Author : Anurag Awasthi

Published on Jul 28, 2023 Commentaries 0 Hours ago

आगामी काळात भारत संशोधन आणि विकास केंद्र बनावा, याकरता सेमीकंडक्टर कार्यक्षेत्रात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या गटांना प्रशिक्षित आणि विकसित करण्याची गरज आहे.

चिप उद्योगाचे कौशल्य आणि मानवी संसाधनाची प्रगती

‘कौशल्य म्हणजे एखाद्या विशिष्ट वेळेत आणि जोमाने प्रभावी अंमलबजावणी करीत निर्धारित परिणाम मिळवण्यासाठी काम करण्याची शिकून आत्मसात केलेली क्षमता,’ अशी कौशल्याची उत्तम व्याख्या केली जाऊ शकते. ‘डिजिटल क्रांती’ आणि ‘इंडस्ट्री ४.०’ बद्दल बरेच काही बोलले गेले आहे, सध्या सुरू असलेल्या गृहितकांमधील मूलभूत बदलांच्या केंद्रस्थानी चिप आहे. चिपची रचना आणि उत्पादन याचा मुख्य आधार हा कौशल्य-विकासामध्ये आहे. ही कौशल्याची तफावत केवळ आपल्या देशासाठीच नाही, तर उर्वरित जगासाठीही लागू आहे. याला काही वेळा ‘प्रतिभेची कमतरता’ असेही संबोधले जाते आणि वाढती मागणी, भू-राजकीय बदल व कोविड-१९ साथीनंतरच्या जागतिक व्यवस्थेतील हे एक स्पष्ट वास्तव आहे. हा निर्णायक पैलू देशातील सरकार, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांनी अचूक ओळखला आहे आणि त्याला महत्त्व दिले आहे.

सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स प्रणाली

सेमीकंडक्टर्स आणि इलेक्ट्रॉनिक्स प्रणाली विकास व देखभाल (इएसडीएम) यांमधील कौशल्य प्राप्त होण्याकरता समज, अंतर्दृष्टी आवश्यक आहे आणि म्हणून ते मूलभूत कामगिरीचा स्तर प्रमाणित करणाऱ्या प्रमाणपत्रांच्या पलीकडे जाते. या क्षेत्रात तज्ज्ञांची टंचाई वाढत आहे आणि म्हणूनच निधी व गुंतवणुकीच्या व्यतिरिक्त अनेक दीर्घकालीन उपाय योजणे आवश्यक आहे. या टंचाईचा थेट विपरित परिणाम आगामी काळात उद्योगाच्या वाढीवर होईल. जगातील तिसरी सर्वात मोठी नवउद्योजकतेसाठीची परिस्थितिकी आणि एक अब्जाहून अधिक ग्राहकांचा आधार असलेला, इंटरनेट वापरकर्त्यांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला, वित्तीय तंत्रज्ञानातील बदलांशी जुळवून घेणारा जगातील अग्रगण्य देश म्हणून, भारत भविष्यातील डिजिटल सत्ताकेंद्र बनण्यासाठी सज्ज आहे. भारताने फॅब्रिकेशन प्रकल्प आणि कंपाऊंड सेमीकंडक्टर्स बनवण्यास सुरुवात करताना आणि धोरणाच्या ठोस चौकटीसह इलेक्ट्रॉनिक्स व्यवस्थेची रचना आणि उत्पादन (इलेक्ट्रॉनिक्स प्रणाली विकास आणि देखभाल) उद्योगाचा उच्च विकास दर स्वीकारत असताना कौशल्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

या क्षेत्रातील तज्ज्ञांची टंचाई वाढत आहे आणि म्हणूनच निधी व गुंतवणुकीच्या व्यतिरिक्त अनेक दीर्घकालीन उपाय योजणे आवश्यक आहे. या टंचाईचा थेट विपरित परिणाम आगामी काळात उद्योगाच्या वाढीवर परिणाम होईल.

एक स्तरीय दृष्टिकोन

  • पहिल्या स्तरात, जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये कुशल कामगार उपलब्ध करून देण्यात निर्णायक भूमिका बजावत असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) कर्मचार्‍यांचे सेमीकंडक्टर आणि त्यातील घटक, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, आयटी हार्डवेअर पीसीबी डिझाइन, कम्युनिकेशन आणि ब्रॉडकास्टिंग तसेच औद्योगिक ऑटोमेशन विषयीची कौशल्ये विविध अभ्यासक्रमांद्वारे विकसित करणे आवश्यक आहे. हा स्तर मनुष्यबळ-केंद्रित आहे आणि कॉर्पोरेट्स, उद्योग संघटना व ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ निधीद्वारे वित्तपुरवठा केला जाऊ शकणाऱ्या खासगी संस्थांशी याचा संबंध असू शकतो. ऑनलाइन किंवा ऑफलाइन स्वरूपात शिकवला जाणारा नियुक्त परंतु अद्ययावत अभ्यासक्रम हा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या गटांना प्रशिक्षित आणि विकसित करण्याचा पायाभूत आधार असू शकतो. या स्तरात अंतर्निहित गतिशीलता आहे व याद्वारे मोठ्या लोकसंख्येला कौशल्य प्राप्त होऊ शकते आणि याचाच वापर ‘प्रशिक्षकांचे प्रशिक्षण’ उपक्रमासाठी केला जाऊ शकतो, ज्यात प्रशिक्षित मनुष्यबळ नवीन प्रवेशकर्त्यांचे प्रशिक्षण अखंडपणे वाढवू शकेल. या क्षेत्रात पुरोगामी विचार आणि कृती होत असताना, केंद्रीकृत समन्वयाने भविष्यात ही शक्ती द्विगुणित होईल.
  • दुसऱ्या स्तरात अभियांत्रिकी आणि इतर विषयांमधील पदवीपूर्व अभ्यासक्रमांचा समावेश आहे, ज्या अभ्यासक्रमांची प्रामुख्याने विद्यार्थी निवड करतात. दरवर्षी १५ लाख अभियांत्रिकी पदवीधरांची भर पडत असते आणि गेल्या दोन दशकांत माहिती- तंत्रज्ञान क्षेत्राच्या झालेल्या भरभराटीमुळे, मायक्रोइलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल आणि मटेरियल इंजिनीअरिंग या क्षेत्रातील नोकऱ्यांकरता फार कमी पदवीधर उपलब्ध आहेत. याकरता दोन प्रमुख युक्तिवाद म्हणजे, संगणक विज्ञान आणि संबंधित विषयांच्या तुलनेत या विषयांविषयी समाजात जागरूकता कमी असणे आणि नोकरीच्या पर्यायांची उपलब्धता नसणे हे होय. म्हणूनच, इलेक्ट्रॉनिक्स प्रणाली विकास व देखभाल आणि सेमीकंडक्टर यांच्या अवकाशातील कौशल्य अंतर कमी करण्यासाठी या दोन पैलूंवर लक्ष देणे महत्त्वाचे आहे. नवीन शैक्षणिक धोरण हे विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित (स्टेम) विषयांसह एक नाविन्यपूर्ण सुधारणा आहे आणि तीच भविष्यात क्षमता बांधणीचा आधार असेल. नामांकित संस्थांद्वारे चिप रचनेचा व्यावहारिक अनुभव असलेल्या पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी लघु पदविका अभ्यासक्रम हादेखील या स्तराचा एक भाग असू शकतो.
  • तिसर्‍या स्तरामध्ये विशेषीकरण (स्पेशलायझेशन) अथवा पदव्युत्तर पदवीचा समावेश आहे, ज्याकडे खूप कमी विद्यार्थी वळतात. याची क्षमता वाढवणे व प्राध्यापकांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. पुढील दशकात मार्गदर्शन आणि अत्याधुनिक संशोधन व विकास सुविधा देणारे मजबूत शैक्षणिक जोडसंबंध निर्माण करण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. या स्तरासाठी केंद्रित निधीची आवश्यकता असेल, तसेच शिक्षणासाठी भारताची निवड करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जागा आणि पायाभूत सुविधा सुनिश्चित करण्यासाठी एक व्यवहार्य परिस्थितिकी तयार करणे आवश्यक आहे.
  • चौथ्या स्तरात भारताला संशोधन आणि विकास केंद्र कसे बनवता येईल, याच्या गतिशीलतेकडे लक्ष देता येईल. रासायनिक व सामग्री यांतील रचना आणि क्षमतांमध्ये जागतिक पुरवठा साखळी जोडण्याकरता अनेक वर्षांचे कौशल्य आपल्यापाशी आहे. यामध्ये जागतिक दर्जाच्या चाचणी प्रयोगशाळांचा समावेश असेल, ज्या सध्याच्या प्रयोगशाळांवर बनवल्या जाऊ शकतात तसेच पर्याय म्हणून विविध प्रारूपांसह नवीन पद्धतीचा अवलंब करू शकतात. आंतरराष्ट्रीय विश्‍वासू भागीदारांना प्रशिक्षित करण्यासाठी प्रोत्साहन देणे हाही एक पर्याय आहे, ज्याचा शोध घेतला जाऊ शकतो. निर्णयाच्या लाभाचे मोजमाप करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रक्रियेचे काळजीपूर्वक विश्लेषण केल्यानंतर, उद्योगाद्वारे प्रतिभेची देवाणघेवाण अथवा संयुक्त कर्मचारी विकास उपक्रम याचाही विचार केला जाऊ शकतो.

संकटकाळातकाही राष्ट्रे सेमीकंडक्टर कार्यक्षेत्रात त्यांच्या स्वत:च्या कुशल कर्मचाऱ्यांचे उच्च मूल्य आकारून प्रशिक्षित मनुष्यबळाची कृत्रिम टंचाई निर्माण करू शकतात.

भविष्यातील सत्तेचा खेळ

जग सतत बदलत असते. कोविड-१९ साथीच्या काळात गतिमान लस पुरवठा साखळींनी हे सिद्ध केले की, कुशल मनुष्यबळ हे उच्च मूल्यावर उपलब्ध होईल आणि त्याची किंमत मोजावी लागेल. भविष्यात, संकटकाळात, काही राष्ट्रे सेमीकंडक्टर कार्यक्षेत्रात त्यांच्या स्वतःच्या कुशल कर्मचाऱ्यांवर उच्च मूल्य आकारून, प्रशिक्षित मनुष्यबळाची कृत्रिम टंचाई निर्माण करू शकतात. त्याचप्रमाणे काही राष्ट्रे या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाचा वापर त्यांच्या स्वतःच्या अजेंड्यासाठी आणि हितसंबंधांसाठी करू शकतात. क्षमता निर्माण करण्यास बराच वेळ लागतो, मात्र हेतू रातोरात बदलू शकतात.

भारत सध्या भविष्यात विविध प्रकारच्या अॅप्लिकेशन्ससाठी वैविध्यपूर्ण उत्पादनांच्या निर्मितीच्या श्रेणी आणि गतीच्या वळणबिंदूवर उभा आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स, चिप रचना आणि उत्पादन क्षेत्रांकरता अत्यंत कुशल कामगारांची एक मजबूत परिस्थितिकी तयार करणे अत्यावश्यक आहे. कर्मचार्‍यांचे कौशल्य हाच ‘आत्मनिर्भर भारता’चा गाभा आहे.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.