Published on Oct 27, 2020 Commentaries 0 Hours ago

या देशाला खऱ्या अर्थाने सेक्युलारिझम जर कोणी शिकवला असेल, तर तो भाषणांनी, लेखांनी आणि पुस्तकांनी नाही, तर तो अमर-अकबर-अँथनी या सिनेमाने शिकवला.

भारताचा ‘विचार’ सिनेमामधून उमटतो

एकीकडे मराठी चित्रपटांचे निर्मितीमूल्य आणि त्यातील आशय अतिशय सशक्त होत असल्याचे आपण ऐकतो आहोत. परंतु जागतिक चित्रपटसृष्टीचा विचार करता, सध्याची मराठी चित्रपटसृष्टी मोठ्या प्रमाणात प्रभाव निर्माण करतेय असे काही दिसत नाही. कारण वेगवेगळ्या महोत्सवांमध्ये इराणी, चायनीज, फ्रेन्च चित्रपट पाहण्यासाठी लोक गर्दी करतात. या चित्रपटांबद्दल लोकांना उत्सुकता असते. असे मराठी चित्रपटांच्या बाबतीत दिसत नाही. जागतिक सिनेमाच्या पटलावर मराठी सिनेमा हा अजूनही ‘आत्ममग्न’ आहे असे वाटते.

मराठी चित्रपट मराठी लोकांसाठी प्रदर्शित करायचा, मराठी लोकांपर्यंत तो पोहोचवला की झाले आणि फारफार सीमा ओलांडायची म्हणजे काय तर राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारायची. काही मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये सादर केले जातात. परंतू मराठी चित्रपटांचा प्रभाव आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीमध्ये आहे असेही म्हणता येणार नाही.

व्ही. शांताराम, प्रभात सिनेमा यांचा काळ, महेश कोठारे, सचिन पिळगांवकर यांचा काळ एक काळ होता. ‘श्वास’नंतर नागराज मंजुळे, उन्मेष जोशी, चैतन्य ताम्हाणे अशा नव्या तरूणांचा सध्याचा काळ आहे. असे मराठी चित्रपटसृष्टीचे तीन टप्पे मानल्यास पुढचा येणारा चौथा टप्पा हा थोडा वेगळा आणि नाविण्यपूर्ण असेल.

व्ही.शांताराम किंवा प्रभात हा काळ जर आपण पाहिला तर तिथे कंटेंट हा अत्यंत महत्त्वाचा घटक होता. त्याकाळच्या सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक धार्मिक आणि शैक्षणिक या सगळ्या परिसराचे प्रतिबिंब त्या चित्रपटामध्ये उमटायचे. उत्तम आशयघन चित्रपटांची निर्मिती तेव्हा होत असे. त्याही काळात ‘सिनेमाची भाषा’ (Cinematic language ) शोधण्याचा प्रयत्न केला जायचा. सचिन पिळगांवकर आणि महेश कोठारे यांनी निखळ मनोरंजनांच्या चित्रपटांवर अधिक भर दिला. त्याचवेळेस चित्रपटांचे आर्थिक गणित मोठ्या प्रमाणात कोसळले होते.

‘श्वास’नंतर मराठी चित्रपटाने कात टाकली असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हापासून नागराज मंजुळे आणि आता चैतन्य ताम्हाणे यांचा ‘कोर्ट’सारखा सिनेमा हा खऱ्या अर्थाने एक जागतिक पातळीवरती ज्या सिनेमाच्या भाषेचा अवलंब केला जातो किंवा त्यांना जशी ती सिनेमाची भाषा सापडलेली आहे, तशी ती चैतन्यला सापडताना आपल्याला दिसते. कंटेंट (आशय) आणि सिनेमाची भाषा या दोन्ही गोष्टीचे मिश्रण त्या ठिकाणी आपल्याला दिसते.

मी जेव्हा चित्रपटांचे काम करू लागलो, तेव्हा कॅमेऱ्यातून बघायला मिळणे ही मोठी संधी असायची. आताच्या पिढीच्या हातात कॅमेरा आहे. मोबाईलसारखी साधने हातात आल्यामुळे या पिढीला फार मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत चित्रपटांमधील भावनांचे, दृश्यांचे सरसकटीकरण झालेले दिसते. आता मला असे वाटते की देशाच्या छोट्या छोट्या कानाकोपऱ्यातून चित्रपट पुढे येतील. त्या त्या ठिकाणचे तरुण त्यांच्याकडे जो एडिटिंग सेटअप आहे, कॅमेरा आहे त्यातून चित्रपटांची निर्मिती करतील. या प्रक्रियेतून जे चित्रपट तयार होतील ते खऱ्या अर्थाने लोकल कंटेंट घेऊन येणारे असतील. यानिमित्ताने एका ठराविक प्रदेशाच्या कथा सांगताना तो चित्रपट वैश्विक पातळीवर काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे येणारा चौथा टप्पा हा मनोरंजक असेल.

चित्रपटाचे मूळ माध्यम हातात आल्यामुळे त्या माध्यमाशी खेळण्याची वृत्ती आता निर्माण होईल. यातूनच एका वेगळ्या प्रकारच्या सिनेमाची निर्मिती होईल जो खऱ्या अर्थाने खऱ्या भारताचे प्रतिनिधित्व करणारे असेल. उदाहरणार्थ, खेड्यापाड्यातील तरूण मुली हातात मोबाईल घेऊन त्यामार्फत व्यक्त होऊ लागल्या, तर मला वाटते की त्या काहीतरी वेगळे बोलतील. त्यातून वास्तववादी भारताची ओळख करून देणारे चित्र उभे राहील. येणारा काळ हा  शोधांचा आणि प्रयोगांचा काळ असेल. नागराज मंजुळे आणि चैतन्य ताम्हाणे यांनी मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक दर्जाची ओळख मिळवून दिली.

वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभागलेल्या संपूर्ण भारताला एक ओळख मिळवून देण्याचे काम आपल्याकडे चित्रपटांनी केले हे आपल्याला मान्य करावे लागेल. माझ्या नव्या कादंबरीतील एक पात्र असे म्हणतं की, ‘या देशाला खऱ्या अर्थाने सेक्युलारिझम जर  कोणी शिकवला असेल, तर तो वेगवेगळ्या भाषणांनी, लेखांनी आणि पुस्तकांनी नाही तर तो अमर-अकबर-अँथनी या सिनेमाने शिकवला.’ चित्रपटांची ही शक्ती आपण ओळखलेली आहे, परंतु जाणीवपूर्वक ती आणखी कशी दृढ करता येईल, त्यासाठी आपण आपल्याच देशातल्या माणसांना, आपल्याच देशातील ओळख नसलेल्या माणसांच्या कथा सांगितल्या पाहिजेत.

मी केवळ खेडेगावातील, आदिवासी जीवनावर आधारलेल्या कथांबद्दल बोलत नाही. महानगरीय विश्वातील वास्तवांवर आधारित कथेच्याद्वारे एकमेकांच्या जीवनाची ओळख चित्रपटांद्वारे एकमेकांना करून देता आली. तर आपल्या देशातील, आजूबाजूच्या माणसांची खरी ओळख आपल्याला होत जाईल. त्याचा उपयोग समाज म्हणून आपल्याला एकत्र येण्यासाठी करता येईल. चित्रपटांच्याद्वारे सामाजिक एकता प्रस्थापित करण्याची शक्ती आपण ओळखलेली आहे.

समाजातील वेगवेगळ्या सामाजिक चळवळींचे प्रतिबिंब चित्रपटात आपल्याला पाहायला मिळाले होते. ज्या काळी समाजवादाचा बोलबाला होता, त्यावेळी राज कपूर यांच्या चित्रपटांतून समाजवाद मांडला गेला होता. हा प्रकार आपल्याकडे चित्रपटांच्या माध्यमातून कायम होत गेलेला आहे. आता हा प्रकार आणखीन प्रकर्षाने होईल, कारण आता हे माध्यम केवळ मूठभरांच्या हातामध्ये राहिलेले नाही तर ते सामान्य माणसांपर्यंत पोहोचले आहे. त्यामूळे चित्रपटासारख्या ‘सॉफ्टपॉवर’चा वापर आपण किती सकारात्मक पद्धतीने करून घेतो यावर सगळे अवलंबून असेल.

स्थानिक भाषा आणि त्यांच्या चित्रपटनिर्मितीकडे पाहण्याचा आपल्याकडच्या एलिट वर्गाचा एक विशिष्ट, हेटाळणीचा किंवा दुय्यमतेचा दृष्टिकोन असतो. आपल्याकडचा ‘एलिट वर्ग’ कायम गोंधळलेला आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्याकडे ‘एलिट’ असणे ही संकल्पना केवळ आर्थिक सुबत्ता आणि इंग्रजी प्रभुत्व यांच्याशी जोडली गेलेली आहे. या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही एलिट मानले जाता. परंतु एलिट असण्याचा संबंध अभिरुची, वैचारिक – सांस्कृतिक समृद्धीशी आहे, हे आपण कधी लक्षात घेतले नाही. त्यामुळे इथला एलिट क्लास हा कायम स्वतः च्या भाषेपासून तुटला कारण एलिट होण्यासाठी त्याला इंग्रजी भाषेशी सलगी साधायची होती.

आपल्याकडच्या एलिट क्लासला स्वतःचे अभिजात असणे हे सिध्द करण्यासाठी सतत कोणाची तरी टिंगल करणे आणि त्याच्या तुलनेत आपण कसे मोठे आहोत, हे सांगण्यामध्ये त्याचा फार काळ गेला. आपल्याकडच्या एलिट क्लासला आवडणारे साहित्य, नाटकं, कादंबऱ्या या सगळ्याचा विचार केला, तर असं लक्षात येते की ते खऱ्या अर्थाने आपल्या मातीशी तुटलेल्या कोणत्यातरी ठिकाणी वावरत आहेत. त्यामुळे त्यांनी या सगळ्या गोष्टींकडे हेटाळणीपूर्वक पाहणं यात मला काही विशेष वाटत नाही.

आपल्याकडे ‘सिंहासन’सारखा सुरेख  आणि सखोल चित्रपट झाला. ‘सिंहासन’सारखा दुसरा चित्रपट पुन्हा पाहण्यास मिळाला नाही. आपला हा चित्रपट जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी आपण किती प्रयत्न केले? ‘जे जनसामान्यांचे आहे ते आमचे नाही किंवा जे जनसामान्यांचे आहे ते गुणवत्तापूर्ण नाही, त्यात अभिजातता नाही’ अशा भ्रमात एलिट वर्ग वावरत असल्यामुळे त्यांनी केलेल्या हेटाळणीने फार काही फरक पडत नाही, असे मला वाटते. असे असूनही ‘चित्रपट’ मोठ्या प्रमाणात उन्नत होत गेला आणि असंख्य लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचला. एलिट क्लासनी नीट समजून घ्यायला हवे की आपला चित्रपट खऱ्या अर्थाने त्यांना आणि जगाला सुद्धा आपल्या मातीशी साधर्म्य साधणारा आहे. अशा गोष्टींशी जोपर्यंत एलिट क्लासची जवळीक होत नाही तोपर्यंत ते हेटाळणीपूर्वक दृष्टीकोनातूनच पाहणार.

आपल्या चित्रपटांतील गाण्यांकडे नेहमी हेटाळणीपूर्वक पाहिले जाते. पण मला असे वाटते की हाच आपण आपला स्ट्राँग मुद्दा का बनवत नाही? कारण आपल्याकडचे नाटक हे कीर्तन परंपरेतून सुरू होते. त्याच्यामध्ये गाणी अपरिहार्य आहेत. नौटंकीमध्येही गाणी आहेत. आपल्याकडच्या कोणत्याही लोककलेच्या प्रकारात गाणी ही अपरिहार्य आहेत. त्यामुळे गाणे हे आपले बलस्थान का असू नये?

एकदा एका प्रसिद्ध दिग्दर्शकाला मी असे बोलताना ऐकले की, ‘मी  माझ्या एका चित्रपटाची दोन व्हर्जन केली. एक एलिट क्लास आणि फेस्टिव्हलसाठी बिन गाण्यांचे व्हर्जन आणि इतरांच्यासाठी गाणे असलेले.’  ही किती गोंधळाची परिस्थिती आहे! गाण्यातूनही संवाद साधता येतो किंवा आमच्या चित्रपटातील नरेशन्सचा तो एक फॉर्म असू शकतो या दृष्टीकोनातून तो आपण विकसित केला नाही. कारण कुठेतरी आम्हाला जनसामान्यांपर्यंत पोहोचायचे असते आणि कुठेतरी आम्हाला या अर्धवक लटकणाऱ्या एलिट क्लासची भिती असते. या दोघांच्यामध्ये जेव्हा फिल्ममेकर अडकतो तेव्हा या पद्धतीच्या गोष्टी निर्माण होतात.

तरीही मला असे वाटते की त्यांच्या हेटाळणीने फार फरक पडणार नाही, कारण आपल्याला बोलायचे आहे ते जागतिक प्रेक्षकांशी.  त्या जागतिक ऑडिएन्सचे सँक्शन आपल्याला इथल्या मातीतही मिळायला पाहिजे. कारण, इथे सुद्धा आपण त्याचं दर्जाचे चित्रपट वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून किंवा वेगवेगळ्या फेस्टिव्हलच्या मार्फत बघतो आहोत. त्यामुळे मला असं वाटते की मधला हा जो सँक्शनचा भाग आहे तो निघून जाईल आणि खऱ्या अर्थाने चित्रपट जागतिक सीमारेषा ओलांडून पुढे जाईल.

सध्या चित्रपटसृष्टी वेगळ्याच कारणांमुळे गाजते आहे. चित्रपटांचे अर्थकारण, ड्रग्ज रॅकेट, राजकारणी मंडळींचा हस्तक्षेप यामुळे सामान्य माणूस चिडलेला, वैतागलेला आहे. मला असे वाटतं की सामान्य माणूस आणि कलावंत या सर्वांच लोकशिक्षण व्हायला हवे. चित्रपटसृष्टीतील लोकांना समाजाने आणि या क्षेत्रातील मंडळींनी स्वतःला ‘लार्जर दँन लाईफ’ अंगाने बघू नये.  आपण फक्त कलावंत आहोत, कला सादर करून झाल्यावर आपण सामान्य नागरिक आहोत हे कलावंतांना कळलं पाहिजे. कायदा, समाजमूल्य यांच्यासारखे सगळे सारखे हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे.

चित्रपटांना उद्योगाचा दर्जा मिळाला पाहिजे, त्याच्या निर्मितीसाठी कर्जे मिळाली पाहिजेत. म्हणजे या सगळ्या काळ्यापैशातून कलासृष्टी सुद्धा बाहेर येईल आणि ती एक उद्योग म्हणून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करेल. आज कधी नव्हे ते राजकारण आणि चित्रपटातील कलावंत यांचे इतके एकत्रीकरण दिसते आहे. हे एकत्रीकरण सामान्य माणसाला तितकं आवडत नाही. शेवटी सामान्य माणसाची दाद आणि त्याच्या मनमोकळेपणाने केलेली प्रशंसा यांनीच हे कलाक्षेत्र टिकलेले आहे, हे कलावंतांनी विसरता कामा नये.

चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरचा राजकारणी लोकांना फायदा होतो आहे. याचे कारण त्यांचे स्वतःचे ग्लॅमर कुठेतरी कमी पडते. राजकारण्यांनी कलाक्षेत्र आम्हा कलावंतांवर सोडून द्यावे आणि कलाकारांनीही आपल्या क्षेत्रात अधिक लक्ष घालावे, त्यातच दोन्ही क्षेत्रांचे आणि समाजाचे हित असेल. चित्रपटांना स्वतंत्र उद्योगाचा दर्जा मिळून जेव्हा त्यांचे स्वतःचे अर्थकारण उभे राहील, तेव्हा सिनेमा ठरावीक पैशातून उभा राहील. आणि लोकही त्याला सकारात्मक पद्धतीने दाद देतील.

(हा लेख अभिराम भडकमकर यांनी ‘ओआरएफ मराठी’ला दिलेल्या मुलाखतीचे शब्दांकन असून, संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी इथे क्लिक करा.)

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.