Author : Shoba Suri

Published on Mar 05, 2024 Commentaries 0 Hours ago
आहारातील सुसंगती : शाश्वत पोषणाद्वारे स्वतःचे आणि ग्रहाचे पोषण

प्रस्तावना

वैयक्तिक आरोग्य आणि शाश्वत पर्यावरण या दृष्टीने सध्या दुहेरी आव्हानांना तोंड द्यावे लागते आहे. अशा परिस्थितीत शाश्वत पोषण ही संकल्पना आशेचा किरण आहे. एवढेच नव्हे तर ही प्रामाणिकपणे जगण्याची गुरुकिल्ली आहे. या संकल्पनेच्या मूळाशी शाश्वत पोषण हा एक समग्र दृष्टिकोन आहे. यामध्ये फक्त उदरनिर्वाहासाठी केला जाणारा आहार अंतर्भूत नाही. तर पर्यावरणीय जबाबदारी, सामाजिक समता आणि आर्थिक व्यवहार्यता अशा तीन स्तंभांमध्ये हे विभागले गेले आहे. हे त्रिकूट आहारविषयक तत्त्वज्ञानाचा आधार आहे.  वैयक्तिक आरोग्याच्या पलीकडे जाऊन अखिल जगाचा आरोग्याशी असलेला परस्परसंबंध इथे अभिप्रेत आहे.

Source: https://www.researchgate.net

शाश्वत पोषण : पर्यावरणीय आरोग्य, सामाजिक समता आणि आर्थिक समृद्धी यांच्यातील समतोल

शाश्वत पोषणाचा पर्यावरणीय पैलू आपल्या अन्नघटकांच्या निवडींवर अवलंबून असतो. जमिनीचा योग्य वापर, जलस्रोत आणि हरितगृह वायू उत्सर्जन या सगळ्यांवर आपल्या आहारातील प्राधान्यांचा परिणाम होत असतो याचे भान ठेवणे गरजेचे आहे. शेतापासून ते आपल्या थाळीपर्यंत आपल्या अन्नाचे जीवनचक्र नेमके काय आहे त्यावर पर्यावरणाची शाश्वतता अवलंबून असते. शाश्वत पोषणाच्या या चौकटीत सामाजिक समानतेच्या दृष्टीनेही आपल्या अन्न प्रणालीच्या समावेशकतेची आवश्यकता आहे. अन्नाची उपलब्धता, शेती क्षेत्रातील कामगारांची परिस्थिती आणि संसाधनांचे न्याय्य वितरण याबद्दल विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आर्थिक व्यवहार्यता ठेवली तर दीर्घकालीन शाश्वत अर्थव्यवस्था अस्तित्वात येऊ शकते.  पर्यावरणपूरक आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदारीने केलेल्या  निवडी स्वाभाविकपणे अधिक महाग किंवा अव्यवहार्य असतात, असा एक गैरसमज आहे. परंतु शाश्वत पोषण आपल्या अन्न प्रणालीची लवचिकता आणि दीर्घायुष्य सुनिश्चित करणाऱ्या पद्धतींमध्ये गुंतवणूक करण्याचे मूल्य ओळखते.

शेतापासून ते आपल्या थाळीपर्यंत आपल्या अन्नाचे जीवनचक्र नेमके काय आहे त्यावर पर्यावरणाची शाश्वतता अवलंबून असते.

वनस्पती-केंद्रित दृष्टिकोन बहुतेक वेळा शाश्वत पोषण दर्शवतो. त्याचबरोबर प्राण्यांच्या उत्पादनांवर अवलंबून राहण्याचे पर्यावरणीय फायदेही आहेत. यामध्ये कठोर शाकाहार किंवा शाकाहारी आहार बंधनकारक नाही. परंतु सारासार विचाराने ठरवलेल्या आहाराच्या निवडींमुळे पर्यावरणावरचा परिणाम कमी करण्यासाठी मदत होते. शाश्वत पौष्टिकतेच्या क्षेत्रामध्ये वैयक्तिक पोषणासाठी खाण्याच्या पद्धतींची विचारी निवड ही एक कोनशिला आहे. आपल्या आहारातील निवडींचा पृथ्वीच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होतो हे ओळखणे हा शाश्वत पोषणाचा एक मुख्य भाग आहे. ही पर्यावरणीय अत्यावश्यकता आपल्याला अशा पद्धतींचा अवलंब करण्यास भाग पाडते. यामुळे पृथ्वीवरच्या सर्वंकष जीवनाला पुष्टी मिळते. तसेच वेगवेगळ्या परिसंस्थांमध्ये सकारात्मक योगदान दिले जाते.

शाश्वत पोषण हे पर्यावरणीय पाऊलखुणा कमी करून अन्न उत्पादन आणि त्याच्या वापराचे पर्यावरणीय प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करते. यामध्ये कमी कार्बन फूटप्रिंटसह खाद्यपदार्थ निवडणे, शाश्वत शेती पद्धतींचा अंगिकार करणे आणि अन्न पुरवठा साखळीत पाणी आणि ऊर्जा यासारख्या संसाधनांचा कमीत कमी वापर करणे याचा समावेश आहे. तसेच जैवविविधतेच्या महत्त्वावर जोर देऊन शाश्वत पोषण कृषी पद्धतींना समर्थन देणे गरजेचे आहे. अशा शेती पद्धती जैवविविधता टिकवून ठेवतात आणि वाढवतात. यासाठी विविध पिकांच्या जातींना प्रोत्साहन देणे, एकाच प्रकारच्या पिकाची लागवड कमी करणे आणि नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण करणे या गोष्टी आवश्यक आहेत. स्थानिक पदार्थांचा आणि स्वदेशी घटकांचा स्वीकार करणे हे आपल्या स्वयंपाकघरात जैवविविधतेचा उत्सव साजरा करण्यासारखेच आहे. हीच पद्धत पर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊ आहे आणि समुदायाच्या अस्तित्वासाठीही पोषक आहे. या पर्यावरणीय कथनाचा केंद्रबिंदू म्हणजे अन्न उत्पादन पद्धतींचे परीक्षण. शाश्वत शेती आणि पुनर्निर्मिती पद्धतींवर लक्ष केंद्रित करून मातीचा ऱ्हास कमी करणे, जैवविविधतेचे  जतन करणे आणि कृत्रिम घटकांचा वापर कमी करणे ही काळाची गरज आहे. अन्न उत्पादन आणि नैसर्गिक वातावरण यांच्यात सुसंवादी संबंध निर्माण करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.  यातील एका घटकाचे आरोग्य हे दुसऱ्या घटकाच्या आरोग्याशी जोडलेले आहे.

शाश्वत पोषण आहार प्रणाली कामगारांना न्याय्य आणि नैतिक वागणूक देण्याचे समर्थन करते. यामध्ये न्याय्य श्रम पद्धतींचा स्वीकार करणे, अन्न संसाधनांच्या समान पुरवठ्याची हमी देणे आणि अन्न पुरवठा साखळीतील सामाजिक न्यायाच्या समस्यांचे निराकरण करणे याचा समावेश आहे. अन्नसुरक्षेला प्रोत्साहन देणे हा सामाजिक समतेचा एक महत्त्वाचा पैलू आहे. शाश्वत पोषण धोरणे आणि पद्धतींना प्रोत्साहन दिल्याने सर्व व्यक्तींना पौष्टिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या योग्य अन्न मिळण्याची हमी मिळते. यामुळे सर्वांना परवडणारे अन्न आणि त्याच्या वितरणामधल्या समस्यांचे निराकरण होते.  

ग्राहकांच्या स्तरावर कचरा कमी करून आणि पुनर्वापराला प्राधान्य देऊन जबाबदार वापराला प्रोत्साहन मिळाले पाहिजे. तरच अन्न उत्पादनात गुंतवलेल्या संसाधनांचा अधिक कार्यक्षमतेने वापर केला जाईल. 

स्थानिक शेतकरी आणि व्यवसायिकांना पाठिंबा देण्याचे महत्त्व ओळखले तर आर्थिक व्यवहार्यतेचे उद्दिष्ट साध्य होईल. हे तत्त्व ग्राहकांना स्थानिक पातळीवर उत्पादित केलेले खाद्यपदार्थ निवडण्यासाठी प्रोत्साहित करते. यामुळे समुदायांमध्ये आर्थिक व्यवहार्यता वाढते आणि लांब-अंतराच्या वाहतुकीशी संबंधित पर्यावरणीय प्रभाव कमी केले जातात.  त्याबरोबर यामुळे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य, पर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊ आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार कृषी पद्धतींना समर्थन देऊन अन्न प्रणालीची दीर्घकालीन लवचिकता आणि व्यवहार्यता साधण्याच्या पद्धतींमध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळते. अन्नाचा अपव्यय टाळणे हा पृथ्वीचे शाश्वत पोषण करण्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. न खाल्लेल्या अन्नामुळे प्रचंड आर्थिक नुकसान होते आणि मग परिणामी ते पर्यावरणाच्या ऱ्हासालाही कारणीभूत ठरते.

निष्कर्ष

शाश्वत पोषण पद्धतींचा अवलंब हा हवामान बदल, जंगलतोड आणि संसाधनांचा ऱ्हास यांमुळे उद्भवलेल्या आव्हानांवर निर्णायक उपाय आहे. वनस्पती-आधारित आहार आत्मसात करून, अन्न कचरा कमी करून आणि स्थानिक आणि पुनरुत्पादक शेतीला पाठिंबा देऊन आपण जैवविविधतेचे संरक्षण आणि पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्यासाठी सक्रियपणे योगदान देऊ शकतो. शिवाय शाश्वत पोषण प्राण्यांच्या नैतिक उपचारांचे महत्त्व ओळखते. मानवीय पद्धतींवर आणि जबाबदार संसाधनांवर जोर देते. अशा प्रकारे आपल्या आहारातील सुसंगती आणण्यासाठी आपण आपल्या पोषणासाठी करत असलेल्या निवडी आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम यांचा थेट संबंध आहे. शाश्वत आहाराच्या सवयींचा अवलंब करून लोक निरोगी आणि अधिक संतुलित जगासाठी योगदान देत आहेत.  खाद्य पदार्थांची निवड ही अधिक शाश्वत आणि अधिक सामंजस्यपूर्ण जग निर्माण करण्याच्या आपल्या सामूहिक ध्येयाचा एक जागरूक आणि अर्थपूर्ण भाग आहे. 

हा लेख मूळतः Illuminem मध्ये प्रकाशित झाला आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.