Author : Oommen C. Kurian

Published on Aug 17, 2023 Commentaries 0 Hours ago

भारताचे सर्वसमावेशक आरोग्य उपायांवर लक्ष केंद्रित करणे, सहकार्यावर भर देणे आणि संशोधनावर व नाविन्यपूर्णतेवर असलेली भारताची निष्ठा ही जागतिक आरोग्याकरता आशेचा किरण आहे.

जागतिक आरोग्यविषयक चित्रातील भारत @ ७६: नेतृत्व, क्षमता आणि विवेक

लक्षणीय मनुष्यबळासह आणि वाढत्या अर्थव्यवस्थेसह, जागतिक आरोग्य क्षेत्रातही भारताची उपस्थिती सातत्याने जाणवत आहे. सर्वांसाठी आरोग्य याकरता देशाची बांधिलकी, देशाची मजबूत औषधनिर्मितीची ताकद, आरोग्यविषयक पायाभूत सुविधा, शिक्षण आणि संशोधनात सातत्यपूर्ण गुंतवणूक यांसह, भारत ही एक प्रमुख बाजारपेठ आहे, तसेच भारत हा जागतिक आरोग्यविषयक चर्चांमध्ये सक्रिय सहभागी होणारा देश आहे. गेल्या काही वर्षांत, देशात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर, आरोग्यविषयक आव्हानांना सामोरे जाण्याविषयीच्या भारतीय दृष्टिकोनाने जागतिक आरोग्य परिसंस्थेतील भारताची भूमिका अधोरेखित केली आहे.

गेल्या काही वर्षांत, देशात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर, आरोग्यविषयक आव्हानांना सामोरे जाण्याविषयीच्या भारतीय दृष्टिकोनाने जागतिक आरोग्य परिसंस्थेतील भारताची भूमिका अधोरेखित केली आहे.

भारताचे जी-२० आणि शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचे अध्यक्षपद

भारताने जी-२० आणि शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन या दोन्ही जागतिक व्यासपीठांच्या नेतृत्वाची भूमिका स्वीकारलेले २०२३ हे वर्ष भारताच्या राजनैतिक आणि धोरणात्मक प्रवासातील एक महत्त्वाचे वर्ष आहे. या प्रभावशाली व्यासपीठांमुळे जागतिक क्षेत्रात भारताचा आवाज वाढला, ज्यामुळे जागतिक आरोग्य धोरणांच्या नव्या योजनांची निर्मिती करण्यात आणि सखोल आंतरराष्ट्रीय सहयोग विकसित करण्यात भारत सक्षम झाला. जागतिक व्यासपीठांवर भारताचे उदयोन्मुख महत्त्व प्रतिबिंबिंत झाल्याने, या मंचांचे भारताचे अध्यक्षपद हे केवळ प्रतीकात्मक राहिले नाही. याने सामूहिक आरोग्यविषयक अजेंडा स्पष्ट करण्यासाठी आणि त्यावर प्रभाव टाकण्यासाठी देशाला एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. एका समग्र दृष्टिकोनावर जोर दिला, जो दृष्टिकोन आधुनिक आरोग्य सेवा पद्धतींसह पारंपरिक वैद्यकीय सूज्ञतेला एकत्रित करतो.

जी-२०च्या तत्त्वाअंतर्गत, भारताने सक्रिय उपाययोजना केल्या आहेत. विविध शहरांमध्ये आरोग्य कार्य गटाच्या बैठका आयोजित केल्या आहेत आणि आंतरराष्ट्रीय आरोग्य उद्दिष्टे, जी-२० वचनबद्धता आणि देशांतर्गत आरोग्य प्राधान्यक्रमांना संबोधित करण्यासाठी आपली वचनबद्धता प्रदर्शित केली आहे. जी-२० गट हा जागतिक जीडीपी, व्यापार आणि लोकसंख्येचा महत्त्वपूर्ण भाग असल्याने, जागतिक आरोग्य उपक्रमांवर त्याचा संभाव्य प्रभाव प्रचंड आहे. ‘सर्वांसाठी आरोग्य’ आणि ‘साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी तयारी’ आणि ‘प्रतिसाद’, वैद्यकीय संसाधने सर्वांना समान उपलब्ध होण्याकरता वकिली करणे आणि जागतिक डिजिटल आरोग्य उपक्रमांना प्रोत्साहन देणे यांसारख्या भारताने पुढाकार घेतलेल्या उपक्रमांमुळे भारताच्या नेतृत्वाच्या आकांक्षा प्रतिध्वनित झाल्या. जी-२० परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविताना, भारताने भूतकाळापासून बोध घेत, भविष्यातील साथीच्या रोगांच्या आव्हानांना तोंड देण्याच्या उद्देशाने, समानता, सार्वजनिक कल्याणासाठी मानके आणि अविकसित राष्ट्रांसाठी प्रतिनिधित्व यांवर भर देणारे वैद्यकीय प्रतिकार समन्वय व्यासपीठ निर्माण व्हावे, असे सुचवले आहे.

यामुळे सामूहिक आरोग्याचा अजेंडा स्पष्ट करण्यासाठी आणि त्यावर प्रभाव टाकण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. एका समग्र दृष्टिकोनावर जोर दिला आहे, जो दृष्टिकोन आधुनिक आरोग्य सेवा पद्धतींसह पारंपरिक वैद्यकीय सूज्ञतेला एकत्रित करतो.

समांतरपणे, आपल्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनाययझेशनच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून, भारताने जागतिक आरोग्य विषयक आव्हानांना सामोरे जाताना सर्वसमावेशक दृष्टिकोन बाळगण्याविषयीची आपली वचनबद्धता अधिक बळकट केली. हे सुनिश्चित केले की, पारंपरिक आणि समकालीन वैद्यकीय ज्ञानाचा मिलाफ मानवतेला मोठ्या प्रमाणात सेवा प्रदान करते. कार्यक्रमांद्वारे, भारताने जागतिक आरोग्य सुरक्षितता साध्य करण्यासाठी मजबूत पाळत ठेवणारी प्रणाली, सहयोगी संशोधन व विकास आणि वैद्यकीय प्रतिकारांचे महत्त्व कथन केले आहे. भारताने सर्वसमावेशक आरोग्यसेवाविषयीचा दृष्टिकोन स्पष्ट करताना, पारंपरिक औषधी प्रणालींसह आधुनिक तांत्रिक प्रगतीला जोडण्यातील महत्त्वावरही लक्ष केंद्रित केले आहे. आणखी एक स्वारस्यपूर्ण क्षेत्र म्हणजे वैद्यकीय मूल्याच्या प्रवासाची क्षमता आणि समग्र ‘सर्वांसाठी आरोग्य’ दृष्टिकोनाचे महत्त्व, ज्यामध्ये व्यापक पर्यावरणीय दृष्टिकोनातून मानवी कल्याण समाविष्ट आहे. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन तसेच जी-२० अध्यक्षपदाच्या दरम्यानचा भारताचा दृष्टिकोन हा अशा सहयोगी दृष्टिकोनाचे प्रतीक आहे, जो पारंपरिक ज्ञानाला समकालीन ज्ञानाशी एकत्रित करतो आणि स्थानिक स्तराला विश्वाशी जोडतो. यातून आरोग्यदायी, एकसंध जागतिक समुदायाला चालना देण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल चिन्हांकित होते.

जागतिक आरोग्य प्रशासनासंबंधित भारताची दृष्टी

समकालीन जागतिक आरोग्यविषयक स्थिती आव्हानात्मक आहे, त्यापैकी अनेक आव्हाने कोविड-१९ साथीच्या आजाराने समोर आली आहेत. या आव्हानांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने आरोग्य प्रशासनाकरता अधिक मजबूत आणि समन्वित आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन निर्माण केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य प्रतिसादांची मांडणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, हे ओळखून, भारत या संस्थेला बळकट करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या उपक्रमांना उत्स्फूर्त पाठिंबा देतो. चपळ, जलदपणे सामना करण्यास आणि आरोग्याच्या वाढत्या आव्हानांशी जुळवून घेण्यास सक्षम आणि सर्वसमावेशक जागतिक आरोग्य संघटना ही जागतिक आरोग्य प्रयत्नांच्या केंद्रस्थानी राहील हे सुनिश्चित करणारी प्रशासकीय चौकट तयार करणे हे उद्दिष्ट आहे.

भारताने सर्वसमावेशक आरोग्य सेवाविषयीचा दृष्टिकोन स्पष्ट करताना, पारंपरिक औषधी प्रणालींसह आधुनिक तांत्रिक प्रगतीला जोडण्यातील महत्त्वावरही भारताने लक्ष केंद्रित केले आहे.

जागतिक आरोग्यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेची ऐतिहासिक भूमिका भारताने मान्य केली असतानाच, आजच्या गुंतागुंतीच्या आरोग्यविषयक परिस्थितीत संस्थेला अधिक प्रभावी बनवण्यासाठी सुधारणांची आवश्यकता स्पष्टपणे मांडली आहे. या प्रस्तावित सुधारणांमधली महत्त्वाची बाब म्हणजे ‘आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती’ (पीएचइआयसी) घोषित करण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करणे, ती केवळ मजबूतच नाही तर कार्यक्षम आहे याची खात्री करणे. या व्यतिरिक्त, भारताच्या दृष्टिकोनाने सहकार्याचा लाभ घेणे, भागीदारी वाढवणे आणि जागतिक आरोग्यविषयक प्रतिसाद समन्वय साधणारे आहेत, संवाद आणि सहकार्यास अडथळा आणणारे असे एकाकी नाहीत ना, हे सुनिश्चित केले आहेत. हा दृष्टिकोन प्रभावी बहुपक्षवादाला चालना देण्याच्या भारताच्या व्यापक दृष्टिकोनात खोलवर रुजलेला आहे.

भारताकरता, आरोग्यातील बहुपक्षीयतेमुळे केवळ संकटांवर मार्गक्रमण करता येते, असे नाही तर आरोग्यदायी, अधिक लवचिक जागतिक भविष्याला आकार मिळतो, जिथे प्रत्येक राष्ट्राला म्हणणे मांडायचे आहे आणि भूमिका बजावायची आहे. भारत, जागतिक आरोग्याबाबतच्या त्यांच्या वचनबद्धतेनुसार, साथीच्या रोगांविषयी करार आणि साथींच्या रोगांसंदर्भात निधी या दोन्हींच्या स्थापनेच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी झाला आहे, ज्यापैकी आधीच्या करारावर अद्याप वाटाघाटी सुरू आहेत. भारताच्या कल्पनेतून तयार झालेल्या या उपक्रमांचे उद्दिष्ट जागतिक तत्परता आणि संभाव्य आरोग्य संकटांना प्रतिसाद देण्याचे बळ देणे हे आहे. भारताने, या करारामुळे राष्ट्रीय सार्वभौमत्वावर परिणाम होईल, यासंबंधीच्या काही चिंता व्यक्त केल्या आहेत. विशेष म्हणजे, कोविड साथीच्या काळात, भारताने दक्षिण आफ्रिकेसह, औषधे आणि लशींवरील बौद्धिक संपदा अधिकार (आयपीआर) माफ करण्यासाठी जागतिक व्यापार संघटनेकडे संपर्क साधला, आणि औषधे व लशी सर्वांना उपलब्ध व्हाव्यात, याविषयीच्या भारताच्या न्याय्य भूमिकेवर प्रकाशझोत पडला.

या व्यतिरिक्त, भारताचे दृष्टिकोन सहकार्याचा लाभ घेणे, भागीदारी वाढवणे अधोरेखित करणारे असून जागतिक आरोग्य विषयक प्रतिसाद समन्वय साधणारे आहेत, संवाद आणि सहकार्यास अडथळा आणणारे असे एकाकी नाहीत ना, हे सुनिश्चित करण्यात आले आहे.

औषधनिर्मिती आणि तंत्रज्ञानासंबंधीचे विलक्षण कौशल्य

भारताचे औषधनिर्माण क्षेत्र, ज्याला बर्‍याचदा ‘जगाची फार्मसी’ असे संबोधले जाते. अत्यावश्यक औषधे जागतिक स्तरावर किफायतशीर दरांत उपलब्ध करून देणारा भारत हा एक आधारस्तंभ आहे. जेनेरिक औषधांच्या मजबूत बाजारपेठेसह, भारताने जीव वाचवणारी औषधे सर्वांना उपलब्ध करून, त्यांचे लोकशाहीकरण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तंत्रज्ञान आणि औषधनिर्माण क्षेत्रांमधील संभाव्य समन्वय एकात्मिक आरोग्यसेवा उपायांकरता मार्ग सुलभ करू शकते, ज्यान्वये वैद्यकीय प्रगतीचे एक नवे युग सुरू होईल. संयुक्त राष्ट्र संघटनेला सर्वात मोठा पुरवठादार म्हणून विविध जागतिक लसीकरण उपक्रमांमध्ये भारताने केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे ही प्रतिष्ठा आणखी मजबूत झाली आहे. भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांसारख्या भारतीय दिग्गज औषध निर्मिती कंपन्यांकडून प्रामुख्याने उत्पादित केले जाणारे उत्पादन, आफ्रिकी देशांना मलेरियाच्या पहिल्या लशीचे वाटप या बाबी जागतिक आरोग्य आव्हानांचा सामना करण्यातील भारताची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करते.

भारतीय औषधनिर्माण क्षेत्राची परिसंस्था, अफाट आणि प्रभावशाली असताना, आव्हानांचा सामना करत आहे. भेसळयुक्त औषधांसंदर्भातील घटनांनी- कठोर गुणवत्ता नियंत्रणे आणि पारदर्शक नियामक यंत्रणेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. वैद्यकीय उत्पादनांची सुरक्षितता आणि परिणामकारकता सुनिश्चित करणे सर्वोच्च महत्त्वाचे आहे आणि भारत जागतिक विश्वास राखण्याचे महत्त्व ओळखतो. नियामक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अधिकाऱ्यांनी विविध पावले उचलली आहेत. मात्र, या आव्हानांना सामोरे जाणे म्हणजे केवळ जागतिक मानकांचे पालन करणे नव्हे तर गुणवत्तेचे नवीन मानक निर्माण करणे हेदेखील आहे.

भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांसारख्या भारतीय दिग्गज औषधनिर्मिती कंपन्यांकडून प्रामुख्याने उत्पादित केले जाणारे उत्पादन, आफ्रिकी देशांना मलेरियाच्या पहिल्या लशीचे वाटप या बाबी जागतिक आरोग्य आव्हानांचा सामना करण्यातील भारताची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करते.

आगामी मार्ग

जागतिक आरोग्य क्षेत्रात भारताची वाटचाल आश्वासनांनी भरलेली आहे. राष्ट्राची कृती, धोरणे आणि रणनीतींमध्ये जागतिक आरोग्य प्रारूपांना पुन्हा परिभाषित करण्याची क्षमता आहे. भारत जसजसा पुढे वाटचाल करीत आहे, तसतसे त्याचे सर्वसमावेशक आरोग्य उपायांवर लक्ष केंद्रित करणे, सहकार्यावर भर देणे आणि संशोधनावर व नाविन्यपूर्णतेवर असलेली भारताची निष्ठा ही जागतिक आरोग्याकरता आशेचा किरण आहे. मात्र, आगामी वाटचाल करण्याच्या मार्गात अनेक आव्हानेही आहेत. त्याकरता आत्मनिरीक्षण, मूल्यांकनाद्वारे कार्यपद्धतींत सुधारणा करणे आणि सतत शिकत राहाणे आवश्यक आहे. पंतप्रधान मोदींनी औषधनिर्मिती उद्योगाला ‘भारतात कल्पना करा, भारतात नवनिर्मिती करा, भारतात निर्माण करा आणि जगाकरता बनवा,’ असे उद्गार काढले तेव्हा भारताने आपले प्राधान्यक्रम अतिशय स्पष्टपणे मांडले होते. भारताने देशाच्या जागतिक आरोग्य आकांक्षांचा आराखडा तयार केल्यामुळे, भारताने महत्त्वाकांक्षेचा समतोल सावधगिरीने साधायला हवा, भारताचा उदय सर्वांगीण, शाश्वत आणि सर्व मानवतेसाठी फायदेशीर आहे, हे सुनिश्चित करायला हवे. हा प्रवास, आश्‍वस्त करणारा असला तरी, ही काही ठराविक अंतराची वेगाने पळण्याची शर्यत नसून दूरवरचे अंतर धावण्याची मॅरेथॉन शर्यत आहे आणि प्रत्येक पाऊल दूरदृष्टीने व विचारपूर्वक उचलायला हवे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.