Published on Sep 28, 2021 Commentaries 0 Hours ago

अँजेला मर्केल यांची देशांतर्गत आणि युरोपीय स्तरावर एकता राखणारी अनोखी प्रतिभा परराष्ट्र धोरणाच्या बाबतीतही महत्त्वपूर्ण ठरली.

अँजेला मर्केल यांची युरोपदृष्टी

२०१९ मध्ये, अँजेला मर्केल यांच्या सरकारने ‘पर्यावरण संरक्षण कायदा’ सादर केला, हा कायदा म्हणजे जणू वादग्रस्त महत्वाकांक्षी उपायांची एक मालिका आहे, ज्या कायद्याने २०३० सालापर्यंत जर्मनीचे शुद्ध कार्बन उत्सर्जन ६५ टक्क्यांनी कमी करण्यासाठी आणि २०४५ पर्यंत कार्बन तटस्थता प्राप्त करण्यासाठी देशाला योग्य मार्गावर आणले. तरीही, पर्यावरण बदलाच्या संकटाची निकड लक्षात घेता, पर्यावरणवादी चळवळींच्या कार्यकर्त्यांनी आणि वकिली गटांनी त्यांना असमाधानकारक, अपुरी धोरणे आखणाऱ्या संबोधून असमाधान व्यक्त केले. त्यांच्या टीकाकारांना उत्तर देताना, मर्केल त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संयमाने, सहजपणे म्हणाल्या: ‘राजकारण म्हणजे जे शक्य आहे, ते करणे.

चार मुदतीतील १६ वर्षांचा भरभक्कम कार्यकाळ २६ सप्टेंबर २०२१ रोजी संपुष्टात येणाऱ्या जर्मनीच्या चॅन्सेलर आणि युरोपीय युनियनच्या खऱ्याखुऱ्या नेत्या असलेल्या अँजेला मर्केल यांच्या यशाचे आणि अपयशाचे वर्णन व्यावहारिक, वास्तववादी, नि:पक्षपाती अशा शब्दांत तसेच ओटो फॉन बिस्मार्कच्या ‘जे जे शक्य आहे, ते ते साध्य करण्याची कला’ या तत्त्वज्ञानाच्या प्रतिध्वनीत सामावले आहे.

व्यासपीठापासून त्या दूर जात असताना, त्यांचा राजकीय वारसा तपासून पाहिला जात आहे, त्याद्वारे कदाचित मर्केल यांच्यानंतर युरोपच्या भविष्यासाठी शहाणपणाचे वेचे सापडण्याची आशा आहे. मात्र, त्यांच्या वैयक्तिक निर्णयांच्या गुण आणि दोषांच्या पलीकडे, पुढील गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत: युरोपीय युनियनसाठी अँजेला मर्केल यांची काय दृष्टी होती? युरोप संकटाच्या आणि गहन परिवर्तनाच्या कालखंडातून जाताना, त्यांच्या राजकारणाच्या व्यावहारिक संकल्पनेतून युरोपीय खंडाची ओळख कशी साकारली?

निराशाजनक काळ

अँजेला मर्केल यांच्या २००५ ते २०२१ या चॅन्सेलर पदाच्या कालावधीत, जर्मनी आणि युरोपला महत्त्वपूर्ण, अस्तित्ववादी आव्हानांचा सामना करावा लागला. त्यापैकी प्रमुख आव्हान म्हणजे २००८ चे वैश्विक आर्थिक संकट आणि आगामी युरो कर्जाचे संकट, यांमुळे युरोपीय प्रकल्पाचे अस्तित्व धोक्यात आले होते. खरोखरीच, २०१० साली कर्जबाजारी झालेला ग्रीस सामायिक चलन आणि संभाव्यत: युरोपीय युनियन सोडून देण्याच्या कचाट्यात असताना, मर्केल यांनी नाखुशीने, ग्रीसची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी साह्य आणि संसाधनांची जमजाजमव केली.

मदतीच्या पॅकेजचा भाग म्हणून, ग्रीसला जर्मनीने त्यांच्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत आणि संपूर्ण युरोपीय प्रदेशांत स्थिरता आणण्याच्या उद्देशाने कठोर उपाययोजना लागू करण्यास सांगितले होते. हितसंबंधांच्या जटिल क्रिया-प्रतिक्रियांची काळजीपूर्वक गणना करीत अँजेला मर्केल यांनी जे वैज्ञानिक निर्णय अनुसरले, त्यामुळे युरोपीय प्रदेश आजही उभा राहिला आहे, असे मानले जात आहे.

संकटातून जर्मनी हा देश युरोपीय युनियनचा खराखुरा नेता म्हणून उदयास आला. हे केवळ युरोपीय गटात जर्मनीचे आर्थिक वजन असल्यामुळेच नाही, तर युरोपच्या राजकीय चर्चेच्या मध्यवर्ती बिंदूवर स्वतःला स्थान संपादन करण्याच्या अँजेला मर्केल यांच्या अतुलनीय क्षमतेमुळेही शक्य झाले. अनेकदा काही देशांच्या विशिष्ट हिताला बाधा निर्माण झाल्याने सुसंवाद निर्माण होणे अशक्य असल्याचे दिसत असतानाही चॅन्सेलर मर्केल या सातत्याने वेगवेगळ्या युरोपीय देशांमध्ये एकमत निर्माण करण्यास सक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे.

मर्केल यांच्या विचारपूर्वक योजलेल्या आणि शांत नेतृत्वाखाली, वाटाघाटी होऊन करार केले गेले. अगदी अलीकडे, कोविड-१९च्या साथीमुळे अर्थव्यवस्थेत व्यत्यय निर्माण झाल्यानंतर, २०२० साली ‘युरोपीय युनियन रिकव्हरी फंड’ यंत्रणेला त्यांचा अनपेक्षित पाठिंबा मिळाल्याने युरोपीय युनियनव्यापी आर्थिक परस्पर व्यवहारांचे दार खुले झाले, काही वर्षांपूर्वी ज्याचा विचारही कुणी केला नव्हता.

देशांतर्गत आणि युरोपीय स्तरावर एकता राखणारी त्यांची अनोखी प्रतिभा परराष्ट्र धोरणाच्या बाबतीतही तितकीच महत्त्वपूर्ण असल्याचे सिद्ध झाले आहे. जेव्हा रशियन सैन्याने युक्रेनवर आक्रमण केले आणि २०१४ मध्ये क्रिमियाच्या द्विपकल्पावर रशियाने कब्जा केला, तेव्हा त्यावरील युरोपीय युनियनच्या प्रतिसादाचे नेतृत्व मर्केल यांनी केले.

त्यांनी समन्वयित निर्बंधांच्या समर्थनार्थ नेत्यांना एकत्र केले आणि संपूर्ण वाटाघाटी दरम्यान रशियावर दबाव कायम ठेवला, ज्यामुळे अखेरीस युद्धबंदी झाली. त्याचप्रमाणे, २०१५ साली निर्वासितांचे मोठे संकट उभे राहिले, तेव्हा मर्केल यांच्या जर्मनीने दहा लाखांहून अधिक सीरियन निर्वासितांना देशाच्या सीमा खुल्या करून, प्रवेश दिला. त्यांच्या विवादास्पद निर्णयाने बाल्कन मार्गावर असलेल्या देशांचे ओझे कमी झाले आणि निर्वासितांच्या वसाहती संदर्भात शेंजेन-क्षेत्रातील अंतर्गत तणाव टळला.

प्रतिकूल परिस्थितीत आखले गेलेले उपाय

सातत्याने सामान्यतः सहमती प्राप्त असलेले अल्पकालीन उपाय शोधण्याचे श्रेय अँजेला मर्केल यांना नाकारता येणार नाही. मात्र, याकरता जर्मनी आणि युरोपीय युनियनला मोठ्या, संरचनात्मक बदलाची किंमत अदा करावी लागली आहे. एवढेच नाही तर त्यांच्या राजकारणाकडे ‘जे जे शक्य आहे, ते ते साध्य करण्याची कला’ या वृत्तीने पाहण्याच्या दृष्टिकोनाने युरोपीय युनियनमधील सार्वजनिक चर्चेला अशा प्रकारे स्वच्छ केले आहे, जिथे लोकशाहीसंदर्भात निर्माण झालेल्या वादांवर पुरेशा प्रमाणात पडदा पडला आहे. प्रत्येक वादाच्या मुद्द्याचा स्वतंत्रपणे विचार करण्याच्या तत्त्वानुसार त्यांनी संभाव्य ऐतिहासिक निर्णय घेतले. त्यामुळे आदर्शवादी राजकीय निर्णय घेणे शक्य झाले.

अँजेला मर्केल यांची प्रशासकीय शैली बेरजेच्या राजकारणासाठी स्पष्टपणे वचनबद्ध असल्याचे दिसून येते. याद्वारे विरोधाला बुडवून आणि ‘सहमतीपूर्ण मौना’द्वारे विवाद झाकून, आणि स्वाभाविकपणे राजकीय समस्यांवर कायदेशीर, तंत्रज्ञानात्मक उपाय अनुसरून सहमती जपणे साध्य केले जाते. युरोपमध्ये लोकानुनयी राजकारण आणि धर्मांधतेचे प्रकार वाढत असल्याचे सूतोवाच अनेकदा मर्केल यांनी केले आहे आणि ते योग्यही आहे. मात्र, वेबरने अचूकपणे सांगितलेल्या आणि सूचित केलेल्या नोकरशाहीचा अतिरेक या भाकितानुसार, मर्केल यांना लोकशाहीला घातक असलेली फॅसिस्ट प्रवृत्ती मानली गेली.

ग्रीसला दिलेले अर्थसाह्य हे एका मोठ्या संरचनात्मक समस्येच्या अल्पकालीन निराकरणाचे परिपूर्ण उदाहरण आहे, ज्याला युरोपीय युनियनमध्ये परस्परविरोधी अंतर्गत वाद पेटण्याच्या भीतीमुळे कधीही संबोधित करण्यात आले नाही. खरेच, युरो कर्जाचे संकट हे नाणे संघाच्या आणि सामान्य चलनाच्या आर्थिक रचनेतील अंतर्निहित कमकुवतपणाचे लक्षण होते.

त्या मूलभूत त्रुटींमध्ये सुधारणा करण्याऐवजी, अँजेला मर्केल यांनी धोरणात्मक उपाय निवडला, ज्याचा हेतू परिस्थिती पूर्वपदावर आणणे इतकेच नव्हे तर सशर्ततेद्वारे संस्थात्मक बनवणेही आहे. अशा निर्णयाला कायद्याचे अधिष्ठान देण्यासाठी त्यांनी ती तार्किक आणि वैज्ञानिक गरज म्हणून तयार केली. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर, जणू इतर कोणताही ‘पर्याय उपलब्ध नव्हता’.

गरज हे राजकारणाचे संघटन तत्त्व आहे, असे मर्केल यांच्या चॅन्सलरपदाच्या कार्यकाळादरम्यानच्या युरोपीय युनियनच्या सार्वजनिक चर्चेचे वैशिष्ट्य आहे. मुख्यत्वे अचानक आलेल्या आणीबाणींच्या वेळेस प्रतिक्रिया म्हणून- अस्तित्वात आलेल्या ब्रुसेल्समधील सुधारणा, युरोपीय युनियनच्या स्तरावर निर्णय घेण्यास प्रवृत्त करणारी शक्ती बनली आहे. अँजेला मर्केल यांनी अत्यंत ठामपणे लोकानुनयाचा प्रकार टाळण्याचा जो प्रयत्न केला यामुळे शासक आणि शासित यांच्यातील संबंध संपुष्टात आले आणि नाराजीला चालना मिळाली.

सीरियन निर्वासितांचे स्वागत करण्याचा मर्केल यांचा मोठ्या कौतुकास पात्र ठरलेला निर्णय अखेरीस ‘नैतिक’ आणीबाणीअंतर्गत अपवादात्मक होता, आणि ती आणीबाणी होती हे मान्य करावे लागेल. सीरियन लोंढ्याच्या पार्श्वभूमीवर, युरोपीय युनियनच्या आश्रय प्रणालीमध्ये कोणतीही अर्थपूर्ण सुधारणा लागू केली गेली नाही, जी अद्यापही डबलिन नियमनाच्या सदोष यंत्रणेअंतर्गत कार्यरत आहे.

बहुतांश युरोपीय देशांप्रमाणेच जर्मनीनेही २०१५ सालानंतर अन्य सदस्य देशांकडून स्वीकारले जातील अशा युरोपीय युनियनवासी नसलेल्या स्थलांतरितांच्या संख्येवर मर्यादा घालण्यास सुरुवात केली. मर्केल आणि इतर युरोपीय नेत्यांच्या नाकर्तेपणाने निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी नंतर उजव्या विचारसरणीच्या जातीयवादी राजकारण्यांनी भरून काढली, ज्यांनी त्यांच्या अनिश्चिततेचे आणि अस्पष्टतेचे भांडवल केले.

जागतिक स्तरावर युरोपीय युनियनच्या अस्मितेचा प्रश्न येतो तेव्हा कदाचित, अधिक स्पष्टपणे, असाच नमुना पाहिला जाऊ शकतो. मर्केल यांनी युरोपीय युनियन- रशिया यांच्यातील संबंध अशा प्रकारे हाताळले की, युरोपीय युनियनमध्ये या संबंधातील राजकीय पैलू काढून टाकण्याची प्रक्रिया त्या कशी पार पाडत होत्या, ते आपण आरशातील प्रतिमेसारखे पाहू शकतो.

युक्रेनवर रशियाने मिळविलेल्या कब्जाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी रशियाविरोधात निर्बंध लादण्याचा निश्चय दाखवताना, मर्केल जर्मनी आणि युरोपीय युनियनच्या रशिया धोरणाला पुनर्दिशा देण्यास नाखूष होत्या, असे दिसते. याचे उदाहरण म्हणजे ‘नॉर्ड स्ट्रीम २’ हा तेलाच्या पाइपलाइन प्रकल्पाचे बांधकाम अनेक राजनैतिक घटना घडूनही अँजेला मर्केल यांच्या सरकारने थांबवले नाही.

खरे तर, मर्केल यांनी युरोपीय परराष्ट्र धोरण अधिक सक्रिय करण्याच्या मागणीला सातत्याने विरोध केला आहे, उदाहरणार्थ- फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यासंबंधीची मागणी करत होते. तुर्कस्थानाच्या बाबतीत, ट्रम्प प्रशासनाच्या विरोधात आणि चीनच्या बाबतीत अधिक स्पष्टपणे घडले आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये राजकारण न आणता, घटकांची विभागणी करून, लष्करी तणाव, मानवाधिकार, हवामान धोरण, व्यापार इत्यादी मुद्द्यांना स्वतंत्र घटक म्हणून हाताळता येते, असा विश्वास मर्केल यांनी दाखवला आहे. परिणामी, क्वचितच अधिक शांतता निर्माण झाली. त्याऐवजी, यामुळे एक स्वयं-संकुचित, अनियमित, अखेरीस सर्वोच्च मानकाहून गुणवत्तेने काहीसे कमी असे युरोपीय युनियन परराष्ट्र धोरण निर्माण झाले आहे.

‘मुख्य प्रशासकीय अधिकारी’

मग अँजेला मर्केल यांची युरोपाबाबतची दृष्टी काय आहे? युरोपीय युनियन अधिक स्थिर, अधिक सुरक्षित होण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपला सामोरे जावे लागलेल्या सर्वात अशांत वादळांमधून युरोपीय युनियनला एकत्र राखण्याच्या अतिशय महत्त्वाच्या आणि कर्मकठीण कार्यात मर्केल तुलनेने यशस्वी ठरल्या आहेत. त्यांनी हे साध्य केले आहे, याचे कारण ज्या काळात राजकारणातील नाट्यमयतेने अनेकांना भुरळ घातली होती, मर्केल त्यांच्या तर्कशुद्धतेवर आणि त्यांच्या व्यावहारिकतेवर कायम राहिल्या. मात्र, जेव्हा ‘काय शक्य आहे’च्या सीमा पडताळून पाहिल्या जात नाहीत, तेव्हा राजकारण हे त्याच्या ज्ञानरचनावादी पायाऐवजी, तंत्रज्ञानाच्या प्रक्रियेचा गंभीर परिणाम बनतो.

दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, स्थिरता आणि सहमती यांच्या कायदेशीर आणि युक्तिवाद होऊ शकेल अशा, आवश्यक शोधात असलेल्या अँजेला मर्केल यांनी युरोपच्या भविष्यासाठी खऱ्या अर्थाने राजकीय दृष्टिकोन मांडण्याचे धाडस कधीच केले नाही. अँजेला मर्केल यांचा वारसा विश्वासार्ह, सक्षम, कर्तव्यदक्ष मुख्य प्रशासकीय अधिकारी असा आहे, कल्पनारम्य राजकीय नेत्याचा नाही.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.