Author : Harsh V. Pant

Published on May 15, 2023 Commentaries 0 Hours ago

या युद्धातील दावे आणि प्रतिदावे हे दोन नायकांविषयी कमी आणि जगाचे मत बनवण्यासाठी अधिक करण्यात येत आहेत.

युक्रेन युद्धाची नवी व्यूहरचना

युक्रेन संघर्षाने पुढच्या धोकादायक टप्प्यात प्रवेश केला आहे. उभय बाजूंनी आपापली वक्तव्ये आक्रमक केली असल्याने माहितीच्या युद्धाची पुनःव्यूहरचना करण्यासाठी नव्याने प्रयत्न केले जात आहेत. रशियाच्या अध्यक्षांच्या क्रेमलिन येथील निवासस्थानावर युक्रेनने हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप प्रथम रशियाने युक्रेनवर केला. त्यासाठी युक्रेनने ड्रोनचा वापर केला आणि ‘हे पूर्वनियोजित दहशतवादी कृत्य व अध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न’ असल्याचा दावा रशियाकडून करण्यात आला. त्या पाठोपाठ बाखमुत शहरात फॉस्फरसयुक्त युद्धसामग्री वापरल्याचा दावा युक्रेनने केला. या शहरावर कब्जा मिळवण्यासाठी रशियाकडून गेल्या काही महिन्यांपासून अपयशी प्रयत्न सुरू आहेत. या युद्धातील हे दावे आणि प्रतिदावे हे युद्धाच्या दोन नायकांविषयी कमी आणि जगाचे मत बनवण्यासाठी अधिक करण्यात येत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून युक्रेनमधील बाखमुत शहरावर कब्जा करण्याचा रशियाचा प्रयत्न सुरू आहे. धोरणात्मक दृष्ट्या हे फारसे महत्त्वाचे शहर नसले, तरी हे युद्ध हे युद्ध जिंकण्यासाठी रशियाचे प्रयत्न सुरू असल्याचे तो एक प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या अंदाजानुसार, युक्रेन युद्धात डिसेंबर महिन्यापासून रशियाचे सुमारे वीस हजार सैनिक मृत्युमुखी पडले असून सुमारे ८० हजार सैनिक जखमी झाले आहेत.

रशियाच्या अध्यक्षांच्या क्रेमलिन येथील निवासस्थानावर युक्रेनने हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप प्रथम रशियाने युक्रेनवर केला. त्यासाठी युक्रेनने ड्रोनचा वापर केला आणि ‘हे पूर्वनियोजित दहशतवादी कृत्य व अध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न’ असल्याचा दावा रशियाकडून करण्यात आला.

या वृत्तांची विश्वासार्हता मान्य करून रशियाच्या वॅगनार मर्सिनरी गटाचे नेते येगेनी प्रिगोझीन यांनी रशियाच्या संरक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर युद्धसैनिकांना वाटणाऱ्या चिंतेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आगपाखड केली; तसेच आपल्याकडील दारुगोळ्याचा साठा संपत आल्याने आपण १० मे पासून आपले सैन्य माघारी बोलावण्यास सुरुवात करणार आहोत, असे त्यांनी जाहीर केले होते. मात्र त्यांनी नंतर दिलेल्या संकेतांनुसार बाखमुतमध्ये ‘युद्ध सुरू ठेवण्याची गरज’ पूर्ण करण्यासाठी शस्त्रपुरवठा करण्यास रशियाने तयारी दर्शवली असली, तरी संताप व्यक्त करून त्यांनी रशियाच्या धोरणानिर्मितीमध्ये अडथळा आणणाऱ्या अंतर्गत अकार्यक्षमतेवर बोट ठेवले आहे.

नाझी जर्मनीवर रशियाच्या विजयाच्या स्मरणार्थ दर वर्षीप्रमाणे याही वर्षी रशियाने ‘विजय दिवस’ साजरा केला. त्या वेळी सर्वांचे डोळे व्लादिमीर पुतिन यांच्या लाल चौकातील भाषणाकडे लागले  होते. पुतिन गेल्या काही महिन्यांत रशियाकडून झालेला नाझींचा पराभव आणि युक्रेनवरील आक्रमणाची तुलना करीत आहेत. त्यामुळे धोरणाचा अंदाज बांधता येऊ शकतो. गेल्या वर्षी, रशियाचे लष्कर युक्रेनमध्ये लढत आहे ’त्यामुळे या जगात कसायांना मारेकऱ्यांना आणि नाझींना जागा नाही,’ अशी गर्जना करून रशियाच्या विजयाचा दावाही केला होता; परंतु या वर्षी रशियामध्ये काही प्रमाणात अस्वस्थता असून देशातील सुरक्षेबद्दल चिंता वाढल्याने काही राज्यांनी विजय दिवसाचा उत्सव टाळण्याचा निर्णय घेतला होता. मॉस्कोच्या केंद्रस्थानी असलेल्या क्रेमलिनवर ड्रोनचे हल्ले होऊ शकतात, या वास्तवामुळे देशात सावधानता आणि भीती निर्माण झाली आहे.

या आठवड्यात लष्करी संचलने आणि भडक भाषणांच्या माध्यमातून रशियाने आपल्या ताकदीची फुशारकी मारली होती. या पार्श्वभूमीवर, युक्रेनविरोधीत एक वर्षापेक्षाही अधिक काळ लढल्यानंतर रशियाच्या लष्कराची आपल्या पराक्रमाबद्दलची धारणा अद्याप कायम आहे की नाही, ते समजू शकलेले नाही. हा संघर्ष काही दिवसांमध्ये नाही, तरी काही आठवड्यांमध्ये तरी संपावा, असे रशियामधील अनेकांना वाटत होते. पण हा संघर्ष संपण्याची अद्याप चिन्हेही नाहीत. रशियाने फेब्रुवारीपासून अधिक आक्रमकता दाखवण्यास सुरुवात केली असली, तरी त्याचा अद्याप परिणाम दिसत नाही आणि युक्रेनच्या बाजूने प्रतिकारवाई होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

युद्ध सुरू करणे सोपे आहे; परंतु परतीचा मार्ग शोधणे खूप कठीण आहे. पाश्चात्य देशांचा संयम सुटत चालला आहे व तडजोड करण्यासाठी ते युक्रेनवर दबाव आणत आहेत आणि त्यामुळेच थोडी वाट पाहिली, तर आपला विजय निश्चित आहे, असे पुतिन यांना वाटत आहे. आतापर्यंत रशियाची या युद्धाबद्दलची गृहितके खोडून काढली गेली आहेत. युक्रेनची बाजू भक्कम असेल, तेव्हाच वाटाघाटी होतील, असे युक्रेन आणि त्या देशाच्या पाश्चात्य समर्थक देशांना वाटत आहे. यामुळे दोन्ही बाजू आपापल्या लाभासाठी युद्धभूमीचा वापर करीत आहेत.

हा संघर्ष काही दिवसांमध्ये नाही, तरी काही आठवड्यांमध्ये तरी संपावा, असे रशियामधील अनेकांना वाटत होते. पण हा संघर्ष संपण्याची अद्याप चिन्हेही नाहीत.

काही पाश्चात्य देशांनीही वाटाघाटींच्या माध्यमातून संघर्ष संपवण्यासाठी चीनवर आशा केंद्रित केल्या आहेत. हा दृष्टिकोन फ्रान्सने मांडला आहे आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आपल्या चीनभेटीत चीनच्या नेतृत्वासमोर हाच मुद्दा उपस्थित केला होता. वाटाघाटी करण्यास रशिया कितपत तयार आहे, याबाबत अमेरिकेला साशंकता आहे; परंतु शांतता प्रस्थापित करण्यात चीन भूमिका बजावू शकतो, ही शक्यता त्यांनी पूर्णपणे फेटाळलेलीही नाही. युक्रेनला प्रदीर्घ युद्धात आवश्यक असणारा लष्करी सामग्रीचा पुरवठा सुरू ठेवण्यासाठी आवश्यक क्षमतेबद्दल युरोपमध्ये चिंता वाढत आहे. तरीही युरोपमध्ये याबद्दल दोन मते असून पूर्व युरोप आणि बाल्टीक देशांचा दीर्घकालीन सहभाग लक्षात घेता दोन्हीही बाजुंची अद्याप वाटाघाटी करण्याची तयारी नाही.

उर्वरीत जग निश्चितच संघर्षासंबंधात उतावीळ होत आहे. संघर्ष लवकर संपला, तर त्याचे ते स्वागतच करतील. विकसनशील जगातील बहुसंख्य देशांना या युद्धामुळे अन्न, इंधन आणि खतांच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोरोना साथरोगानंतर सावरू पाहणाऱ्या अर्थव्यवस्थांना या युद्धाचा फटका सहन करावा लागत आहे. पण एकदा का युद्धाला तोंड फुटले, की ते नियंत्रणात आणणे सोपे नसते. ज्या युद्धामुळे सर्व बाजूंनी अपार दुःखच आणले आहे, ते युद्ध थांबवणे पुतिन आणि झिल्येन्स्की किंवा अगदी शी जिनपिंग व जो बायडेन यांच्याही हातात राहिलेले नाही. तत्त्ववेत्ता बर्टार्ड रसेल याने फार पूर्वीच लिहून ठेवले आहे, की ‘कोण बरोबर आहे किंवा कोण शक्तीमान आहे, हे युद्ध ठरवत नाही.’

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.