Author : Harsh V. Pant

Originally Published The Telegraph Published on Sep 03, 2025 Commentaries 0 Hours ago

रशिया-युक्रेनमधील युद्ध 24 तासांत थांबवू शकतो, असा दावा ट्रम्प यांनी करूनही युद्ध थांबवण्यात त्यांच्यासमोरील आव्हाने वाढत चालली आहेत. कारण त्यांना तीन परस्परविरोधी दबावांचा समतोल साधावा लागत आहे.

24 तासांत युद्ध थांबवण्याचा दावा, पण ट्रम्पसमोर तिहेरी पेच!

Image Source: Getty Images

युक्रेनची कहाणी गेल्या आठवड्यातील आशादायी घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुढे चालू राहिली आहे. त्यामुळे रणभूमीवरील संघर्ष व राजनैतिक बैठकांमधील शांतता प्रस्थापित करण्याच्या चर्चेतील आजवरच्या निराशेचे धुके बाजूला होऊन एक आशेचा किरण दिसू लागला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नेहमीच आपल्या युद्ध थांबवण्याच्या क्षमतेविषयी जाहीर निवेदने केली आहेत; परंतु एखाद्या नेत्याला नोबेल पुरस्कार मिळवायचा आहे, म्हणून युद्धे थांबत नसतात, या वास्तवाची जाणीव त्यांना प्रयत्न केल्यानंतर झाली आहे. रणभूमीवरील परिस्थिती आपल्या हाताबाहेर गेली आहे, असे लढणाऱ्यांपैकी एकाला वाटले, तरच युद्धे थांबत असतात. युक्रेनच्या बाबतीत ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदीमीर झेलेन्स्की यांना युद्धसमाप्तीची आवश्यकता असल्याच्या अमेरिकेच्या भूमिकेवर सहमती देण्यावर अखेरीस एकत्र आणण्याचा धाडसी प्रयत्न केला होता; परंतु गेल्या काही दिवसांत या पलीकडे फार काही हाती लागले नाही.

यामुळे स्वतः ट्रम्पच आता हा संघर्ष रोखणे ‘खूप अवघड’ आहे, असे कबूल करू लागले आहेत, यात आश्चर्य नाही. रशियाच्या अध्यक्षांना शत्रुत्व संपवण्यात रस आहे, असे वाटत नाही, असे सांगून ‘त्यांना करार करण्याची इच्छा नाही, असे वाटते,’ असे त्यांनी अधोरेखित केले आहे.

ट्रम्प व पुतिन यांच्यादरम्यान झालेली बहुचर्चित शिखर परिषद मोठ्या प्रमाणात प्रतिकात्मक ठरली. त्यामुळे जागतिक स्तरावर पुतिन यांची प्रतिमा अधिक भक्कम झाली. त्याचबरोबर रशिया व युक्रेनबाबतच्या अमेरिकेच्या धोरणात्मक भूमिकेबद्दल शंका निर्माण झाली. ठोस निकालाच्या अभावामुळे मूलभूत प्रश्न अनुत्तरितच राहिले आणि मित्र राष्ट्रांमध्ये चिंता निर्माण झाली. रशिया व युक्रेनदरम्यान युद्धविराम झाला नाही की शांतता करारही झाला नाही, उलट ‘करार होईपर्यंत कोणताही करार नाही,’ असे दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केले.  

ट्रम्प व पुतिन यांच्यादरम्यान झालेली बहुचर्चित शिखर परिषद मोठ्या प्रमाणात प्रतिकात्मक ठरली. त्यामुळे जागतिक स्तरावर पुतिन यांची प्रतिमा अधिक भक्कम झाली. त्याचबरोबर रशिया व युक्रेनबाबतच्या अमेरिकेच्या धोरणात्मक भूमिकेबद्दल शंका निर्माण झाली.

ट्रम्प यांनी युद्धविरामासंबंधीचा आपला आधीचा आग्रह सोडला आणि एवढेच नव्हे, तर निर्बंध शिथिल करण्याचे आणि रशियाला अगदी प्रदेशविषयक काही लाभ मिळवून देण्याचे संकेतही दिले. पुढील काळात कदाचित मॉस्कोमध्ये आणि कदाचित झेलेन्स्की यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय बैठका होण्याची शक्यता बोलून दाखवण्यात आली. मात्र या सर्व नाट्याचे लाभार्थी पुतिनच होते. कारण त्यांचे रेड कार्पेटवर स्वागत झाले, त्यांना लष्करी मानवंदना मिळाली आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्थानाची पावती म्हणून ट्रम्प यांच्या लिमोझिनमधून त्यांना प्रवासही घडवण्यात आला.

युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याबद्दल बोलायचे, तर ट्रम्प यांनी आपल्या युरोपीय मित्रदेशांच्या प्रतिनिधींसमवेत त्यांचे व्हाइट हाऊसमध्ये स्वागत केले. येथे झालेल्या बैठकीत ट्रम्प यांचा सूर आधीच्या वादविवादाच्या उलट लक्षणीयरीत्या मैत्रीपूर्ण होता. असे आशादायक वातावरण निर्माण होऊनही प्रत्यक्ष निष्कर्ष किंवा कराराविषयी अनिश्चतता कायम आहे.    

ट्रम्प यांनी पूर्ण सदस्यत्वाशिवाय ‘नाटो’सारखी सुरक्षा हमी देण्याची तयारी दर्शवली असून अमेरिकेने अधिक अप्रत्यक्ष भूमिका घेऊन युरोपीय नेतृत्वाखालील पाठिंब्यावर भर दिला. शांतता करार झाल्यास युक्रेनच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी अशी वचनबद्धता महत्त्वपूर्ण ठरेल, हे झेलेन्स्की आणि युरोपीय नेत्यांनी ट्रम्प यांना पटवून दिल्यानंतर ही घडामोड घडली. झेलेन्स्की यांच्या मते अमेरिका व युक्रेन यांच्यातील 90 अब्ज डॉलरचा शस्त्रास्त्र करार हा सुरक्षा हमीचा एक भाग असेल; परंतु ट्रम्प यांनी आपल्या पद्धतीने रशिया व युक्रेनने युद्धबंदीऐवजी थेट कायमस्वरूपी शांतता कराराकडे जाण्याची गरज अधोरेखित केली. पण पुतिन यांना त्यात रस नसल्याचे दिसते.

ट्रम्प, झेलेन्स्की आणि पुतिन यांच्या त्रिपक्षीय बैठकीला व्यापक पाठिंबा असला, तरी रशियाने अशा शक्यतेसाठी अधिकृत आश्वासन दिलेले नाही. पुतिन आणि झेलेन्स्की यांच्यात लवकरच होणाऱ्या शिखर परिषदेला महत्त्व न देता ट्रम्प यांनी या दोन्ही नेत्यांना भेटीचे पुन्हा एकदा आवाहन केले. आपल्या पूर्वीच्या विधानाची आठवण करून देत ट्रम्प यांनी दोन्ही नेते आपल्याशिवाय भेटले असते, तर ‘बरे झाले असते’, असे ट्रम्प यांनी सूचवले आहे. ‘आवश्यक असेल, तर’ त्यांच्यासमवेत बैठकीला उपस्थित राहण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे; परंतु त्यांना ‘काय होते आहे, ते पाहायचे आहे’.  

ट्रम्प यांनी पूर्ण सदस्यत्वाशिवाय ‘नाटो’सारखी सुरक्षा हमी देण्याची तयारी दर्शवली असून अमेरिकेने अधिक अप्रत्यक्ष भूमिका घेऊन युरोपीय नेतृत्वाखालील पाठिंब्यावर भर दिला.

दोन्ही प्रतिस्पर्धी देशांची युद्धविषयक उद्दिष्टे अद्याप जुळलेली नाहीत. रशियाने संलग्न प्रदेशांवर (क्रिमिया, डोनबस, दक्षिण युक्रेनचा काही भाग) प्रादेशिक नियंत्रण राखणे, नाटोचा विस्तार रोखणे आणि युक्रेनच्या सार्वभौमत्वाला कमकुवत करणे या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे. ट्रम्प यांच्या दबावाखाली उद्दिष्टपूर्ती क्षीण होत असली, तरी युक्रेनसाठी संपूर्ण क्षेत्र राखणे (क्रिमियासह), युद्ध गुन्ह्यांसाठी न्याय करणे, संपूर्ण सार्वभौमत्व आणि नाटो सदस्यत्व ही अजूनही प्रमुख उद्दिष्टे आहेत.

दरम्यान, युद्धभूमीवर लष्करी हातमिळवणी करणे आवश्यक आहे, हे एक वास्तव आहे. दोन्ही देशांना मोठे नुकसान सहन करावे लागले असले, तरी बऱ्याचशा प्रदेशावर त्यांचे नियंत्रण आहे. दोन्ही देशांना निर्णायक यश मिळालेले नाही. रशियाचे सैन्य बचावात्मक पवित्र्यात असून युक्रेन बाह्य लष्करी मदतीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. दीर्घ काळच्या युद्धामुळे शक्तिपात झाल्याचे जाणवत आहे; परंतु दोन्ही देशांना आपल्या लष्कराचा पराभव होईल, अशी शक्यता वाटत नाही. अगदी अलीकडेच रशियाने पश्चिम युक्रेनवर शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली असून त्यात झपोरिझे, निप्रोपेत्रोस्क आणि लुव्हिव्ह या ठिकाणांना लक्ष्य केले आहे.

देशांतर्गत राजकारणामुळे सध्याचे प्रश्न आणखी गुंतागुंतीचे झाले आहेत. क्षेत्रीय सवलतींसह कोणत्याही प्रकारचा शांतता प्रस्ताव युक्रेनमध्ये राजकीयदृष्ट्या सफल होण्याची शक्यता नाही. पुतिन यांच्यासाठी माघार घेणे हे अपमानास्पद आणि सत्तेच्या स्थैर्याला असलेला धोका असू शकतो. पाश्चात्य नेते युक्रेनला हानीकारक ठरावासाठी ‘भाग पाडत’ असतील, तर या नेत्यांनाही देशांतर्गत विरोधाला सामोरे जावे लागेल. अस्थिर असलेल्या जागतिक राजकीय व्यवस्थेत या संघर्षाचा अंतर्भाव आहे. युक्रेनच्या विजयासाठी सर्व शक्तीनिशी आणखी प्रयत्न करायचे की वाटाघाटी करून युद्ध संपवायचे या दोन पर्यायांवर पाश्चात्य सत्तांमध्ये मतभेद असले, तरी चीन, इराण व अन्य देश रशियाच्या दीर्घ काळच्या संघर्षाचे समर्थन करतात किंवा लाभ मिळवतात.   

देशांतर्गत राजकारणामुळे सध्याचे प्रश्न आणखी गुंतागुंतीचे झाले आहेत. क्षेत्रीय सवलतींसह कोणत्याही प्रकारचा शांतता प्रस्ताव युक्रेनमध्ये राजकीयदृष्ट्या सफल होण्याची शक्यता नाही.

रशिया-युक्रेनमधील युद्ध 24 तासांत थांबवू शकतो, असा दावा ट्रम्प यांनी करूनही युद्ध थांबवण्यात त्यांच्यासमोरील आव्हाने वाढत चालली आहेत. कारण त्यांना तीन परस्परविरोधी दबावांचा समतोल साधावा लागत आहे. ते म्हणजे, शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुतिन यांना पुरेसे खूश करणे, अमेरिकेचे मित्र देश किंवा देशातील मतदार यांच्याकडे दुर्लक्ष न करता युक्रेनला पाठिंबा देणे आणि हे सर्व करताना आपण दुर्बल आहोत किंवा व्यापारी आहोत, असे दिसणार नाही, याची काळजी घेणे. युक्रेनला एकटे न पाडता ते पुतिन यांना उघडपणे लाभ मिळू देत आहेत, असे वाटत नाही. अमेरिकेच्या मित्रदेशांना शांतता हवी असली, तरी त्यासाठी युरोपच्या दीर्घकालीन सुरक्षेची किंमत मोजायची त्यांची तयारी नाही. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी युरोपीय नेत्यांसमोर स्पष्ट केले, की ‘आपण सुरक्षेच्या हमीबद्दल बोलत असतो, तेव्हा आपण युरोप खंडाच्या सुरक्षेच्या मुद्द्याबद्दलही बोलत असतो.’ अर्थातच, ट्रम्प यांच्या MAGA ला त्यांनी ‘अंतहीन युद्धे थांबवावीत’ असे वाटत असले, तरी दुर्बल असल्याचे दिसता कामा नये, अशी अट आहेच. त्यामुळे मध्यस्थीला कमी वाव उरला आहे.

जवळजवळ अशक्य वाटणारे संतुलन साधण्यात ट्रम्प कसे यशस्वी होतील, हे स्पष्ट झालेले नाही. आतापर्यंत अटोकाट प्रयत्न करूनही नोबेल पुरस्काराचे मृगजळ शोधण्यात त्यांना अपयश आले असल्याचे दिसून येत आहे.


हा लेख या आधी ‘दि टेलिग्राफ’मध्ये प्रसिद्ध झाला आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.