Author : Soumya Bhowmick

Published on Feb 22, 2019 Commentaries 0 Hours ago

फॅशन-वस्त्रोद्योग क्षेत्र हे तेल उद्योगानंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषण करणारे क्षेत्र ठरले आहे. त्यामुळे नवी फॅशन करताना दहावेळा विचार करायला हवा.

फॅशनचा फंडा, पर्यावरणाला गंडा

फक्त खाणकाम, विविध उत्पादनांचे कारखाने किंवा ऊर्जाक्षेत्रामुळेच जास्त प्रदूषण होते, असा आपला सर्वसाधारण समज आहे. मात्र, आपले जुने कपडे नकोसे वाटू लागल्यामुळे थेट शॉपिंग मॉलमधून नवे कपडे घेणाऱ्यांना (ज्यात आपण स्वतःही असतो) आपण मोजत नाही. खरे तर फॅशन आणि वस्त्रोद्योग क्षेत्र इतक्या भयावह पद्धतीने वाढते आहे, की त्यामुळे तेल उद्योग क्षेत्रानंतर, फॅशन आणि वस्त्रोद्योग क्षेत्र हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषण करणारे क्षेत्र ठरले आहे.

फॅशन उद्योगजगतासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या पुरवठादारांची एक मोठी साखळी जोडलेली आहे. अनेक प्रकारची उत्पादने, कच्चा माल, कापड निर्मिती, वाहतूक, विक्री आणि अखेरीस विल्हेवाट अशा स्वरुपाची ही साखळी आहे. या व्यवसायाशी संबंधित प्रत्येक टप्प्यावर, अनेक प्रक्रियांमध्ये प्रचंड प्रमाणात पाण्याची नासाडी होत असते, त्याशिवाय या प्रक्रियेत घातक रसायनांचाही मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. जागतिक पातळीवर विचार केला स्वच्छ पाणी दूषित होण्यामागची जी प्रमुख कारणे आहेत, त्यामध्ये कृषी क्षेत्र हे पहिल्या क्रमांकाचे तर त्यापाठोपाठ कपड्यांना रंग देण्याची प्रक्रिया हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे कारण आहे.

फॅशन जगतात सर्वाधिक वापरला जाणारा कापडाचा एक प्रकार म्हणजे पॉलिएस्टर. कापडाचा हा प्रकार तुलनेने स्वस्तात उपलब्ध असतो. त्यामुळेच कापडाचा हा प्रकार लोकप्रियही आहे. अशा प्रकारचा कपडा जेव्हा धुतला जातो, तेव्हा त्यातून निघणाऱ्या सुक्ष्म तंतूंसोबत प्लास्टिकचा अंशही निघत असतो. ज्यामुळे समुद्राच्या पाण्यातल्या प्लास्टिकचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे सागरी जैविक साखळी धोक्यात आली आहे.

महत्वाचे म्हणजे जगभरात जो कापूस पिकवला जातो, त्याला किड लागू नये म्हणून, त्यात जनुकीय बदल केलेले असतात. मात्र त्यामुळे अशा कापसावर अधिक विषारी किटकनाशकांचाही वापर केला जातो. या सगळ्यामुळे पर्यावरणाचाही ऱ्हास होतो. या ऱ्हासाचे मोठे उदाहरण म्हणजे कोरडाठाक पडेला अराल समुद्र. अराल समुद्र कोरडा पडल्यामुळेच या समुद्रावर अवलंबून असलेला तिथला मासेमारांचा समुदायही उध्वस्त झाला आहे. उझबेकीस्तान आणि तुर्कमेनिस्तानातील कापसाच्या शेतीला पाणीपुरवठा करता यावा, यासाठी मध्य आशियातल्या अनेक नद्यांचे पाणी वळवण्यात आले. अराल समुद्र कोरडा पडला तो अशाप्रकारे नद्यांचे पाणी वळवल्यामुळेच.

फॅशन उद्योगजगत  पर्यावरणाचा एक शत्रू

समाजात सेलिब्रिटी म्हणून मिरवण्याच्या लालसेमुळे, झटपट बदलता येणारी फॅशन ही संकल्पना जोर धरू लागली आहे. या संकल्पनेच्या मागे धावणाऱ्यांना नव नवी उत्पादने उपलब्ध करून देण्याच्या बाजारी प्रवृत्तीमुळेच फॅशन उद्योगजगत हे पर्यावरणाचा एक खरा शत्रू म्हणूनच उदयाला येत आहे.

चुटकीसरशी किंवा झटपट बदलणाऱ्या फॅशनची पद्धत सुरु झाली ती पाश्चिमात्य देशांमध्ये. मात्र ही पद्धत आता जगभर लोकप्रिय झाली आहे. महत्वाचे म्हणजे पाश्चिमात्य जगातील ग्राहक संस्कृती आणि युरोपीय देशांचा विचार करून बाजारात आणलेल्या कल्पनांचा प्रभाव आता इतर देशांमध्ये, विशेषतः मोठी बाजारपेठ असलेल्या भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये वेगाने झिरपू लागला आहे.

सद्यस्थितीत सामान्य खरेदीदार, ते पूर्वी ज्या प्रमाणात कपडे खरेदी करत, त्याही पेक्षा अधिक कपडे खरेदी करू लागले आहेत. वाढती उपभोगवृत्ती आणि बाजाराचे बदलते जागतिक स्वरुप हीच या बदलामागची कारणे आहेत. फॅशनच्या या जगाचा पुरवठा एवढा वेगात आहे, की कितीही खरेदी केली तरी, आपल्याकडे नव्या फॅशनचे कपडे नाहीत, अशी भावना खरेदीदारांमध्ये कायम राहते.

भारत, बांग्लादेश, व्हिएतनाम आणि पाकिस्तान अशा विकसनशील देशांमध्ये तयार केलेली फॅशन वस्त्रोत्पादने ही, या देशांपासून दूरवर असलेल्या मोठ्या शहरातल्या बाजारपेठांमध्ये निर्यात केली जातात. त्याबदल्यात या सर्व विकसित देशांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक मोबदलाही दिला जातो. त्याचं महत्वाचे कारण म्हणजे फॅशन उद्योग क्षेत्र या सगळ्या विकसनशील देशांकडे स्वस्त दरात मनुष्यबळाचा पुरवठा करणारे केंद्र म्हणून पाहतात. इतकेच नाही तर हे विकसनशील देश म्हणजे, आपल्या देशातला कचरा टाकण्यासाठीचे कचरा डेपोच (dumping ground) म्हणूनही या अर्थाने या देशांकडे पाहिले जाते.

फॅशन उद्योग क्षेत्र आणि आणि पाण्याचा अपव्यय / पाण्याची नासाडी

जागतिक पातळीवर झटपट बदलणाऱ्या फॅशनचा कल ज्या वेगाने लोकप्रिय होतो आहे, त्याच वेगाने मोठ मोठे नावाजलेले ब्रँड्स / उद्योजक स्वतःची उत्पादनेही मोठ्या प्रमाणावर वाढवत आहेत. स्वाभाविकच त्याचा मोठा ताण नैसर्गिक स्त्रोतांवर विशेषतः पाण्यासारख्या स्त्रोतांवर पडायला सुरुवात झाली आहे. सिटारम नदीलगतच्या मानवी वस्त्या आणि वन्य जैवविविधतेवर झालेले दुष्परीणाम हे याच ताणाचे दुष्परीणाम. इंडिनेशियात बेसुमार पद्धतीने वाढत असलेल्या वस्त्रोद्योग क्षेत्रामुळे सिटारम नदीलगतच्या मानवी वस्त्या आणि वन्य जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले आहे. तमीळनाडुमधील तिरुप्पूर जिल्ह्यातील प्रदुषणाचे मोठे कारण तेथील वस्त्रोद्योग क्षेत्र आहे. इतकेच नाही तर यामुळे तिथले कृषी क्षेत्र आणि कृषी आधारित उद्योगही उध्वस्त झाले आहे.

पाण्याच्या नासाडीबाबत संयुक्त राष्ट्रसंघाच्या युरोपीय आर्थिक आयोगाने मांडलेला निष्कर्ष अत्यंत महत्वाचा आहे. या आयोगाच्या म्हणण्यानुसार २.५ ट्रिलीअन डॉलर मूल्याचे फॅशन उद्योग क्षेत्र, पाण्याचा सर्वाधिक वापर करणारे उद्योगक्षेत्र ठरले असून, जगभरात पाण्याच्या होणाऱ्या एकूण नासाडीपैकी, सुमारे २० टक्के पाण्याची नासाडी फॅशन उद्योगक्षेत्रामुळेच होते.

गंभीर बाब म्हणजे म्हणजे फॅशन उद्योग क्षेत्रामुळे होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाच्या प्रमाणात २०३० सालापर्यंत ६० टक्क्यांची वाढ होऊन, हे प्रमाण २.८ बिलीअन टनापर्यंत पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. झटपट बदलणाऱ्या फॅशनमुळे पॉलिएस्टर आणि नायलॉनच्या उत्पादनातही बेसुमार वाढ झाली आहे. या वाढत्या उत्पादन प्रक्रियेतून वातावरणात हरीत वायुंचे (greenhouse gases) प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होते. या उत्सर्जनामुळे जागतिक तापमानात कार्बनडाय ऑक्साईडच्या उत्सर्जनामुळे होणाऱ्या वाढीपेक्षाही ३०० पटींनी अधिक वाढ होत आहे.

या संपूर्ण घडामोडींमधली एक महत्वाची बाब म्हणजे, सद्यस्थितीत कपड्यांना रंग देण्यासाठी नॉनायलफेनॉल एथॉक्सीलेट (Nonylphenol Ethoxylate) म्हणजेच एन.पी.ई. (NPE) या रसायनाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो आहे. हे रसायन आरोग्याच्यादृष्टीने अत्यंत घातक आहे. या रसायनामुळे गर्भवती महिलांना अनेक गुंतागुंतींचा सामना करावा लागू शकतो, स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींमध्ये वाढ होऊ शकते, तसेच शरिरातील बीजनिर्मिती यंत्रणाही (placenta) निकामी होऊ शकते. अर्थात या घातक रसायनाच्या वापरावर युरोपीय महासंघातील देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही अमेरिकेमध्ये आयात होणाऱ्या असंख्य कपड्यांमध्ये याच रसायनाचा सर्सास वापर केलेला आढळतो.

गंभीर बाब म्हणजे म्हणजे फॅशन उद्योग क्षेत्रामुळे होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाच्या प्रमाणात २०३० सालापर्यंत ६० टक्क्यांची वाढ होऊन, हे प्रमाण २.८ बिलिअन टनापर्यंत पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अकार्यक्षम पद्धती आणि कामगारांचे शोषण

जिनिवा इथे १ मार्च २०१८ रोजी, ‘फॅशन आणि शाश्वत विकासाचं ध्येय : संयुक्त राष्ट्रसंघाची भूमिका काय? (‘Fashion and the Sustainable Development Goals: What Role for the UN?’) या विषयावर परिषद झाली होती / कार्यक्रम झाला होता. फॅशन उद्योग जगताने वापर करून फेकून देण्यासारख्या स्वस्त कपड्यांचे केलेले बेसुमार उत्पादन म्हणजे “पर्यावरणीय आणि सामाजिक आणिबाणी आहे” असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाच्या युरोपीय आर्थिक आयोगाने (UNECE) या परिषदेतच दिला होता.

विकसनशील देशांमधील अकार्यक्षम उत्पादन पद्धती, असंघटीत आणि कंत्राटीपद्धतीने काम करणाऱ्या कामगारांचे होणारे शोषण, आणि यात भर म्हणून भांडलदारधार्जीणे कामगार कायदे. अशा परिस्थितीमुळेच फॅशन उद्योग जगतातल्या कंपन्यांना कपड्यांचे कमी किंमतीत मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणे शक्य होते.

कपड्यांची एका देशातून दुसऱ्या देशात होणारी – आयात निर्यात, कामगारांचे होणारे शोषण, स्त्रियांवरचे अत्याचार, आणि पर्यावरणाला बाधा पोहोचवणारी सदोष उत्पादन पद्धती हे फॅशन उद्योगजगताचे वास्तव आहे. मात्र बऱ्याचदा झटपट बदलणाऱ्या फॅशनच्या आहारी गेलेले ग्राहक या वास्तवाकडे सोयीस्करित्या दुर्लक्ष करतात.

खरे तर फॅशन उद्योगजगताचा विचार करता, उत्पादनाचे परवडवण्याजोगे दर आणि पर्यावरणाचं हित असा समतोल साधण्याची जबाबदारी जागतिक समुदायावरच आहे. भांडवलाचे नैसर्गिक मूल्यांकन होणे गरजेचे आहे. तसेच कॉर्पोरेट क्षेत्राने सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन कठोर नियम पाळायला हवेत. तसेच अशा उत्पादनांमुळे पर्यावरणीय आणि सामाजिकदृष्ट्या निर्माण झालेले धोके कमी करण्यासाठी सामाजिक चळवळी वाढल्या पाहिजेत. या विविध मार्गाने जाऊनच जगभरातील सर्वांनी हा मानवनिर्मित धोका टाळण्यासाठी पुढाकार घेतल्याशिवाय, दुसरा तरुणोपाय नाही.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Soumya Bhowmick

Soumya Bhowmick

Soumya Bhowmick is an Associate Fellow at the Centre for New Economic Diplomacy at the Observer Research Foundation. His research focuses on sustainable development and ...

Read More +