Published on Nov 05, 2019 Commentaries 0 Hours ago

भारताप्रमाणेच ब्राझीलनेही अमेरिकेच्या लहरी कारभाराला आणि दबावाला महत्त्व न देता आपल्या परराष्ट्र धोरणाबाबत सार्वभौम भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत.

भारत-ब्राझील दोस्ती घट्ट होतेय!

ब्राझीलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या अकराव्या ब्रिक्स शिखर परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्याशी संवाद साधण्यासाठी खूपच उत्सुक दिसत होते. इतकेच नव्हे, पुढच्या वर्षीच्या, म्हणजेच २०२० च्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी बोल्सोनारो यांना मोदींनी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रणही दिले. ब्राझीलशी संबंध अधिक दृढ करण्याची भारताची इच्छा असल्याचा हा स्पष्ट संकेत होता.

जागतिक पातळीवर भारत आणि ब्राझील यांच्या भूमिकेत प्रदीर्घ काळापासून एकवाक्यता राहिली आहे. त्यामुळेच दोन्ही देशांमधील संबंध आणखी मजबूत झाल्यास भविष्यात जागतिक पातळीवर त्याचा ठळक परिणाम दिसू शकतो. विशेषत: नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेलं ब्राझील व भारतातील वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर हे संबंध अधिक महत्त्वाचे ठरणार आहेत.

ब्राझीलमध्ये उजव्या विचारसरणीच्या नेतृत्वाचा उदय आणि राष्ट्रवादी विचारधारेचा पुरस्कार करणाऱ्या मोदींची भारताच्या परराष्ट्र धोरणावरील मजबूत पकड लक्षात घेता, भारत- ब्राझील संबंध घट्ट करण्याची ही योग्य वेळ आहे, असाही तर्क लावला जात आहे. मोदी-बोल्सोनारो यांच्यातील खेळीमेळी व मुक्त संवाद भारत-ब्राझील संबंध मजबूत करणारा ठरू शकेल का?, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे.

२००९ मध्ये ब्रिक्स गटाला संस्थात्मक स्वरूप आल्यापासून ब्राझीलशी नव्याने संबंध प्रस्थापित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चालना मिळाली आहे. जागतिक पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावण्याची महत्त्वाकांक्षा असलेला ब्राझील हे दक्षिण अमेरिकेतील एक महत्त्वाचे सत्ताकेंद्र आहे. भारत-ब्राझील संबंधांच्या विविध पैलूंकडे आतापर्यंत फारसे लक्ष दिले गेलेले नाही. मात्र, एकमेकांशी सुसंगत असलेले दोन्ही देशांचे परराष्ट्र धोरण भविष्यातील संबंधांच्या दृष्टीने खूपच निर्णायक ठरणार आहे.

भारत आणि ब्राझील: समान जागतिक दृष्टिकोन

अलिकडच्या काही वर्षांत भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांनी जागतिक संघटनांच्या कारभारात निर्णायक भूमिका बजावण्यामध्ये अधिक रस दाखवला आहे. देशाचा भौगोलिक विस्तार आणि लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्याला जागतिक राजकारणात स्थान मिळावे, असा दोन्ही देशांचा प्रयत्न आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्व मिळविण्यासाठी दोन्ही देशांनी एक प्रकारे आघाडीच उघडली आहे. भारताप्रमाणेच ब्राझीलनेही अमेरिकेच्या लहरी कारभाराला आणि दबावाला भीक न घालता परराष्ट्र धोरणाबाबत सार्वभौम भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत.

गेली अनेक वर्षे विकसनशील देशांच्या समस्या जागतिक पातळीवर मांडून या दोन्ही देशांनी तिसऱ्या जगातील देशांचं नेतृत्व केले आहे. संयुक्त राष्ट्रसंघ (यूएन) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या पुनर्रचनेची मागणीही हे देश सातत्याने करत आले आहेत. २०११ मध्ये पश्चिमेकडील देशांनी लिबियाच्या सार्वभौमत्वावर गदा आणण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा भारत-ब्राझीलने विरोधाची भूमिका घेतली होती. त्यावेळी देखील दोन्ही देशांच्या सहकार्याचे दर्शन घडले होते.

इराणमधील इस्लामिक विचारधारेच्या सरकारला अमेरिकेने विरोध केला असतानाही भारत आणि ब्राझीलने इराणशी व्यावहारिक संबंध कायम ठेवले होते. इराण हा आपल्या मित्र राष्ट्रांसाठी धोकादायक असल्याचे अमेरिकेला वाटते. त्यामुळं भारताने देखील त्यांच्याशी संबंध तोडावेत असं अमेरिकेचे म्हणणे आहे. मात्र, केवळ अमेरिकेच्या सांगण्यावरून ऊर्जा आणि पायाभूत सोयीसुविधा क्षेत्रात इराणशी प्रस्थापित केलेले संबंध पूर्णपणे तोडण्यास भारतानं कधीही उत्सुकता दाखवलेली नाही. ब्राझीलनेही पश्चिमेकडील राष्ट्रांच्या इराणबाबतच्या भूमिकेला विरोधच केला आहे. उलट इराणशी संबंधांना ब्राझीलने नेहमीच अधिक महत्त्व दिले आहे. इतकेच नव्हे तर, पश्चिमेकडील देश व इराणमधील वादात मध्यस्थी करण्याची भूमिका घेतली आहे.

देशाची सार्वभौमता आणि परराष्ट्र धोरण महासत्तांच्या कलाने न ठरवण्याची भारत व ब्राझील यांची भूमिका दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंधांना चालना देणारी आहे. शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत रशियाशी असलेल्या संबंधांमुळे पाश्चात्त्य देश भारताकडे नेहमी संशयाच्या नजरेने पाहत होते. मात्र, शीतयुद्धानंतर भारताने जगातील अन्य खंडातील देशांशी राजकीय संबंध प्रस्थापित करण्याला विशेष महत्त्व दिलेले आहे. दुसरीकडे, लुला सरकारच्या काळात ब्राझीलने आशिया व आफ्रिकेतील देशांशी संबंधांनाही महत्त्व दिलं होते. ब्राझीलचे परराष्ट्र धोरण स्वतंत्र व सार्वभौम आहे हे दाखवण्याचाच तो प्रयत्न होता.

दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलचे आणि दक्षिण आशियातील भारताचं भौगोलिक स्थान व महत्त्व लक्षात घेता या दोन्ही देशांकडे त्या-त्या खंडातील सत्ताकेंद्र म्हणून पाहिले जाते. शेजारी देशांवरही या देशांच्या धोरणांचा मोठा प्रभाव असतो. परराष्ट्र धोरणातील सक्रियतेबरोबरच होणाऱ्या भारत व ब्राझीलमधील आर्थिक वृद्धीमुळे पश्चिमेकडील देशांपुढे एक पर्याय उभा राहिला आहे. पश्चिमी देशांच्या वर्चस्ववादाला विरोध करणाऱ्या ‘ब्रिक्स’ आणि ‘आयबीएसए’ या संस्था भारत व ब्राझीलच्या ‘सौम्य समतोल’ राखण्याच्या रणनीतीच्या निदर्शक आहेत. भारत-ब्राझीलचे परराष्ट्र धोरण एकमेकांना सुसंगत व पूरक असले तरी दोन्ही देशांतील संबंध अद्याप पुरेसे दृढ झालेले नाहीत. या संबंधांना योग्य दिशा देण्यासाठी मोदी व बोल्सोनारो यांनी सध्याच्या परस्परपूरकतेच्या राजकारणाच्या पलीकडं जाऊन विचार करायला हवा.

भारत-ब्राझील संबंधः पायाभरणीची वेळ

जागतिक दृष्टिकोनात जवळपास अजिबात मतभेद नसलेल्या भारत आणि ब्राझील यांच्यात कूटनीतीक भागीदारीची शक्यता निर्माण झाली आहे. जागतिक पातळीवरील विविध घटनांच्या वेळी व निर्णयांमध्ये दोन्ही देशांच्या भूमिका सारख्या राहिल्या आहेत, त्यामुळे आपल्या संबंधांचा फेरआढावा घेणे हे भारत आणि ब्राझीलच्या नेतृत्वासाठी सहज शक्य आहे. शिवाय, दोन्ही देशांमध्ये परस्परांबद्दल सद्भावना आहे. योग आणि आयुर्वेद ही भारतातील प्राचीन शास्त्रे ब्राझीलमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. तसेच, आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढत असलेला भारताचा आर्थिक व राजकीय प्रभाव ब्राझीलमधील धोरणकर्त्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ब्राझीलशी नाते अधिक दृढ होण्यासारखे हे वातावरण आहे, असं मतप्रवाह भारतातही आहे. अगदी अलीकडंपर्यंत ब्राझीलची प्रतिमा भारतात सकारात्मकच राहिली आहे. या देशाबाबत भारताला कधीच संशय वाटला नाही. मात्र, बोल्सोनारो यांचा राजकारणातील उदय भारतातील काही वर्तुळात ब्राझीलविषयी साशंकता निर्माण करणारा ठरला आहे.

सुरुवातीच्या काळात बोल्सोनारो यांनी ब्राझील-चीन संबंधांना फारसे महत्त्व न देण्याची भूमिका घेतली होती. मात्र, ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेतील चीनचे प्रमुख स्थान आणि उद्योजक लॉबीच्या दबावानंतर बोल्सोनारो यांना आपल्या भूमिकेचा फेरविचार करावा लागला. असं असले तरी चीनबद्दल भारत आणि ब्राझीलमध्ये किमान सामंजस्य आहे. भारताप्रमाणेच ब्राझीलमध्ये चीनचा महत्त्वाकांक्षी ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ (बीआरआय) हा प्रकल्प फारसा स्वीकारार्ह नाही. शिवाय, दक्षिण अमेरिकेतील चीनच्या वाढत्या आर्थिक प्रभावाबद्दलही ब्राझीलमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. चीनबद्दल वाटणारा हा अविश्वास भारत आणि ब्राझीलला अधिक जवळ आणणारा ठरू शकतो.

ऊर्जा, शेती, संरक्षण आणि अंतराळासारख्या अनेक क्षेत्रांत ब्राझीलशी सहकार्य करणे फायद्याचे असतानाही दोन्ही देशात सहकार्याचा निश्चित आराखडा बनविण्यास भारताला अपयश आले आहे. ब्राझीलच्या आंतरराष्ट्रीय व्यापारातील आशियाच्या स्थानात मोठा बदल झाला असला तरी त्यात इंडो-पॅसिफिक प्रदेश किंवा भारतासाठी धोरणात्मक दृष्टिकोन दिसून आलेला नाही.

ब्राझील हा भारताचा महत्त्वाचा व्यापारी भागीदार असला तरी दोन्ही देशांतील आर्थिक संबंधांकडे ग्राहक आणि विक्रेता या नजरेतूनच पाहिलं जाते. भारतीयांच्या मते, ब्राझील हा भारतीय उद्योजक व व्यावसायिकांचे गुंतवणूक करण्याचं एक ठिकाण आहे. मात्र, केवळ या दृष्टिकोनातून ब्राझील-भारताच्या संबंधांचे मूल्यमापन होऊ शकत नाही. भारत-मर्कोसूर प्रिफरेन्शियल ट्रेड अॅग्रीमेंट (पीटीए) मध्ये ब्राझीलनं अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे दक्षिण अमेरिकेसारखी मोठी बाजारपेठ भारतासाठी खुली झाली आहे. २०१७-१८ मध्ये ‘मर्कोसूर’मधील (South American Trade Block) सदस्य देशांशी भारतानं तब्बल १० अब्ज डॉलरहून अधिक व्यापार केला. तर, २०१८-१९ मध्ये भारताने एकट्या ब्राझीलशी ८ अब्ज डॉलरचा व्यापार केला. भारताने निर्यात केलेल्या प्रमुख वस्तूंमध्ये सेंद्रीय रसायनं, रासायनिक उत्पादने आणि औषधांचा समावेश होता.

बोल्सोनारो फॅक्टर

भारत-ब्राझील संबंधांचा पुनर्विचार करताना दहशतवाद विरोधी लढ्यावर भर देणे हा योग्य मार्ग नाही. कारण, भारत-ब्राझील संबंधांमध्ये हा मुद्दा अर्थहीन आहे. मोदी आणि बोल्सोनारो हे दोन्ही नेते विविध मुद्द्यांवर कठोर भूमिका घेण्यासाठी ओळखले जातात. अलीकडे झालेल्या काही बैठकांतून त्यांनी संरक्षण आणि कृषी क्षेत्रात सहकार्य वाढविण्याची इच्छा दाखवली आहे. विशेष म्हणजे, दोन्ही नेत्यांसमोर दारिद्र्य निर्मूलन, उत्पन्नातील वाढती विषमता, भ्रष्टाचार आणि प्रशासकीय अकार्यक्षमता ही आव्हाने आहेत. उजवी विचारसरणी व आक्रमक राष्ट्रवादी नेते म्हणून असलेली ओळख हा मोदी व बोल्सोनारो यांच्यातील समान धागा आहे. हाच समान धागा कदाचित भारत-ब्राझीलच्या संबंधांमध्ये परिवर्तन घडवून ते घट्ट करण्यास उपयुक्त ठरेल.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.