Originally Published The Diplomat Published on Aug 24, 2023 Commentaries 0 Hours ago

काही गोष्टींबाबत मतभिन्नता असूनही चीनच्या मुद्द्यामुळे भारत व जपानदरम्यानच्या धोरणात्मक भागीदारीला बळ मिळाले आहे.

वीर गार्डियन २०२३ : भारत-जपान हवाई सरावास प्रारंभ

भारत आणि जपानदरम्यान पहिला हवाई सराव दि. १२ ते २६ जानेवारीदरम्यान होणार आहे. भारतीय हवाई दल आणि जपानचे वायू दल (एअर सेल्फ डिफेन्स फोर्सेस) एकत्रितपणे प्रथमच सराव करणार आहेत. ‘वीर गार्डियन २०२३’ हा सराव जपानमधील हयाकुरी हवाई तळावर होणार आहे.

भारताचे नेतृत्व सुखोई-३०एमकेआय स्क्वाड्रन लिडर अवनी चतुर्वेदी करणार आहेत. अशा प्रकारे महिला लढाऊ वैमानिक परदेशी लढाऊ वैमानिकासह प्रथमच भारतीय लढाऊ स्क्वाड्रनचे नेतृत्व करणार आहे. भारतीय तुकडीत चार सुखोई-३०एमकेआय, दोन सी-१७ आणि एका आयएल-७८ विमानाचा अंतर्भाव आहे, तर जपानचे प्रतिनिधित्व चार एफ-२ एस (अमेरिकानिर्मित एफ-१६चे जपानकडून झालेले विकसन) आणि चार एफ-१५ विमाने प्रतिनिधित्व करतील.

हवाई सराव हा दोन्ही देशांमधील हवाई संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी करण्यात येणार आहे. द्विपक्षीय हवाई सरावामध्ये ‘उभय देशांमधील हवाई दलांच्या लढाऊ सरावांचे आयोजन करण्यात आले असून जटील वातावरणातील या सरावात बहुविध हवाई लढाऊ मोहिमांचा समावेश असेल आणि उभयतांच्या उत्कृष्ट पद्धतींची त्यात देवघेव होईल,’ असे निवेदन भारतीय भारतीय संरक्षण मंत्रालयाने जारी केले आहे. या सरावामुळे ‘दीर्घकाळापासूनचे मैत्रीचे बंध दृढ होतील आणि दोन्ही देशांच्या हवाई दलांमधील संरक्षण सहकार्यासाठीच्या मार्गांमध्येही वाढ होईल,’ असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

द्विपक्षीय हवाई सरावामध्ये ‘उभय देशांमधील हवाई दलांच्या लढाऊ सरावांचे आयोजन करण्यात आले असून जटील वातावरणातील या सरावात बहुविध हवाई लढाऊ मोहिमांचा समावेश असेल.

हा सराव उभय देशांच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांचा समावेश असलेल्या २+२ संवादानंतर जारी करण्यात आलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने आहे. त्यामध्ये दोन्ही बाजूंनी ‘भारत आणि जपान यांच्यामधील सुरक्षा व संरक्षण सहकार्याचा लक्षणीय विस्तार झाल्याचे नमूद केले असून द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सराव बहुस्तरीय पद्धतीने सुरू ठेवण्यास सहमती दर्शवली आहे.’ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान किशिदा फुमिओ यांच्यामध्ये गेल्या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये झालेल्या शिखर परिषदेसह अन्य वेळाही सक्तीविरहीत स्वतंत्र व खुले भारत-प्रशांत क्षेत्र हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या अनुषंगानेही हा सराव होत आहे.

चीनचे आक्रमक धोरण, हिंद व प्रशांत महासागरात चीनच्या वाढत्या हालचाली आणि पुरवठा साखळ्यांना असलेला चीनचा धोका यांबद्दल भारत आणि जपानला सारखीच चिंता आहे. त्यामुळे उभय देश धोरणात्मकरीत्या समान पातळीवर आले आहेत. हे विशेषतः गेल्या तीन वर्षांत लडाखमधील गलवानमधील भारत व चीन यांच्या सीमेवर संघर्ष सुरू आहे. मोदी यांनी प्रमुख स्तरावरील बैठकांच्या निमित्ताने किशिदा यांची गेल्या वर्षभरात दोन वेळा भेट घेतली. हे पाहता यातून उभय देशांच्या संबंधांमधील वाढते धोरणात्मक अभिसरण आणि संबंधातील नव्या उद्दिष्टांची जाणीव झाल्याचे दिसून येते.

रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणासह काही मुद्द्यांवर उभय देशांमध्ये मतभेद असले, तरी चीनमुळे भारत व जपान संबंध आहे तसेच कायम राहण्याची आणि त्यांना गती मिळण्याचीच शक्यता आहे. यामध्ये संरक्षण व सुरक्षा सहकार्य; तसेच आर्थिक सुरक्षा व सुरक्षा पुरवठा साखळीसंबंधित मुद्द्यांवरील सहकार्याचा समावेश असेल. जपानच्या विचारप्रक्रियेत आर्थिक सुरक्षेला नव्याने महत्त्व आल्याचे प्रतिबिंबित झाले आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था या ‘द्विपक्षीय स्तरावरील भक्कम गुंतवणूक आणि बहुविध, लवचिक, पारदर्शी, खुल्या, सुरक्षित व अंदाज बांधण्याजोग्या जागतिक पुरवठा साखळ्यांच्या माध्यमातून चालवल्या जातील. हा पुरवठा आपापल्या देशांमधील नागरिकांना आर्थिक सुरक्षा व प्रगतीस पोषक असेल,’ असे निवेदन दोन्ही नेत्यांनी २०२२ च्या मार्च महिन्यात प्रसिद्ध केले. जागतिक पुरवठा साखळी लवचिकतेवरील शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान मोदी यांनी याच पद्धतीचे वक्तव्य केले. विश्वासार्ह जागतिक पुरवठा साखळीसाठी ‘तीन टी – विश्वसनीय स्रोत (ट्रस्टेड सोर्स), पारदर्शकता (ट्रान्सपरन्सी) आणि वेळेची मर्यादा (टाइमफ्रेम)’ आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी या वेळी केले.

दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था या ‘द्विपक्षीय स्तरावरील भक्कम गुंतवणूक आणि बहुविध, लवचिक, पारदर्शी, खुल्या, सुरक्षित व अंदाज बांधण्याजोग्या जागतिक पुरवठा साखळ्यांच्या माध्यमातून चालवल्या जातील.

भारत आणि जपानने आपापल्या सुरक्षेत आणि राजकीय विचारविनिमयात वाढ केली आहे. शिवाय सशस्त्र दलांच्या वार्षिक सरावांची संख्याही वाढवली आहे. हवाई दलातील सराव हा दोन्ही देशांच्या अन्य द्विपक्षीय सरावांच्या पार्श्वभूमीवर केला जातो. दोन्ही देशांनी २०२२ मध्ये बेळगाव येथील ‘फॉरिन ट्रेनिंग नोड’मध्ये ‘एक्सरसाइझ धर्म गार्डियन-२०२२’ हा सराव केला होता. देशाच्या संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, ‘उभय देशांनी दहशतवादविरोधी मोहिमांमधील आपल्या सध्याच्या कौशल्याची देवाणघेवाण केलीच, शिवाय ड्रोन व ड्रोनविरोधी शस्त्रांसारख्या स्फोटक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी आपल्या अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी या संधीचा उपयोग करून घेतला.’

दोन्ही देशांची नौदले सप्टेंबर महिन्यात बंगालच्या उपसागरात जीआयएमईएक्स-२२ या सहाव्या वार्षिक सागरी सरावात गुंतली होती. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या वर्षीच्या सरावात, ‘दोन्ही नौदलांनी काही अत्यंत कठीण कवायतींचा संयुक्तरीत्या समावेश केला आहे.’ त्यामध्ये ‘अत्याधुनिक पाणबुडीविरोधी लढाऊ कवायती, सस्त्रास्त्र गोळीबार आणि हवाई संरक्षणाच्या सरावांचा समावेश आहे.’ या सरावामध्ये जहाजावरून वाहून नेणारी हेलिकॉप्टर, लढाऊ विमाने आणि पाणबुड्यांचा समावेश आहे.

उभय देशांनी नोव्हेंबर महिन्यात एकत्र येऊन बहुपक्षीय मलाबार कवायतींमध्ये सहभाग नोंदवला. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया व अमेरिकेच्या संरक्षण दलाचाही सहभाग होता. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या सरावाच्या समुद्री टप्प्यामध्ये ‘थेट गोळीबार, जमिनीवर, हवेतील व पाणबुडीविरोधी लढाऊ सराव आणि गनिमी पद्धतींचा समावेश होता.’ शिवाय ‘चारही देशांच्या नौदलांना आंतरकार्यक्षमता एकत्रित करण्यास सक्षम केले आणि आपापली गनिमी कौशल्ये विकसीत करण्यासही वाव दिला.’

सुरक्षाविषयक गोष्टींमध्ये भारताचे असलेले सर्व भागीदार रशियावर कठोर निर्बंध आणण्यासाठी एकत्र आले आहेत आणि त्यांनी संयुक्त राष्ट्रांत रशियाविरोधात मतदानही केले आहे.

संयुक्त लष्करी सरावाव्यतिरिक्त दोन्ही देशांनी राजकीय विचारविनिमय आणि सुरक्षाविषयक संवादातही वाढ केली आहे. उदाहरणार्थ, सप्टेंबर महिन्यात भारतीय तटरक्षक दलाच्या महासंचालकांच्या नेतृत्वाखालील एका गटाने उभय देशांमध्ये तटरक्षक दलाच्या वीसाव्या उच्चस्तरीय बैठकीसाठी टोकिया येथे भेट दिली. आधी उल्लेख केल्यानुसार, सप्टेंबर महिन्यात उभय देशांनी २+२ मंत्रिस्तरावरील बैठकींचे आयोजन केले होते. त्यात संरक्षण व परराष्ट्र मंत्र्यांचा सहभाग होता.

शिंझो आबे यांचे गेल्या वर्षी अकाली निधन झाल्यानंतर, भारत-जपान संबंधांची वाढ मंदावेल, अशी भिती होती. मात्र रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाबाबत मतभेद असूनही मोदी व किशिदा यांच्यात दिलजमाई झाली असल्याचे दिसत आहे. सुरक्षाविषयक गोष्टींमध्ये भारताचे असलेले सर्व भागीदार रशियावर कठोर निर्बंध आणण्यासाठी एकत्र आले आहेत आणि त्यांनी संयुक्त राष्ट्रांत रशियाविरोधात मतदानही केले आहे. भारताने अद्याप तसे केलेले नाही आणि संयुक्त राष्ट्रांच्या मताकडे कानाडोळा करण्याचाही भारताचा पवित्रा आहे. कारण रशियाशी स्वतंत्र संबंध ठेवणे भारताला अधिक योग्य वाटते. त्यामुळे किमान काही काळ्यापुरता का होईना हा मतभेदाचा मुद्दा बनू शकला असता. मात्र चीनमुळे भारत-जपान धोरणात्मक भागीदारीला बळ मिळालेले आहे. भारत-प्रशांत क्षेत्र आणि त्या पलीकडे चीन ही आक्रमक शक्ती कायम राहिली आहे, हे पाहता भारत आणि जपानदरम्यान व्यापक सामरिक व लष्करी समन्वय, परस्पर सहकार्य आणि कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी सज्जता ही उद्दिष्टे असतील.

हे भाष्य मूळतः  The Diplomat मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.