Originally Published DECEMBER 26 2018 Published on Jul 26, 2023 Commentaries 0 Hours ago

सिरियातून अमेरिकेची पाठ वळताच, तेथे कुर्दिश, तुर्की लोकांचे फावणार आहे. ट्रम्प यांच्या सैन्य परत बोलावण्याच्या निर्णयामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीचा हा आढावा.

सीरियातून अमेरिकची पाठ वळल्यानंतर…
सीरियातून अमेरिकची पाठ वळल्यानंतर…

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियामधून आपल्या सैन्याला परत बोलावण्याचा जो निर्णय जाहीर केला आहे त्याबद्दल जगभरातून टोकाच्या आणि संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ट्रम्प सरकारचे संरक्षण सचिव जिम मॅटिस आणि इस्लामिक स्टेट विरुद्ध लढण्यासाठी उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय आघाडीमधले अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी ब्रेट मॅकगर्क या दोघांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामागे नाही म्हटले तरी ट्रम्प यांचा हा निर्णय कारणीभूत आहे. फ्रांसचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी, ट्रम्प प्रशासनाचा हा निर्णय अतिशय खेदजनक असल्याचे बोलून दाखवले आहे. तसेच दहशतवादाच्या विरोधात एकत्र आलेले अमेरिकेचे मित्र देशही याबद्दल टीका करताना दिसत आहेत.

हे सगळे देश हे विसरत आहेत की, सीरियातले अमेरिकन सैन्य मायदेशी बोलावण्याबाबत ट्रम्प यांनी मार्च २०१८ मध्येच जाहीर विधान केले होते. त्यावेळी सौदी अरेबियासारख्या मध्यपूर्वेतल्या अमेरिकेच्या मित्रदेशांनी आणि सल्लागारांनी ट्रम्प यांना पटवून दिले होते की, इस्लामिक स्टेट ISIL चा निर्णायक खातमा अजून झालेला नाही. म्हणूनच ट्रम्प यांनी आणखी काही काळासाठी तो निर्णय बाजूला ठेवला होता.

एका बाजूला जाणकार आणि सहकारी देशांचा असा रोख आहे की, ट्रम्प यांनी सीरियन युद्धाबद्दल कधी सुसंगत धोरणाचा अवलंब केलाच नाही. पण याची दुसरी बाजू पाहिली तर दिसून येईल की, सीरियन संकट कायमचे निकालात काढण्याबाबत ट्रम्प यांनी कधीच फारशी आस्था दाखवलेली नाही.

याला पुष्टी या परिस्थितीतून मिळते की, गेल्या काही वर्षांपासून इस्लामिक स्टेट ISIL ची पकड सीरियातून खिळखिळी करण्याच्या व्यतिरिक्त तिथली राजकीय घडी नीट बसवण्यामध्ये अमेरिकेने फारसा पुढाकार घेतलेला दिसत नाही. अर्थात या प्रदेशामधला इराणचा दबदबा कमी करणे हे मात्र अमेरिकेचे छुपे उद्दिष्ट राहिलेलेच आहे, मात्र सीरियाचा उपयोग करून इराणशी डावपेच खेळण्यास अमेरिका फारशी उत्सूक उरलेली नाही.

या कारवाईतले अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी ब्रेट मॅकगर्क यांनी आपला राजीनामा सादर करताना सहका­यांना लिहिलेल्या पत्रामध्ये ट्रम्प यांच्या निर्णयावर स्पष्टच सांगितले आहे की, यामुळे आपले सहयोगी देश पूर्णपणे गोंधळले आहेत. बहुतांश विश्लेषकांची मान्यता आहे की, ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे इराणला मोकळे रान मिळेल. आता अफगाणिस्तान पासून थेट भूमध्य समुद्रापर्यंत, इराणच्या शिया पंथाची चंद्रकोर तळपण्यास वाव मिळणार आहे. तर काहींचे सांगणे आहे की, रशियासाठी या सगळ्या प्रदेशात दबदबा निर्माण करण्याची आयती संधी चालून आली आहे.

या सगळ्या विश्लेषकांचे या गोष्टीकडे साफ दुर्लक्ष झाले आहे की, अमेरिकेची पाठ वळताच, सीरियामध्ये कुर्दिश आणि तुर्की लोकांचेच फावणार आहे. बाकी सगळेजण हे नुसते बघ्याच्याच भूमिकेत असतील किंवा नाही तर पुढच्या काळात त्यांनाही इथून काढता पाय घ्यावा लागणार आहे.

आजघडीला सीरियामध्ये कोणता प्रदेश कोणाच्या अधिपत्याखाली आहे ते पुढच्या नकाशात पहा….

सीरियातले स्वायत्ततावादी कुर्दिश लोक, सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस (SDF) च्या झेंड्याखाली एकवटले आहेत. यात महत्त्वाची भूमिका बजावणारा गट आहे तो म्हणजे उत्तर सीरियाच्या कुर्दिश लोकांच्या संरक्षणासाठी काम करणारा People’s Protection Units अर्थात YPG गट. 1980 सालपासून तुर्कस्तानात वसणा­या कुर्दिश जनतेच्या स्वायत्ततेसाठी सतत विद्रोह करत असणा­या कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी (PKK) शी संलग्न असलेला असा हा सिरियामधला स्वायत्ततावादी गट आहे. तुर्की गणराज्य, अमेरिका आणि युरोपियन युनियन यांनी PKK ला अतिरेकी संघटना म्हणून जाहीर केले आहे. जरी YPG ची उत्पत्ती PKK मधूनच झालेली असली तरी वॉशिंग्टन कडून त्या लोकांनाही पाठिंबा मिळतो आहे. कारण की दोघांचाही समान शत्रू असलेल्या इस्लामिक स्टेट ISIL शी शिताफीने सामना करण्यासाठी दोघांनाही परस्परांचे सहकार्य मिळत आले आहे. इस्लामिक स्टेटला या युद्धात सीरियातल्या ज्या प्रदेशांमध्ये मात खाऊन मागे परतावे लागते आहे असे सगळे प्रदेश आता YPG च्या अखत्यारीत आले आहेत आणि त्यामध्ये, पूर्वी कुर्दांच्या ऐवजी अरबी प्रजेचे वर्चस्व असलेल्या अशा मनबिल आणि रक्का सारख्या अनेक शहरांचा समावेश आहे.

या YPG च्या अधिपत्याखाली सध्या तर सीरियाचा जवळपास एक तृतीयांश प्रदेश आलेला आहे. गेल्या काही वर्षांच्या सीरियन युद्धाच्या दरम्यान इस्लामिक दहशतवादी गटांशी झुंज देऊन त्यांनी हा प्रदेश काबीज केला आहे. आणि मुख्य म्हणजे सीरियातला अतिशय उपयुक्त असा हा साधनसंपन्न प्रदेश आहे.

सीरियाचे विद्यमान प्रमुख बशर अल असाद यांनी सैन्याचा वापर करून विद्रोही गटांचे सध्याचे शेवटचे महत्त्वाचे केंद्र असलेले इदलिब शहर पुन्हा जिंकून जरी घेतले तरी सीरियाला एक सार्वभौम देश म्हणून उभे करण्यासाठी धान्य आणि इंधन तेलाची गरज भागवायची असल्यास YPGच्या अधिपत्याखालच्या प्रदेशावरच अवलंबून रहावे लागणार आहे.

अर्थात युद्धसमाप्तीनंतरच्या सत्ता समीकरणांची जुळवाजुवळ करण्यासाठी आणि आपल्या आंशिक स्वायत्ततेला असद सरकारची मान्यता मिळवण्यासाठी YPG कडून अनेक प्रतिनिधिमंडळे दमास्कसला जाऊन आलेली आहेत. मात्र या सगळ्यात पुष्कळ वेळ जाण्याची शक्यता आहे आणि तरीही हे समाधान तात्पुरतेच असेल. कारण की असद यांना कुर्दिश स्वायत्ततावाद्यांशी असा कोणताही समजुतीचा करार करण्याची कसलीही घाई नाही.

एकदा अमेरिकेची पाठ फिरली की हे सगळे गट चांगलेच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण उत्तर सीरियामधल्या कुर्दांच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रदेशांवर तुर्कस्तानकडून सैनिकी आक्रमणाची दाट भीती आहे. तेव्हा असद सरकारशी तत्पूर्वीच समझौता झाला तर YPG ला हवाच आहे. त्यामुळे कुर्दिश स्वायत्ततावादी आणि असद सरकार यांच्यात उशिरा का होईना पण परस्पर समझौता होईल अशी अनेकांना आशा आहे.

तरीही तुर्कस्तान आणि सीरियाच्या सीमाभागात दोन्हीकडून कुर्दिश लोकांच्या एकवटलेल्या वस्तीमुळे, पुढे काय घडू शकते याची कल्पनाच केलेली बरी. तुर्कस्तानला आपल्या सीमाभागाला अगदी लागून असलेल्या सीरियन प्रदेशात YPG मार्फत PKK ने चालवलेला स्वायत्त कुर्दिस्तानचा प्रयोग बिलकुल पसंत नाही. मागच्या फेब्रुवारीमध्ये तुर्कस्तानच्या सैन्याने वायव्य सीरियामध्ये कुर्दिश स्वायत्ततावाद्यांचे वर्चस्व असलेल्या आफरिन शहरामध्ये घुसून तो प्रांत स्वत:कडे हिसकावून घेतला आणि अमेरिका व रशियाने तुर्कस्तानला या कारवाईसाठी पाठिंबाच दिला होता. या घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती कुर्दिश स्वायत्ततावाद्यांना सतत लागून राहिलेली आहे.

अमेरिका सीरियामधून सैन्य परत नेणार असल्याची खबर लागताच तुर्क आणि कुर्द यांच्यात, सीरियामधल्या मनजिब शहरात जबर तणाव निर्माण झाला. अध्यक्ष असद यांच्या मध्यस्तीमुळे सध्या तरी तणाव निवळला असला तरी या युद्धजन्य परिस्थितीवर कायमचा तोडगा निघण्याची सध्या तरी शक्यता दिसत नाही. सीरियाचे अध्यक्ष म्हणून असद ही चुरशीची वर्चस्वाची लढाई पहात वर्तुळाच्या बाहेर उभे आहेत आणि कुर्द आणि तुर्क आपापल्या सीमा सांभाळत हे वर्षानुवर्षांचे रक्तरंजित युद्ध पुढेही चालवत आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.