Author : Cahyo Prihadi

Published on Jun 10, 2020 Commentaries 0 Hours ago

अमेरिकेत एकीकडे कोरोनाच्या साथीला तोंड देणे सुरू आहे, दुसरीकडे वर्णद्वेषाविरुद्ध आंदोलन पेटलेय आणि हे सारे सुरू असताना अमेरिकेत निवडणुकीची तयारी सुरू आहे.

अमेरिकेतल्या वर्णद्वेषाचा जागतिक अन्वयार्थ

Source Image: aa.com.tr

अमेरिकेतल्या मिनिआपोलिस या शहरात, जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या श्वेतवर्णीय पोलिसांकडून झालेल्या हत्येचे पडसाद अमेरिकेसह जगभर उमटत आहेत. वंशद्वेषाच्या या घटनेचा निषेध जगभर होतो आहे. पॅरीस, लंडन, बर्लिन, सिडनी, कायरो, हाँगकाँग, माद्रीद, लुझान, प्रिटोरिया, मास्ट्रिच, एडिंबरा, लिस्बन इथे झालेल्या निदर्शनांनी हे स्पष्ट केले की, हा प्रश्न फक्त अमेरिकेचा नाही.

जिथेजिथे निषेध झाला त्या अनेक देशांत कृष्णवर्णीयांची लोकसंख्या अगदी कमी आहे किंवा तिथे कृष्णवर्णियांना वाईट वागवल्याच्या घटनाही घडलेल्या नाहीत. मग असे का होते आहे? अमेरिकेतील घटनेचा जगभरच्या लोकांना का निषेध करावासा वाटतो आहे? प्रत्येक ठिकाणी तेथील स्थानिक वर्गसंघर्ष या आंदोलनाच्या निमित्ताने जगापुढे येत आहे.

हे सारे घडताना, जग एकीकडे कोरोनाच्या साथीला तोंड देतेय आणि दुसरीकडे अमेरिकेसारख्या देशात निवडणुकीची तयारी सुरू आहे. सारे जग एका अभूतपूर्व घुसळणीतून चालले आहे. या वर्षी होणारी अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक ही महत्त्वाची ठरणार आहे. अमेरिकेतील अनेक घटना या उद्या जगाच्या इतिहासावर परिणाम करणार आहेत. या साऱ्या घटनांचा अभ्यास करताना, अमेरिका आणि जगभराची स्थिती यांच्यात अनेक समान धागे सापडत जातात. या धाग्यांची उकल करत, अमेरिका आणि त्याच्याभोवती गुंतलेल्या जागतिक मुद्द्यांवर भाष्य करण्याचा प्रयत्न करणारी ही लेखमालिका…

।।

जॉर्ज फ्लॉईड पहिलाच नाही

कृष्णवर्णियांना अमेरिकेत दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल असंतोष व्यक्त करणारे आंदोलन साऱ्या जगात उफाळून आले आहे. पण ही काही पहिलीच घटना नाही. याआधीही अशा घटना कित्येक वर्षे घडत आहेत. आजवर यासंदर्भात अनेक पुस्तके लिहिली गेली, भाषणे केली गेली, सिनेमे आले आणि असे खूप काही घडले. पण अद्यापही हे वर्णद्वेषाचे हे भूत संपल्या संपत नाही. त्यामुळे जॉर्ज फ्लॉईडचा मृत्यू हे फक्त आत्ताचे निमित्त आहे. काळाच्या उदरात डोकावले तर खूप काही सापडत जाते. ते समजून घेणे, उद्याची दिशा कळण्यासाठी महत्त्वाचे आहे.

।।

जॉर्ज फ्लॉईडचा खून मिनीआपोलिस पोलिसानी केला. फ्लॉईडने वीस डॉलरची खोटी नोट दिली असा आरोप दुकानदाराने केला. नोट खरी की खोटी याची साधी चौकशी पोलिसांनी केली नाही. खोटी नोट दिली असेल तर, ती बदलून द्या असे सांगितले जाते, फार तर ती कुठून आणलीत असे विचारले जाते. त्यासाठी कोणाला अटक केली जात नाही. पोलिसांनी फ्लॉइडला हातकड्या घातल्या. पकडताना, हातकड्या घालताना फ्लॉईडने विरोध केला नव्हता. तरीही पोलिसाने त्याला खाली पाडले, त्याच्या मानेवर गुडधा दाबला. फ्लॉईड ओरडत होता “मी गुदरमतो आहे, मी मरतो आहे.” पोलिसाने गुडघा उचलला नाही… आणि फ्लॉईड मेला.

फ्लॉईड मारला गेला त्याआधी १२ तास न्यू यॉर्कमधे एका गोऱ्या बाईने एका माणसाबद्दल तक्रार केली की, तो आफ्रिकन माणूस तिला जिवे मारण्याची धमकी देतोय अशी. लगोलग तेथे पोलीस हजर झाले. तो कृषणवर्णीय माणूस त्या गोऱ्या बाईला येवढेच सांगत होता की, त्यांनी त्यांच्या पाळीव कुत्र्याच्या गळ्यात पट्टा बांधावा, तसा कायदाच आहे. पोलिस हजर झाले, काहीही ऐकून न घेता त्या कृष्णवर्षीय माणसाला त्यांनी अटक केली. मिनिआपोलिसमधेच २०१५ मधे एका कृष्णवर्णीय व्यक्तीला विनाकारण गोळ्या घालून ठार मारले, तेव्हा मिनिआपोलिस आठवडाभर बंद होते.

अमेरिकेत सुमारे २४ कोटी श्वेतवर्णीय आहेत, तर साधारणतः ४ कोटी कृष्णवर्णीय आहेत. २०१५ ते २०२० या काळात पोलिसांकडून मेलेल्या श्वेतवर्णीयांची संख्या २३८५ आहे, तर कृष्णवर्णीयाची १२५२ आहे. लोकसंख्येच्या तुलनेत ही आकडेवारी तपासून पाहिली तर असे दिसते की, दर दहा लाखात १२ श्वेतवर्णीय मारले जातात आणि दर दहा लाखात ३० कृष्णवर्णीय मारले जातात.

।।

कलीफ ब्राऊडर, वय वर्षे १६, ब्राँक्समधे रहाणारा. कृष्णवर्णीय, अनाथ, आफ्रिकन अमेरिकन. एका अनाथालयात रहात असे. अनाथालय एका महिलेने चालवले होते. ती महिला म्हणजे कलीफची आई. १५ मे २०१० च्या रात्री ब्राऊडर एका पार्टीनंतर मित्रांसोबत घरी परतत होता. ते ईस्ट १८६ स्ट्रीटवर पोहचले असताना, समोरून एक पोलिसांची गाडी आली. समोर उभी राहिली. पाठोपाठ आणखी गाड्या आल्या. ब्राऊडरच्या तिन्ही बाजूनी उभ्या राहिल्या.

त्यांच्या लकाकत्या दिव्यांमुळे ब्राऊडरचे डोळे दिपले. पोलिस ब्राऊडरला म्हणाले ” एका माणसाने तक्रार केलीय की, तू त्याला लुबाडलय.” ब्राऊडर म्हणाला ” मी कोणालाही लुबाडलेले वगैरे नाहीये. मी एका पार्टीतून आताच बाहेर पडलोय. हवे तर माझी झडती घ्या.” पोलिसांनी झडती घेतली. ब्राऊडर आणि त्याच्या मित्राकडे काहीही सापडले नाही. पोलिस गाडीकडे गेला आणि गाडीत बसलेल्या माणसाशी काही तरी बोलला. तक्रार करणारा माणूसच गाडीत होता. पोलिस परत ब्राऊडरकडे आला आणि म्हणाला “तक्रारदार म्हणतोय की, आज नव्हे पंधरा दिवसांपूर्वी त्याला लुटले गेलेय.”

पंधरा दिवसांपूर्वी लुटलेल्या गोष्टी आता कशा सापडणार? पोलिसानं ब्राऊडरला हातकड्या घातल्या. “मला कशासाठी पकडलेय? माझा गुन्हा काय?” ब्राऊडरने विचारले. “तुला आम्ही चौकीत घेऊन जातोय. बहुदा तुला नंतर सोडून देऊ, तू घरी जाऊ शकशील.” मित्रासह ब्राऊडर पोलीस चौकीत होता. रात्रभर पोलीस चौकीत काढल्यावर कोर्टात नेण्यात आले. तिथे पोलिस अधिकारी आणि सरकारी वकिलाने ब्राऊडरची जबानी घेतली. ब्राऊडरने गुन्हा नाकबूल केला. ब्राऊडरच्या मित्राला सोडून देण्यात आले.

काही महिन्यांपूर्वी अगदी असेच घडले होते. ब्राऊडर एका डिलिव्हरी व्हॅनला लटकून काही अंतर गेला होता. गंमत केली होती. पोलिसांनी त्याला पकडले आणि त्याच्यावर चोरीचा आरोप ठेवला. व्हॅनला लटकणे आणि चोरीचा काय संबंध? पोलिसांनी ब्राऊडरला कोर्टात उभे केले. कोर्टाने ब्राऊडरचे म्हणणे ऐकून घेतले नाही, त्याने गुन्हा केलाय असा निकाल दिला. बालवयात असल्याने त्याला गुन्हेगार जाहीर न करता प्रोबेशनवर, परीक्षाकाळाचा उमेदवार म्हणून सोडून दिले होते.

या वेळी कोर्टाने त्याचा मागला रेकॉर्ड पाहून अजून परीक्षा काळात असल्यानं तीन हजार डॉलरच्या जामिनावर सोडा, असा निकाल दिला. मुळात गुन्हाच घडलेला नसतांना जामीन देण्याचा प्रश्नच कुठे येतो? तीन हजार डॉलर ही रक्कम भरायची कोणी? अनाथ मुलाकडं पैसे कुठून येणार? अनाथालयातली आई ते पैसे आणणार कुठून?  वकील देणेही शक्य नव्हते.

ब्राऊडरला कोर्टाच्या बाहेर काढून एका बसमधे बसवण्यात आले. बस निघाली. काही अंतर गेल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला समुद्र होता. बस रायकर्स तुरुंगात पोचली. एका मोठ्या हॉलमधे चाळीस कैदी मुलांबरोबर ब्राऊडरची व्यवस्था. प्रत्येकाला एक कॉट आणि प्लास्टिकची बादली. तुरुंगातून मिळणाऱ्या साबणाने कपडे धुवायचे आणि कॉटच्या टोकाच्या लोखंडी दांडीवर वाळत घालायचे. ओल्या कपड्यामुळे कॉटचे दांडे गंजलेले. कपड्यांना गंजाचे डाग पडायचे. अन्न मिळायचे, तेही अपुरे आणि निकृष्ट.

ब्राऊडरची आई आठवड्यातून एकदा तुरुंगात येई. मळलेले कपडे घेऊन जाई आणि धुतलेले कपडे देई. खाण्यासाठी पदार्थ देई आणि त्याला चांगले खायला मिळावे यासाठी तुरुंगाधिकाऱ्यांकडे पैसे देऊन जाई. तुरुंगात दोन चार भाई होते. तुरुंगावर त्यांची हुकूमत चाले. ते ब्राऊडरचे पैसे हिसकून घेत, त्याचे पदार्थ खाऊन टाकत. एकदा एक भाई पैसे हिसकावून घेत असताना ब्राऊडरने अटकाव केला.  मारामारी झाली. जेलर आला. ब्राऊडरची रवानगी एकांत कोठडीत झाली.

दोन आठवड्यांनी ब्राऊडर पुन्हा साध्या तुरुंगात गेला. कोर्टात तारीख होती. ब्राऊडरने वकील देण्याचा प्रश्नच नव्हता. एक सार्वजनिक वकील त्याच्या वतीने उभा होता. त्या वकिलाला सरकार अगदीच कमी पैसे देत असे. त्याच्याकडे फार खटले असत. त्याला काम जमत नसे. तो तारीख मागे. एक आठवड्यानंतरची तारीख मागितली तर कोर्ट त्याला दीड महिन्यानंतरची तारीख देत असे. तारीख पडून ब्राऊडर पुन्हा तुरुंगात.

न्यू यॉर्क राज्याच्या कायद्यानुसार कोणताही खटला सहा महिने उभा राहिला नाही, तर आरोपीला सोडून द्यायला हवे. सरकारतर्फे तयारी झालेली नसल्याने कोर्ट जेव्हा सुनावणी पुढं ढकलते तेव्हा सहा महिन्यांची तरतूद लागू होत नाही. त्यामुळे दर वर्षी तीन चार हजार कैदी तुरुंगात तुंबून पडतात. खटले चालवण्यासाठी पुरेसे न्यायाधीश न्यू यॉर्कमधे नाहीत. पोलिस धडाधड लोकाना पकडतात परंतु खटले चालू शकत नाहीत. तारखा पडत होत्या. दोन वर्ष त्यात गेली. एका तारखेला ब्राऊडर कोर्टात गेला तेव्हां सरकारी वकीलाने सुचवले ” गुन्हा कबूल केलास तर फक्त साडेतीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होईल. आपण निर्दोष आहोत असे पालुपद चालू ठेवलेस, तर खटला हरशील आणि १५ वर्षाची शिक्षा होईल.”

ब्राऊडर तयार झाला नाही. पुन्हा तुरुंगात रवाना झाला. तुरूंगात गेल्या गेल्या पुन्हा एकांत कोठडीत रवाना. एकांत कोठडीवर लक्ष ठेवणारे जेलर संधी मिळाली की, कैद्यांना धोपटून काढत. काही जेलर विकृत असत. एकदा एका जेलरला हात साफ करायची खुमखुमी आली. तो ब्राऊडरकडे आला आणि म्हणाला ” मला मारामारी करायचीय. ये. “

मारामारी म्हणजे काय? ब्राऊडरला ठोसे मारायची परवानगी नव्हती. ब्राऊडरच्या हातात बेड्या असत. जेलर एकतरफी ब्राऊडरला ठोसे मारायचा. ब्राऊडरचे नाक फुटले. कपाळावर आणि जबड्याला जखमा झाल्या.  रक्तबंबाळ झालातरी जवळपास तो बेशुद्ध पडेपर्यंत जेलरने ब्राऊडरला बडवले.

तुरुंगात शिक्षण घ्यायची सोय होती. मोठ्या हॉलमधे असताना पुस्तके आणि उत्तरे लिहिण्यासाठी वह्या पुरवल्या जात. एकांत कोठडीत आठवड्यातून एकदा पुस्तके दरवाजाच्या फटीतून आत सरकवली जात आणि चार दिवस गेल्यानंतर उत्तरे लिहिण्यासाठी वही, कागद सरकवले जात. तुरुंगातले फारसे कोणी या सोयीचा वापर करत नसे. कैद्यांना आपसात मारामाऱ्या करणे, सेक्सच्या गोष्टी करणे यातच रस असे. ब्राऊडरला मात्र वाचायची सवय होती. तुरुंगात जाण्यापूर्वी शाळेतही चांगला विद्यार्थी अशी त्याची ख्याती होती. वाचन आणि परीक्षा देण्याची सोय असली तरी तुरुंगाधिकारी तिथे लक्ष देत नसत. ब्राऊडर ओरड करून पुस्तके मागवी, परिक्षा द्यायचीय म्हणे. एकदा पुस्तके आली नाहीत म्हणून ब्राऊडरने चौकशी केली. तर जेलरने त्याला बोलावून घेऊन बेदम मारले.

रक्तबंबाळ केल्यानंतर जेलर म्हणाला ” हे बघ. तू जखमी झालायस. दवाखान्यात जाऊन तू तक्रार नोंदवून औषधे घेऊ शकतोस. परंतु नंतर तुला कसल्याशा गुन्ह्यात गुंतवणून आणखी एकांत कोठडी आणि नव्या आरोपांना सामोरे जावे लागेल, तुझी शिक्षा वाढेल. गप्प राहिलास तर यातले काहीही होणार नाही. गप्प रहायचे की तक्रार करायची हे तुझे तू ठरव.” गप्प बसण्यावाचून ब्रॉउडरला गत्यंतर नव्हते.

दर चार दोन महिन्यांनी ब्राऊडरची एकांत कोठडीत रवानगी होई. एकदा तो सलग चार महिने एकांत कोठडीत होता. त्याच्या सहनशीलतेचा अंत झाला. त्याने चादरीच्या धांदोट्या करून, त्या एकत्र बांधून केलेला गळफास घेतला. फेरी मारणाऱ्या जेलरच्या लक्षात आल्यामुळे त्यानं ब्राऊडरला बाहेर काढले. औषधोपचार झाले. पुन्हा ब्राऊडर एकांत कोठडीत रवाना. काही दिवसांनी त्यानं प्लास्टिकची बादली तोडली. बादलीचा  एक धारदार तुकडा वापरून मनगटाची शीर कापली. बेशुद्ध अवस्थेत जेलरला सापडला. हॉस्पिटल. उपचार. बरा झाल्यावर पुन्हा तुरुंगात रवाना.

तारखा पडत होत्या. एका तारखेला पुन्हा त़डजोडीचा प्रस्ताव सरकारी वकिलाने मांडला. गुन्हा कबूल कर. अडीच वर्षाची शिक्षा होईल. तुला तुरुंगात येईन येव्हाना अडीच वर्षं झालेली असल्याने सुटका होऊन जाईल. “मी निरपराध असताना गुन्हा का कबूल करू?” ब्राऊडरने भांडण सुरु ठेवले. कोर्टातल्या न्यायाधीशांच्या बदल्या होत, ते निवृत्त होत. ब्राऊडरची केस चालूच. असे सात न्यायाधीश झाले.

२०१३ सालच्या मे महिन्यात ब्राऊडर पुन्हा कोर्टात. न्यायाधीश जरा कडक. जुने खटले निकाली काढायचा सपाटा त्यानी चालवला होता. ब्राऊडरची केस पाहिल्यावर न्यायाधिशानाही आश्चर्य वाटले. त्यानी सरकारी वकील आणि पोलिसाना फैलावर घेतले. तेव्हां पोलिस म्हणाले की, ब्राऊडरवरचा खटला चालू शकत नाही. कारण ज्या माणसाने तक्रार केली होती तो मेक्सिकोत निघून गेला आहे. त्यामुळे कोणतेही पुरावे नाहीत, फिर्यादी नाहीत. अशा परिस्थितीत खटला उभाच राहू शकत नाही.

ब्राऊडर सुटला. तीन वर्षाच्या तुरुंगवासानंतर.

ब्राऊडर आपल्या घरात परतला. आता सारे वातावरण बदलले होते. मित्र त्याच्याशी बोलत नसत. दिवसेंदिवस ब्राऊडर पायरीवर बसून आकाशाकडे पहात असे. त्याला कोणी नोकरी द्यायला तयार नव्हते. नोकरीसाठी गेला की, त्याच्या तीन वर्षाच्या तुरुंगवासावर बोट ठेवले जाई. ब्राऊडर सांगे की त्यानं गुन्हाच केला नव्हता आणि गुन्हा सिद्ध न झाल्याने त्याची सुटका झालीय.  त्याचे कोणीही ऐकून घेतले नाही. कधे मधे कनवाळू आणि समजूतदार माणसे त्याला नोकरी देत. परंतू नोकरी टिकत नसे.

एकांतवासाचा धक्का त्याला बसला होता. आपल्याला कोणी तरी मारेल, आपल्याला लुटेल अशी भीती त्याला वाटायची. घरात असला की तो खिडक्या दारे बंद करत असे. ट्यूबने प्रवास करतांना मधेच त्याला भीतीचा झटका येत असे, तो किंचाळे. त्याला उपचाराची गरज होती. पण खर्च कोण करणार? कंटाळून एके दिवशी त्याने नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घरातल्या इतरांच्या लक्षात आल्याने तो वाचला. समाज ब्राऊडरला जगू देत नाही आणि मरूही देत नाही.

या घडीला ब्राऊडर त्याच अवस्थेत जगतोय.

।।

जुलै २००९

हारवर्ड विद्यापीठाच्या परिसरातला केंब्रिज विभाग.

पोलिसांना ९११ या नंबरवर एका गोऱ्या बाईने फोन केला. “दोन काळी माणसे घराच्या दाराशी झटापट करत आहेत. कदाचित घरफोडीचा प्रयत्न असेल. कदाचित त्यांची चावी नीट लागत नसेल.” सार्जंट जेम्स क्राऊली त्या घरापाशी पोचला. तोवर घराचे दार उघडून ती कृष्णवर्णीय माणसे घरात पोहचली होती. क्राऊलीने फोनवरच्या तक्रारीचा संदर्भ देऊन, विचारपूस सुरू केली. दारात उभे राहून त्या दोघांना घराबाहेर यायला सांगितले. दोघांपैकी एका कृष्णवर्णीय माणसाने आपले ओळखपत्र दाखवले. तो कृष्णवर्णीय माणूस होता प्रो. हेन्री लुई गेट्स. हारवर्डमधे ते इतिहासाचे प्राध्यापक होते आणि चीनच्या दौऱ्यावरून घरी परतले होते, चावी नीट लागत नसल्याने दाराशी थोडी खटपट करावी लागली होती एवढेच.

गेट्स वैतागले. आपले ओखखपत्र दाखवले, आपण प्राध्यापक आहोत हे सिद्ध केले तरी, पोलीस बाहेर यायला का सांगतोय असे ते म्हणाले. वाद झाला. प्रो. गेट्सनी सांगितले की त्याने हारवर्ड विद्यापीठाच्या पोलीस विभागाला फोन करून माहिती घ्यावी. सार्जंटने त्या आणि शहरातल्या पोलीस विभागातल्या पोलीस कचेऱ्यांना फोन करून आणखी कुमक मागवली. दिवे लकाकत आणखी पोलिस गाड्या हजर झाल्या. गेट्स वैतागले. आपण प्राध्यापक आहोत, हे ओळखपत्रावरूनही सिद्ध झाल्यानंतर आणखी पोलिस मागवणे, हा काय प्रकार आहे, असा प्रश्न त्यांनी केला.

सार्जंट क्राऊलीनी प्रा. गेट्सना हातकड्या घातल्या, अटक केली आणि पोलिस स्टेशनमधे नेले. काही तास पोलिस स्टेशनमधे अपमानास्पद वागणूक देऊन डांबून ठेवले. विद्यापीठातून फोन आल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. सार्जंट क्राऊलीनं आरोप ठेवला की, गेट्स यांची वागणूक दंगलखोर होती. त्या आरोपात तथ्थ्य नसल्याचे कोर्टाने ठरवले आणि गेट्सना आरोपातून मुक्त करण्यात आले.

सार्जंट क्राऊली आणि त्याच्यासोबतचे पोलिस अधिकारी श्वेतवर्णीय होते. अमेरिकाभर या प्रकरणाची ओरड झाली. प्रेसिडेंट ओबामांनीही या घटनेची दखल घेतली. सार्जंट क्राऊली यांच्यावर मात्र कोणतीही कारवाई झाली नाही.

।।

न्यू यॉर्क. जुलै २०१४.

एरिक गार्नर एका दुकानासमोर उभा होता. दुपारची तीन साडेतीनची वेळ. अचानक डॅनियल पँटालियो हा पोलीस तिथे उगवला आणि एरिकला  प्रश्न विचारायला सुरुवात केली. एरिक वैतागला. म्हणाला “आतापर्यंत तुम्ही मला तीसेक वेळा तरी अटक केलीय. मला त्रास दिलाय. माझी तपासणी केलीय. एकदा तर माझ्या गुदद्वारातही बोटे घालून तपासणी केलीत. प्रत्येक वेळी तुम्हाला माझ्याकडे काहीच सापडलेले नाही. त्रास देता, सोडून देता. आता मी विटलोय. पुन्हा नको तो प्रकार. प्लीज मला एकटे सोडा, त्रास देऊ नका.”

कोणत्याही वॉरंटशिवाय कोणाही नागरिकाला हटकणे आणि त्याची तपासणी करणे अशी मोहिम न्यू यॉर्क पोलिसांनी सुरु केली होती. भर रस्त्यावर, भर गर्दीत पोलिस कोणालाही हटकत. स्त्री असो की पुरुष. छाती आणि जांघेची तपासणी. कॅविटी सर्च असं या तपासणीच नाव. २०११ साली पोलिसांनी ६.८५ लाख लोकांची तपासणी केली होती. एरिकची तपासणी झाली त्या वर्षी तो पर्यंत ४.५ लाख लोक हटकले, तपासले गेले होते. अपवाद सोडता सगळे कृष्णवर्णीय असत.

‘ तू सिगरेट्स विकत होतास.” पोलिसाने आरोप ठेवला. “तपासणी घ्या. आहेत का माझ्याकडे काही सिगरेट्स ते पहा. मला उगाच त्रास देताय.” एरिक म्हणाला. एरिकने नाराजी व्यक्त केल्यावर पोलिसाने त्याला धरले, त्याचे हात पाठीमागे घेऊन हातकड्या घालायचा प्रयत्न केला. एरिक हातकडी घालून घ्यायला तयार नव्हता. पोलिसाने मागून त्याच्या गळ्यावर कुस्तीत करतात तशी पकड केली. गळा पकड. गळा दाबून धरला आणि त्याला फूटपाथवर पाडले.

काही सेकंदात आणखी तीन पोलिस तिथे पोचले. त्यात एक महिला पोलिस होती. महिला पोलिस काळी होती. पोलिसाने एरिकला जमीनीवर दाबून ठेवले आणि गळा दाबला. एका वाटसरूने या घटनेचे चित्रण केले, त्यात दिसले की एरीक अकरा वेळा घुसमटलेल्या आवाजात ओरडला की, मला श्वास घेता येत नाहीये, मी घुसमटतोय. तिधे पोलीस बघ्यासारखे उभे होते.

काही सेकंदांनी पोलिसानं गळा सोडला. एरिक बहुदा घुसमटून मेला असावा.

अँब्युलन्स आली. वैद्यकीय सेवक खाली उतरले. त्यांच्या मते एरिक श्वासोच्छवास करत होता. त्यामुळे कृत्रिम श्वास देण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. एरिकला हॉस्पिटलमधे नेण्यात आले. तिथ डॉक्टरनी जाहीर केले की, तो मेला होता. मरणोत्तर तपासणीच्या निष्कर्षातली नोंद सांगत होती की, गळा दाबल्यामुळे एरिकचा मृत्यू झाला.

एरिकच्या मृत्यूचे चित्रण प्रसिद्ध झाल्यावर देशभर गडबड उडाली. प्रे. बुश म्हणाले की हा प्रकार फार भयानक आहे. सर्व राजकीय पक्षांनी पोलिसांवर झोड उठवली. न्यू यॉर्क न्याय व्यवस्था पोलिसावर खटला भरायला तयार नव्हती. फारच ओरड झाल्यावर खटला झाला. ग्रँड ज्यूरीसमोर सुनावणी झाली. ज्यूरी आणि न्यायाधिशांनी एरिकचा खून झाला हे मान्य केले नाही. हटकण्याच्या प्रक्रियेत बळाचा अतिरेकी वापर झाल्याने एरिकचा मृत्यू झाला, तो खून नव्हता असे न्यायालयाने म्हटले. पोलीस सुटला. एरिकच्या पत्नीने सरकारवर खटला भरला. नुकसान भरपाईची मागणी केली. कोर्टात न जाता तडजोड झाली. सरकारने ५६ लाख रुपये पत्नीला देऊन खटला मिटवला. पोलीस अधिकारी सुटला. त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.

।।

फेब्रुवारी १९९९.

अमादू दियाल्लो हा गिनीतून स्थलांतरित झालेला कृष्णवर्णीय तरूण न्यू यॉर्कमधल्या ब्राँक्स या कृष्णवर्णीयबहुल विभागातल्या आपल्या घराच्या पायऱ्यांवर उभा होता. मध्यरात्र उलटून गेली होती. गणवेशात नसलेले चार पोलीस तिथे पोहचले. दुरूनच त्यांनी अमादूला हटकले, थांब, झडती घ्यायचीय असे म्हणाले.

अमादू मागे वळला आणि आपल्या घरात पळू लागला. पळताना त्याने आपल्या जॅकेटमधून पैशाचं पाकीट काढले. आपल्याजवळ काहीही नाहीये असे दाखवण्याचा त्याचा प्रयत्न असावा. पोलीस पकडतील अशी भीती त्याला होती कारण तो स्थलांतरित होता, अमेरिकेचे नागरीकत्व मिळवण्याच्या खटपटीत होता. कामधंदा नसल्याने तो फेरीवाल्याचा व्यवसाय करत असे. मोजे, सिगारेट्स, कॅसेट्स इत्यादी गोष्टी रस्त्यावर विकत असे. अशी विक्री करायला न्यू यॉर्कमधे बंदी असल्याने पोलिस वेळोवेळी अशी विक्री करणाऱ्याना पकडत असत. आपल्यालाही तसंच पकडले जाईल, अशी भीती अमादूला असावी.

पोलिसांचे म्हणणे असे की, दुरून अंधुक प्रकाशात त्यांना अमादू खिशातून काही तरी चौकोनी वस्तू काढताना दिसला आणि ती वस्तू पिस्तूल असावी असे पोलिसांना वाटले. पोलिसांनी त्याला वस्तू टाकून हात वर करायला सांगितले. अमादू पळत राहिला. चारही पोलिसांनी दूरवरून गोळीबार केला. ४१ गोळ्या झाडल्या. त्यापैकी १९ गोळ्या त्याला लागल्या. गोळ्या लागून तो खाली पडला असतानाही पोलिस गोळीबार करत राहिले.

ब्राँक्समधे खटला झाला. कोर्टाने पोलिसांना खुनी ठरवले. पोलीस म्हणाले की, गावात भारलेल्या वातावरणात आणि प्रचारप्रभावात खटला उभा राहिल्याने कोर्टावर परिणाम झाला. म्हणून अल्बानी या दुसऱ्या ठिकाणच्या कोर्टात खटला चालवावा. अल्बानीच्या कोर्टात खटला झाला आणि त्यात पोलीस निर्दोष सुटले.

अमादूच्या वडिलांनी सरकावर सहा कोटी डॉलरच्या नुकसान भरपाईचा खटला भरला. सरकारने कोर्टाबाहेर तडजोड करून तीस लाख डॉलर अमादूच्या वडिलांना दिले. गोळ्या चालवणाऱ्या पोलिसांचा म्होरक्या पोलीस अधिकारी केनेथ बॉस पूर्वी किमान दोन वेळा याच प्रकारच्या गुन्ह्यात सापडला होता. कृष्णवर्णीयांना दिसताक्षणीच गोळ्या घालून ठार मारणे, असे गुन्ह्याचे रूप होते. अल्बानीच्या कोर्टातून निर्दोष सुटल्यानंतर केनेथ बॉसला कालांतराने बढती देण्यात आली.

।।

या आणि अशा अनेक घटना अमेरिकेतील वंशद्वेषाती विखार अधोरेखित करतात. अमेरिकेत हे वर्षानुवर्षे चालू आहे. अमेरिकेत सुमारे १३ टक्के कृष्णवर्णीय आहेत. २५ ते ४९ या वयोगटात ३५ टक्के कृष्णवर्णीय बेरोजगार आहेत. कृष्णवर्णियांचा चांगल्या शिक्षण संस्थांत प्रवेश मिळत नाही. शिकले असले तरी, त्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळत नाहीत. चांगल्या वस्त्यांत त्यांना घरे मिळत नाहीत. चांगली घरे घेण्याएवढे पैसेही त्यांच्याकडे नसतात. कृष्णवर्णीय माणसे इतर कोणत्याही समाजाच्या तुलनेत जास्त तुरुंगात आहेत. कृष्णवर्णियांना मतदानाचा अधिकार असला तरी, अनेकदा त्यांना मतदान करता येत नाही अशी स्थिती दक्षिणेतल्या राज्यात आहे. उदा. वाहन चालवण्याचा परवाना असणे, ही त्या राज्यात मतदानाचा अधिकार मिळण्याची अट आहे. अनेक कृष्णवर्णियांकडे गाड्या नसल्याने त्यांच्याकडे परवाने नसतात. काहीही गुन्हा केलेला नसताना त्यांचे वाहन चालक परवाने रद्द केल्याने मतदानाचा अधिकार रद्द होतो.

एकट्या मिलवॉकीत  दर पाच कृष्णवर्णीय तरुणांमध्ये एक जण बेरोजगार असतो. मिलवॉकीत सरासरी कृष्णवर्णीय कुटुंबाचे उत्पन्न २५,६०० डॉलर आहे. तर, श्वेतवर्णीय कुटुंबाचे सरासरी उत्पन्न ६२,६०० डॉलर आहे. कृष्णवर्णीय तरुणांमधले सुमारे ३० टक्के तरूण अनेकवेळा तुरुंगात जाऊन आलेले आहेत. वस्तूंची रस्त्यावर विक्री करणे, शस्त्रे बाळगणे, मारियुआना जवळ बाळगणे, आक्षेपार्ह वर्तणूक असे आरोप त्यांच्यावर ठेवलेले असतात. बहुतेक वेळा ते आरोप सिद्ध होत नाहीत.

या साऱ्या घटनांमधून काय दिसते. तर या कृष्णवर्णियांना कसेही वागवा, तुम्हाला कोणीही दोषी ठरवणार नाही, असा संदेश वरील साऱ्या घटना देतात. अमेरिकेत याला ‘ब्रोकन विंडो इफेक्ट’ म्हणतात. इमारतीत एखाद्या खिडकीची काच फुटलेली असते. कोणीही ती खिडकी दुरुस्त करत नाही. याचा अर्थ होतो की, या इमारतीकडे कोणाचे लक्ष नाही. त्यामुळे आणखी काचा फोडल्या तरी कोणी विचारणार नाही. खुश्शाल काचा फोडा, इमारतीची वाट लावा, असेच काहीतरी.

कृष्णवर्णीय ही कमी दर्जाची प्रजा आहे आणि ती तशीच राहिली पाहिजे असे बहुतांश श्वेतवर्णियांना वाटतं. त्यांना आपल्या शेजारी, आपल्या वस्तीत कृष्णवर्णीय नको असतात. श्वेतवर्णियांच्या वस्तीत कृष्णवर्णियांना घरे मिळत नाहीत. काही कारणाने कृष्णवर्णियांचा वावर श्वेतवर्णियांच्या वस्तीत वाढला तर श्वेतवर्णीय ती वस्ती सोडून जातात. परिणामी या दोन्ही वर्णाच्या स्वतंत्र वस्त्या तयार होतात.

।।

अमेरिकेत दक्षिणेतल्या राज्यांमध्ये कृष्णवर्णीय गुलाम होते. त्यांची गुलामी रद्द करणे यावरून दक्षिण आणि उत्तरेतली राज्ये यांच्यात लढाया झाला. हेच अमेरिकेतले सिविल वॉर. या युद्धात गुलामी रद्द करणे, या विषयाचा विजय झाला आणि १८६५ साली गुलामी बेकायदेशीर ठरवणारी तरतूद राज्यघटनेत  करण्यात आली. १९६८ साली राज्यघटनेत कायद्यासमोर सर्व नागरीक समान आहेत असे सांगणारी १४वी  सुधारणा करण्यात आली.

विद्यापीठांध्ये कृष्णवर्णियांना प्रवेश नव्हता, रंगावरून त्यांची विभागणी होत होती. १४व्या  घटना दुरुस्तीचा आधार घेऊन ही विभागणी रद्द करणारा कायदा १९५४ साली करण्यात आला. १९६४ मधे माणसागणिक मत हा कायदा झाला, सर्वांना मताधिकार मिळाला.

१९६१ आणि १९६५ मधे अध्यादेश काढून केनेडी आणि जॉन्सन या प्रेसिडेंटांनी कोणाही माणसावर त्याचा वंश, धर्म, लिंग इत्यादी कारणांसाठी भेदभाव होता कामा नये असे जाहीर केले. आरक्षण किंवा कोटा असणार नाही परंतु कृष्णवर्णीय व्यक्ती पात्र असेल तर, त्याला नोकरी-शिक्षण-व्यवसायात संधी नाकारता कामा नये असे या अध्यादेशांनी जाहीर केले. अमेरिकेत याला सकारात्मक कारवाई (अॅफर्मेटिव अॅक्शन ) असे म्हणतात.

राज्यघटनेनुसार कृष्णवर्णियांवर अन्याय करणे, त्यांना विनाकारण अटक करणे, त्यांना बेकायदेशीर मारणे, त्याला न्यायालयात जायला मनाई करणे, त्याला नोकरी नाकारणे बेकायदेशीर आहे.

।।

कृष्णवर्णियांवर अन्याय होतो असे केवळ त्यांनाच वाटते असे नव्हे तर ८० टक्केपेक्षा श्वेतवर्णियांनाही तसेच वाटते. राजकारणाच्या हिशोबात बोलायचे तर ९० टक्के डेमॉक्रॅट्सना कृष्णवर्णियांवर अन्याय होतो, हे मान्य आहे. पण, रिपब्लिकन मंडळींमधे मात्र ते प्रमाण ३० टक्के आहे. म्हणजे ७० टक्के रिपब्लिकनांना वाटतं की कृष्णवर्णियांवर अन्याय होत नाही. रीपब्लिकन हा श्वेतवर्णियांचा, श्रीमंतांचा. मुक्त अर्थव्यवस्थावाल्यांचा कन्झर्वेटिव पक्ष आहे. कोणीही असो, त्यांनी आपापले पाहून घ्यावे, त्यांच्यावर सरकारने पैसे खर्च करता कामा नयेत असे रिपब्लिकनांचे मत असते. थोडक्यात म्हणजे, समाजात जर कोणी गरीब असतील, वंचित असतील, तर त्यांचे त्यांनी पाहून घ्यावे असे म्हणून रिपब्लिकन त्याना वाऱ्यावर सोडतात.

डेमॉक्रॅट्स हे तुलनेने डावे. कृष्णवर्णीय, गरीब इत्यादींची काळजी समाजानं-सरकारने घेतली पाहिजे असे त्याना वाटते. पण त्यांचा जनाधारही श्वेतवर्णियांचा आणि श्रीमंतांचा. त्यामुळे साधारणपणे गोरेपण आणि श्रीमंती याना धक्का न लावता कृष्णवर्णियांसाठी काही तरी करा, असे त्यांचे म्हणणे असते. त्यामुळे डेमॉक्रॅट्स बोलतात खूप पण कृष्णवर्णियांवर अन्याय करणारी व्यवस्था बदलायला ते तयार होत नाहीत.

बराक ओबामा हे पहिला कृष्णवर्णीय अमेरिकेन अध्यक्ष झाले. ओबामा समंजस होते, विद्वान होते, त्यांना वर्णद्वेषाच्या प्रश्नांची जाण होती. पण, अमेरिकन व्यवस्थेशी पंगा घ्यायची त्यांची तयारी नव्हती त्यामुळे त्यांनाही कृष्णवर्णियांवरचा अन्याय संपवता आला नाही.

२०१३ मधे Black Lives Matter ही संघटना निर्माण झाली. ही संघटना मार्टिन लूथर किंग यांच्या अहिंसक वाटेने जाण्याचा प्रयत्न करते. कृष्णवर्णियांच्या आंदोलनातली ही एक नवी संघटना. २०१३ मधे फ्लोरिडात जॉर्ज झिमरमन या श्वेतवर्णीय माणसाने ट्रेवन मार्टिन या निःशस्त्र कृष्णवर्णीय तरूणाला गोळ्या घालून मारले. प्रथम त्याला अटक होत नव्हती. आंदोलन झाल्यानंतर त्याला अटक झाली. नंतरच्या खटल्यात तो सुटला. त्या घटनेचे पडसाद अमेरिकाभर उमटले. Black Lives Matter चा उदय या घटनेनंतर झाला. ब्लॅक पँथर ही हिंसक प्रतिकाराचा पुरस्कार करणारी संघटनाही अमेरिकेत नव्याने जोर धरते आहे.

कृष्णवर्णियांवर होणारा अन्याय एकीकडे अमेरिकन राज्यव्यवस्थेमधेच अंगभूत आहे. पण त्या बरोबरच श्वेतवर्णियांच्या मनातही कृष्णवर्णियांबद्दल दुरावा आणि गैरसमज आहेत. समाजात ७० टक्के असलेल्या श्वेतवर्णियांच्या मनातच वर्णद्वेष-वर्णदुरावा-वर्णपूर्वग्रह आहे. फ्लॉईडच्या मृत्यूनंतर उफाळून आलेला उद्रेक म्हणतोय की, कृष्णवर्णियांवर अन्याय करणारी व्यवस्थाच मुळातून बदला. म्हणजे कायदे बदला, पोलीस व्यवस्था बदला, न्यायव्यवस्था बदला. ते बदल करायचे म्हणजे अमेरिकेतल्या श्वेतवर्णियांच्या मनात असलेला पूर्वग्रह, द्वेष आणि दुरावाही काढून टाकावा लागेल.

एकंदरीतच हे आंदोलन आता, लोकशाही, स्वातंत्र्य, समता, न्याय या मुळातल्याच गोष्टींना हात घालत आहे. फक्त अमेरिकतल्या नव्हे तर जगभरातल्या.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Cahyo Prihadi

Cahyo Prihadi

Cahyo Prihadi Director of Monitoring and Evaluation Project Management Office of Kartu Prakerja Coordinating Ministry for Economic Affairs of the Republic of Indonesia

Read More +