Author : Don McLain Gill

Published on Nov 23, 2020 Commentaries 0 Hours ago

चीनला थेट भिडणे अवघड असल्याने फिलिपिन्ससारख्या दक्षिणपूर्व आशियायी देशाला भारताचा आधार वाटतो. भारतालाही अशा मैत्रीची आवश्यकता आहे.

भारत-फिलिपिन्स मैत्रीने चीनला शह

भारत आणि फिलिपिन्सने ६ नोव्हेंबर रोजी द्विपक्षीय सह्कार्यासंदर्भातील संयुक्त आयोगाची चौथी बैठक आयोजित केली होती. या बैठकीचे अध्यक्षपद भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि फिलीपिन्सच्या परराष्ट्र व्यवहार विभागाचे सचिव टीओडोरो लोकसिन ज्युनियर या दोघांनी भूषवले. भारतीय अहवालाच्या मते, “दोन्ही देशांमधील संरक्षण गुंतवणूक आणि सागरी सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या निर्णयावर त्यांनी संमती दर्शवली. विशेषतः यात लष्करी शिक्षण आणि प्रशिक्षण, लष्कराची क्षमता वाढवणे, नियमित मैत्रीपूर्ण भेटी आणि सैनिकी उपकरणांची खरेदी यांचा समावेश होता.

तैवान, मलेशिया, इंडोनेशिया, ब्रुनेई आणि फिलिपिन्स यांचा सहभाग असलेल्या दक्षिणपूर्व आशियाई भागात आणि विशेषतः दक्षिण चीन सागरात आपल्या लष्करी क्षमता आणि शक्तीचा वापर यात चीनने लक्षणीय वाढ केली आहे. चीनचे विस्तारवादी दावे आणि नियमांवर आधारित जागतिक व्यवस्थेचा तिरस्कार यामुळे चीन आणि इतर राष्ट्रांमध्ये वाटाघाटी होण्याची शक्यता फार कमी आहे.

चीनसोबत असलेल्या आपल्या असमतोल संबंधांकडे लक्ष देण्याऐवजी हा विषय फिलिपिन्स टाळत आला आहे. असे असले तरी, अ‍ॅक्ट ईस्ट पॉलिसीअंतर्गत फिलिपिन्स – भारत सामरिक संबंध अधिक दृढ होत आहेत. त्यामुळे चीनच्या वाढत्या प्रभावातून आपली सुटका करून घेण्यासाठी फिलिपिन्सला गरजेचे असलेले सहकार्य भारताकडू नमिळेल. विस्तृत पूर्व आशियाई प्रदेशात चीन आणि अमेरिका यांच्यात वर्चस्वाची जी लढाई चालू आहे, त्यात फिलिपिन्सने मध्यवर्ती तटस्थ भूमिका घेतली आहे, असे दिसते आहे.

अमेरिकेशी जवळचे सुरक्षा संबंध निर्माण करत आणि चीनसोबत आर्थिक संबंध कायम ठेवत फिलिपिन्सने संतुलित भूमिका घेतली आहे. चीनचा वाढता प्रभाव हा आपल्या राष्ट्रीय आणि सामरिक हितांसाठी चिंताजनक आहे हे माहीत असूनही, ज्याचा ठळक उल्लेख देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण २०१७ – २०२२ मध्ये देखील आहे. फिलिपिन्सला अमेरिकेसोबत उघडपणे हातमिळवणी करणे कठीण वाटते. या कोंडीमुळे फिलिपिन्सच्या परराष्ट्र धोरणावर दबाव निर्माण झाला आहे.

तथापि, फिलिपिन्सचे भारताशी वाढत असलेले सामरिक संबंध ही एक आश्वासक बाब आहे. दोन्ही देशांनी भारत-फिलिपिन्स सामरिक भागीदारीचे महत्त्व आणि गरज व्यक्त केली आहे. फिलिपिन्स नौदलाचे प्रमुख रियर एडमिरल जियोव्हानी कार्लो जे. बॅकर्डो यांनी भारताच्या नौदलप्रमुखांना पत्र लिहून सांगितले की, “आपला सागरी प्रदेश अधिकाधिक सुरक्षित बनवण्यासाठी एक चांगला मार्ग म्हणून आम्ही हे संबंध अधिक दृढ करू इच्छितो.” त्यामुळे हे स्पष्ट होते की, सामरिक आणि सुरक्षा क्षेत्रामध्ये उघडपणे भारताशी हातमिळवणी करण्यास फिलिपिन्स उत्सुक आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉडिर्गो दुतेर्ते यांच्यात झालेल्या दूरध्वनी संवादात दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांतील संरक्षण सहकार्यावर जोर देत द्विपक्षीय संबंधांबद्दल समाधान व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपण फिलिपिन्सला इंडो-पॅसिफिक प्रदेशातील एक “अत्यंत महत्वाचा सहकारी” म्हणून पाहतो असे नमूद केले. फिलिपिन्सने देखील समान भावना व्यक्त केल्या.

भारताचे फिलिपिन्स मधील माजी राजदूत जयदीप मझुमदार यांच्या मते भारताकडून ब्राह्मोस लँड-बेस्ड सुपरसॉनिक क्षेपणास्त्र यासोबत इतर संरक्षण प्रणाली विकत घेण्याबाबत दोन देशांमध्ये चर्चा चालू आहे. ते म्हणाले की “भारत आणि फिलीपिन्स यांच्यात अनेक प्रकारच्या शस्त्रास्त्र यंत्रणांवर चर्चा सुरू आहे. एकदा प्रवास करणे शक्य झालं की,  लष्कराचे लॉजिस्टिक पाहणारी संयुक्त समितीची बैठक होईलआणि या गोष्टींची भेटून चर्चा होईल.”

नव्या द्विपक्षीय गुंतवणूक करारावर वाटाघाटी सुरू झाल्याने आर्थिक स्तरावरही दबाव निर्माण झाला आहे. या चर्चेची पहिली फेरी ऑनलाईन पद्धतीने गेल्या आठवड्यात पार पडली, ज्यात भारताच्या आर्थिक व्यवहार विभागाचे आणि फिलिपिन्सच्या उद्योग आणि व्यापार विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.

भारत – फिलिपिन्स द्विपक्षीय संबंध आता राजकीय, संरक्षण आणि आर्थिक क्षेत्रांत नवीन उंची गाठत आहेत. ही भागीदारी जर अधिक दृढ झाली तर त्याचा सकारात्मक परिणाम फिलिपिन्सच्या सामरिक धोरणावर होईल, तसेच चीनच्या या प्रदेशातील वाढत्या प्रभावावर याचा परिणाम होईल.

भारत चीन संबंधातून आपल्याला बरीच शिकवण मिळते जी फिलिपिन्सच्या हिताची ठरू शकते. चीनच्या सीमेवरील विस्तारवादी आक्षेपार्ह कारवायांचा भारत देखील बळी आहे. भारत आणि फिलिपिन्स हे दोन्ही देश चीनचे शेजारी आहेत. याव्यतिरिक्त, दोन्ही देश  मोठ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्या बीजिंगसह गुंतलेले आहेत. परंतु, भारताने दाखवून दिले आहे की जेव्हा राष्ट्रीय हितसंबंधांशी तडजोड करावी लागणार असेल तर आपण चीनसमोर ताकदीने उभे राहू शकतो. 

नवी दिल्लीच्या दृष्टिकोनातून बीजिंग समोर ताकदीने उभे राहणे म्हणजे चीनशी युद्ध करणे किंवा त्यांच्याशी संबंध तोडून टाकणे असा नाही. भारताने चीनशी संवादाचा पर्याय खुला ठेवला आहे आणि वेगवेगळ्या पातळ्यांवर चीनशी संपर्क भारत साधत आहे. परंतु त्याचसोबत भारताने आपली प्रादेशिक अखंडता आणि सामरिक हितसंबंध याबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड शक्य नाही हा मुद्दा सतत नमूद केला आहे.

भारत आणि फिलिपिन्स हे दोन्ही देश नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे रक्षण करतात, तसेच लोकशाही तत्त्वांचे आणि आदर्शांचे पालन करतात. दोन्ही देश दीर्घकालीन ध्येय साध्य करण्यासाठी एकत्र यावेत म्हणून द्विपक्षीय संबंधांची ही बाजू आवश्यक आहे. ही द्विपक्षीय भागीदारी भारत आणि फिलिपिन्स या दोन्ही देशांना फक्त त्यांचे सामरिक हित जपण्यासाठीच नाही तर इंडो-पॅसिफिक प्रदेशात नियमांवर आधारित व्यवस्था जतन करण्यास मदत करेल.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.