Published on Dec 26, 2019 Commentaries 0 Hours ago

अंतराळविषयक उद्योग क्षेत्रात विशेषतः छोट्या उपग्रहांच्या प्रक्षेपणाच्या बाबतीतली वाढती बाजारपेठ आणि परदेशातून होणारी स्पर्धा हे इस्रोसमोरचे आव्हान आहे.

इस्रोची कामगिरी कशी पाहायची?

इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे अलिकडच्या काळात केलेली काही निवेदने आणि दावे लक्षात घेतले तर, भारताच्या अवकाश मोहीमांचे मुल्यमापन करण्यासाठी, काही गोष्टी आणि बाबींचीही तपासणी करण्याची गरज आहे. इस्रोच्या एका प्रवक्त्यांनी अलिकडेच असे म्हटले होते की, इस्रो अवकाशात किती उपग्रह सोडते, त्या संख्येवरून इस्रोच्या कामगिरीचे मुल्यमापन करता यावे, यासाठी इस्रो म्हणजे काही एखादे ‘उत्पादन केंद्र नाही’.

इस्रोकडची उपलब्ध मर्यादित वैज्ञानिक आणि तांत्रिक पायाभूत सोयीसुविधा, तसेच मर्यादित आर्थिक तरतुदीमुळे निर्माण होत असलेल्या समस्या लक्षात घेतल्या, इस्रोने नागरी आणि व्यावसायिक गरजांसह, लष्कराच्याही कामी येऊ शकतील असे अधिकाधिक उपग्रह सातत्याने यशस्वीरित्या सोडावेत अशी अपेक्षा केली जायला हवी का?

अर्थात परिस्थिती अशी असली तरीदेखील नागरी, व्यावसायिक, तसेच लष्करी उपयोगितेसाठीची अंतराळ याने बनवण्याची जबाबदारी असलेली ही देशातली एकमेव अंतराळ संस्था आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच इस्रोने अधिकाधिक मोहीमा हाती घेऊन त्या यशस्वीपणे राबवाव्यात याबद्दल असलेल्या अपेक्षा किंवा त्याचे आकर्षण आणि त्यातून इस्रोवर येत असलेला दबाव समजून घेण्यासारखा आहे. तरीदेखील जर का आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचा विचार केला तर ही परिस्थिती समस्या निर्माण करणारीच आहे हे देखील खरेच. त्याचवेळी इस्रो स्वतःच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना लावत असलेले निकष, किंवा त्यासंबंधी त्यांनी स्वतःच केलेली व्याख्या एकादृष्टीने व्यापक आहे. याकरता इस्रो त्यांनी आजवर राबवलेल्या वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानविषयक मोहीमाच गृहीत धरते.

उदाहरण घ्यायचे झाले तर उपग्रह प्रक्षेपणवाहक मोहीम आणि उपग्रहाला अंतराळात सोडण्याची मोहीम या दोन वेगळ्याप्रकारच्या मोहीमा आहेत असेच इस्रो मानते. खरे तर हे अनाकलनीय म्हणावे असेच आहे, आणि त्यामुळे चुकीचे आहे असा निष्कर्षही काढता येईल. कारण, जगातल्या इतर मोठ्या आणि महत्वाच्या अंतराळ संस्था अशारितीनेच कामगिरीचे मुल्यमापन करत असतील, असे म्हणता येणे थोडे कठीणच आहे. खरे तर एखाद्या मोहीमेची इस्रोने केलेली व्याख्या म्हणजे, दोन वेगवेगळी कामे आहेत, किंवा एखाद्या मोहीमेतले दोन वेगवेगळे टप्पे आहेत.

उपग्रह प्रक्षेपणवाहक सुरु करणे, यशस्वीरित्या उड्डाण करणे, आणि उपग्रहाला अंतराळात त्याच्या नियोजित कक्षेत स्थिर करणे हा खरे तर एक टप्पा आहे. [ इथे आपण ध्रुवीय उपग्रह अवकाश प्रक्षेपण वाहकासाठीचे (पी.एस.एल.व्ही. / PSLV) टप्पे गृहीत धरू नयेत)]. त्यानंतर त्या त्या उपग्रहाने प्रत्यक्षात त्याच्या बाह्यवर्ती संवेदन मर्यादेचा वापर करून संवाद साधत राहणे आणि इतर अपेक्षित कामगिरी करणे हा पुढचा टप्पा आहे.

आता इस्रोच्या या भूमिकेच्या उलट पाहिले, तर इतर महत्वाच्या शक्तिशाली अंतराळ संस्था एखाद्या मोहिमेची व्याख्या कशी करत असतील हे पाहायला हवे. अमेरिकेच्या राष्ट्रीय वैमानिक आणि अंतराळ व्यवस्थापन अर्थात ‘नासा’ची (NASA) एखाद्या मोहीमेच्या मुल्यमापनाची व्याख्या, इस्रोच्या प्रवक्त्यांनी सांगितलेल्या व्याख्येपेक्षा वेगळी आहे.

सामान्यतः ‘नासा’नुसार एखाद्या मोहिमेच्या संपूर्ण आयुष्यकाळात ‘प्री-फेज ए’ (Pre-Phase A) म्हणजेच त्या मोहिमेच्या संकल्पनेविषयी अभ्यास आणि संशोधन करण्यासाठीचा मोहीमपूर्व टप्पा असतो. ‘फेज ए’ म्हणजे पहिल्या टप्प्यात प्राथमिक विश्लेषण आणि संशोधनाचा समावेश असतो तर ‘फेज बी’ म्हणजे दुसऱ्या टप्प्यात मोहिमेसाठी उभाराव्या लागणाऱ्या यंत्रणा वा व्यवस्थेसाठीच्या आवश्यक बाबी, रचना आणि मोहिमेसाठी समर्थनीय न ठरू शकणाऱ्या बाबींचा दृष्टीकोन समजून घेत त्याचे विश्लेषण करणे याचा समावेश असतो. ‘फेज सी’ आणि ‘डी’ म्हणजेच तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात रचना, तोवरची प्रगती, मोहिमेसाठीची तयारी, उड्डाण चाचणी याचा समावेश असतो. ‘फेज इ’ म्हणजेच पाचव्या टप्प्यात मोहिमेच्या प्रत्यक्ष कार्यान्वयाशी संबंधित प्राथिमिक ते विस्तारीत बाबींचा समावेश असतो. यासगळ्या नासा मोहिमेचे कार्यान्वयन म्हणजे मिशन ऑपरेशन [Mission Operations (MO)] आणि माहितीचे विश्लेषण म्हणजेच डेटा अॅनालिसिस [Data Analysis (DA)] असे म्हणते.

इथे आपला संबंध केवळ शेवटचा टप्पा म्हणजेच फेज इ अर्थात MO आणि DA सोबतच आहे. आता नासा राबवत असलेल्या आंतरग्रह किंवा अंतराळातल्या अत्यंत दूरवरच्या मोहीमांचा विचार करूयात. अशा मोहीमांमध्ये चार टप्पे किंवा पुरकटप्पे म्हणता येतील अशाप्रकारचे टप्पे असतात. यामध्ये उड्डाणाचा टप्पा म्हणजेच लाँच फेज (Launch phase), क्रुज फेज (Cruise Phase), एनकाऊंटर फेज (Encounter Phase) आणि अंतराळयानाच्या संपूर्ण क्रियाप्रक्रियांशी, यानाच्या तांत्रिक स्थितीगतीशी आणि मोहीमेला लागणाऱ्या संपूर्ण कालावधीचा अखेरचा विस्तारित कार्यान्वयाचा टप्पा (extended operations phase) अशा टप्प्यांचा समावेश आहे.

इस्रोने ऑक्टोबर २००८ मध्ये सुरु केलेल्या चंद्रयान -१ या आपल्या पहिल्या अंतराळातल्या दूरवरच्या चंद्र मोहिमेचे अंतर्गत मुल्यमापन करताना जी निरीक्षणे नोंदवली आहेत, त्याप्रमाणे, “चंद्राच्या पृथ्वीपासून जवळच्या आणि अत्यंत दूरच्या अशा दोन्ही बाजुंचे त्रिमीतीय नकाशे तयार करणे आणि, चंद्राच्या संपूर्ण पृष्ठभागावरच्या रासायनिक तसेच खनिज उपलब्धतेचे नेमके नकाशा रेखाटन करणे हे या प्राथमिक उद्दिष्ट होते. चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी (H2O) आणि हायड्रॉक्सिलचे (OH) अस्तित्व असल्याचे मिळालेले पुरावे हा चंद्रयान – १ या मोहीमेअंतर्गत लावलेला मोठा शोध आहे. तिथल्या ध्रुविय क्षेत्रात पाणी आणि हायड्रॉक्सिल विपुल प्रमाणात असल्याची माहितीही या शोधासंदर्भातल्या माहितीसाठ्यातून समोर आली आहे”. पाण्याचे अस्तित्व असल्याच्या पुरव्यांच्या शोधाशिवाय, इस्रोने चंद्राच्या पृष्ठभागावर टिटॅनिअम, कॅल्शिअम, अॅल्युमिनिअम आणि मॅग्नेशिअमसारखी खनिजे असल्याचाही शोध लावला, पुरावे मिळवले. एखाद्या सामान्य व्यक्तीला यात विशेष असे काही जाणवणार नाही.

सामान्य माणसांसाठी चंद्रयानाचा ऑर्बिटर उपग्रह म्हणजे मोहीम नाही, तर त्यांच्यासाठी हा ऑर्बिटर म्हणजे एक अशी मोहीम पार पाडण्यासाठी तयार केलेली कृत्रिम तांत्रिक वस्तू आहे, जी चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी आणि खनिजांचे अस्तित्व शोधण्यासाठीची मोहीम पार पाडण्यासाठी तयार करण्यात आली. एका अर्थाने खरे तर आपण मोहीम म्हणजे इस्रोने केलेली व्याख्याच आपल्याला प्रचंड पेचात टाकणारी ठरली आहे.

हे गृहीत धरतानाच हे देखील लक्षात घ्यायला हवे की, चंद्राची भौगोलिक स्थिती, चंद्राच्या पृष्ठभागावरच्या खनिजांची उपलब्धता याविषयी समजून घेणे हा चंद्रयान-१ या मोहीमेचे प्राथमिक उद्दिष्ट होते. आता अशावेळी ही उद्दिष्टे, अंतराळ मोहीम म्हणजे काय याबाबत इस्रोने अलिकडेच  केलेल्या व्याख्येच्या चौकटीत कसे काय बसू शकेल? असा विचारही व्हायला हवा.

एक प्रश्न निश्चितच उभा ठाकतो की मोहीमीविषयी इस्रोने मांडलेली व्याख्या म्हणजे इस्रोची तृटीपूर्ण कृती किंवा दोष आहे का? तर त्याचवेळी सांख्यिकीच्या पातळीवर आपल्या कामगिरीविषयी अधिकची बढाई मारण्यासाठीच किंवा आकडेवारी फुगवून सांगण्यासाठीच इस्रोने मुद्दाम दिशाभूल करत, उपग्रह प्रक्षेपण वाहक आणि उपग्रहाचे कार्यान्वय या दोन स्वतंत्र मोहिमा असल्याचे भासवले आहे, असेही अनेकांना वाटू शकते.

महत्वाचे म्हणजे चंद्रयान-२च्या बाबतीत तर इस्रोने याच्याही पुढचे पाऊल टाकले आहे. या मोहिमेबाबत इस्रोच्या अधिकाऱ्याने स्पष्टपणे असे म्हटले आहे की, “चंद्रयान-२ मोहीमेसाठी अत्यंत गुंतागुंतीचा ऑर्बिटर आणि लँडर, एक रोव्हर, आणि प्रक्षेपक वाहन तयार करावे लागल्याने, यावर्षीची चंद्रयान-२ ही एकमेव मोहिमच इस्रोच्या किमान ५ ते ६ मोहिमांइतकी आहे (यासाठी घेतलेली मेहनत आणि प्रयत्नांच्या संदर्भाने). त्यामुळेच अशा प्रकारची आकडेवारी ही दिशाभूल करणारी आहे.” खरे तर कोणताही उपग्रह, प्रक्षेपक वाहनाशिवाय अंतराळाच्या आसपास किंवा प्रत्यक्ष अंतराळात पोहचूच शकत नाही. थोडक्यात काय तर, प्रक्षेपक वाहन आणि उपग्रहाचे कार्यान्वय, केवळ हेच कोणत्याही मोहीमेचे टप्पे असतात, आणि मोहीमेची उद्दिष्टे आपण आधी नमूद केल्याप्रमाणेच परिवर्तनशील असतात.

दीर्घकालाच्या वाटचालीच्या अनुषंगाने सगळ्याकडे गांभीर्याने पाहीले, तर इस्रो किती मोहीमा हाती घेते, याबाबतची आकडेवारी फुगवून सांगण्यामागे इस्रोची काहीही उद्देश असला, तरी त्यामुळे इस्रोसमोरच्या समस्या मात्र अधिकच वाढणार आहेत, आणि त्या दोन वेगवेगळ्या स्वरुपात समोर येण्याचीही शक्यता आहे. पहिले स्वरुप अगदी सोपे आणि स्पष्टच आहे, ते म्हणजे, तंत्रज्ञानविषयक क्षमता आणि मनुष्यबळाच्या पातळीवर इस्रोत मोठी तुट किंवा कमतरता आहे. आणि यामुळे इस्रोच्या उत्पादकक्षमतेलाच नुकसान पोचत आहे.

याच संदर्भाने पाहीले तर २०१५ मध्ये केलेल्या अभ्यासात मागणी आणि पुरवठ्याशी संबंधित समस्येवरच्या उपाययोजनेबाबत असे म्हटले आहे की, “इस्रोने त्यांच्या स्वतःच्या उत्पादनांसाठीच्या गरजा गरजा पूर्ण करण्याच्या मोठ्या कामापासून स्वतःचे अंग काढून घ्यायला हवे, आणि हे काम संबंधित उद्योग क्षेत्राकडेच (खाजगी भारतीय) वळवले पाहीजे, आणि हेच या समस्येवरचे योग्य उत्तर असेल.” यादृष्टीने पाहीले तर छोटे उपग्रह विकसित करणे आणि त्यांची निर्मिती करण्याच्या कामावरचे नियंत्रण काढून घेत, ते स्वतःपेक्षा वेगळ्या यंत्रणेकडे देत सुरुवात करायला हवी.

अंतराळविषयक उद्योग क्षेत्रात विशेषतः छोट्या उपग्रहांच्या प्रक्षेपणाच्या बाबतीतली बाजारपेठ वाढते आहे, मात्र त्याचवेळी या कामात परदेशस्थित संस्थांच्या माध्यमातून स्पर्धादेखील वाढतेच आहे, आणि हे  इस्रोसमोरचे दुसरे महत्वाचे आव्हान आहे. एलॉन मस्कच्या मालकीची असलेली स्पेस एक्स फाल्कॉन नाईन (SpaceX Falcon 9) ही संस्था म्हणजे, इस्रोच्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहकासमोरचा (पी.एस.एल.व्ही. / PSLV) सर्वात मोठा धोका असल्याचे मानले जाते.

खरे तर छोट्या उपग्रह निर्मात्यांसाठी पी.एस.एल.व्ही.ने कमी खर्चातले विश्वासपात्र उपग्रह प्रक्षेपक म्हणून स्थान निर्माण केले आहे. मात्र फाल्कॉन नाईन च्या रुपात एक नवे अंतराळ प्रक्षेपक वाहक (SLV) उपलब्ध झाले आहे. अशावेळी इस्रोने संशोधन आणि विकासावरचे (R&D) आपले नियंत्रण शिथील करत किंवा सोडून देत, छोट्या उपग्रहांसाठी खाजगी क्षेत्राच्या माध्यमातून व्यावसायिकीकरण करणेच इस्रोच्या हिताचे ठरणार आहे. असे केले तर त्यामुळे इस्रोला अंतराळ प्रक्षेपक वाहके अधिक सक्षम करण्यासाठीच्या संशोधन आणि विकासप्रक्रीयेवर लक्ष केंद्रीत करता येईल, तसेच त्यासाठी त्यांच्याकडची संसाधनेही त्यासाठीच वापरण्याची संधीही निर्माण होऊ शकेल.

महत्वाचे म्हणजे यामुळे थेट प्रक्षेपणासाठी तयार असलेल्या उपग्रहांसाठीच्या प्रक्षेपक रॉकेट्सच्या क्षेत्रात फाल्कॉन नाईन ने निर्माण केलेल्या स्पर्धेला इस्रो सर्थपणे सामोरी जाऊ शकेल. खरे तर आपल्या मोहिमांसंदर्भात अतिशयोक्तीपूर्ण वाटणारे दावे करण्याबाबतच्या इस्रोच्या भूमिकेबाबत त्यांना कोणीतरी व्यवस्थित सल्ले देणे गरजेचे आहे, कारण अशा प्रकारचे दावे हे इस्रोच्या तसेच भारतीय नागरिकांच्याही हिताचे नाहीच.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Kartik Bommakanti

Kartik Bommakanti

Kartik Bommakanti is a Senior Fellow with the Strategic Studies Programme. Kartik specialises in space military issues and his research is primarily centred on the ...

Read More +