Published on Aug 18, 2020 Commentaries 0 Hours ago

प्लॅस्टर ऑफ पॅरिस घातक व शाडूमाती ही पर्यावरणपूरक, हा गैरसमज आपण दूर करायला हवा. या दोन्ही पर्यायांच्या पलिकडे जाऊन गणेशोत्सवाचा पुनर्विचार व्हायला हवा.

शाडूची मूर्ती ‘इकोफ्रेंडली’ नव्हे!

Source Image: asheshr.com / gettyimages

कोरोनाच्या महासाथीमुळे यावर्षी गणेशोत्सवासह सर्वच उत्सवाचा पुनर्विचार सुरू झाला आहे. गर्दी न करता गणेशोत्सव कसा करता येईल, याचा विचार करताना पर्यावरणपूरक म्हणजे ‘इकोफ्रेंडली’ गणेशोत्सवाबद्दल खूप बोलले जात आहे. पण, पर्यावरणपूरक गणेशोत्सव म्हणजे शाडूच्या मातीचा गणपती असा एक समज आज रूढ झाला आहे. पण, शाडूची गणेशमूर्ती ही पर्यावरणपूरक नसते, हे नीट समजून घ्यायला हवे. तसेच, पर्यावरणपूरक गणेशोत्सव आपल्याला नक्की कसा करता येईल, याचाही नव्याने विचार सुरू व्हायला हवा.

एक आपण सर्वांनी आधी मान्य करायला हवे, की वाढत्या शहरीकरणासोबत उत्सवाची संकल्पना बदलत गेली आहे. शहरातील उत्सव हे निसर्गापेक्षा बाजारावर अधिक अवलंबून असतात. आपल्या संस्कृतीमध्ये उत्सवाची संकल्पना ही निसर्गाशी जोडलेली आहे. निसर्गात उपलब्ध असलेल्या गोष्टींमधूनच, उत्सव साजरा करण्याची आपली परंपरा आहे. पण शहरात हा निसर्ग उपलब्ध नसल्याने, आपण बाजारातून वस्तू आणून उत्सव साजरा करतो.

उत्सवाचे इथपर्यंतचा बदल हा अपरिहार्य होता, हे जरी मान्य केले, तरी आपल्या संस्कृतीत निसर्गातून घेतलेले निसर्गाला परत करण्यालाही तेवढेच महत्त्व आहे. निसर्गातून जसे घेतले तसेच ते परत केले, तरच निसर्गचक्र पूर्ण होऊ शकते. निर्माल्याचे विघटन होऊन ते पुन्हा निसर्गात जाऊ शकते, पण मातीचे काय? जी माती जिथून काढली तिथेच ती परत जायला हवी. गणेशमूर्तींबाबत असे होताना दिसत नाही. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून गणेशमूर्तींचा हा वापर आणि व्यापार नीट समजून घ्यायला हवा.

आज बाजारात गणेशमूर्तींचे साधारण दोन प्रकार उपलब्ध आहेत. एक शाडूच्या मातीचा आणि दुसरा प्लॅस्टर ऑफ पॅरिस म्हणजेच पीओपीचा. ही दोन्ही प्रकारची माती बाहेरूनच आणली जाते. शाडूची मातीची मूर्ती लवकर विरघळते आणि चिकण माती पाण्याखाली जाऊन बसते. पीओपीची मूर्ती विरघळायला वेळ लागतो एवढेच. मूर्ती विरघळते म्हणजे माती विरघळत नाही. हे दोन्हीही मातीचे प्रकार आपल्या नदीत, समुद्रात किंवा नैसर्गिक जलस्रोतात गेल्याने, निसर्गचक्र साधले जात नाही. त्यामुळे शाडू मातीची मूर्ती पर्यावरणपूरक आणि पीओपीची घातक हा समज चुकीचा आहे, हे सर्वांनी समजून घ्यायला हवे.

पीओपी हानिकारक आहे हे लक्षात आल्यावर आपण शाडूच्या मातीपासून तयार केलेले गणपती वापरू लागलो. त्यासाठी ‘इकोफ्रेंडली’ वगैरे जाहिरातबाजी करू लागलो. त्यासाठी सरकार पुरस्कारही देऊ लागले. कारण, शाडूमाती हे पर्यावरणपूरक आहे हा गैरसमज आपण करून घेतला. गुजरात येथील खाणींमधून शाडूमाती प्रक्रिया करून तयार केली जाते. शाडूमाती हा चिकण मातीचा एक प्रकार आहे. आधी शाडूमाती ही आर्टिस्ट क्ले म्हणून वापरली जायची. परंतू काही काळानंतर पीओपीच्या मुर्त्यांसाठी पर्याय म्हणून शाडूमातीकडे पाहिले जाऊ लागले. शाडूमाती ही तुलनेने स्वस्त मिळते, शिवाय तिची बांधणी सहज होऊन ती लवकर कडक होते.

शाडूमातीही पाण्यात विरघळत नाही. नदीपात्रात शाडूमातीपासून बनवलेल्या मुर्त्यांचे विसर्जन केल्यास नदीमधील वाळूवर शाडूमाती चिकटून बसते. त्यामुळे नदीतील पाणी गाळण्याच्या प्रक्रियेत अडथळे येतात शिवाय यामुळे भूजल पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेत नदीची भोके बंद होत आहेत. शाडूमातीमध्ये सिलिका, मॅग्नेशियम, मँगनीज, आयर्न असे जडधातू अस्तित्वात असतात. नदीत विसर्जित केलेली शाडूमाती नदीपरिसरातील इतर शेतांमध्ये जाते. त्यातील विषारी जडधातू पिकांमधून आपल्या पोटांत जाऊन अनेक आजार उद्धभवतात. त्यामुळे शाडूमाती ही पर्यावरणपूरक आहे, हा गैरसमज आपण ताबडतोब दूर करायला हवा.

यासंदर्भात पुण्यातील ‘जिवीत नदी’ ही संस्था गेली कित्येक वर्षे नदी पुनरूज्जीवनासाठी काम करत आहे. या उपक्रमांतर्गत ते पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा नवा विचार लोकांपर्यंत पोहचवत आहे. नदीच्या काठावर चर्चासत्रचे आयोजन करणे, नदीकिनारा दत्तक घेण्याचा उपक्रम राबवणे, गणपती विसर्जनाच्या वेळी प्रत्यक्ष विसर्जन स्थळी पोहचून कमीत कमी प्रदूषण असे करावे या संदर्भात लोकांना माहिती देणे, असे अनेक उपक्रम या संस्थेमार्फत राबवले जातात.

या संस्थेच्या कार्यकर्त्या शैलजा देशपांडे म्हणतात,  ‘इकोफ्रेंडली हे फॅड आपण थांबवायला हवे. आज पाणी हे सर्वात मौल्यवान गोष्ट ठरत आहे. त्यामुळे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत वाचवणे, ही काळाची गरज आहे. कोणत्याही गोष्टी जास्त प्रमाणात नदीत किंवा जलस्रोतांमध्ये गेल्या, तर प्रदूषण निश्चितच होणार आहे. याच अर्थ आपण उत्सव साजरा करायचा नाही, असे नाही. फक्त उत्सवाची पद्धत आपण बदलायला हवी. याआधीही अनेकदा उत्सवाच्या पद्दती बदलल्या आहेत. आपण सध्या आचरत असलेली पद्धतही मूळ पद्धतीपेक्षा बदललेलीच आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या परंपरांचा निसर्गाच्या दृष्टिकोनातून विचार करून उत्सव कसे साजरे करता येतील, त्याचा विचार करायला हवा.’

गणेशोत्सवाची लोकप्रियता वाढू लागल्याने गणेशमूर्तींचीही मागणी वाढली. ही मागणी पूर्ण करण्याकरता शहरामध्ये कुठे माती मिळणार? मग १९३०-१९४० च्या दरम्यान ‘पीओपी’चा वापर वाढल्यामुळे घरोघरी विविध रासायनिक रंगांनी रंगवलेल्या पीओपीच्या गणपतीच्या मूर्त्या मोठ्या प्रमाणात दिसू लागल्या. या मूर्त्या खूपच आकर्षक असतात. चुन्यापासून बनवलेले पीओपी मोकळ्या हवेत अगदी काही मिनिटात कडक होऊन जाते. त्यामुळे ‘पीओपी’पासून बनवलेल्या गणपतींच्या मुर्त्यांची उंची देखील आपोआप वाढली. मंडळा-मंडळांमधील स्पर्धांमुळे या मूर्त्यांच्या उंचीमध्ये आणखीणच भर पडली. त्यामुळे गणेशोत्सव काळातील प्रदूषणांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली.

एकट्या मुंबईत २०१९ च्या गणेशोत्सवात एकूण १ लाख ९६ हजार ४८३ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. हीच संख्या पुण्यामध्ये ५ लाख ३० हजार १०९ एवढी होती. महाराष्ट्रातील या दोन्ही महानगरांनी किती प्रमाणात तेथील जलस्रोतांमध्ये शाडूची माती आणि पीओपी टाकले असणार याची कल्पना या दोन संख्यांवरून आपल्याला येईल. आता मुद्दा असा की, या मातीचे पाण्यात काय होते? ज्या मूर्त्यांचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये होते, तेथे किमान ती माती पुनर्वापरासाठी तरी जाते. पण, नैसर्गिक स्रोत्रामध्ये गेलेली माती, त्या नदीला, विहिरीतील नैसर्गिक छिद्रांमध्ये अडकून बसते. समुद्रातही ती तेथील सागरी जीवसृष्टीला हानीकारक ठरते.

पीओपी हे विघटित होत नाही अथवा विरघळत नाही. पण पीओपीच्या मूर्त्या विरघळत नसल्याने त्या उचलून त्यांचा पुनर्वापर बांधकाम उद्योगात होतो. पण शाडूची माती त्या त्या जलस्रोतांमध्ये जाऊन अडकते. याचा अर्थ शाडू असो की पीओपी हे दोन्हीही पर्यावरणाला घातकच ठरतात. या मातीप्रमाणेच गणेशमूर्त्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या रंगामध्ये शिसे, क्रोमियम, आयर्न यांसारखे अतिशय हानिकारक घटक मिसळलेले असतात. हे रंग पाण्यात विरघळून पाण्यातील जलचर आणि वनस्पतींवर वाईट परिणाम होतो. तसेच हे घटक आपल्या अन्नसाखळीत येऊन रोगराई वाढण्याची शक्यता अधिक असते.

आता हे सारे सांगितल्यावर मग गणेशोत्सव कसा साजरा करता येईल, याचाही विचार व्हायला हवा. आपल्याकडे गणेशमूर्ती पार्थिव असावी, असे सांगितले आहे. पार्थिव म्हणजे पृथ्वीतत्वापासून बनलेली. या व्याख्येप्रमाणे धातूपासून बनलेली मूर्ती पार्थिवच ठरते. त्यामुळे भविष्यात धातूपासून बनलेल्या गणेशमूर्तींचा वापर वाढला तर उत्सवही टिकून राहील आणि विसर्जनाच्या वेळी होणारी निसर्गाचीही हानीही टाळता येईल.

पण, ज्यांना शाडूमातीची किंवा पीओपीचीच गणेशमूर्ती घरी आणायची आहे, त्यांनी मूर्तीचे विसर्जन न करता, सुपारी म्हणून पूजलेल्या गणपतीचे प्रतिकात्मक विसर्जन करता येईल. उत्सवमूर्ती नीट ठेवून तिचा पुढीलवर्षी पुन्हा वापर करता येईल. महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये आणि गणेशोत्सव मंडळात ही परंपरा कित्येक वर्षे पाळली जाते. त्यामुळे त्यात काही चुकीचे आहे, असे वाटण्याचेही कारण नाही.

या सर्व पर्यायांना उत्सवाचे धोरण म्हणून किंवा किमान मार्गदर्शन सूचना म्हणून शासनाने प्रोत्साहन द्यायला हवे. विसर्जनाची प्रकिया जेवढी कमी तेवढा गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक, ही भविष्यातील उत्सवाची दिशा ठरवायला हवी. आज जागतिक पातळीवर हवामान बदलाचे होणारे परिमाम आपण सर्वच अनुभवतो आहोत. शहरीकरणामुळे या हवामान बदलाने आपले जलस्रोत आधीच धोक्यात आहेत. त्यामुळे नव्या दृष्टीने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा पुनर्विचार एक व्यक्ती म्हणून, कुटुंब म्हणून आणि समाज म्हणून सर्वांनी करणे, आज अत्यावश्यक आहे.

(लेखिका ‘ओआरएफ मराठी’साठी इंटर्नशिप करत आहेत.)

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.