Author : Ramanath Jha

Published on May 25, 2020 Commentaries 0 Hours ago

निराश झालेली जनता, थकलेले प्रशासन आणि रुग्णसंख्येत होणारी लक्षणीय वाढ हे सर्व लक्षात घेता, लॉकडाऊन हळूहळू उठविण्याऐवजी लवकरात लवकर उठवणे आवश्यक आहे.

लॉकडाऊनचा फायदा कमी, तोटाच जास्त

देशात ‘कोव्हिड-१९’ने बाधित झालेला पहिला रुग्ण ३० जानेवारी रोजी नोंदविण्यात आला. त्यानंतर गेल्या चार महिन्यांत या आजाराच्या रुग्णांचा आकडा एक लाखापार गेला. याचा अर्थ, रोज सरासरी ९०० नवे रुग्ण नोंदविण्यात आले. काही पाश्चात्य देशांमध्ये साथीच्या पहिल्या टप्प्यात रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. भारतात लॉकडाऊनमुळे कोरोना संक्रमणाचा वेग कमी करण्यात तात्पुरते यश मिळाले; परंतु मोठ्या प्रमाणात संसर्ग रोखण्यात लॉकडाऊन अपयशी ठरले आहे.

पंतप्रधानांनी दि. १२ मे रोजी रात्री राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात नव्या स्वरूपातील लॉकडाऊन ४ ची घोषणा केली. मात्र, त्यासंबंधातील तपशील सांगितला नाही. लॉकडाऊन ३ संपेल, त्या आधी म्हणजे १८ मेपूर्वी या संबंधीची माहिती देण्यात येईल, असे ते म्हणाले होते. धोरणकर्त्यांनी याचा तपशील ठरविला, तेव्हा त्यांनी कदाचित काही घटकांचा प्राधान्याने विचार केला असावा. तो असा…

१. कोरोनाच्या साथीमुळे भारतीय अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. अशा वेळी अर्थव्यवस्थेतील निष्क्रियता आपल्याला किती काळ परवडू शकेल?

२. ही साथ रोखण्यात काही प्रमाणात नियंत्रण आले आहे; परंतु रुग्णसंख्येत वाढ होत आहे आणि आपण पुन्हा सर्व सुरू केले, तर त्यामुळे रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होईल.

३. आतापर्यंत बहुसंख्य नागरिकांनी सहकार्य केले आहे; परंतु आता ते निराश झाले आहेत, बेचैन झाले आहेत. लॉकडाऊन यापुढेही कायम ठेवला, तर आपण त्यांना अडवू शकतो का?

या गुंतागुंतीच्या प्रश्नांवर उत्तर शोधणे अवघड आहे. मात्र, पंतप्रधानांनी आपल्या भाषणात आत्मनिर्भरतेवर आधारित अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनावर भर दिला होता. त्यातून बंद पडलेली अर्थव्यवस्था नव्या दमाने पुन्हा सुरू करण्याचे स्पष्ट संकेत मिळाले होते.

लॉकडाऊनचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे लाभ अधोरेखित होतात; परंतु हानीकडे दुर्लक्ष होते. त्याहीपेक्षा दुर्दैवी म्हणजे, लाभांविषयी अनिश्चितता आहे, एवढेच काय खरेच लाभ झाले आहेत का, अशी शंका येते. कोरोनाच्या साथीठी केलेले लॉकडाऊन म्हणजे पुराचे पाणी रोखून धरण्यासाठी बांधलेले तात्पुरते धरण आहे. एकदा का धरण फोडले, की सुरक्षित ठेवलेल्या कोरड्या भागाकडे पाणी धाव घेणार. कोरोना विषाणू अत्यंत धोकादायक आहे आणि अतिसूक्ष्म आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता तो मानवी शरीरात शिरतो, राहतो आणि निघूनही जातो. बरेचदा शरीरावर त्याची कोणती लक्षणेही दिसत नाहीत. त्यामुळे त्याचे अस्तित्व ओळखून त्याला रोखणे जवळजवळ अशक्य होते.

भारतासह अनेक देशांनी लॉकडाऊन केले. मात्र, त्यामुळे देशवासियांना असह्य वेदनांना सामोरे जावे लागेल, हे लक्षात घेतले गेले नाही. शेक्सपिअरच्या भाषेत सांगायचे तर, भले करण्याच्या उद्देशाने ते क्रूर झाले. या सगळ्या प्रक्रियेत क्रौर्याचे अत्यंत रौद्र रूप दृश्य झाले. मर्यादित काळासाठी लादलेली निष्क्रियता आणि कैद यांमध्ये दयेचा अंश होता की नाही, हे अवघ्या वर्षभरातच आपल्याला समजेल. कदाचित या सगळ्यामुळे आपण खूप काही गमावून बसलो आहोत आणि हातात फार काही आलेले नाही, असाही या प्रक्रियेचा निष्कर्ष असू शकेल.

लॉकडाऊन करण्याची तीन प्रमुख उद्दिष्ट्ये होती. पहिले उद्दिष्ट म्हणजे, विषाणूची साखळी तोडणे. साखळी तोडली, तर विषाणूचे पेशीविभाजन रोखले जाईल. दुसरे म्हणजे, बाधित व्यक्तिंमध्ये वाढ झाली, तर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तयारी करायला आरोग्य यंत्रणेला अवधी मिळेल आणि तिसरे उद्दिष्ट म्हणजे, मानवी वर्तणुकीवर काम करणे. याचा अर्थ पुरुष, स्त्रिया आणि मुलांना हात धुणे, मास्क घालणे आणि सुरक्षित वावराचे नियम पाळण्याची सवय लावणे.

‘कोव्हिड-१९’ या साथीच्या दृष्टीने पाहिले, तर जीवनाच्या नाण्याला दोन बाजू आहेत. पहिली म्हणजे, अस्तित्व राखण्यासाठी जगणे गरजेचे आहे. दुसरे म्हणजे, शरीर आणि मनाचे संतुलन राहील, याची काळजी घेणे आवश्यक आहे. साधारणतः या दोन्ही गोष्टी शक्य होण्यात अडचण नसते; परंतु ‘कोव्हिड-१९’ मुळे मानवावर कठीण परिस्थिती ओढवली आहे. सामाजिक आणि आर्थिक कारणांमुळे होणाऱ्या भेटीगाठींमधून विषाणूच्या फैलावाला चालना मिळते. मोठ्या प्रमाणावर मृत्यू होण्याचा धोकाही निर्माण होतो; परंतु निष्क्रियता आणि विलगीकरणामुळे लोकांची आर्थिकदृष्ट्या जगण्याची क्षमता संपते. दीर्घकालीन विचार केला, तर विशेषतः गरीबांचा एक तर संसर्गामुळे मृत्यू होतो अथवा भुकेने.

त्यामुळे सर्वांत महत्त्वाचा प्रश्न असा आहे, की विलगीकरण किती व किती काळ करावे लागेल आणि नेहमीसारखे सक्रीय होण्याचा धोका किती मर्यादेपर्यंत पत्करावा लागेल?  याचे प्राथमिक उत्तर म्हणजे विलगीकरण फार काळाचे नसावे. ते अधिक काळ सुरू राहिले, तर ते देशाला आणि नागरिकांना शक्तिहिन करते. दुसरी गोष्ट म्हणजे, ल़ॉकडाऊनमध्ये विषाणूला लांब ठेवले, तरी लॉकडाऊन उठवला, की लगेचच वेगाने फैलाव होण्यास सुरुवात होईल. या विषाणूला रोखले, तरी तो हल्ला करण्यात तरबेज आहे. लॉकडाऊनमुळे विषाणू पूर्णपणे पराभूत होऊ शकत नाही, हे स्पष्टपणे कळत होतेच, आता असे म्हणण्यासाठी आपल्याकडे पुरेसा पुरावाही आहे.

साथीचे जागतिक केंद्र बनलेल्या चीनमधील वुहान या शहरात लॉकडाऊन उठवल्यानंतर महिन्याभरात म्हणजे, ११ मे रोजी पुन्हा संसर्गाचे रुग्ण आढळले. त्यामुळे ही साथ पुन्हा मोठ्या प्रमाणात डोके वर काढू शकते, अशी चिंता निर्माण झाली आहे. दक्षिण कोरियानेही विषाणूशी कसा लढा द्यायचा, हे दाखवून दिले आणि सुरुवातीच्या टप्प्यात विषाणूच्या फैलावावर नियंत्रण आणण्यात यश मिळवले होते; परंतु आज पुन्हा त्यांनी बचावात्मक पवित्रा घेतला आहे. त्या देशात १० मे रोजी महिन्याभरातील उच्चांकी रुग्णसंख्या नोंदविली गेल्यावर, सरकारने बार आणि क्लबांवर बंदी आणली. भारतातील लॉकडाऊन हा चीनसारखा क्रूर मात्र, परिणामकारक नाही की दक्षिण कोरियासारखा नागरी व्यवस्थापनात कुशलही नाही. त्यामुळे भारतामध्ये लॉकडाऊननंतरच्या काळात काही वेगळे परिणाम समोर येतील, असा विचार करण्याचे कारण नाही.

पहिला लॉकडाऊन जाहीर झाला, तेव्हा म्हणजे २३ मार्च रोजी भारतात ‘कोव्हिड-१९’चे ४१५ रुग्ण आणि दहा मृत्यू नोंदविण्यात आले होते. मार्चच्या अखेरीपर्यंत रुग्णसंख्या १२५१ वर पोहोचली आणि ३२ मृत्यूंची नोंद झाली होती. एप्रिलच्या अखेरीस रुग्णसंख्या ३३,०६२ वर आणि मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा १०७९वर गेला. तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपण्यास केवळ काही दिवस उऱले असताना म्हणजे १२ मे पर्यंत देशात ७४,०७९ रुग्ण आणि २,४१० मृत्यू नोंदविण्यात आले. याचा अर्थ मार्चच्या अखेरीपर्यंत केवळ सात दिवसांत रुग्णसंख्या आणि मृत्यू तिपटीने वाढले.

एप्रिल अखेरीपर्यंत म्हणजे ३० दिवसांत रुग्णांच्या संख्येत ८० पटीने आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत १०८ पटीने वाढ झाली. याचप्रमाणे १२ मे पर्यंत संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत १७८ पटीने आणि मृत्यूंच्या संख्येत २४१ पटीने वाढ झाली. ही आकडेवारी पाहता, सध्याच्या स्वरूपातील लॉकडाऊन आणखी काही दिवस कायम राहिला, तर  जूनच्या अखेरीपर्यंत रुग्णसंख्या सुमारे साडेपाच लाखांवर आणि मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १८ हजारांवर पोहोचू शकते. सरकारने झोनच्या संदर्भातील आपल्या व्याख्येत बदल केला नाही, तर प्रतिबंधित क्षेत्र व रेड झोनमध्ये वाढ होईल आणि ऑरेंज झोन व ग्रीन झोनची संख्या कमी होईल. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, देश भौगोलिक दृष्ट्या वाढत जाणाऱ्या कायमच्या लॉकडाऊनमध्येच राहील.

अलिकडेच झालेल्या चर्चेदरम्यान काही मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन यापुढेही कायम ठेवावा, अशी इच्छा व्यक्त केली. परंतु त्यांनी लॉकडाऊनच्या मोठ्या प्रमाणातील प्रतिकूल परिणामांचा विचार करायला हवा.

जगभरातील वैज्ञानिकांचा एक मोठा मतप्रवाह असा आहे, की ‘विषाणूंच्या संक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण फार काही करू शकत नाही. लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्येतील वाढ आपण काही काळापुरती लांबवू शकतो. मात्र, एकदा का निर्बंध शिथील केले, की रुग्ण पुन्हा दिसू लागतील.’ एवढेच नव्हे, तर ‘उपाययोजना कोणत्याही करा, वर्षभरानंतर आपण प्रत्येक देशातील मृत्यूसंख्या पाहिली, तर ती समानच दिसेल,’ असे धाडसी मत ‘लान्सेट’ या प्रसिद्ध जर्नलमध्ये नोंदविण्यात आले आहे. याचा अर्थ ‘आपल्यासमोरचे सर्वांत प्रमुख लक्ष्य हे संक्रमण रोखण्यासाठी निष्फळ काम करणे नव्हे, तर दुर्दैवी रुग्णांची शक्य तितकी काळजी घेणे हे आहे.’

भारतासारख्या देशात भावनिक किंवा संवेदनशील न होता, विवेकी व तर्कशुद्ध विचार करून लॉकडाऊन संपूर्णपणे उठवणे, ही अवघड गोष्ट आहे. मात्र, आर्थिक ताण आणि गरीबांवरील आपत्ती या दोहोंमुळे औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्र काही अंशी सुरू करणे किंवा श्रमिकांना त्यांच्या मूळ राज्यांत प्रवासासाठी परवानगी देणे, भाग पडले आहे. लॉकडाऊनमुळे झालेले प्रतिकूल परिणाम आणि लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याच्या सूचनांची अंमलबाजवणी करणाऱ्या प्रशासनाला आलेला थकवा; तसेच रुग्णसंख्येत होणारी लक्षणीय वाढ हे सर्व लक्षात घेता, लॉकडाऊन हळूहळू उठविण्याऐवजी लवकरात लवकर उठवणे आवश्यक आहे.

चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनच्या तपशीलाचा विचार करताना, महात्मा गांधी यांच्या विचारांची आठवण होते. गांधीजी म्हणाले होते, ‘मी तुम्हाला एक ताईत देतो. जेव्हा तुम्हाला शंका असेल किंवा तुमच्यावर खूप दबाव आला आहे, असे तुम्हाला वाटेल, तेव्हा स्वतःचीच परीक्षा घ्या. तुम्ही पाहिलेल्या सर्वांत गरीब आणि सगळ्यांत दुर्बल माणसाचा चेहरा तुमच्या डोळ्यांसमोर आणा आणि मग स्वतःला विचारा, तुम्ही जे काही करणार आहात, त्याचा त्या गरीब माणासाला उपयोग होणार आहे का?’ नक्कीच लॉकडाऊनचा फायदा त्या माणसाला फारच कमी झाला असेल.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Ramanath Jha

Ramanath Jha

Dr. Ramanath Jha is Distinguished Fellow at Observer Research Foundation, Mumbai. He works on urbanisation — urban sustainability, urban governance and urban planning. Dr. Jha belongs ...

Read More +