चीनवर दबाव, दडपशाही आणि वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्यांचे डोके १.४ अब्ज चीनी जनतेच्या ‘वॉल ऑफ स्टील’वर आपटण्यात येईल, असे सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चीनच्या वर्धापनदिनी केलेल्या भाषणात राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग यांनी म्हटले आहे.गेल्या काही दशकांमध्ये चीनने मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्रगती केली आहे आणि ही गोष्ट साजरी करणे महत्वाचे आहे. चीनची आर्थिक आणि राजकीय प्रगती ही या काळामधील एक उल्लेखनीय बाब आहे.
याचा थेट परिणाम आपल्याही आयुष्यावर झाला आहे. जागतिक राजकारणामधील प्रत्येक क्षेत्रावर बीजिंगचा प्रभाव आहे. असे असले तरीही चीनच्या उदयामुळे निर्माण झालेल्या विविध आव्हानांचा विचार व्हायला हवा. चीनला पाठिंबा देणार्या अनेक देशांनी गेल्या दशकामध्ये चीनकडे पाठ वळवली आहे. कोविड १९ बाबत सुरुवातीच्या काळात चीनने जी भूमिका घेतली आणि त्यावर जी अंमलबजावणी करण्यात आली या गोष्टीचा अजूनही बराचसा उलगडा होणे बाकी आहे.
चीनचा उदय आणि त्याचे झालेले परिणाम यांचे नि:पक्षपाती मुल्यांकन करणे ही काळाची गरज आहे. आज जगात अनेक ठिकाणी, अनेकांकडून चीन आणि भारत यांच्यात खोटी तुलना केली जाते, याच पार्श्वभूमीवर भारत आणि जागतिक राजकारणात भारताची भूमिका यांचा अभ्यास होणेही गरजेचे आहे. चीनच्या उदयाचा बाऊ करणे आणि त्याविपरीत भारताने जे यश कमावले आहे त्याकडे दुर्लक्ष करणे यामुळे जगातील या दोन मोठ्या संस्कृतींवर तसेच लोकशाहीच्या मुल्यांवर अन्याय होतो आहे.
भारत आणि चीन यांचे यश हे गुणवत्तेवर आधारित आहे. या दोनही देशांनी वेळोवेळी यशापयश अनुभवले आहे. १९९० पर्यंत भारताची अर्थव्यवस्था बंदिस्त होती. या तुलनेत चीनची आर्थिक घोडदौड त्याही आधी सुरू झाली होती. म्हणूनच चीन आणि भारत यांची तुलना होऊ शकत नाही.
शीतयुद्धाच्या काळात चीनने आपल्या फायद्यासाठी सत्ता संतुलनाचा पुरेपूर वापर केला होता. भारताने अलिप्ततावादी तत्वांचा अंगीकार केला होता. भारताने जे काही केले ते लोकशाही चौकटींमधून राहून केले. भारताचा आर्थिक सुधारणांचा कार्यकम हा कोणत्याही पक्षाच्या हाय कमांडच्या आदेशाने सुरू झाला नाही तर अनेक भागधारकांच्या गुंतवणुकीच्या सूक्ष्म प्रक्रियेचा परिणाम आहे. त्यामुळे भारताने घेतलेले निर्णय नीट समजून घेणे गरजेचे आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये भारताने ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली आणि समाज माध्यमांनी ते जगभर पोहोचवले त्यामुळे जगात भारताची प्रतिमा काहीशी मलीन झाली आहे. असे असले तरी या महामारीचा उदय कोणत्या देशात झाला हे आपण विसरता कामा नये.
जगातील अनेक प्रगत देशांच्या तुलनेत भारताने कोरोनाच्या पहिल्या लाटेचा अधिक प्रभावीपणे सामना केला, पण ही बाब जागतिक पातळीवर समाजमाध्यमांवर कधीही दाखवण्यात आली नाही. भारताचा जागतिक ब्रॅंड हा कधीच झगझगाटात आणि वलयांकित प्रणालींवर आधारलेला नव्हता. भारताचा जागतिक ब्रॅंड हा कित्येक वर्षांपासून लक्षावधी भारतीयांच्या सर्जनशीलतेमधून तयार झाला आहे. कोविड १९ च्या काळात जगातील अनेक प्रगत राष्ट्रे व्यवस्थापकीय आव्हानांचा सामना करीत होती, हयाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
या तुलनेत पहिल्या लाटेच्या वेळी भारताने चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळली होती. हे करत असतानाच जागतिक सार्वजनिक आरोग्य प्रदाता म्हणून भारताचा उदय झाला होता. तसेच कोरोनाची दुसरी लाट विक्रमी वेळेत भारताने थोपवून धरली. गेल्या काही महिन्यांमध्ये आपत्कालीन औषधे, पीपीई किट्स आणि लस यांद्वारे भारत आपली आरोग्य यंत्रणा सातत्याने वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
हे करतानाच या प्रक्रियेचा फायदा भारताच्या शेजारील राष्ट्रे आणि मित्र राष्ट्रे यांना झाला आहे. भारत ब्रँडवर टीका करणार्यांवर मात करत भारत लवकरच पूर्वपदावर येईल,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. म्हणूनच जगातील अनेक देशांचे, घटकांचे भारताच्या वाटचालीवर बारीक लक्ष आहे.
गेल्या दीड वर्षांमध्ये भारताने एकीकडे कोरोनाचे संकट थोपवून धरले आहे आणि सीमांवरील चीनच्या दडपशाहीला लगाम घातलेला आहे. अमेरिकेसारख्या अनेक प्रगत देशांनी कोरोना काळात आपल्या स्वतःच्या देशाकडे लक्ष केंद्रीत केले होते तेव्हा भारत जागतिक पातळीवर या महामारीबाबत इतर देशांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न करत होता. तसेच दुसर्या बाजूला भारत सीमेवर चीनी सैनिकांशी लढत होता.
चीन आणि तेथून येणार्या दडपशाहीला थोपवून धरणे हा भारताच्या राजनैतिक प्रक्रियेचा एक मोठा भाग होता. चीनशी सलोख्याचे संबंध टिकवून ठेवण्यात अनेक पाश्चिमात्य राष्ट्रे धन्यता मानत होती त्याच वेळेस विविध आघाड्यांवर भारत चीनला विरोध दर्शवत होता. शी जिनपिंग यांच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशीएटीव्ह’वर उघडपणे टीका करणारा भारत हा पहिला देश होता.
आता अनेक देश बीआरआय वरून चीनवर टीका करीत आहेत. चीनचा तीव्र नकार असतानाही इंडो पॅसिफीक या व्यासपीठाचा वापर पाश्चिमात्य आणि पौर्वात्य देशांनी एकत्र येण्यासाठी व्हावा, याला भारताने उत्स्फुर्त पाठींबा दिला होता. या पाठिंब्याशिवाय हे घडून आले नसते. भारताने आपली परराष्ट्र धोरणे स्पष्टपणे मांडली नसती तर क्वाड प्रत्यक्षात येऊ शकले नसते.
कोविड १९ महामारी आणि त्याचे परिणाम यांमुळे चीनला जागतिक पातळीवर थोपवून धरणे ही आता नवी वस्तुस्थिती झाली आहे. चीनचा उदय ही अजूनही चालू प्रक्रिया आहे. जर असे नसते तर चीनच्या राष्ट्राध्यक्षांना कोणाचेही डोके फोडण्याची भाषा वापरावी लागली नसती.
ज्याप्रमाणे चीनचा उदय ही बाब कोणीही थांबवू शकले नाही त्याप्रमाणे सर्व आव्हानांचा सामना करून लोकशाही मार्गाने भारत आपली घोडदौड चालू ठेवेल. भारत आणि भारताचे निर्णय, धोरणे यांवर मित्रराष्ट्रे आणि शत्रूराष्ट्रे उघडपणे टीका करू शकतात. कोणी टीका केली म्हणून त्याचे डोके फोडण्याची भाषा भारतीय नेतृत्वाकडून केली जात नाही.
समोर येणार्या सर्व आव्हानांनाचा सामना करत आणि यशाला गवसणी घालत भारताची जागतिक नेतृत्व होण्याकडची वाटचाल अखंड चालू राहील. अर्थात याचा अर्थ असा नाही की चीनची वाढ यात थांबावी. पण या दोन्ही क्रिया एकमेकांना पूरक राहून वेगळ्या प्रकारे हाताळायला हव्यात.
या जगात सर्वजण सुरक्षित राहावेत, ही भावना आता वाढीस लागलेली आहे. याच पार्श्वभूमीवर भारत जगाचे लक्ष सतत आपल्याकडे खेचून घेत राहील आणि चीन आपली वाटचाल सुरू ठेवेल.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.