Author : Khalid Shah

Published on May 06, 2020 Commentaries 0 Hours ago

कोरोनाचा हाहाःकार सुरू असतानाच, जम्मू-काश्मीरमध्ये अचानक वाढलेल्या दहशतवादी कारवायांमुळे मोदी सरकारने ५ ऑगस्टनंतर केलेले सर्व दावे निरर्थक ठरले आहेत.

कोरोनाच्या आडून पाकचा ‘नापाक’ डाव!

महाभयंकर अशा कोरोना विषाणूचा सामना करण्याचे मोठे आव्हान संपूर्ण जगासमोर उभे ठाकले आहे. या कोरोनाला पराभूत करण्याकडे संपूर्ण जगाने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी सारे जग झपाटून कामाला लागले आहे. मात्र, पाकिस्तान याकडे एक संधी म्हणून पाहत आहे. नव्या दहशतवादी संघटनेच्या स्थापनेसह सीमेपलीकडे घुसखोरी वाढवणे आणि सोशल मीडियाद्वारे दहशतवादी कारवाया वाढवण्याचे काम जम्मू आणि काश्मीरमध्ये केले जात आहे. जगभर कोरोनाचा हाहाःकार सुरू असताना दुसरीकडे, पाकिस्तानच्या वरदहस्ताने काश्मीरमध्ये कारवाया करणाऱ्या अपप्रवृत्तींना आणि अतिरेकी संघटनांना अचानक बळ मिळाले आहे. या शक्तींनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.

काश्मीरमध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांमध्ये जोरदार संघर्ष सुरू झाल्याचे बोलले जात आहे. २५ एप्रिल २०२० रोजी ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) ही नवी दहशतवादी संघटना सक्रिय झाल्याचे वृत्त समोर आलं. हिज्बुल मुजाहिद्दीन (HM) या दहशतवादी संघटनेत फूट पडल्यानंतर या नव्या दहशतवादी गटाचा उदय झाला आहे. त्यानंतर हिज्बुल मुजाहिद्दीन आणि या नव्या संघटनेत जबरदस्त संघर्ष सुरू झाला आहे, असे वृत्त आहे. मात्र, हिज्बुल मुजाहिद्दीनच्या ऑपरेशनल कमांडर रियाझ नाइकू याने तातडीने एक ध्वनिफित जारी केली आणि काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांमध्ये फूट पडल्याचे वृत्त त्याने फेटाळून लावले. हिज्बुल मुजाहिद्दीनला जबाबदार ठरवणारे बोगस व्हिडिओ प्रसिद्ध करून संघटनांमध्ये फूट पडल्याचा चुकीचा समज पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा या ध्वनिफितीद्वारे त्याने केला.

काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या विविध दहशतवादी संघटनांमधील अधिक चांगला ताळमेळ आणि परस्परांमधील कार्यक्षमता सुनिश्चित करण्याच्या पाकिस्तानच्या रणनीतीनुसार हिज्बुल मुजाहिद्दीनचा या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ अर्थात टीआरएफ या नव्याने स्थापन झालेल्या संघटनेला पाठिंबा आहे. टीआरएफची स्थापना देखील सीमेपलीकडील दहशतवादाच्या पाकिस्तानच्या रणनीतीचे आणखी एक पाऊल आहे. बुरहान वानीचा उदय झाल्यापासून पाकिस्तान आणि काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवादी गटांनी सीमेपलीकडील दहशतवादाला स्वदेशी ब्रँडिंग देण्याचा प्रयत्न केला. याच रणनीतीचा भाग म्हणून, यापूर्वी पाकिस्तान पुरस्कृत असलेल्या जैश-ए-मोहम्मद आणि लश्कर- ए-तोयबासारख्या दहशतवादी संघटनांनी काश्मीरमधील स्थानिक तरुणांना फूस लावून या संघटनांसाठी मोठी भरती केली होती. सन २०१८ मध्ये लश्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या संघटनांनी स्थानिक तरुणांची केलेली भरती हिज्बुल मुजाहिद्दीनच्या तुलनेत कैक पटीने अधिक होती.

संघटना मजबूत करणे, अधिक शक्तिशाली बनवणे, मनुष्यबळ वाढवणे, शस्त्रसाठा आणि विविध दहशतवादी गटांना एकाच छताखाली एकत्रित प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न म्हणून या नव्याने स्थापन केलेल्या टीआरएफ या संघटनेकडे पाहिले गेले पाहिजे. काश्मीरमधील दहशतवाद ही स्थानिक स्वरूपाची चळवळ आहे आणि ज्याचा वापर आर्थिक रसद पुरवठ्यावर लक्ष ठेवून असलेल्या फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स अर्थात ‘एफएटीएफ’च्या नियंत्रणाखाली असलेल्या विविध दहशतवादी संघटनांशी कोणताही संबंध नाही, हे जगाला दाखवून देण्यासाठी केला जाईल.

मुख्य म्हणजे, लश्कर- ए- तोयबा, हिज्बुल मुजाहिद्दीन आणि टीआरएफ हे संयुक्तपणे एक संघटना म्हणून टीआरएफच्या नावाखाली काम करतील. १ एप्रिलपासून ज्या प्रकारच्या हालचाली सुरू आहेत, त्या पाहता हे गट एकत्रित आल्याचे त्यांच्याद्वारे चालवण्यात येणाऱ्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून दिसून येते. सोशल मीडिया ग्रुपच्या माध्यमातून हिज्बुल मुजाहिद्दीन, लश्कर-ए-तोयबा आणि टीआरएफमध्ये माहिती आणि प्रचाराच्या तंत्राची देवाणघेवाण केली जात आहे.

१५ एप्रिल रोजी ‘द जॉइंट रेझिस्टन्स फ्रंट’ नावाचा एक नवीन टेलिग्राम चॅनल सुरू करण्यात आला होता. त्यावर टीआरएफच्या कमांडरचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. त्यात हुशार, दगडफेक करणारे आणि स्थानिक तरुणांना एकजूट होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर चॅनलवरून हिज्बुल मुजाहिद्दीन आणि लश्कर-ए-तोयबाच्या मृत्यू झालेल्या दहशतवाद्यांची छायाचित्रे प्रसिद्ध केली होती. त्यात या दहशतवाद्यांची स्तुती करण्यात आली होती. विशेष म्हणजे हिज्बुल मुजाहिद्दीनचे ५ ऑगस्टच्या जवळपास बंद झालेले चॅनल पुन्हा सक्रिय झाले.

टीआरएफचे अस्तित्व पहिल्यांदाच २३ मार्च रोजी जगासमोर आले. पोलिसांनी त्यांच्या सहा दहशतवाद्यांना अटक करत त्यांच्या मॉड्युलचा भंडाफोड केला. त्यांच्याजवळून आठ स्वयंचलित रायफल्स, दहा पिस्तूल आणि ८९ ग्रेनेड असा शस्त्रसाठा जप्त केला होता. हा गट सोशल मीडियावर सक्रिय होता आणि त्याची सुरूवात गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झाली होती.

५ ऑगस्टनंतर पहिल्यांदाच या दहशतवादी गटांकडून सुरक्षा दलांना लक्ष्य केले जात असल्याचे समोर आले. १८ एप्रिल २०२० रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हल्ला झाला होता. त्यात निमलष्करी दलाचे तीन जवान शहीद झाले होते. तर दोन जवान जखमी झाले होते. हा हल्ला घडवून आणल्याचा दावा टीआरएफनं केला होता. ४ एप्रिल रोजी विशेष सुरक्षा दलांमधील कमांडो आणि टीआरएफच्या दहशतवाद्यांमध्ये नियंत्रण रेषेजवळ चकमक झडली होती. त्यात पाच कमांडो शहीद झाले होते. या चकमकीत टीआरएफचे पाच दहशतवादी मारले गेले होते. त्यात तीन जण काश्मीरमधील स्थानिक तरूण होते. नियंत्रण रेषेवरून ते भारतात घुसखोरीचा प्रयत्न करत होते. त्यांना विशेष सुरक्षा दलाच्या कमांडोंनी रोखले होते. त्यावेळी ही चकमक झाली होती. या व्यतिरिक्त दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मोठी हानी झाली होती.

जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात आणि किश्तवारमधील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन पोलीस शहीद झाले होते. इतर दोन घटनांबाबत सांगायचे झाले तर, दहशतवाद्यांनी दोन पोलिसांचे अपहरण केले होते आणि त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या सुरक्षा दलांसाठी सांगायचे झाले तर, परिस्थितीत खूप काही बदल झालेला नाही.

‘केरन ऑपरेशन’ तब्बल पाच दिवस चालले होते. वाढलेल्या दहशतवादी कारवायांमधून अनेक अस्वस्थ करणारे घटक या मोहिमेच्या माध्यमातून समोर आले होते. केरन चकमकीत तीन स्थानिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं. सज्जाद अहमद हुराह, आदिल हुसैन मिर आणि उमर नाईक हे तिघेही दक्षिण काश्मीरमधील रहिवासी. वाघा-अटारी सीमेवरून ते पाकिस्तानच्या अधिकृत व्हिसावर ते पाकिस्तानला गेले होते. हे तिघेही सन २०१८ पासून बेपत्ता होते. प्रशिक्षण आणि शस्त्रास्त्रे मिळवण्यासाठी ते पाकिस्तानात गेले होते. दहशतवादासाठी काश्मीरमधील स्थानिक प्रशिक्षण घेण्याकरिता अशा प्रकारे सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेले होते. हे पहिल्यांदाच घडले होते. या घटनेपर्यंत काश्मीरमध्ये नवीन दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या कोणत्याही प्रशिक्षित काश्मिरी दहशतवाद्याला पाहिलेले नाही.

दुसऱ्या बाजूला काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रा निघणे सुरू झाले होते. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी सजाद नवाब डार हा मारला गेला होता. सोपोरमध्ये ८ एप्रिल रोजी डार याच्या अंत्ययात्रेला शेकडोंचा जनसमुदाय जमला होता. दुसरी अशाच प्रकारची घटना आहे. कुलगामध्ये सद्दाम याच्या अंत्ययात्रेला अनेक जण उपस्थित राहिले होते. हे म्हणजे एक न उलगडलेले कोडे होते. ज्या कोड्याचे तुकडे ५ ऑगस्टनंतर अदृश्य झाले होते. ते अचानकपणे गेल्या काही आठवड्यांत पुन्हा जोडले गेले आहेत. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांवर अंत्यसंस्कार करण्यास मनाई केली होती. पूर्णपणे प्रतिबंध घातला होता.

स्थानिक दहशतवाद्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देणे बंद केले असले तरी, मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांवर लपूनछपून अंत्यसंस्कार केले जात आहेत. दहशतवाद्यांवर अंत्यसंस्कार करण्याचे प्रकार काही थांबलेले नाहीत. टीआरएफचा कमांडर मारला गेला. २७ एप्रिलला साधारण शंभर लोकांनी त्याच्याकरीता प्रार्थना केली होती. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह असो अथवा नसो, त्यांचे अंत्यविधी करणे सुरूच आहेत. हे प्रकार काही थांबलेले नाहीत.

जम्मू-काश्मीरमध्ये अचानक वाढलेल्या दहशतवादी कारवायांमुळे मोदी सरकारने ५ ऑगस्टनंतर केलेले सर्व दावे निरर्थक ठरले आहेत. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवले. त्यानंतर अनेक वेळा सरकारमधील बहुतेक मंत्र्यांनी, इतकंच काय तर केंद्रीय गृहमंत्र्यांनी सुद्धा जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद संपेल, असा दावा केला होता. वर्तमानकाळात वाढलेल्या दहशतवादी कारवायांवरून असं दिसून येते की, भारत सरकार एकीकडे जल्लोष साजरा करण्याच्या मानसिकतेत असताना, पाकिस्तानकडून यापूर्वीच पुढील मोसमापर्यंत योजना आखल्या गेल्या आहेत.

नवीन दहशतवादी संघटना स्थापन करण्यासाठी अनेक महिन्यांपासून तयारी आणि योजना आखली असेल आणि भविष्यात काय घडू शकते, याचे हे एकप्रकारे संकेतच आहेत. दहशतवादी संघटनांच्या टेलिग्राम समूहांनी नव्याने भरती करण्याची केलेली घोषणा पाहता, त्यांनी एक भक्कम अशी योजना आखल्याचे दिसून येतं. काही वृत्तांनुसार, पाकिस्तान पुरस्कृत आणि प्रशिक्षित स्थानिक आणि स्थानिक नसलेले अनेक दहशतवादी नियंत्रण रेषेपलीकडे घुसखोरी करण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

अनेक नव्या दहशतवादी संघटनांपैकी टीआरएफ ही दहशतवादी संघटना जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात आधी डोके वर काढण्याची दाट शक्यता आहे. नव्या दहशतवादी संघटनांपैकी काही पाकिस्तानमधील संघटना पुन्हा सक्रिय होतील. आर्थिक रसद पुरवठ्यावर लक्ष ठेवून असलेल्या ‘एफएटीएफ’च्या चौकशीच्या ससेमिऱ्यातून सुटका करण्यासाठीची ही एक रणनीती आहे. कदाचित ‘एफएटीए’ हे पाकिस्तानसाठी एक सर्वात भयानक असे स्वप्न ठरलेले आहे.

भले काहीही होवो, पण पाकिस्तानची सीमेपलीकडील दहशतवादाची रणनिती कायम आहे. सूडभावनेने मोठ्या प्रमाणात हानी करण्याच्या योजना पाकिस्तानी लष्कराच्या कार्यालयांमध्ये ५ ऑगस्टनंतर आखलेल्या असू शकतात आणि महाभयंकर अशा कोविड १९ महामारीकडे त्याची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे. ही बाब नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकमधील धोरणकर्त्यांसाठी चिंतेची आहे, ज्यांनी दहशतवाद्यांसाठी एकप्रकारे ढाल बनलेले कलम ३७० जम्मू-काश्मीरमधून हद्दपार केले. ५ ऑगस्टला पाकिस्तानमधील अपप्रवृत्तींनी आखलेल्या योजनांमध्ये काहीअंशी फरक पडलेला आहे. त्याचप्रमाणे, सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोट हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या छुप्या युद्ध कारवायांमध्ये खरोखरच काही फरक पडला आहे का, याचा फेरआढावा घेण्याची वेळ आलेली आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.