Author : Dr. Gunjan Singh

Published on Apr 21, 2020 Commentaries 0 Hours ago

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जैविक-शस्त्रास्त्राच्या कल्पनेला जितके उत्तेजन मिळेल, तेवढीच चीनविरोधी भावनाही जगभर बळकट होत जाईल.

चीनचे काय होणार?

Image Source: static.bangkokpost.com

कोरोनाच्या हाहाकारामध्ये एक देश संपूर्ण जगातील चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे, तो म्हणजे चीन. आजघडीला चीनमध्ये काय सुरू आहे, यावर साऱ्या जगाचे लक्ष आहे. कारण, चीनमधील वूहान शहरात कोव्हीड-१९ च्या प्रादुर्भावाला डिसेंबर २०१९ मध्येच सुरुवात झाली होती. चीनमधून पसरलेल्या या विषाणूबद्दल चीनने कितीही स्पष्टीकरण दिले तरी या साऱ्या जागतिक महामारीच्या साथीबद्दल चीनकडेच संशयाची सुई वळते आहे. त्यामुळेच चीनबद्दलच्या विविध शक्यतांचा विचार करणे, महत्त्वाचे ठरते.

सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कोरोनाच्या या संसर्गाची माहिती प्रसारित होण्यापासून रोखणे, हीच चीनी सरकारची यावर पहिली प्रतिक्रिया होती. या संसर्गाच्या उद्रेकाबाबत सरकारला माहिती देणाऱ्या आणि सरकारने या विषाणूच्या अस्तित्वाची दखल घ्यावी, म्हणून प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरांचे तोंड चीन सरकारनेच बंद केले, असेही अनेक ठिकाणी प्रसिद्धही झाले आहे. असाच एक डॉक्टर या विषाणूच्या संसर्गाचा बळीही ठरला.

चीनमध्ये पहिला रुग्ण सापडल्यानंतर महिन्यानंतर या आजाराचा विस्तार आणि त्याच्या प्रसाराचा वेग पाहून चीन सरकारला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेणे भाग पडले. त्यानंतर सरकारने यासंबधी उपाययोजना सुरु केल्या. परंतु, सामान्यत: जागतिक पातळीवर असे म्हंटले जात आहे की, चीन सरकारने याची दखल घेण्यास खूपच उशीर केला. त्यामुळेच आज जगभर या विषाणूने पसरविलेल्या दहशतीमागे चीनचा हात आहे का, याबद्दल अनेकजण बोलू लागले आहेत.

याच मुद्द्यावरून आज जागतिक राजकारण आकार घेत आहे. चीननेच कोव्हीड-१९ विषाणूची निर्मिती केल्याचा आणि या विषाणूचा जगभर प्रसार व्हावा, या उद्देशाने कोव्हीड-१९ बाधित रुग्णांचा वापर करत असल्याचा आरोप केला जात आहे. या कुटनीतीनुसार, चीन सरकारने जगभर या आजाराचा प्रसार व्हावा या उद्देशानेच कोव्हीड-१९चे बाधित रुग्ण बाहेरच्या देशांत पाठवले. हे चीनचे षडयंत्र असल्याचे मानले जात आहे.

काही सिद्धांतानुसार असाही दावा केला जात आहे की, या आजारावरील लस चीनकडे उपलब्ध आहे. पण, हे मान्य करण्यासाठी ते योग्य वेळ येण्याची वाट पाहत आहेत. त्यातच अध्यक्ष ट्रम्प यांनी या विषाणूला ‘चायनीज व्हायरस’ संबोधल्याने स्थिती आणखी बिकट बनली आहे. या विषाणूला ‘चायनीज व्हायरस’ म्हणण्याला चीनचा तीव्र आक्षेप आहे. अशाने चीन आणि चीनी नागरिकांबद्दल नकारात्मक प्रतिमा निर्माण केली जात असल्याचा त्यांचा दावा आहे. या विषाणूच्या उद्रेकामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे.

चीनच्या नागरिकांचे जीवन धोक्यात असताना त्यांच्यावर वंशावादातून टिप्पणी केली जात आहे. जगभरात विखुरलेल्या स्थलांतरीत चीनी कामगारांची दयनीय अवस्था झाली आहे. इटली, स्पेन, अमेरिकायांसारख्या देशात जिथे या विषाणूमुळे मृतांची संख्या वाढत आहे, अशा देशांतील चीनी कामगारांचीस्थिती तर फारचबिकट आहे.

यातच भर म्हणजे, जैविक अस्त्र म्हणून कोव्हीड-१९ च्या विषाणूची निर्मिती चीननेच केली असल्याचे सिद्धांत पसरवले जात आहेत. परंतु, कोव्हीड-१९ चा विषाणू हा वटवाघळांमध्ये निसर्गतःच असतो असे मान्य केल्यास जैविक अस्त्र म्हणून त्याचा वापर करण्याचा सिद्धांतहा दिशाभूल करणारा ठरतो. वूहान मधील चायनीज प्रयोगशाळेत वाटवाघळांवर संशोधन सुरु होते आणितिथूनच अपघाताने या विषाणूचा प्रसार झाला असावा, अशा प्रकारचा लेख प्रसारित झाल्याने, तर या सिद्धांताला आणखीनच बळकटी मिळते.

चीनमधील या प्रयोगांना अमेरिकेतूनच ३.७ दशलक्ष डॉलर इतका आर्थिक निधी दिला जातो. या सर्व प्रतिक्रियांना उत्तर म्हणून चायनीज दूतावासाने एक निवेदन जरी केले आहे. यामध्ये: “कोणत्याही वैज्ञानिक निष्कर्षाशिवाय चीन हाच या विषाणूचा निर्माता असल्याचा बिनबुडाचा आणि उथळ आरोप करणे बेजबाबदार वर्तन असून अशा बिकट प्रसंगीयाचा आंतरराष्ट्रीय सहकार्यावर निश्चितच विपरीत परिणाम होऊ शकतो,”असे म्हंटले आहे.

या विषाणूशी लढा देत असतानाच, सरकार समोर आणखी एक प्रमुख आव्हान उभे राहिले आहे, ते म्हणजे ज्या वेगाने चुकीची माहिती प्रसारित होत आहे, त्याला पायबंद घालणे. विषाणूच्या आव्हानासोबतच सरकारसमोरील आणखी एक अडथळा आहे, तो माहिती युद्धाचा. याचे एक प्रमुख उदाहरण म्हणजे, ५जी नेटवर्कचा कोव्हीड-१९ शी संबंध जोडणे. ही एक छोटी अफवा आहे, जी अतिशय वेगाने मुख्य प्रवाहातील चर्चेचा विषय बनली, असे मानले जाते. खुलेपणाने आणि मोठ्या प्रमाणात पसरणाऱ्या अशा प्रकारच्या परस्पर विरोधी माहितीमुळेही परिस्थिती हाताळणे सर्वच देशातील सरकारांना प्रचंड आव्हानात्मक ठरणार आहे.

मृतांचा आकडा सातत्याने वाढत असताना, अशा प्रकारच्या कुटील कल्पना फारच आकर्षक वाटतात. अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल म्हणून अमेरिकेला लॉकडाऊनचा पर्याय मान्य नव्हता. अशा उपायांमुळे रुग्णांच्या आणि मृतांच्याही संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत एकमेकांवर चिखलफेक करत राहणे आणि अमेरिकेच्या महासत्तेला आव्हान देण्यासाठी चीनने या विषाणूची निर्मिती केली अशा कल्पना पुढे रेटणे खूपच सोपे वाटते.

चीनमध्ये देखील अशाच षडयंत्रांच्या संकल्पनांना पेव फुटत आहेत. अजून सत्य उघड झाले नाही तोपर्यंतच अमेरिकेकडून मिळणारा निधी वापरून केले जाणारे प्रयोग अशाच प्रकारे स्फोटक ठरतील, अशा कल्पनांना ऊत येत आहे. या विषाणूच्या उद्रेकाने चीनी अर्थव्यवस्थेवरही गंभीर परिणाम होणार आहेत. अशा परिस्थितीत चीन सरकारदेखील, चीनच्या विकासदरात अडथळे आणण्यासाठीच अमेरिकेकडून असे प्रयत्न अवलंबले जात असल्याच्या कल्पनेचा आधार घेईल.

अर्थव्यवस्था आणि राजकरणासोबतच प्रत्येक समाजातील सामाजिक सौहार्दावरही कोव्हीड-१९च्या उद्रेकाचे विपरीत परिणाम होत आहेत. आपल्या आप्तस्वकीयांना गमावल्यानंतर सामाजिक विलागीकरण अवलंबणाऱ्या लोकांमध्ये जैविक-शस्त्राची कल्पना वेगाने मूळ धरू शकते. प्रसारमाध्यमे आणि माहिती तंत्रज्ञान देखील अशा कल्पनांची पुष्टी करत आहेत. परंतु, अशा प्रकारच्या सिद्धांतामुळे आंतरराष्ट्रीय समुदायातील अविश्वासाला आणखी बळकटी मिळेल. या अविश्वासामुळे पूर्ववत सामान्यपदावर येणे आणखीच कठीण होऊन बसेल. अशा दाव्यांमुळे राष्ट्रवादाच्या भावनेला खतपाणी मिळेल. जागतिक खुलेपणाच्या विचारांसाठी हे अधिक धोकादायक ठरू शकते.

गेल्या काही वर्षात जगभरातून जागतिकीकरण-विरोधी विचारांची लाट उसळली आहे. अनेक देशांतील नेते देशांतर्गत विकास आणि आर्थिक वाढ यावरच जास्त भर देत आहेत. कोव्हीड-१९मुळे हे विचार आणखी दृढ होतील. बाहेरील देशांकडून केली जाणारी आयात अधिक असुरक्षित होईल. अमेरिका आणि भारतासारख्या देशांत चीनविरोधी भावना वाढीस लागल्या आहेत. म्हणून जैविक-शस्त्रास्त्राच्या कल्पनेला जितके उत्तेजन मिळेल, चीनविरोधी भावनाही तितकीच बळकट होत जाईल.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.