Author : Samir Saran

Published on Aug 30, 2021 Commentaries 0 Hours ago

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मधील चीनचा प्रभाव हे इंडो पॅसिफिक मधील महत्वाचे आव्हान आहे, हे अमेरिकेने वेळीच ओळखणे गरजेचे आहे.

‘पॅक्स अमेरिकाना’ समजून घेताना…

जागतिक शांततेबद्दलच्या अमेरिकेच्या भूमिकेला ‘पॅक्स अमेरिकाना’ असे संबोधले जाते. पण, आजघडीला अफगाणिस्तान मुद्द्यावरून अमेरिकेची जागतिक सत्ता आणि विश्वासार्हताही कमी झाली आहे. सुरुवातीपासून ‘आत्मकेंद्री व्यवहारा’साठी ओळखली जाणारी अमेरिका, आता जागतिक वर्तनात आपल्या मित्रराष्ट्रांची मदत घेणार का? हा कळीचा मुद्दा आहे.

साधारण दोन दशकांपूर्वी अमेरिकेने ‘वॉर ऑन टेरर’ सुरू केले. अमेरिकेच्या इतिहासात हा क्षण एकध्रुवीय राजकारणाचे शिखर मानला गेला आहे. अमेरिकेच्या ट्विन टॉवर वर झालेला हा हल्ला अमेरिका आणि युरोपातील मित्र राष्ट्रांनी सुरू केलेल्या आणि वाढविलेल्या जागतिकीकरणावरील थेट हल्ला मानला गेला. हे युद्ध पुढे चालवण्यासाठी अमेरिकेकडून पूर्ण शक्ती लावण्यात आली होती. पण हा काळही वेगळा होता आणि वेळही वेगळी होती.

तेव्हापासून, अमेरिका २००८ च्या जागतिक आर्थिक संकटात सापडली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीपासून ते सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या शपथविधीपर्यंत सर्व घडामोडींवर २०१६ पासूनच संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिकेतील अंतर्गत राजकारण आणि विभाजित लोकशाही यांचे यातून सर्व जगाला दर्शन झाले.

दोन्ही नेते अर्ध्याच अमेरिकेला पटणारे आहेत. कोविड १९ महामारीच्या काळात अमेरिकेच्या वर्तनामुळे अमेरिकेची नैतिकता ढासळल्याचेच दिसून आले आहे. याचाच पुढील भाग म्हणून अफगाणिस्तानातून अमेरिकेने माघार घेतली आहे. ही माघार म्हणजे फक्त राजकीय घटना नसून एका मोठ्या घटनाक्रमाचा एक महत्वाचा भाग आहे. यामुळे अमेरिकेच्या सत्तेला धक्का पोहोचला आहेच पण त्यासोबतच उदारमतवादी व्यवस्थेतील संस्थांनाही तडा गेला आहे.

प्रसारमाध्यमे आणि विचारवंतांच्या पक्षपातीपणाचे यातून दर्शन घडले आहे. अमेरिका आता असे एक राष्ट्र घडत आहे, जिथे व्यापक राष्ट्रीय एकमताऐवजी ट्रोल संस्कृती जोमाने वाढते आहे. विकसनशील देशांमध्ये लसींच्या उपलब्धतेसाठी तिष्ठत रहाणारे लाखो लोक आणि अमेरिकेचे अफगाणिस्तानातील युद्ध चालू ठेवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालणारे अफगाणिस्तानातील कित्येक दुभाषी यांच्यावर आलेल्या कठीण प्रसंगाकडे अमेरिकेचे दुर्लक्ष झाले आहे.

इंडो पॅसिफिक संघर्ष आणि नव्या युगातील स्पर्धेची तयारी करणारे आशियातील अनेक लोक या सर्व घटनांमुळे अधिकच साशंक झालेले आहेत. यातील कित्येक जण वेगवेगळ्या दहशतवादी गटांना पोषण आणि आश्रय देण्याच्या तालीबानी वृत्तीचे पहिले बळी ठरणार आहेत. असे लोक जर महासत्तांच्या संघर्षात सापडले तर काबूलमधील परिस्थिती त्यांच्यावरही ओढवण्यास वेळ लागणार नाही.

जर एखादा माणूस जपान मध्ये राहत असेल तर अण्वस्त्रांचा वापर हा त्याला विवेकी पर्याय वाटू शकतो. जर तुम्ही आसियानमधील राष्ट्रांचे नागरिक असाल तर, तुमच्या शेजारचा देश काय करू शकतो याचा अंदाज बांधणे अधिक सोयीचे ठरू शकेल. कोणत्याही प्रकारच्या घटनेमुळे यात बदल होणार नाही. सध्याची अमेरिका ही अनेक देशांसाठी कमी आकर्षक झाली आहे. त्यामुळे अनेक देश अमेरिकेसोबतच्या भागिदारीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. याचे दीर्घकालीन परिणाम दिसून येणार आहेत.

अमेरिकेच्या इंडो पॅसिफिक महत्वाकांक्षी प्रकल्पाला पहिल्यांदाच मोठा धक्का बसला आहे, असा युक्तिवाद आता केला जाऊ शकतो. अमेरिका आता तिचे पूर्ण लक्ष चीनवर एकवटेल, असे म्हणणे मूर्खपणाचे ठरणार आहे. जमिनीवरील सीमा आजही तितक्याच महत्वाच्या आहेत. दक्षिण आणि नैऋत्य आशियातील चीनचा वाढता प्रभाव अधिकाधिक अधोरेखित होत आहे. अमेरिकेच्या माघारीवरून चीनी प्रसारमाध्यमांनी अमेरिकेची यथेच्छ खिल्ली उडवलेली आहे.

चीनची अफगाणिस्तानमधील भूमिका अजूनही अस्पष्ट आहे. पण अमेरिकेच्या माघारीमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा चीन पूर्ण प्रयत्न करेल हे नक्की. यजमान राष्ट्रामध्ये उपलब्ध असलेल्या संसाधनांचे मूल्य काढणे आणि त्यासाठी मदत करणार्‍या व संपूर्ण प्रक्रिया सुलभ करून देणार्‍या शासकांना त्याचा लाभ देणे हे चीनी मॉडेल अमेरिकन मॉडेलपेक्षा वेगळे आहे.

उदारमतवादी राष्ट्रे आणि मुक्त बाजारपेठांचे बळी ठरू शकणार्‍या सरंजामी समाजामधील लोकांनी या मॉडेलला अधिक पसंती दिलेली आहे. परिणामी अल्प मुदतीसाठी का होईना पण अफगाणिस्तान – पाकिस्तान आणि पश्चिम आशियामध्ये चीन एक शक्तीशाली आर्थिक आणि लष्करी व्यवस्था म्हणून उदयास येण्याची दाट शक्यता आहे.

या घटनेचे तीव्र पडसाद क्वाडमध्येही दिसून येणार आहेत. त्यामुळे आता सत्याला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. पूर्व आशियाई समुद्र हा इंडो पॅसिफिकची सीमा आहे यावर बराच काळ अमेरिकेतील धोरणकर्त्यांचा विश्वास होता. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि पश्चिम आशियाबाबतचा भारताचा दृष्टीकोन अमेरिकेने वारंवार नाकारला आहे. यात बदल होणे गरजेचे आहे. अन्यथा भारताला इतर पर्यायांचा विचार करावा लागेल.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मधील चीनचा प्रभाव हे इंडो पॅसिफिक मधील महत्वाचे आव्हान आहे, हे अमेरिकेने वेळीच ओळखणे गरजेचे आहे. चीनची सरशी हे अमेरिकेच्या पश्चिम पॅसिफिक प्रकल्पाचे मोठे अपयश आहे.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंडो पॅसिफिक प्रदेशाचा विस्तार समजून घेताना युरोप आणि आशिया एकमेकांच्या जवळ येण्यास चीन कारणीभूत आहे हे अमेरिकेने ओळखायला हवे. ज्याप्रकारे ही राष्ट्रे एकमेकांजवळ येत आहेत त्याप्रमाणे यादवी युद्धे, हवामान बदल, वित्त, पायाभूत सोयीसुविधा आणि तंत्रज्ञान यांचा प्रवाह आणि त्यातील अडचणी या राष्ट्रांना भोगाव्या लागणार आहेत. अमेरिकेला काळानुरूप सुसंगत राहायचे असेल तर इंडो पॅसिफिक प्रदेशावर दुर्लक्ष करता कामा नये.

तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भारत अमेरिकेला सर्वात महत्वाचा भागीदार समजत आहे. अस्तास जाणार्‍या महासत्तेशी भागीदारी करणे जास्त सोपे आहे. काऊंटरिंग अमेरिका’ज अॅडव्हर्सरिज थ्रु सॅंक्शन अॅक्ट (सीएटीएसएए) आणि मूल्यांवरून अमेरिका देत असलेल्या भाषणांकडे दुर्लक्ष करणे आता अधिक सोपे झाले आहे. अमेरिका काय म्हणते हयापेक्षा ती काय वागते हयाकडेच इतर राष्ट्रांचे अधिक लक्ष आहे.

अमेरिका तिच्या संकुचित फायद्यासाठी करत असलेल्या कारवायांना आता थेट विरोध केला जात आहे. याबाबतीत कोणतेही राष्ट्र आणि त्याचा विकास याला धक्का न लागता चीनचा उदय रोखण्याच्या अमेरिकेच्या क्षमतेवरून तिची विश्वसनीयता आणि विश्वासार्हता मोजली जाणार आहे. त्यासाठी तडजोडीला तयार असलेल्या अमेरिकेला मित्रराष्ट्रे मदत करतील, अशी अशा बाळगायला हरकत नाही.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.