Originally Published Deccan Herald Published on May 16, 2025 Commentaries 0 Hours ago

भारताची नव्याने उदयास येणारी तंत्रज्ञान-आधारित लष्करी धोरणे ही अण्वस्त्रांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानवर "विजयाशिवाय लढाई" ची किंमत लादण्याच्या उद्देशाने पायाभूत बदल करत आहे.

ऑपरेशन सिंदूर आणि भारताची बदलती लष्करी रणनीती

Image Source: Getty

    १२ मे रोजी राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर सीमापार दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी भारताची नवीन भूमिका मांडली. त्याआधी ११ आणि १२ मे रोजी भारतीय लष्कराच्या वरिष्ठ कमांडर्सनी संयुक्त पत्रकार परिषदांमध्ये ७ मे रोजी सुरू झालेल्या ऑपरेशन सिंदूरचे सविस्तर वर्णन दिले. हे ऑपरेशन २२ एप्रिल रोजी झालेल्या भयानक पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात सुरू करण्यात आले होते.

    लष्करी रणनीतीच्या दृष्टीने पाहता, ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने आपल्या लष्करी क्षमतेचा ठोस प्रत्यय दिला, ज्याचे महत्त्व अनेक अंगांनी अधोरेखित होते. हे महत्त्व धोका पत्करण्याची मानसिकता, कल्पकता आणि संपूर्ण लष्करी मोहिमेची अंमलबजावणी आणि त्या मागील व्यापक राजकीय रणनीती यामध्ये दिसून येते. तसंच युद्ध लढण्याची क्षमता प्रभावी ठरवण्यासाठी वापरलेली आधुनिक तंत्रज्ञान आणि इतर सहाय्यक गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या होत्या. भारताच्या आधुनिक शस्त्रास्त्रांच्या वापरामुळे पाकिस्तानच्या प्रतिसाद देण्याच्या क्षमतेवर आणि इच्छाशक्तीवर मोठा परिणाम झाला. मोदींनी आपल्या भाषणात याला ‘नवयुगातील युद्धशैली’ म्हणून गौरवले.

    ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी तळांचा अचूक शोध घेतला.

    जून २०२० मध्ये चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीबरोबर गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारताच्या लष्करी आणि धोरणात्मक विचारसरणीत मोठे बदल झाले. आता भारत एकाचवेळी दोन सीमांवरील धोक्यांचा सामना करण्यासाठी संरचनात्मक सुधारणांवर आणि लष्करी आधुनिकीकरणावर भर देत आहे. त्यामुळे भारताने आपल्या लष्करी क्षमतेमध्ये वेगाने सुधारणा केली असून, महत्त्वाच्या शस्त्रप्रणाली खरेदी करून बहु-क्षेत्रीय क्षमता विकसित करण्यावर भर दिला आहे. यात इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, सेन्सर्स, उपग्रह, आणि सायबर क्षमता यांचा समावेश आहे, जे गुप्तचर माहिती, देखरेख आणि निरीक्षण सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतात. ऑपरेशन सिंदूरमध्येही हेच तंत्रज्ञान वापरून दहशतवादी ठिकाणांचा अचूक मागोवा घेण्यात आला होता. या ऑपरेशनमधून तीन महत्त्वाचे मुद्दे समोर येतात, जे भारताच्या नव्याने तयार होत असलेल्या लष्करी धोरणाकडे निर्देश करतात.

    अचूकतेवर आधारित रणनीती

    भारत अलीकडे अचूकतेवर आधारित, तंत्रज्ञानावर अवलंबून असलेल्या लष्करी क्षमतेचा विकास व खरेदी करत आहे. यात लहान, मध्यम व लांब पल्ल्याच्या प्रहारक्षम शस्त्रांचा समावेश आहे. भारताकडे आता विविध प्रकारची क्रूझ व बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची शृंखला आहे, जी शत्रूला गंभीर नुकसान पोहोचवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने SCALP/Storm Shadow ही हवाई प्रक्षेपित क्रूझ क्षेपणास्त्रे आणि HAMMER (Highly Agile Modular Munition Extended Range) ही हवाई ते जमिनीवर मारा करणारी अचूक शस्त्रास्त्रे वापरली. या शस्त्रांनी पाकिस्तानव्याप्त जम्मू-काश्मीरमधील पाच आणि पाकिस्तानच्या पंजाबमधील चार अशा एकूण नऊ दहशतवादी ठिकाणांवर अचूक मारा केला.

    ही अचूक व नियोजित आणि इतरांचे नुकसान टाळणाऱ्या हल्ल्यांची कारवाई भारतासाठी यशस्वी ठरली आणि सीमापार दहशतवादाच्या विरोधात भारताची नविन भूमिका स्पष्ट झाली. यामुळे भारताने दहशतवादी संघटनांवर आणि पाकिस्तानच्या नकार देण्याच्या धोरणावर लष्करी पातळीवर परिणामकारक प्रत्युत्तर देण्याची क्षमता सिध्द केली जी बाब मोदींनीही आपल्या भाषणात अधोरेखित केली.

    हवाई वर्चस्वाद्वारे आक्रमण आणि संरक्षण

    लष्करी रणनीती फक्त आपल्याला लाभ मिळवणं एवढ्यावर मर्यादित नसते, तर ती शत्रूला तोच लाभ मिळू न देण्याची तयारीही असते. पाकिस्तानकडून सतत होणाऱ्या लष्करी आणि नागरी ठिकाणांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात घुसून ‘लोइटरिंग म्युनिशन’ (कामिकाझे ड्रोन), क्रूझ क्षेपणास्त्रे आणि हवाई तुकड्या वापरून महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांवर अचूक हल्ले केले.

    या कारवाईबरोबरच भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने पाकिस्तानकडून प्रक्षेपित अनेक क्षेपणास्त्रं आणि कामिकाझे ड्रोन यशस्वीपणे पाडले.

    यामुळे शत्रूच्या लढण्याच्या इच्छेला धक्का बसला, त्यांच्यावर दबाव निर्माण झाला आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्याच वेळी भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणांनी पाकिस्तानकडून करण्यात आलेले अनेक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले यशस्वीपणे थोपवले. त्यामुळे इस्लामाबाद किंवा रावळपिंडीला भारतावर नुकसान करण्याची संधी मिळाली नाही.

    तंत्रज्ञानाच्या आधारे नियंत्रणात्मक हल्ला

    भारतानं प्रथम अनेक दहशतवादी तळांवर हल्ला केला आणि त्यानंतर पाकिस्तानच्या लष्करी हवाई तळांवर आणि अन्य लष्करी ठिकाणांवर प्रहार केला. हे हल्ले हे दाखवतात की, लष्करी रणनीती ही केवळ संरक्षणासाठी नाही, तर शत्रूवर खर्च लादण्याची व भविष्यातील प्रसंगी तीव्रतेनुसार प्रतिसाद वाढवण्याची क्षमता बाळगण्यासाठी महत्त्वाची आहे.

    आधुनिक उपकरणांचा वापर करून भारत आता किती आणि कसा लष्करी दबाव टाकायचा हे ठरवू शकतो मग तो दहशतवादी संघटनांवर असो किंवा पाकिस्तानच्या लष्करावर. भारताचे हे नियंत्रित व जबाबदार हल्ले हे पूलवामा-बालाकोट प्रकारणानंतर आणि भारत-पाकिस्तानमधील इतर संकटांपेक्षा वेगळी उंची गाठतात. मोदींनी आपल्या भाषणात स्पष्ट सांगितले की “अण्वस्त्रांच्या नावाखाली धमकी” भारतावर चालणार नाही.

    नवीन परिस्थिती अशी आहे की, जर गरज भासली तर पाकिस्तानमधील कोणतेही लष्करी लक्ष्य भारताच्या पारंपरिक खोलवर हल्ल्यांपासून सुरक्षित राहणार नाही. मात्र, यासाठी भारताला सतत सज्ज राहावे लागेल आणि तांत्रिक क्षमतांमध्ये मोठी वाढ करावी लागेल, कारण चीन पाकिस्तानच्या संरक्षण क्षमतेला बळकटी देत आहे.

    भविष्यातील युद्धनीतीसाठी परिणाम

    सध्या भारताने ‘कोल्ड स्टार्ट’सारख्या रणनीतीच्या व्यापक चौकटीत आपली ‘स्टँडऑफ वॉरफेअर’ (दूरवरून केलेली युद्ध कारवाई) क्षमता विकसित केली आहे. यामुळे भारताला मोठ्या प्रमाणावर जमिनीवर चालणाऱ्या लष्करी मोहिमांमध्ये अडकून न पडता नवीन लष्करी विचारसरणी आणि संभाव्य पर्याय उभे करण्याची संधी मिळाली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि लष्करी क्षमतांमुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या यंत्रणेला पाकिस्तानच्या लष्करावर आणि त्यांच्या पाठबळ असलेल्या दहशतवादावर रक्षणात्मक-आक्रमक भूमिका घेण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे.

    पाकिस्तानविरुद्ध धोका पत्करण्याची भारताची क्षमता वाढली आहे कारण भारताकडे आता स्मार्ट, अचूक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त शस्त्रास्त्रे आहेत. या प्रभावी पण अण्वस्त्रविरहित सामरिक क्षमतांमुळे आणि विविध प्रकारच्या हवाई संरक्षण उपायांमुळे भारताला एक मोठा आत्मविश्वास मिळतो, विशेषतः जेव्हा समोरचा प्रतिस्पर्धी सतत आक्रमणाच्या भूमिकेत असतो.

    भारतीय लष्कराने या क्षमतांमध्ये सातत्य ठेवून नवनवीन तंत्रज्ञान निर्माण करणे, उत्पादन वाढवणे आणि सज्जता राखणे आवश्यक आहे.

    पण भारताच्या या नव्या दृष्टिकोनाला पारंपरिक युद्धपद्धतींमध्ये काही मर्यादा आहेत. म्हणून पाकिस्तानने या घटनेतून काय शिकले आणि सध्या ते लष्करी पातळीवर काय बदल करत आहेत, याचा नीट अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. भारतीय लष्कराने आपल्या संरक्षण तंत्रज्ञानात नवकल्पना आणणे, उत्पादन वाढवणे आणि सज्जता टिकवणे हे सातत्याने चालू ठेवणे आवश्यक आहे.

    आपली इच्छा शत्रूवर लादण्यासाठी आणि त्याच्या क्षमतेला खिळखिळं करण्यासाठी, भारताने आपल्या युद्धसज्जतेत तंत्रज्ञानाचा वेगाने समावेश करणे आणि लष्करी कार्यपद्धतींच्या संकल्पना (Concepts of Operations) अधिक चांगल्या प्रकारे आत्मसात करून त्यांना नव्या रणनीतीमध्ये समाविष्ट करणे गरजेचे आहे. एक मजबूत लष्करी रणनीती ही युद्धकाळातच नव्हे तर शांततेच्या काळातसुद्धा शत्रूच्या आकांक्षा आणि हेतूंना मर्यादा घालण्यासाठी उपयुक्त ठरते.


    हा लेख मूळतः ‘डेक्कन हेराल्ड’ या वृत्तपत्रात प्रकाशित झाला आहे. 

    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

    Authors

    Sameer Patil

    Sameer Patil

    Dr Sameer Patil is Director, Centre for Security, Strategy and Technology at the Observer Research Foundation.  His work focuses on the intersection of technology and national ...

    Read More +
    Rahul Rawat

    Rahul Rawat

    Rahul Rawat is a Research Assistant with ORF’s Strategic Studies Programme (SSP). He also coordinates the SSP activities. His work focuses on strategic issues in the ...

    Read More +