Author : Swati Prabhu

Published on Jul 14, 2021 Commentaries 0 Hours ago

कोरोनाने जागतिकीकरणात सुधारणा करणे आवश्यक ठरले असून, त्यासाठी ‘ग्लोकलायझेशन’ हा उत्तम पर्याय ठरू शकते, हे जाणवू लागले आहे.

शाश्वत विकासासाठी आता ‘ग्लोकल’ व्हा…

सध्या काळ मोठा कठीण आला आहे. तेवढेच नाही तर आपल्या जगण्याच्या, अस्तित्वाच्या प्रत्येक कक्षेतही धोक्याच्या घंटा वाजू लागल्या आहेत. झपाट्याने पसरणाऱ्या अक्राळविक्राळ करोना महासाथीमुळे हवामानासंदर्भातील उपक्रम आणि पर्यावरणाशी संबंधित इतर उपक्रम काही काळासाठी स्तब्ध झाले आहेत, असे पहिल्या दृष्टिक्षेपात वाटू शकते. असेही वाटले की, शाश्वतताही थबकली की काय? परंतु तसे नसून शाश्वत विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून आखण्यात आलेल्या आणि या दशकाच्या अखेरीस मुदतसमाप्ती असलेल्या ‘अजेंडा २०३०’चे महत्त्व अधिकच ठळकपणे अधोरेखित झाले आहे.

कोरोना या जागतिक महासाथीचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे या महासाथीने जागतिकीकरणाच्या कोंदणात असलेल्या परस्परावलंबी जगाला अशांत केले. देशादेशांना परस्परांशी जोडून ठेवणारी साखळीच करोना महासाथीने तोडली. पुरवठा साखळीवर त्याचा परिणाम झाला आणि जागतिक बाजारपेठेवर ‘न भूतो न भविष्यति’ असा ताण आला. करोना विषाणूने उघडपणे जागतिकीकरणाच्या व्यवस्थेची भेदनीयता उघड केली किंवा लक्तरे जगापुढे मांडली.

या महासाथीने केवळ जागतिकीकरणच धोक्यात आणले असे नाही तर शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांवरही (एसडीजी) अनिश्चिततेचे काळे ढग त्यामुळे निर्माण झाले. तरीही संकटात निर्माण झालेली ही एक सुसंधी आहे, असेच म्हणावे लागेल.

कोरोना महासाथ आंतरराष्ट्रीय समुदायासाठी एक वळणबिंदू ठरू शकते. यातून जागतिक सुशासनासंदर्भातील मूळ आचार सुधारून त्याचे स्वरूप अधिक सर्वसमावेशक करता येऊ शकते. याशिवाय महासाथीने आणखी एक संधी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. ती म्हणजे जागतिकसुशासनाच्या स्थानिक चौकटीला प्राधान्य देऊन शाश्वततेच्या मुद्द्यावरून जागतिक समान धागे मजबूत करणे.

१९९० मध्ये जागतिकीकरणाचे आगमन झाले. त्यामुळे आपल्या जीवनाचे प्रत्येक क्षेत्र अमूलाग्रपणे बदलून गेले. त्याचा केवळ परस्परांत गुंतलेल्या जगाच्या गुंतागुंतीवर परिणाम झाला असे नाही तर त्यामुळे अनेक देशांना आर्थिक प्रगतीची कवाडे खुली झाली. त्यात भारताचाही समावेश आलाच. विकसनशील देशांसाठी जागतिकीकरणाने विकासाची नवनवी दालने उघडली किंवा उपलब्ध करून दिली. तंत्रज्ञान, रोजगारक्षमता, गुंतवणूक आणि आणखी कितीतरी क्षेत्रांतील सर्जनशीलतेला त्यामुळे वाव मिळाला.

सुरुवातीला जागतिकीकरण गुळगुळीत भासले. २००८ मध्ये निर्माण झालेल्या आर्थिक मंदीमुळे जागतिकीकरणाची दरी रुंदावली. त्यानंतर दशकभराने पुन्हा या संकटाने डोके वर काढले. यावेळी करोना महासाथ त्यासाठी कारणीभूत ठरली. या सर्व घटनांमधून जागतिकीकरण प्रतिकार यंत्रणा उभारण्यात कमालीची अपयशी ठरल्याचे ठळकपणे दिसून आले. विकसित आणि विकसनशील देशांना त्याची सारखीच झळ पोहोचली.

नवीन सूत्र

ही दरी ग्लोकलायझेशन भरून काढू शकते. जागतिक दर्जाच्या परंतु स्थानिक पातळीवरील घटकांचे प्रतिबिंब आणि त्यांचे प्रतिनिधित्व म्हणजे ग्लोकलायझेशन. उद्योग वर्तुळात ग्लोकलायझेशन हा शब्द वारंवार वापरला जातो. परंतु आता त्याचा वापर सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय वर्तुळातही सर्रासपणे केला जातो. पर्यावरणीय कक्षेत ग्लोकलायझेशनचा वापर ही काळाची गरज बनली आहे.

कोरोना महासाथीने जागतिकीकरणात सुधारणा घडवून आणण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे. राष्ट्रीय संस्था, तळागाळात काम करणाऱ्या संस्था, स्वयंसेवी संस्था आणि इतर अ-राजकीय संस्था यांसारख्या स्थानिकांना विश्वासात घेऊन, त्यांना बरोबर घेऊन शाश्वत विकास किंवा हवामानाविषयी काहीतरी ठोस कृती करून त्या माध्यमातून नव्याने जागतिकीकरणाची व्याख्या तयार केली जाऊ शकते.

भारतासारख्या देशांमध्ये स्थानिक अर्थव्यवस्थांना विकासाची उद्दिष्ट्ये आखून देत त्यांना त्याच्या पूर्ततेसाठी प्रोत्साहित केले जाऊ शकते. यातून आत्यंतिक गरजेचा असलेला पर्यावरणीय भान आणि आर्थिक प्रगती यांच्यातील समतोल साधला जाऊ शकतो. तसेच स्थानिक लोकांकडे असलेली सर्जनशीलता, त्यांच्या अंगी असलेले गुण यांच्याकडे दुर्लक्ष करूनही चालणारे नाही. कारण त्यांचे पाय जमिनीवर असतात आणि स्थानिक स्थितीशी त्यांचे सूर जुळलेले असतात. अशा प्रकारचे स्थानिक स्रोत जागतिक सुशासनाच्या अंमलबजावणीत उपयुक्त ठरू शकतात. उत्तरदायित्वता, पारदर्शकता आणि विश्वासवृद्धी यांसारखे घटकही या प्रक्रियेत महत्त्वाचे ठरतात.

आधुनिक जीवनमानाच्या सद्य:स्थितीत आपल्या सर्वांना बदल करावे लागणार आहे, हे आता गृहीतच धरावे लागेल. तसेच पर्यावरणात वाढलेले कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यासाठी, आता आपल्याला लांबूनच काम करावे लागेल. या साऱ्या सामाजिक प्रक्रियेमधून जागतिकीकरणासाठी ‘ग्लोकलायझेशन’ हा उत्तम पर्याय ठरू शकते, हे प्रकर्षाने जाणवू लागले आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात शाश्वत विकासासाठी नवे सर्जनशील मार्ग शोधले जातील, यात शंका नाही.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.