Author : Ezhil Subbian

Published on Nov 23, 2020 Commentaries 0 Hours ago

मानवाच्या अनेक गुंतागुंतीच्या आणि जटिल अशा अडचणी सोडविण्यासाठी जीवशास्त्र हे हुकुमाचे अस्त्र आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल साधता येतो.

‘स्ट्रिंग बायो’: जगणे सोपे करणारे जैवतंत्रज्ञान

‘स्ट्रिंग बायो’ ही बंगळूरूस्थित इनोव्हेटिव्ह कंपनी जीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञानाचा उपयोग करून आधुनिक जगांच्या प्रश्नांवर उत्तरे शोधण्याच्या प्रयत्न करत आहे. या उपक्रमाच्या सीईओ एझिल सुबियन यांची ‘ओआरएफ’ने घेतलेली मुलाखत.

ओआरएफ : शाश्वत भविष्यासाठी ‘स्ट्रिंग बायो’चे सर्वसमावेशक ध्येय काय आहे?

एझिल सुबियन : वाढत्या लोकसंख्येची भूक शमविण्यासाठी, ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी आणि अन्य अनेक कारणांमुळे गेल्या काही दशकांपासून आपल्या पर्यावरणावरचा ताण वाढीस लागला आहे. त्याचा आपल्या सभोवतालीच्या जीवन आणि पर्यावरणावर मोठा नकारात्मक परिणाम झाला आहे. या सर्व वाढत्या शाश्वत मागण्यांची पूर्तता करण्यासाठी तातडीच्या उपायांची गरज आहे.

स्ट्रिंग तंत्रज्ञानामुळे अशा प्रकारच्या उपाययोजनांसाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध होऊ शकतो. बौद्धिक संपदेचे (आयपी) संरक्षण लाभलेली तंत्रज्ञाने (स्ट्रिंग एकात्मिक मिथेन मंच) स्ट्रिंगने विकसित केली आहेत, ज्यातून रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असलेला कच्चा माल मिथेनपासून प्राप्त करता येतो. आमच्या उत्पादनांचे मुख्य उद्दिष्ट क्षेत्र खाद्यान्न बाजाराला (मायक्रोबायल प्रथिने जी स्वच्छ, सुरक्षित, शोधण्यायोग्य, उच्च दर्जाची आणि मापनीय असतात) आणि कृषी उत्पादकता (मिथेनपासून प्राप्त केलेली, रसायनमुक्त, नैसर्गिक बायोस्टिम्युलंट्स जे मातीचे आरोग्य जपून तिची पीक उत्पादकता वाढवू शकतात) पर्यायी प्रथिने पुरवणे हे आहे.

स्थानिक बाजारात उत्पादित झालेला आणि शाश्वत पुरवठ्याची हमी देणारा कच्चा माल जिथे सहज उपलब्ध असेल, ज्या ठिकाणी जैविक प्रगती कार्यक्षमतेमुळे दैनंदिन जीवन जगणे शक्य झाले आहे, अशा जगाची निर्मिती करणे हे ‘स्ट्रिंग’चे व्हिजन आहे. जीवशास्त्र समजून घेण्याच्या प्रक्रियेत गेल्या काही दशकांत मोठी प्रगती झाली आहे. आमचा असा ठाम विश्वास आहे की, अनेक गुंतागुंतीच्या आणि जटिल अशा अडचणी सोडविण्यासाठी जीवशास्त्र हे हुकुमाचे अस्त्र आहे. त्यामुळे परिसंस्थेचा समतोल साधण्यात मदत होते.

आमचे उद्दिष्ट अगदी साधे आहे. जीवशास्त्राच्या शक्तीचा अधिकाधिक लाभ घेऊन जीवन जगण्याच्या धडपडीत प्राधान्यक्रम असेलल्या क्षेत्रांसाठी शाश्वत आणि मापनीय उपाययोजनांची आखणी करणे. आमच्या प्रभावामुळे स्थानिक उत्पादने सक्षम होऊन किफायतशीर किमतीत स्पर्धात्मक पर्याय उपलब्ध होतात, मजबूत मूल्य साखळींच्या उभारणीसाठी हरितगृह वायूंमधील कर्बाचा लाभ उठवणे, सुरक्षित, सेंद्रीय आणि नैसर्गिक पर्याय सक्षम करणे, जगण्याच्या चक्रातील मूळ वर्तुळ सक्षम करणे आणि मूल्य साखळींना आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या अधिक शाश्वत ठरेल अशा संक्रमणासाठी सक्षम करणे.

ओआरएफ : संशोधन आणि विकासाची मुळे भारतात घट्ट रुजवताना जागतिक बाजारपेठेत विस्तार करण्याच्या संकल्पनेकडे तुम्ही कसे पाहता?

ईएस : स्थानिक उत्पादन आणि उपभोग (खप) यांच्या माध्यमातून पुरवठा साखळ्यांची कार्यक्षमता वृद्धिंगत करणे हे स्ट्रिंगचे व्हिजन आहे. म्हणून भारतात संशोधन आणि विकासाचे काम करत असलो तरी आमचे अंतिम उद्दिष्ट मात्र जागतिक बाजारपेठ हेच आहे. अगदी सुरुवातीपासूनच आम्ही हे उद्दिष्ट आमच्यासमोर ठेवले आहे.

विविध बाजारपेठांत स्थानिक उत्पादन आणि उपभोग (खप) यांना सक्षम करण्यासाठी आम्ही बाजाराधिष्ठित उत्पादन मागणीच्या पार्श्वभूमीवर विविध भौगोलिक प्रदेशांत पुरवठा आणि बाजारपेठ अशा दोन्ही ठिकाणी व्यूहात्मक भागीदारांशी संबंध स्थापित करत आहोत.

तंत्रज्ञान, कार्यक्षमता आणि उत्पादने यांच्यातील प्रगतीबरोबरच सर्वांसाठी उपयुक्त ठरेल अशा संशोधन आणि विकास कार्यक्रमाची मुळे भारतात रुजविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यंदाच्या वर्षी (२०२०) प्रवासावर तसेच वैयक्तिक गाठीभेटींवर अनेक प्रकारचे निर्बंध आले आहेत. अशा परिस्थितीतही व्यवसाय कसा चालवायचा, हे यातून प्रकर्षाने दर्शवायचे आहे. याचा अर्थ असा की, भारतातून जागतिक बाजारपेठेसाठी उपाययोजनांचा पुरवठा करणे हे कधी नव्हे एवढे सोपे झाले आहे.

ओआरएफ : भारतातील प्राथमिक अवस्थेत असलेली सर्जनशील यंत्रणा तुम्हाला ‘स्ट्रिंग बायो’ मंतावरील उपाययोजना विकसित करण्यासाठी कितपत उपयुक्त ठरली? आणि मजबूत सर्जनशील पर्यावरणाला पूरक ठरेल, अशी कोणती धोरणे भारताने राबवायला हवीत?

ईएस : गेल्या पाच वर्षांत भारतामध्ये जैवतंत्रज्ञानावर आधारलेल्या स्टार्टअप्ससाठी निधीपुरवठा आणि पायाभूत सुविधा या प्राथमिक टप्प्यावरील प्राथमिक अवस्थेतील पूरक यंत्रणेत स्वप्नवत बदल झाला असल्याचे आढळून आले आहे. २०१४ मध्ये जेव्हा स्ट्रिंगची बेंगळुरूत रुजवात झाली त्यावेळी शहरात जैवतंत्रज्ञान स्टार्टअप्सना पूरक ठरतील अशी दोनच इनक्युबेटर्स होती आणि त्यांचे पूर्ण लक्ष केवळ इनक्युबेशनवर केंद्रित नव्हते. शिक्षण आणि संशोधन या दोन महत्त्वाच्या घटकांमधील इनक्युबेशन हा एक लक्ष केंद्रित करण्याचा तितकाच महत्त्वाचा दुवा आहे. आम्हाला त्यातील एकात आमचे कार्य सुरू करण्याइतपत मार्ग सापडला, याबाबतीत आम्ही नशीबवान आहोत, असे आम्हाला वाटते.

मात्र, यंदाच्या वर्षातील चित्र फारच वेगळे आहे. सद्यःस्थितीत जैवतंत्रज्ञान कंपन्यांसाठी बेंगळुरूत किमान दहा ठिकाणी इनक्युबेशन सुविधा उपलब्ध आहेत. जैवतंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांना प्राथमिक टप्प्यात लागणा-या उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे त्यांचे प्राथमिक कर्तव्य आहे. तसेच अधिकाधिक इनक्युबेटर्सना सामावून घेता यावे यासाठी बंगलोर बायोइनोव्हेशन सेंटर आणि सी-कॅम्प यांसारख्या संस्था त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करत आहेत.

या बदलाचे श्रेय निर्विवादपणे केंद्र आणि राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात सुरू केलेल्या निधीपुरवठा उपक्रमांना जाते. बीआयआरएसीसारखी केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागांतर्गत येणा-या संस्था आणि त्यांच्याकडून राबविण्यात येणा-या असंख्य निधीपुरवठा योजना यांमुळे देशात जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी अनुकूल वातावण तयार झाले असून या क्षेत्रातील जाणकार हळूहळू पुढे येऊन विविध कंपन्यांची स्थापना करू लागले आहेत. कर्नाटक सरकारनेही राज्य पातळीवर हे धोरण पुढे नेले असून अनेकांना मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे जैवतंत्रज्ञान क्षेत्राला प्राथमिक टप्प्यातच चांगले पाठबळ मिळाले आहे.

स्ट्रिंगने अगदी योग्यवेळी बेंगळुरूमध्ये आपल्या कामाला सुरुवात केल्याने त्याचे चांगले लाभ आमच्या पदरात पडले. सर्जनशीलतेला वाव मिळण्यासाठी मिळालेल्या अनुकूल वातावरणाचा आम्हाला फायदा झाला आणि आम्हीही त्या लाटेवर स्वार होऊन आमचे ध्येय गाठू शकलो. आमच्या सुरुवातीच्या टप्प्यातील कामासाठी बीआयआरएसी आणि कर्नाटक राज्य शासन यांच्याकडून मोठ्या प्रमाणात निधीपुरवठा झाला. आमच्या स्वमालकीच्या जागेत स्थलांतरित होण्यापूर्वी आम्हाला इनक्युबेशन सुविधेचाही प्रचंड प्रमाणात लाभ झाला.

भारतातील सर्जनशीलतेला सक्षम करण्याचे सरकारी प्रयत्न मंदावणार नाहीत अशी आम्हाला आशा आहे. परिसंस्था विकसित होत असताना तसेच कंपन्या अधिकाधिक परिपक्व होत असताना सर्जनशीलतेवर आधारित विकासाचा पुढचा टप्पा गाठण्यासाठीची नितांत गरज भासू लागते. काही आवश्यक बाबी/धोरणे अधिक सक्षम होणे गरजेचे आहे ज्यात प्राथमिक टप्प्यातील उत्पादन/चाचणई सुविदा, प्लग अँड प्ले कमर्शिअल मॅन्युफॅक्चरिंग पार्क्स, देशातच निर्माण केलेल्या उत्पादनांना बाजारात आणण्यासाठी आवश्यक असलेली नियामकतेतील सुस्पष्टता, प्रगतीचा पुढील टप्पा गाठण्यासाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळवण्यासाठी थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) भारतात आणण्यासाठीचे सुलभीकरण आणि आयपी प्रोटोकॉल सर्जनशीलतेसाठी सशक्त कायदेशीर वातावरणाची निर्मिती इत्यादींचा समावेश आहे.

ओआरएफ : तुमचा विस्तारित आणि जागतिक तंत्रज्ञान विकास पाहता संशोधन आणि विकास अधिकाधिक रसपूर्ण होण्यासाठी तुम्ही काय मंत्र द्याल?

ईएस : स्ट्रिंगसाठी लोकांची निवड करतेवेळी घेतलेल्या मुलाखती आणि त्या दिशेने काम करताना आलेल्या अनुभवांवर आधारित एक पुस्तकच लिहावे असं मला वाटते. अनेकांना तर आपण हे क्षेत्र का निवडलंय याचाच काही पत्ता नसल्याचे या प्रक्रियेदरम्यान जाणवले. अर्थात सगळेच तसे होते असे नाही. बहुतांशजणांना या विषयात रुची असून नवीन काही तरी करून दाखवण्याच्या जिद्दीने ते या क्षेत्रात आल्याचे आढळून आले. जैवतंत्रज्ञान क्षेत्रासाठी लागणा-या काही भूमिकांसाठी हा काही चिंतेचा विषय नव्हता. मात्र, जेव्हा तंत्रज्ञान आणि सर्जनशीलता हे मुद्दे येतात त्यावेळी तुमच्याकडे तेवढी पात्रता असावीच लागते. ते जर नसेल तर उमेदवार निवडीचे मोठे आव्हान समोर असते.

संधोधन आणि विकास अधिकाधिक रसपूर्ण करण्यासाठी तसेच उत्पादने बाजारात धडाक्याने येण्यासाठी या सर्व प्रक्रियेत सहभागी असलेला चमू ऊर्जेने भरलेला हवा, कल्पकता हवी, व्हिजन असणे गरजेचे आहे आणि मुख्य म्हणजे आपले ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक असलेला सकारात्मक दृष्टिकोन आणि चिकाटी हे गुण या क्षेत्रात खूप महत्त्वाचे ठरतात. आम्ही आमच्याकडच्या कर्मचा-यांना त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे कोणतेही काम करताना त्यांच्यावर दबाव नसतो. तुमच्या आवडीच्या क्षेत्रात उत्तुंग काही करायचे असेल तर तेवढे स्वातंत्र्य द्यायलाच हवे. त्यानंतर जे काही कराल त्याची सर्वस्वी जबाबदारी त्या कर्त्याची असते त्यामुळे त्याला जबाबदारीचे भान असते. आमचे आकारमान जेव्हा लहान होते तेव्हा हे असे करणे आमच्यासाठी आवश्यक होते. जसजशी आमची कर्मचारीसंख्या वाढली तेव्हाही आम्ही हाच दृष्टिकोन कायम ठेवला. योग्य निर्णय घेण्याची क्षमता असलेले, आपली जबाबदारी ओळखून त्या दिशेने गांभीर्याने काम करणारे कर्मचारी मिळणे दुरापास्त असते. मात्र, सुदैवाने आम्हाला तसे कर्मचारी मिळाले.

सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना शिकण्याचे स्वातंत्र्य आणि मुक्त वातावरण उपलब्ध करून दिल्यास त्यातून सकारात्मक परिणाम घडतात. त्याप्रमाणे शिक्षण पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. सद्यःस्थितीत भारतात तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची वानवा आहे. त्याकडे अधिकाधिक लक्ष दिले जाणे गरजेचे आहे. शिक्षणात तंत्रज्ञानाचा समावेश केला जावा. कुटुंबातील जबाबदा-या वाढल्या की महिला पूर्वीसारखे कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.

त्यामुळे टेक्नॉलॉजी/इनक्युबेशन पार्क्समध्ये पाळणाघरांची, डे-केअर सेंटर्सची उपलब्धता, कामाच्या ठिकाणी कोणाला काही इजा झाल्यास त्याच्यावर तातडीने प्राथमिक उपचार करता येतील किंवा करू शकणा-या कर्मचा-यांची नियुक्ती, पितृत्वाची रजा यांसारख्या सुविधांमुळे महिलांना पूरक ठरू शकेल अशी कार्यसंस्कृती उभारली जाणे गरजेचे आहे. मी अशा वातावरणात काम केले असल्याने याचे महत्त्व मी जाणून आहे. बेंगळुरूसारख्या महानगरांमध्ये अजूनही अशी कार्यसंस्कृती रुजलेली नाही. स्टार्टअप यंत्रणा जसजशा विकसित होत जातील तसतशा अनेक कंपन्या एकत्र येऊन ही यंत्रणा नक्कीच उभारतील, अशी मला आशा आहे.

संशोधन आणि विकास अधिक रसपूर्ण करता येऊ शकेल अशी आणखी एक संधी म्हणजे जैवतंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असेलल्या कंपन्या आणि याच क्षेत्रातील शिक्षण संस्था यांच्यातील समन्वय वा भागीदारी होय. सद्यःस्थितीत या दोन्ही यंत्रणांमध्ये मोठी दरी आहे. ही दरी मिटविण्याच्या कामात यश आले तर शैक्षणिक संशोधन हा उद्योग/कंपन्यांसाठी खजिना ठरेल. त्यामुळे शैक्षणिक संस्थांकडेही निधीचा ओघ येऊ शकेल.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.