Published on May 27, 2020 Commentaries 0 Hours ago

कोरोनाने आपण परस्परांशी किती जोडलेले आहोत, हे लख्खपणे अधोरेखित केले आहे. त्यामुळे किमान आता तरी स्वतःच्या पलिकडे जाऊन विचार करायला हवा.

स्वतःच्या पलिकडे विचार करताना…

अडीअडचणीच्या काळात माणसाने माणसाला मदत करणे हीच खरी माणूसकी आहे. आज सारे जग कोरोनाच्या संकटाने वेढलेले असताना, अनेकजण आपापल्या पद्धतीने मदत करताना दिसताहेत. काहीजण व्यक्तिगत स्तरावर, तर काहीजण समूह म्हणून या मदतकार्यात उतरले आहेत. पण अशी ही मदत सुटीसुटी न राहता, जेव्हा व्यवस्थेशी जोडली जाते तेव्हा तिचा परिणाम अधिक दुणावतो. आज आपल्याकडे अशा व्यवस्थेला जोडलेल्या मदतीची कमतरता दिसते. त्यामुळे अनेकदा ज्यांना खरंच गरज आहे ते मदतीपासून वंचित राहतात.

आपल्या देशात मदत ही बऱ्याचदा आपत्कालीन परिस्थितीत करण्याची गोष्ट आहे. एखादी युद्धजन्य परिस्थिती उद्भवली किंवा नैसर्गिक आपत्ती ओढवली, तरच आपला देश एकत्रित उभा ठाकतो, असे आजपर्यंत दिसून आलेले आहे. एक समाज म्हणून परस्परांना मदत करण्यासाठी एकत्र येऊन व्यवस्थेला मदत करणे आपल्याकडे फारसे आढळत नाही. आज कोरोनाने आपण परस्परांशी किती जोडलेले आहोत, हे लख्खपणे अधोरेखित केले आहे. त्यामुळे किमान आता तरी तरी स्वतःच्या पलिकडे जाऊन विचार करायला हवा. त्यासाठी आपल्या मनावर आणि मदतीवर चढलेली संकुचिततेची पुटे गळून जायला हवीत.

खरंतर, एक समाज म्हणून आपण परस्परांसाठी आपण काय करतो, यावरून आपल्या समाजाची प्रगती ठरत असते. दुर्दैवाने आज कोविड-१९ च्या जागतिक समस्येदरम्यान, समाजाबद्दल आपल्या जाणिवा ठसठशीत झाल्या आहेत की अद्याप या जाणिवांनी संकुचिततेची कुंपण ओलांडली नाहीत, हे जागतिक उदाहारणांद्वारे समजून घेणे आवश्यक आहे.

अलिकडे संकुचितता म्हटले तरी, ती क्षेत्रीय, धार्मिक, जातीय, लिंगसापेक्ष परिघात फिरत राहते… त्यापलिकडे आपल्याला जाता येईल का? यासाठी जगभरातील काही उदाहरणे पाहुयात. ही उदाहरणे म्हटली तर अगदी साधीसुधी. पण या उदाहणांनी समाज म्हणून मदतीचा हात पुढे केलाच पण, त्याद्वारे व्यवस्थाही मजबूत झाली.

आपण सुरुवात करूया, रुमानियापासून. तिथे दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या एका भाषाविषयक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास मुलं जीव ओतून करतात. पण यंदा कोविड-१९ संकटाने या परीक्षेच्या तयारीच्या साधनांवर गदा आली. विद्यार्थी आणि त्यांचा पालकवर्गही सैरभैर झाला. अशा वेळी ख्रिस्तिना तुनेगारु या रुमानियातील भाषाविषयक प्रशिक्षकेने सर्वांसाठी विनामूल्य ऑनलाइन शिकवणी वर्ग सुरू केले. याचा लाभ गेल्या काही दिवसांत तब्बल दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आहे. ‘आम्हाला ख्रिस्तिनामुळे मोठा आधार मिळाला’, ‘आम्ही एकटे आहोत, असं आम्हाला वाटत नाही,’ अशा प्रतिक्रिया आज या शिकवणी वर्गाचा लाभ घेणारे विद्यार्थी व त्यांचा पालकवर्ग व्यक्त करत आहेत.

कुणीतरी आपली काळजी घेतेय, आपल्याला मदत करतेय, या भावनेने तिथल्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतोय. आता यावर आपल्याकडे कुणी म्हणेल, ऑनलाइन क्लास तर आमच्याकडेही सुरू आहेत की, तेही विनामूल्य. त्यात काय मोठे? संकुचिततेचा मुद्दा डोकावतो तो इथे. आपल्याकडे ऑनलाइन वर्ग भरतात ते आपल्या शाळेतल्या, आपल्या महाविद्यालयातील मुलांसाठी. सर्वांना लाभदायक असं मोठ्या प्रमाणावर करण्याची- ‘लोकल टू ग्लोबल’ अशी उदाहरणे आजही आपल्याकडे हाताच्या बोटावर मोजता येण्याइतकीच असतील.

………………………………

ऑनलाइन धडे शिकवणारी ख्रिस्तिना

………………………………

या संकटाचा सामना करताना आपल्याकडे व्यक्तिगत स्तरावर मदत, स्वयंसेवी संस्थांतर्फे विविध उपक्रम, सरकारी स्तरावरील अविरत सेवा हे सारं प्रचंड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. पण या सगळ्यांचे एकत्रित सशक्त जाळे निर्माण करण्यात आपण यशस्वी ठरतोय का? प्रत्येकजण आपापल्या स्तरावर प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, मात्र जेव्हा व्यक्तिगत आणि स्वयंसेवी संस्थांची मदत व्यवस्थेशी जोडली जाते, तेव्हा तिची ताकद दुणावते. एक छोटे उदाहऱण पाहूया- इस्रायलमधील द्रोर इस्रायल या संस्थेचे. ‘द्रोर इस्रायल’ ही औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणाविषयी संशोधन करणाऱ्या व तंत्रज्ञानविषयक प्रकल्प राबविणाऱ्या शिक्षणतज्ज्ञांची संस्था आहे.

कोविड-१९ च्या या संकटात या संस्थेने तेथील पालिकेला जेरुसलेम शहरातील सर्व इमारतींचं मॅपिंग करायला मदत केली. ६०० स्वयंसेवकांची टीम उभारून कोणाला आर्थिक गरज आहे, कुणाला वैद्यकीय मदतीची, वाणसामान घरापर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता कुणाला आहे, ते समजून घेत आज या सर्वापर्यंत मदत पोहोचवणे शक्य बनले आहे. अशा गरजू हजारो कुटुंबांना मदतीचा हात देण्यात व्यवस्थेला यश येत आहे. बहुतांश इमारतीतील युवावर्गापर्यंत पोहोचून त्यांना त्यांच्या इमारतीत एकट्या राहणाऱ्या आजोबा-आजींची विचारपूस करण्याची, त्यांना सामान आणून देण्याची त्यांच्या भाषेत आजोबा-आजींचे दत्तकत्व घेण्याची जबाबदारी सोपवली गेली आहे. या स्वयंसेवकांची ऑनलाइन मीटिग होते, तेव्हा त्यातील अनेक युवा स्वयंसेवकांनी सांगितले, की आम्ही करत असलेल्या मदतीचा फायदा केवळ आजी-आजोबांनाच नाही, तर आम्हांलाही होतोय, आमचा एकाकीपणा यामुळे कमी होतोय. वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे समाजासोबत कसे जोडले जाऊ शकतो, आणि अशा उपक्रमांतून केवळ घेणाऱ्यालाच नव्हे, तर देणाऱ्यालाही बरंच काही मिळते, याचे हे उत्तम उदाहरण ठरावे.

…………………………………………..

डावीकडचे चित्र- द्रोर इस्रायल संस्थेने पालिकेला अशा पद्धतीने इमारतींचे मॅपिंग करायला मदत केली. उजवीकडील छायाचित्र- इमारतीतील युवा कार्यकर्ता आणि त्याने जिचे दत्तकत्व घेतले आहे, ती आजी

…………………………………………..

इंडोनेशियाच्या ‘सुम्बा हॉस्पिटॅलिटी फाऊंडेशन’तर्फे सुम्बानी युवकांना प्रशिक्षण दिले जाते आणि त्यांना पर्यटन व्यवसायात रोजगाराची संधी कशी मिळेल हे पाहिले जाते. इंडोनेशियात कोविड-१९च्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली, तेव्हाच या फाऊंडेशनच्या ज्येष्ठ अधिकारी डेम्प्टा तेतेबाटो यांच्या ध्यानात आले की, या साथीचा उद्रेक जर झाला, तर त्याला सामोरे जाण्यासाठी येथील दुर्गम गावांमध्ये पुरेशा सोयीसुविधा नाहीत. कोविड-१९ मुळे टाळेबंदी लागू झाली असताना रिझॉर्ट आणि हॉस्पिटॅलिटी प्रशिक्षण केंद्रे बंद असताना, डेम्प्टा मात्र मदतकार्यात सक्रिय झाल्या. तेथील स्थानिक सहयोगींमार्फत त्या आपल्या सहकाऱ्यांसोबत सुम्बा परिसरातील १३७ दुर्गम गावांपर्यंत पोहोचल्या आणि तेथील रहिवाशांना त्यांनी या साथीविषयीची इत्यंभूत माहिती दिली व स्वच्छता राखण्याविषयीचे आवश्यक प्रशिक्षणही दिले. दुर्गम गावांमधील ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींपर्यंत त्यांनी आजपर्यंत हजारो मास्क, शेकडो लिटर सॅनिटायझर पोहोचवले आहेत.

आपल्या या उपक्रमाविषयी बोलताना डेम्प्टा तेतेबाटो म्हणाल्या, ‘मला माझ्या समाजाला याची जाणीव करून द्यायची आहे की, एकमेकांसोबत काम करताना, ते परस्परांसाठीही बरंच काही करू शकतात.’ एक व्यक्ती सहकारी आणि सहयोगींचे जाळे विणत मोठ्या समुदायाकरता काय करू शकते, याचा हा उत्तम नमुना ठरावा.

…………………………

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘सुम्बा फाऊंडेशन’तर्फे आदिवासींना स्वच्छतेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

…………………………

मलेशियातील ‘एपिक’ ही स्वयंसेवी संस्था तंत्रज्ञानाचा उपयोग करून ‘ओरांग असली’ या दुर्गम भागात घर उभारणीसंबंधीच्या सेवा पुरवते. या संस्थेमार्फत अनेक संस्था आणि व्यक्ती विनामूल्य सेवा करण्यास त्या भागात जात असतात. कोविड-१९च्या संकटसमयी या संस्थेने आपल्या कामाचा नेहमीचा ढाचा बदलला आणि ते ‘ओरांग असली’ समाजाच्या सदस्यस्थिती विषयीची माहिती जमा करण्याचे व्यासपीठ बनले. ‘ओरांग असली’ ही संज्ञा मलेशियातील १८ आदिवासी वांशिक गटांसाठी वापरली जाते. शहरी भागांपासून खूपच दूर-दुर्गम भागांत, घनदाट अरण्यांमध्ये या वसाहती वसलेल्या आहेत. त्यांना या साथीच्या रोगाला तोंड देणे मुश्कील ठरत आहे.

त्यांच्यापर्यंत जीवनावश्यक वस्तू आणि वैद्यकीय मदत पोहोचणेही कठीण बनले असताना ‘एपिक’ ही संस्था आपल्या तंत्रज्ञानविषयक व्यासपीठाद्वारे तिथल्या नेमक्या कुठल्या भागात, कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे, याचा मागोवा घेते आणि सरकारच्या ‘जाकोअ’ या संस्थेसोबतइतर स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने या भागात मदत पोहोचविण्यास मदत करते. या संस्थेच्या जॉनसन यांच्या मते, ‘आजवर दुर्लक्षित राहिलेल्या या समाजापर्यंत पोहोचण्याची आणि त्यांच्यासोबत नातेसंबंध दृढ करण्याची सर्वांना मिळालेली ही संधी आहे. या संकटसमयी दिलासादायक बाब अशी की, ‘ओरांग असली’ ८५३ गावांचा समूह आहे. या भागात अनेक स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. पण कुणाचा कुणाला पायपोस नाही. कोविड-१९ संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने मदतीची हाक दिल्याने साऱ्या संस्था एकत्र येतील आणि नेमकी कुठल्या भागाला अधिक गरज आहे, हे कळणे सुकर होईल, अशी आशा आहे.’

…………………………………………………….

‘एपिक’तर्फे दुर्गम गावांत मदत पोहोचविण्यात येत आहे.

…………………………………………………….

या संकटाला सामोरे जाताना अनेक आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था स्थानिक सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्याचेही दिसून येते. ‘ब्रॅक’ या संस्थेने बांगलादेशात ४१ प्रसूतिगृहांमधील काम सुरू ठेवीत आपला खारीचा वाटा उचलला आहे. ग्युटेमालामध्ये ‘कोनाक्मी’ या स्थानिक सहयोगी संस्थेसोबत काम करणाऱ्या ‘टॉयबॉक्स’ या संस्थेने स्थानिक सुपरमार्केटच्या मदतीने फूड वाउचर व्यवस्था अमलात आणली आहे, ज्याद्वारे हे वाउचर देऊन अत्यावश्यक अन्नपदार्थ मिळण्याची सोय झाली आहे.जेव्हा एखादी व्यक्ती अथवा स्वयंसेवी संस्था इतरांशी जोडली जाते, तेव्हा त्या मदतीचे परिणाम अधिक व्यापक असतात, हेच यांतून स्पष्ट होते.

जर्मन मानसशास्त्रज्ञ मॅस्लो याचा गरजांची उतरंड स्पष्ट करणारा जो सिद्धान्त आहे, त्याचा आपण कोरोनापूर्व परिस्थिती आणि कोरोनानंतरची स्थिती या संबंधात तुलनात्मक विचार केला, तर पहिली गोष्ट जाणवते ती अशी की, कोरोनापूर्व परिस्थितीत आपल्या प्राथमिक गरजा आपल्याला भागवता येतील, असा विश्वास आपल्यापैकी अनेकांना वाटायचा. आज मात्र, उद्भवलेल्या संकटामुळे या विश्वासाला तडा गेला आहे… एक प्रकारची अनिश्चितता बहुतांश कुटुंबांना घेरून आहे. प्राथमिक गरजांनंतरचा स्तर येतो, तो म्हणजे सुरक्षिततेच्या भावनेचा. ही सुरक्षितता आज असंख्य व्यक्ती हरवून बसल्या आहेत. त्यानंतरच्या स्तरात जवळच्या वर्तुळातून आणि सामाजिक संपर्कातून मिळणारे ममत्व, प्रेम, साहचर्याची भावना यांचा समावेश होतो.

टाळेबंदीच्या उपायात हा स्तरही विचलित झाला आहे. कुणी घरापासून दूर, मित्रमैत्रिणी, सहकाऱ्यांचा न होणारी भेट, यांतूनही एक पोकळीची भावना कोरोनाच्या संकटकाळात निर्माण झाली आहे. या सगळ्याचा एकूणात परिणाम म्हणून स्वाभिमानाची भावना, अभिव्यक्ती या सर्वात वरच्या स्तराला चांगलीच ठेच लागली आहे. या गरजांच्या उतरंडीतून ध्यानात येते की, संकटकाळात गरजांची उतरंड बदलली आहे. अशा गरजवंतांची संख्याही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा वेळी आपण केवळ आपल्या आप्तस्वकियांच्या जवळच्या वर्तुळापुरते सीमित राहिलो, तर कुठल्या ना कुठल्या मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या असंख्य व्यक्ती मदतीपासून वंचित राहतील. यांतूनच स्पष्ट होते ती टोकदार सामाजिक जाणिवा असण्याची गरज.

………………………………….

कोरोनापूर्व परिस्थितीत आणि कोरोनानंतरच्या स्थितीत गरजांची उतरंड स्पष्ट करणारा‘मॅस्लोचा सिद्धान्त

………………………………….

कोरोनापूर्व परिस्थितीत- नेहमीचे रुटिन जगताना, आपला सामाजिक संपर्क हा ज्यांची आपल्याला गरज आहे आणि ज्यांना आपली गरज आहे, अशा व्यावसायिक गरजेपुरता व्हायचा. ती गरज कोविड-१९ च्या संकटाच बऱ्याचअंशी बुजून गेल्याने त्या पलीकडच्या समाजाला जाणून घेण्याची आपली आवश्यकता विझून गेली आहे की समाजापर्यंत पोहोचण्याचे आपले दुवे निखळले आहेत?

ब्राऊन, रीड अँड हॅरिस यांनी २००२ मध्ये केलेले संशोधन असे सांगते की, अधिक जोडल्या गेलेल्या व्यक्ती म्हणजेच सक्रिय व्यक्ती. जेव्हा लोक परस्परांशी अधिक जोडले गेलेले असतात, तेव्हा ते सर्वांसमोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांना सामोरे जाताना एकत्र येण्याची आणि पर्यावरणविषयक जबाबदारीने वागण्याची शक्यता अधिक असते. याविषयी बोलताना आंतरराष्ट्रीय शिक्षण या विषयात पीएच.डी करणाऱ्या दाना लेव यांनी लहान वयातच समाजजाणिवा जोपासण्यात शिक्षण ही मोठी भूमिका निभावत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये परस्परांमध्ये सामाजिक जोडलेपण आणि एकोपा शिक्षणाद्वारे निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळायला हवे. त्यामुळे मुलांमध्ये परस्परांमधील बंध मजबूत होण्यास मदत होते आणि ही मुलं मोठेपणी समाजात अधिक सक्रिय आणि जबाबदारीने वागतात.

त्यांचे हे म्हणणे ऐकताना आठवण झाली ती, इस्रायलच्या प्रयोगशील शाळांमध्ये पाहिलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची. युरोप, अमेरिका, आफ्रिका, आशिया अशा जगाच्या विविध भागांमधून ज्यू लोक इस्रायलमध्ये परतल्याने अर्थातच इस्रायलमधील सामाजिक जीवनांत मोठी विविधता आहे. असा विविध घटकांमध्ये सामंजस्य निर्माण होण्यासाठी तिथे शालेय स्तरावर मोठे प्रयत्न केले जातात. उदा. आफेक स्कूल ही शाळा ज्या भागात होती, त्या भागात येमेनहून इस्रायलला आलेल्या येमेनी वंशाच्या लोकांची संख्या अधिक आहे. या समाजाचा इतिहास समजून घेणे, त्यांच्या चालीरीती समजून घेणे, त्यासंबंधीचं डॉक्युमेन्टेशन करणे हे काम या शाळेच्या मुलांनी केले आहे. या शाळेच्या एका भागात यासंबंधीचे वस्तुसंग्रहालय आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रकल्प काम हे या समाजाच्या गरजांशी सुसंगत असते. वेगवेगळ्या भागांतील विद्यार्थ्यांना परस्परांच्या चाली-रीती, सणसमारंभ, पार्श्वभूमी समजून घेता यावी, या दृष्टिकोनातून इस्रायली शाळांमध्ये विद्यार्थ्यांना त्यासंबंधीचे प्रोजेक्ट वर्क दिले जाते. समाजात आपल्याहून वेगळे घटक असतात आणि त्याचा आदर करायला हवा, हे तिथे शालेय वयात मुलांच्या मनावर ठसवले जाते.

सामाजिक जाणिवांची रुजवात शाळा व्यवस्थेत झाली आणि जर शाळांमध्ये संवेदनशील उपक्रमांचे खतपाणी मिळाले, तर समाजजाणिवांची मुळे कोवळ्या वयात घट्ट रुजू शकतात. याकरता दररोज केवळ प्रतिज्ञा वदवण्यापलीकडे, आपल्या शाळांमध्ये जाणीवपूर्वक अनेक गोष्टी करता येतील.

आपल्याकडे अशा पद्धतीने काहीच काम होत नाही, असे या लेखातून म्हणायचे नाही. आपल्याकडे खूप काही होते आहे. आज सरकार आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतनिधींना पैशांची मदत करणे, आपल्या घरी काम करणाऱ्या मदतनीसांना गेल्या दोन महिन्यांचे पूर्ण वेतन देणे, आपल्याला विविध सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींची विचारपूस करत त्यांना मदतीचा हात देणे अशा गोष्टी करत आपापल्या परीने या संकटकाळात अनेकजण खारीचा वाटा उचलताना दिसतात… हे स्तुत्य आहेच, मात्र त्यापलीकडे झेपावत आपले व्यक्तिगत योगदान जर समाजव्यवस्थेशी जोडले गेले, तर त्यामुळे घडणारा परिणाम विखुरलेला न राहता, अधिकाधिक गरजवंतांपर्यंत पोहोचणारा असेल.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.