Published on Nov 17, 2020 Commentaries 0 Hours ago

कमला हारिस हे एक अनन्यसाधारण अमेरिकी यश आहे, यात शंकाच नाही. पण विविध क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या अमेरिकेला हे साधण्यासाठी २०२० उजाडावे लागले.

कमला हारिस यांचे यश मोठे, पण…

अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत बायडेन-हारिस यांच्या विजयाची बातमी ज्या रात्री आली, त्या वेळेस- सभोवताली त्यांच्या नावाचा जयजयकार चालला होता, टाळ्यांचा कडकडाट होत होता, एकच कल्ला सुरू होता, काहीजणांना तर भावनातिरेकाने रडू कोसळत होते- अशा वेळी उपराष्ट्राध्यक्षपदी निवड झालेल्या कमला हारिस समोरच्या गर्दीला सामोरे जात या महान ऐतिहासिक प्रसंगाला साजेशा बोलल्या. या भाषणामधील अनेक मुद्द्यांचा विविध अंगांनी अभ्यास व्हायला हवा. विशेषतः महिलांचे यश या मुद्द्याबद्दल नीट समजून घ्यायला हवे.

सामाजिक अंतरांचे नियम जपण्यासाठी श्रोते त्यांच्या पार्क केलेल्या गाड्यांमध्ये बसले होते. अशा या गाड्यांच्या रचनेसमोर व्यासपीठ उभे करण्यात आले होते. व्यासपीठावर उभ्या असलेल्या हारिस यांनी, महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा, या उद्दिष्टाने सुरू करण्यात आलेल्या चळवळीचे प्रतीक म्हणून शुभ्र वस्त्र धारण केले होते (आणि हा आता त्यांचा ट्रेडमार्क बनला आहे). भावनिक होऊन त्या म्हणाल्या, “मला आईची आणि कृष्णवर्णीय, आशियाई, श्वेतवर्णीय, लॅटिन, मूळ अमेरिकी अशा महिलांच्या अनेक पिढ्यांची आठवण येतेय, ज्यांनी आपल्या राष्ट्राच्या संपूर्ण इतिहासात, आजच्या रात्री मला प्राप्त झालेला मार्ग सुकर केला.”

तो क्षण अर्थपूर्ण होता, आणि आनंदी, ध्वज फडकावणाऱ्या शेकडो समर्थकांना त्या रात्री, त्यातून एक यशस्वी संकेत मिळाला. हे शक्य होईल, याची खात्री खूप कमीजणांना होती. अमेरिकेची नवनियुक्त पहिली महिला उपाध्यक्ष अनेक अल्पसंख्याक समाजांचे प्रतिनिधित्व करत आहे: राष्ट्र स्तरावरील पदावर निवडून आलेली ती पहिली अशी व्यक्ती आहे, जी कृष्णवर्णीय, दक्षिण आशियाई आणि कॅरिबियन वंशाचा दावा करू शकते आणि ज्यांचा पती ज्यू आहे. ‘माझी उपाध्यक्ष माझ्यासारखी दिसते” हा टी-शर्ट परिधान केलेल्या हजारो लहानग्या कृष्णवर्णीय मुली, समाजमाध्यमांमध्ये पुढील काही दिवस चर्चेत राहिल्या, त्यांचे क्षितीज विस्तारल्याचे कमला हारिस यांच्या प्रतिनिधित्वातून दिसून येते.

त्या भाषणाच्या रात्री कमला हारिस यांनी ज्यांच्या आठवणी काढल्या, त्यात एक खटकणारी बाबही होती. महिलांच्या विजयाचा उत्सव साजरा करताना, त्यांनी अभिमानाने अनेक वक्तव्ये केली- त्यांनी त्यांची दिवंगत आई, श्यामला गोपालन, जी १९५९ साली ‘वयाच्या १९व्या वर्षी भारतातून इथे आली’ आणि ‘आज वास्तवात उतरल्यासारखा क्षण इथे घडणे शक्य आहे, इतका गाढ विश्वास जिने अमेरिकेवर दाखवला,’ त्यांना आदरांजली वाहिली. मात्र, हारिस म्हणाल्या, ‘कदाचित (त्यांच्या आईने) या क्षणाची फारशी कल्पना केली नसेल.’

का नाही, असा प्रश्न एक भारतीय चाहता उपस्थित करेल. अमेरिकेमध्ये अशा क्षणाची कल्पना करणे सोपे नव्हते, ज्या देशात आजमितीस एका प्रमुख राजकीय पक्षाकडून केवळ एका महिलेला अध्यक्षपदासाठी आणि दोघीजणींना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी मिळाली आहे- आणि त्या सर्व अयशस्वी ठरल्या आहेत. मात्र, दक्षिण आशियात महिलांना उमेदवारी मिळणे आणि त्यांनी निवडणुकीत विजेतेपद संपादन करणे खूप आधीच शक्य झाले होते. किशोरवयीन श्यामला गोपालन अमेरिकेत ज्या वर्षी दाखल झाल्या, त्यानंतर वर्षभरातच, श्रीलंकेचे पंतप्रधान सोलोमन यांची दु:खद हत्या झाली आणि त्यांच्या पश्चात, त्यांच्या पत्नी सिरिमावो बंदरनायके श्रीलंकेच्या पंतप्रधान बनल्या.

अशा प्रकारे, आशियाई देशांमध्ये, सरकारमध्ये प्रमुखपदी महिला विराजमान होण्याच्या लांबलचक यादीला सुरुवात झाली. भारतात, जानेवारी १९६६ साली देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून  इंदिरा गांधी यांनी शपथ घेतली (आणि त्यानंतर पुन्हा, १९८० सालापासून त्यांच्या हत्येची शोकान्तिका घडेपर्यंत इंदिरा गांधी यांनी सरकारचे नेतृत्व केले.) १९७०-७७ या कालावधीत बंदरनायके यांनी पुन्हा श्रीलंकेचे पंतप्रधानपद भूषवले आणि नंतर पुन्हा १९९४-२००० या कालावधी दरम्यान, पुन्हा त्या श्रीलंकेच्या पंतप्रधान बनल्या. योगायोग असा की, त्यावेळेस त्यांची मुलगी चंद्रिका कुमारतुंगा देशाच्या राष्ट्रपती होत्या.

भारतीय सीमेच्या पल्याड, बेनझीर भुट्टो यांनी पाकिस्तानच्या (आणि मुस्लिम राष्ट्रातील पहिल्या) पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला. त्या १९८८ मध्ये पहिल्यांदा आणि नंतर १९९३ साली पुन्हा निवडून आल्या. बांगलादेशात, खलिदा झिया १९९१ पासून पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून नियुक्त झाल्या आणि लवकरच त्यांची जागा शेख हसीना यांची घेतली. (१९९६ साली त्या पहिल्यांदा निवडून आल्या, त्यानंतर २००८ साली पुन्हा निवडून येऊन, त्या बांगलादेशाच्या पंतप्रधान म्हणून आजही कार्यरत आहेत.). दशकभरापूर्वी, प्रतिभा पाटील यांची भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी २००७-२०१२ या कालावधीदरम्यान, भारताचे राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला.

जगातील सर्वात जुन्या लोकशाहीच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष होण्यातील कमला हारिस यांचे विलक्षण वेगळेपण कुणी नाकारू शकत नाही आणि भारतीयांच्या दृष्टीने स्वारस्यपूर्ण गोष्ट अशी की, कमला हारिस यांची आई ज्या दक्षिण आशियाई प्रदेशातून आली आहे, त्या ठिकाणी दक्षिण-आशियाई वंशाच्या महिलेने, सर्वोच्च पद भूषविण्याची संकल्पना नवी नाही.

खरोखरीच, कोणीतरी असा युक्तिवाद करू शकतो की, इतर लोकशाही देशांच्या, अगदी उदारमतवादी नसलेल्या देशांच्या तुलनेत, महिलांना सर्वोच्च पदावर नियुक्त करण्यात अमेरिकेने फारच विलंब लावला. १९६९ साली (१९७४ पर्यंत सेवा बजावणाऱ्या) गोल्डा मेअर या इस्त्रायलच्या चौथ्या पंतप्रधान झाल्याच्या घटनेला, आज अर्ध शतक लोटले आहे. आणि जगाच्या पाठीवर अनेक स्त्रियांनी त्यांच्या पावलावर पाऊल टाकले आहे. मार्गारेट थॅचर यांनी १९७९ ते १९९२ या कालावधीत इंग्लंडच्या पंतप्रधान म्हणून देशावर पोलादी पकड संपादन केली.

१९८० ते १९९६ या कालावधीत आईसलँडच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष म्हणून लोकशाही पद्धतीने निवडलेल्या विग्डिस फिनबोगॅदोत्तीर यांनी कार्यभार सांभाळला. आजच्या जमान्यात जगातील सर्वोत्तम राष्ट्रप्रमुख म्हणून ज्यांची नावे चर्चिली जातात, त्यात २००५ पासून जर्मनीच्या चॅन्सेलर म्हणून पदभार स्वीकारलेल्या अँजेला मर्केल यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.

ही यादी वाढत जाते. अलीकडच्या महिला राष्ट्रप्रमुखांमध्ये ब्राझीलच्या दिलमा रौसेफ, दक्षिण कोरियाच्या पार्क ग्युन-हाय, स्वित्झर्लंडच्या सिमोनेत्ता सोम्मारुगा, मॉरिशसची अमीना गुरिब-फकिम आणि क्रोएशियाच्या कोलिन्दा ग्रैबर-किटारोविक (त्या देशाच्या आजवरच्या सर्वात युवा राष्ट्रप्रमुख आहेत) यांचा समावेश आहे. फिलिपिन्समधील कोराझोन अक्किनो, इंडोनेशियातील मेगावती सुकर्णोपुत्री, थायलंडमधील यिंगलक शिनावात्रा आणि किर्गिस्तानमधील रोजा ओटुनबायेवा या जगातील इतरत्र ठिकाणीही अशीच उदाहरणे दिसून येतात. सध्या बांगलादेश, एस्टोनिया, इथिओपिया, ग्रीस आणि म्यानमारमध्ये राष्ट्राचे अथवा सरकारचे प्रमुख नेतृत्व महिलेकडे आहे.

खरे पाहता, कमला हारिस अमेरिकेच्या पहिल्या उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवडल्या गेलेल्या महिला आहेत, पण त्या देशाच्या पहिल्या अमेरिकी महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडल्या गेलेल्या नाहीत. अद्यापही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद हे महिलेलेला मिळालेले नाही. विलक्षण वेगळेपण जेनेट रोझेनबर्ग जगन या श्वेतवर्णीय ज्यू अमेरिकी महिलेचे आहे. गयानाचे लोकप्रिय राजकीय नेते छेदी जगन यांचे १९९७ मध्ये निधन झाल्यानंतर त्यांची पत्नी जेनेट गयानाच्या अध्यक्षपदी निवडून आल्या. त्या दोन वर्षे अध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या.

हे खरे आहे की, जेनेट जगन यांच्या जीवनकथेतून असे सूचित होते की, प्रत्येकीला नाही तरी काही महिला राजकीय नेत्यांना, शक्तिशाली पुरुषांशी जोडल्या जाण्याचा अथवा त्यांच्या वंशाचा भाग असल्याचा लाभ झाला आहे. बहुतेकदा या महिलांच्या राजकीय कारकिर्दीच्या उदयाला कारणीभूत असणारा घटक म्हणून राजघराण्याच्या राजकारणाकडे पाहिले जाते; आशियाई राजकीय अवकाशात महिला नेतृत्वाची नोंद कितपत प्रभावी झाली, हा वादाचा विषय आहे. हे अधिक समंजस मतदारांचे किंवा महिलांच्या मोठ्या प्रमाणातील राजकीय सहभागाचे अटळ प्रतिबिंब नाही तर ते कुटुंबाधारित नेटवर्कला मिळालेले शाश्वत यश आहे.

तरीही, मुद्दा असा आहेः दोनदा बिल क्लिन्टन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होण्यात त्यांची पत्नी हिलरी क्लिन्टन यांचा मोलाचा वाटा होता. मात्र, त्या बिल क्लिंटन यांच्या पत्नी आहे, म्हणून हिलरी क्लिंटन यांना बहुसंख्य अमेरिकी मतदारांनी स्वीकारले नाही. महिलांविरोधात खोलवर रुजलेल्या पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनाचा फटका त्यांना अमेरिकेच्या निवडणुकीत बसला, मात्र इतर देशांतील महिलांसाठी हा मुद्दा अडथळा बनला नाही.

कमला हारिस यांचे पती डग्लस एम्हॉफ ‘सेकंड जेंटलमन’ बनण्याची अभूतपूर्व भूमिका अमेरिकेच्या अंगवळणी पडण्याची शक्यता अनेक महिला पडताळत असताना, वस्तुस्थिती अशी आहे की, डेनिस थॅचरपासून आसिफ अली झरदारी यांच्यापर्यंत जगभरातील पुरुषांनी अशी भूमिका चांगली निभावली आणि त्यातील आव्हानांशी त्यांनी जुळवून घेतले.

कमला हारिस हे एक अनन्यसाधारण अमेरिकी यश आहे, यात शंकाच नाही. पण याचीही आठवण असू द्यावी की, अमेरिका मानवी प्रयासाच्या विविध क्षेत्रांत अग्रगण्य म्हणून ओळखली जाते, मात्र या देशात लिंगसापेक्षता हा अखेरचा अडथळा पार करण्यासाठी २०२० हे वर्ष उजाडावे लागले.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.