Author : Jeff M. Smith

Published on Jun 16, 2020 Commentaries 0 Hours ago

भारत आणि चीन या दोन्ही देशांचे लष्कर पुन्हा परस्परांसमोर उभे ठाकले आहे. आजची परिस्थिती पाहता, यापुढे प्रत्यक्ष नियंत्रण रेषा तणावपूर्ण राहील, असेच दिसतेय.

भारत-चीन पुन्हा आमने-सामने?

लडाख क्षेत्रात भारत आणि चीन या दोन्ही देशांचे सैन्य परस्परांसमोर उभे ठाकले आहे. उभय बाजूंनी सुरुवातीला आक्रमक धोरण स्वीकारल्या गेल्यानंतर चर्चेच्या फे-या सुरू होणे, हे स्वागतार्हच आहे. मात्र, अजूनही उभय देशांमध्ये सीमारेषेवरून वादविवाद आहेत आणि यापुढे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा परिसर अधिक तणावपूर्ण राहील, असेच त्यातून स्पष्ट होत आहे.

भारत-चीन सीमेवर अशीच परिस्थिती दोन वर्षांपूर्वी डोकलाम पठारावरही उद्भवली होती. भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमारेषा ज्या ठिकाणी परस्परांना खेटतात त्या ठिकाणी असलेल्या डोकलाम पठारावर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) हक्क सांगितला होता. तब्बल दोन महिने हे भांडण चालले होते. आताही मे महिन्यापासून दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

भारत आणि चीन यांच्यात २ हजार १६७ मैल लांबीची सीमारेषा आहे. या दरम्यान सतत कोणत्या ना कोणत्या मुद्द्यांवरून उभय देशांमध्ये लष्करी तणाव निर्माण होत असतो. आताही तशीच परिस्थिती आहे. दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की झाली. एकमेकांचे रक्त काढून झाले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलएसी) ओलांडून झाली. सीमावर्ती भागात उखळी तोफा आणि अवजड लष्करी सामुग्रीची जमवाजमवही सुरू झाली. यातून परिस्थिती चिघळते की काय, असा प्रश्न पडू लागला असतानाच जूनच्या पहिल्या आठवड्यात आशेचा किरण दिसू लागला. सीमेवर निर्माण झालेल्या तणावातून मार्ग काढण्यासाठी भारत आणि चीन या दोन्ही बाजूच्या सर्वोच्च लष्करी अधिका-यांनी चर्चेची तयारी दाखवली.

एकीकडे उभय देशांमध्ये चर्चा सुरू असली तरी पँगाँग सरोवरानजीक दोन्ही बाजूचे सैन्य ‘जैसे थे’ परिस्थितीत आहे. अगदी युद्धसज्ज. आतापर्यंतचा असा अनुभव आहे की, जेव्हा जेव्हा दोन्ही देशांमध्ये सीमारेषेवरून तणाव निर्माण झाला तेव्हा तेव्हा चर्चेच्या माध्यमातून त्यावर तोडगा काढण्यात आला. आताही शांततेत सर्व मिटले तरी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीकचा परिसर आता अधिक तणावपूर्ण राहील, असेच यातून सूचित होत आहे.

गेल्या दशकभरात चीनने पूर्व चिनी समुद्र, दक्षिण चिनी समुद्र, भारत-चीन सीमारेषा आणि अमेरिका या चार आघाड्यांवर आक्रमक धोरण स्वीकारले आहे. यापैकी भारत-चीन सीमावाद त्यातला त्यात स्थिर मुद्दा असल्याचे समजला जात होते. मात्र, त्याचाही आता पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे.

पार्श्वभूमी

भारत आणि चीन यांच्यातला ताजा सीमावाद मे महिन्याच्या सुरुवातीला झाला. सीमारेषेवर गस्त घालणा-या दोन्ही देशांच्या जवानांमध्ये दोन ठिकाणी धक्काबुक्की झाल्याचे प्रकार उजेडात आले. पहिली धक्काबुक्की झाली पँगाँग सरोवराच्या काठावर, ५ मे रोजी. पँगाँग सरोवर हा परिसर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक किमान डझनभर ठिकाणी तरी चीनशी सीमावाद आहे, त्यातलेच एक ठिकाण म्हणजे पँगाँग सरोवर. सिक्कीम आणि तिबेट यांच्या सीमारेषा ज्या ठिकाणी भिडतात तिथेही ९ मे रोजी दोन्ही देशांच्या जवानांमध्ये झटापट झाली.

उल्लेखनीय म्हणजे सिक्कीम आणि तिबेट यांच्या सीमारेषा जिथे परस्परांना भिडतात तेथील वाद २०००च्या मध्यातच सोडवला गेला होता. भारतही हे ठिकाण वादाचे मानत नाही. अर्थात २००० नंतरही चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) या ठिकाणी वारंवार घुसखोरी केल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे.

पँगाँग सरोवरानजीकचा सीमावाद सुरू असतानाच लडाखसह गलवान नदीनजीकचा परिसर, हॉट स्प्रिंग आणि गोगरा या परिसरात भारत आणि चीनच्या सैन्यात वाद चालू असून उभय बाजूंनी जोरदार लष्करी तयारी सुरू असल्याच्या बातम्या मे महिन्याच्या मध्यात येऊ लागल्या होत्या. मे महिन्याच्या अखेरीस पँगाँग सरोवराच्या परिसरात भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या जवानांमध्ये हिंसाचार सुरू असल्याची ध्वनिचित्रफीत उघडकीस आली. त्यानंतर तब्बल १० हजार सैनिकांसह चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन करत भारतीय क्षेत्रात घुसखोरी केल्याच्या बातम्या भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित होऊ लागल्या.

सुरुवातीला भारतीय आणि चिनी अधिका-यांनी प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तांवर फारशी प्रतिक्रिया न देण्याचेच धोरण स्वीकारले. मे महिन्याच्या मध्यात चीनने भारतावर आरोपाच्या फैरी झाडल्या. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक भारताने ‘’अतिक्रमण’’ करून ‘’बेकायदा’’ बांधकामे केल्याचे आरोप चीनने केले. भारतानेही चीनच्या या आरोपाला उत्तर दिले. चीनचा आरोप खोडून काढताना परराष्ट्र मंत्रालयाने सविस्तर निवेदनच प्रसिद्ध केले. त्यात म्हटले होते की, ‘’प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुरू असलेल्या भारताच्या हालचाली या भारतीय हद्दीतच सुरू आहेत. उलटपक्षी चीननेच भारतीय हद्दीत घुसखोरी करून भारताच्या कामात व्यत्यय आणला आहे’’.

वादाच्या मुद्द्यांवर मिठाची गुळणी धरण्याचे धोरण चिनी राजकीय नेतृत्व कायमच स्वीकारत आले आहे. त्यामुळे आताही ताज्या वादावर चीनकडून फारशी प्रतिक्रिया उमटली नाही. चीनच्या भारतातील राजदूताने तर ‘’दोन्ही देशांना परस्परांकडून कोणताही धोका नसल्याचे’’ सांगत वादाच्या मुद्द्यांवर दोन्ही देशांनी ‘’सामंजस्याने आणि चर्चेने तोडगा काढावा’’, असे सूचित केले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी तर ‘’सीमेनजीकची परिस्थिती पूर्णपणे स्थिर आणि नियंत्रणात’’ असल्याचे स्पष्ट केले. चीनच्या प्रखर राष्ट्रवादी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राने अपेक्षित अशी भूमिका घेतली. या वृत्तपत्राने भारतावरच दुगाण्या झाडल्या. भारतानेच चीनशी सीमावाद उकरून काढला असा आरोप या दैनिकाने केला. तसेच भारत-चीन यांच्यातील सद्यःस्थितीतील सीमावादाला अमेरिका कारणीभूत असल्याचे म्हटले. तसेच भारताने अमेरिकेच्या हातचे बाहुले बनू नये असे सूचवत चीनविषयी कोणतीही भूमिका घेताना चीनवरील गृहपाठ पक्का करावा, असा शहाजोग सल्लाही ग्लोबल टाइम्सने भारताला दिला.

जूनच्या सुरुवातीला भारताचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी यासंदर्भात प्रथमच सार्वजनिकरित्या विधान केले. चीनशी सीमावादावर राजनैतिक पद्धतीने तोडगा काढण्यावर भारताचा भर असल्याचे  राजनाथसिंह यांनी स्पष्ट करतानाच चीनला इशाराही दिला. ते म्हणाले, ‘’कोणाचाही स्वाभिमान दुखावण्याचा भारताचा हेतू नाही. मात्र, त्याचवेळी भारताच्या स्वाभिमानाला जर कोणी नख लावत असेल तर तेही भारत खपवून घेणार नाही. आम्हाला झुकवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्यास चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमता आम्ही राखून आहोत’’.

सुस्पष्ट चित्र

आता या सर्व पार्श्वभूमीवर साहजिकच प्रश्न निर्माण होतो की, हिमालयाच्या कुशीत नेमके चाललंय काय? प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक सुरू असलेल्या घडामोडींची माहिती आपल्यापर्यंत जशीच्या तशी चालून येत नाही. अनेक गाळण्यांमधून गाळून मग ती आपल्यापर्यंत पोहोचते. म्हणजे नेमकी किती माहिती सार्वजनिक व्हावी, कोणती दिली जाऊ नये वगैरेचा निर्णय सर्वोच्च पातळीवरून होतो. त्यामुळे अनेकदा अपुरी वा त्रोटक माहितीच हाती लागते. किंवा मग कोणीतरी अज्ञात स्रोत नाव न छापण्याच्या अटीवर वगैरे माहिती देतो. त्यातही कितपत तथ्यांश असतात, हेही अस्पष्ट असते. असे असले तरी लडाख परिसरात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक जे काही घडत आहे त्यासंदर्भातील नवनवीन माहिती, सरकारी निवेदने, उपग्रहीय छायाचित्रे, माहितीपूर्ण विश्लेषणे इत्यादी उपलब्ध होत आहे. परंतु तरी ते अपुरेच असल्याचे भासते.

प्रथमतः गलवान नदी, गोगरा आणि हॉट स्प्रिंग या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीकच्या तीन ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात लष्करी तुकड्या परस्परांसमोर उभ्या असल्याचे ठळकपणे दिसून येते. हे दृश्य चिंताजनक आहे. गोगरानजीक तर चीनने उखळी तोफा तैनात केल्याचे दिसते. खात्रीलायक वृत्तानुसार मे महिन्यातच पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) गलवान नदी ओलांडून भारतीय भूभागात मर्यादित प्रमाणात घुसखोरी केली परंतु नंतर त्यांना एकतर हुसकावून तरी लावण्यात आले किंवा ते स्वतःहून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलीकडे चिनी हद्दीत परत गेले.

भारतानेही जय्यत तयारी सुरू केली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय हद्दीत भारताने लष्करी तुकड्यांची संख्या वाढवली आहे. तसेच लष्करी साधने आणि रसदही वाढवली आहे. काश्मिरात नियंत्रण रेषेनजीक तैनात असलेल्या सैन्यापैकी काही तुकड्या भारताने इकडे वळवल्या आहेत. अंदाजे दोन्ही बाजूंचे १० हजार सैनिक लडाख परिसरात आता या घडीला तैनात आहेत.

पीपल्स लिबरेशन आर्मीच्या तुकड्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलीकडे यापैकी काही ठिकाणांवर आपला तळ ठोकल्याचे समजते परंतु या दाव्यांमधील तथ्य अद्याप ज्ञात नाही. भारतानेही जय्यत तयारी सुरू केली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय हद्दीत भारताने लष्करी तुकड्यांची संख्या वाढवली आहे. तसेच लष्करी साधने आणि रसदही वाढवली आहे. काश्मिरात नियंत्रण रेषेनजीक तैनात असलेल्या सैन्यापैकी काही तुकड्या भारताने इकडे वळवल्या आहेत. अंदाजे दोन्ही बाजूंचे १० हजार सैनिक लडाख परिसरात आता या घडीला तैनात आहेत.

लष्कराच्या स्थानिक आणि विभागीय स्तरावरच्या चर्चेच्या अनेक निष्फळ फे-यांनंतर ६ जून रोजी उभय बाजूंनी कॉर्प्स कमांडर स्तरावरची चर्चा झाली. ही चर्चा ‘’सौहार्दपूर्ण आणि सकारात्मक वातावरणात’’ झाल्याचे दोन्ही बाजूंनी स्पष्ट करण्यात आले. उभय देशांच्या सैन्यांत निर्माण झालेला तणाव टप्प्याटप्प्याने निवळावा यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील गलवान, गोगरा आणि हॉट स्प्रिंग या आघाडीच्या ठिकाणांवरून दोन्ही सैन्यांनी माघार घ्यावी, यावर दोन्ही गटांमध्ये एकमत झाले. सीमारेषेवर निर्माण झालेला तणाव आता निवळला असून उभय पक्षांमध्ये सकारात्मक सहमती झाल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.

त्रासदायक सरोवर

लडाखच्या दक्षिणेला असलेल्या पँगाँग सरोवरानजीक अजूनही भारत-चीन यांच्यातील तणाव निवळलेला नाही. उलटपक्षी तो आणखीनच गुंतागुंतीचा होत चालला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेमुळे विभागल्या गेलेल्या या सरोवराच्या काठावर गेल्या अनेक वर्षांपासून अडचणी निर्माण होत आहेत. सरोवराच्या पश्चिमेकडचा एक तृतियांश भाग भारताच्या नियंत्रणाखाली आहे तर पूर्वेकडचा दोन तृतियांश भाग चीनच्या ताब्यात आहे. भारत सरकारकडील अधिकृत आकडेवारीनुसार २०१५ आणि २०१९ या दरम्यान पँगाँग सरोवर परिसरात चिनी सैन्याकडून असंख्य वेळा भारतीय हद्दीत घुसखोरीचे प्रकार घडले. अंदाजे १००० वेळा तरी चिनी सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून या भागात घुसल्याचे स्पष्ट झाले आहे. भारत-चीन यांच्यातील हजारो किमी अंतरापर्यंत पसरलेल्या सीमारेषेवर याच ठिकाणी चीनने सर्वाधिक वेळा घुसखोरी केली आहे.

२०१७ मध्ये डोकलामच्या तिठ्यावर जेव्हा भारत-चीन यांच्यात अभूतपूर्व असा प्रचंड तणाव निर्माण झाला होता तेव्हा पँगाँग सरोवारनजीकही दोन्ही सैन्यांमध्ये झटापटी, धक्काबुक्की, गुद्दागुद्दी इत्यादी प्रकार झाल्याची ध्वनिचित्रफीत उघडकीस आली होती. यंदाच्या मे महिन्यात चीनने सरोवरात गस्तीच्या नावाखाली एरवीपेक्षा तिप्पट संख्येने बोटी उतरवल्या होत्या. सरोवरात नौकांद्वारे घुसखोरी करण्याचे प्रकार या ठिकाणी सर्रास घडत असतात.

पँगाँग सरोवरावर कोणी किती अतिक्रमण केले हा मुद्दा नाही. वस्तुतः प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या स्थळावरूनच भारत आणि चीन यांच्यात मतभेद आहेत. पँगाँग सरोवर एवढा अडचणीचा का वाटतो दोन्ही देशांना? सरोवराच्या उत्तर दिशेला अनेक प्रकारच्या भौगोलिक रचना आहेत. त्यातील एक म्हणजे आठ शिखरे ज्यांचा उतार सरोवराच्या दिशेने येतो. या ठिकाणाला ‘फिंगर ८’ असे संबोधले जाते. या ‘फिंगर ८’ च्या पूर्वेकडील भूभागावर भारत हक्क सांगतो. तर चीन पश्चिमेवरील ‘फिंगर २’ या भूभागावर हक्क सांगतो. पँगाँग सरोवरावर कोणी किती अतिक्रमण केले हा मुद्दा नाही. वस्तुतः प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या स्थळावरूनच भारत आणि चीन यांच्यात मतभेद आहेत. ‘फिंगर ४’ हा भूभागही चीन आपला मानतो. भारतासाठी मात्र प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ‘फिंगर ८’च्या पूर्वेला कितीतरी मैलाच्या अंतरावर आहे.

‘फिंगर ४’ पर्यंत जाणा-या भूभागावर भारताचा सार्वभौम हक्क आहे. त्या ठिकाणाच्या पश्चिमेला भारतीय लष्कराची चौकीही स्थित आहे. खरी अडचण ‘फिंगर ४’च्या पूर्व दिशेला म्हणजे दोन ज्ञात प्रत्यक्ष नियंत्रण रेषांच्या दरम्यान आहे. चिनी फौजा या ठिकाणी नियमितपणे गस्त घालत असतात. १९९९ मध्ये तर चीनने तिथे रस्ताही बांधला. ‘फिंगर ८’च्या रेषेपर्यंत भारतीय फौजाही या भागात गस्त घालत असतात परंतु पायीच. कारण ‘फिंगर ४’ हा परिसर एवढा डोंगराळ आहे की, या ठिकाणी वाहनांनी गस्त घालणे जिकिरीचेच ठरते. ‘फिंगर ४’ आणि ‘फिंगर ८’ यांच्या दरम्यान असलेला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेतील परिसर कायमच भारतीय लष्कर आणि पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) यांच्यासाठी वादाचा ठरला आहे. २०१३ मध्ये तर चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांना या भागात गस्त घालण्यापासून रोखले होते.

गेल्या महिन्यात जेव्हा लडाखच्या उत्तरेला भारत-चीन लष्करातील तणाव शिगेला पोहोचला होता तेव्हा २०० हून अधिक चिनी सैनिकांनी ‘फिंगर ४’ पर्यंत घुसखोरी करून काही काळ प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघनही केले होते. या ठिकाणाजवळील ‘जैसे थे’ परिस्थिती बदलण्यासाठी ‘फिंगर ४’ जवळ तसेच्या त्याच्या पूर्वेला चिनी सैन्याने चौकीही बांधल्याचे समजते.

चीनने ‘’भारतीय भूभागाचा’’ ताबा घेतला किंवा कसे, यावर आता भारतीय प्रसारमाध्यमे चर्चा करत आहेत. अर्थातच याचे उत्तर खूपच गुंतागुंतीचे आहे. ज्या भूभागावर भारत हक्क सांगतो आणि त्या ठिकाणी भारतीय लष्कराच्या तुकड्या नियमितपणे गस्त घालतात तिथे म्हणजे ‘फिंगर ४’ आणि ‘फिंगर ८’ यांच्या दरम्यान असलेल्या क्षेत्रावर कधीही भारताने सार्वभौम हक्क सांगितला नाही. आणि नेमक्या याच ठिकाणी चीनने पक्क्या रस्त्याची निर्मिती करून आपले स्थान मजबूत केले आहे.

चिंता वाढवणा-या घडामोडी

गेल्या ४० वर्षांत या वादग्रस्त प्रदेशात उभय बाजूच्या सैन्याने संयम राखला आहे. उभय बाजूंनी झालेल्या हिंसाचारात केवळ एकाचाच या ठिकाणी मृत्यू झाला आहे. म्हणजे दोन्ही देशांचे सैन्य परस्परांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न येथे करत असतात परंतु त्याची परिणती मर्यादित युद्ध वा चकमकीत आजपर्यंत तरी झालेली नाही, हे उल्लेखनीयच आहे. दरवर्षी चिनी सैन्य या भागात शेकडो वेळा घुसखोरी करते. दोन्ही सैन्यांच्या गस्ती पथकांमध्ये अनेकदा झटापटही होते. परंतु नंतर तणाव निवळतो.

परंतु २०१३च्या वसंत ऋतूमध्ये चित्र बदलले. डझनभर चिनी सैनिकांनी लडाख परिसरात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन करत डेपसांग खो-यात प्रवेश मिळवला आणि तिथे चौकीही उभारली. तसेच तिथे असलेल्या भारतीय खंदकांवर व चौक्यांवरही आक्षेप घेतला. तब्बल तीन आठवडे चिनी लष्कराने या ठिकाणी तळ ठोकला होता. अखेरीस चर्चेनंतर चीनने तेथून माघार घेतली. परंतु तत्पूर्वी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या काही भारतीय चौक्याही त्यांनी उद्ध्वस्त केल्या. यापूर्वीही, २०११ मध्ये, चिनी सैनिकांनी भारतीय भूभागात घुसखोरी करून तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेल्या चौक्या उद्ध्वस्त केल्या होत्या. परंतु २०१३ मध्ये त्यांनी जरा जास्त वेळ तळ ठोकून येथील‘जैसे थे’ परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला.

२०१३ची पुनरावृत्ती चीनने लगेच पुढच्या वर्षीही केली. चीनचे अध्यक्ष क्ष जिनपिंग भारताच्या दौ-यावर आले असतानाच पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) ही आगळीक केली. सप्टेंबर, २०१४ मध्ये पीएलएच्या शेकडो जवानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडत चुमार खो-यापर्यंत घुसखोरी केली. १६ दिवस हा तिढा चालला. याहीवेळी चर्चेने तोडगा निघाला परंतु भारताने या ठिकाणी उभारलेला टेहळणी बुरूज आणि अनेक खंदक लष्कराने काढून टाकावे, ही पूर्वअट पीएलएने घातली. चीननेही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपर्यंत पोहोचणा-या रस्त्याचे बांधकाम थांबवावे, अशी अट भारताने घातली. पुन्हा काही काळ शांतता नांदली. परंतु लगेचच २०१५ मध्ये चीनने आगळीक केली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक चीनच्या बाजून बांधण्यात येत असलेल्या टेहळणी बुरुजावर भारताने आक्षेप घेतला आणि त्यावरून दोन्ही सैन्यांमध्ये तणाव निर्माण झाला. अर्थात तो फार काळ टिकला नाही.

लडाखमध्ये सध्या निर्माण झालेला तणाव आणि आधीचे तणाव यांच्यात बरेचसे साधर्म्य आहे, जे शांततेने सोडविण्यात उभय बाजूंना यश आले. ही अर्थातच उभय पक्षांसाठी सुवार्ता आहे. परंतु दोन्ही देशांमधील विसंवाद वाढू लागला असून प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आता अधिकाधिक वादग्रस्त ठरू लागेल, असे त्यातून ध्वनित होत आहे.

या दाव्याला पुष्टी देणा-या अनेक घटना सध्या घडत आहेत. प्रथम म्हणजे सर्व भागात चीनकडून होणारे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन आता वरचेवर होऊ लागले आहे. २०१९ मध्ये चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडून तब्बल ६६० वेळा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन झाले. २०१८ आणि समकालीन नोंदींच्या तुलनेत हे प्रमाण ५० टक्क्यांनी जास्त आहे. (प्रत्यक्ष नियंत्रणे रेषेचे हवाई उल्लंघनाचे प्रमाणही वाढले आहे. २०१७ मध्ये हे प्रमाण ४७ होते ते आता २०१९ मध्ये १०८ झाले आहे.)

दुसरे म्हणजे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक अलीकडे निर्माण झालेले तणाव हे एकाच वेळी निर्माण झालेले आहेत, जे की सामान्य नाही. तिसरा मुद्दा म्हणजे हे जे काही तणाव उभय देशांमध्ये निर्माण झाले त्यात प्रचंड प्रमाणात हिंसाचाराचा समावेश होता. २०१७ पूर्वी अशी परिस्थिती नव्हती.

चौथा मुद्दा म्हणजे चीनने अशा ठिकाणी कुरापती काढल्या आहेत जी एरवी वादाची ठिकाणे नव्हती. म्हणजे या ठिकाणी असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या अस्तित्वावर उभय देशांची सहमती होती. तरीही चीनने कुरापती काढल्या. त्यात गलवान नदी, गोगरा, हॉट स्प्रिंग आणि सिक्कीम (गेल्या काही वर्षांत येथे वर्षातून एकदाच घुसखोरी व्हायची. जेव्हा की पँगाँग सरोवर परिसरात हेच प्रमाण दरवर्षी १०० असे होते) यांचा समावेश आहे.

यातून असाच निष्कर्ष निघतो की, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक निर्माण होणारे ताणतणाव यापुढे सातत्याने होतील, त्यांचा कालावधीही मोठा असेल आणि त्याची प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा होत राहील. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे पडसाद उमटतील. ज्यातून उभय देशांना युक्तीने मार्ग काढण्यात निर्बंध येतील.

(दोन भागातील लेखाचा हा पूर्वार्ध आहे.)

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.