Author : Hari Bansh Jha

Published on Mar 20, 2020 Commentaries 0 Hours ago

करोना विषाणूमुळे जग एकाचवेळी साथीच्या आजाराच्या आणि मंदीच्या विळख्यात सापडले आहे. जागतिक अर्थव्यवस्था २.५ टक्क्यांनी घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

करोनाविरोधात जागतिक सहकार्य हवे

करोना विषाणू जगातील तमाम देशांच्या मागे हात धुवून लागला आहे. जगभरात हाहाःकार माजविणा-या या आजाराने आतापर्यंत चार हजारांहून अधिक बळी घेतले आहेत तर ११० देशांतून १ लाख १० हजारांहून अधिक जणांना या आजाराची बाधा झाली आहे. चीनमधील हुवेई प्रांतातील वुहान हे शहर या विषाणूचे उगमस्थान. म्हणून या विषाणूला ‘वुहान विषाणू’, असेही संबोधले जाते. एकट्या चीनमध्ये करोनाने हजारो लोकांना बाधीत केले आहे आणि अनेकांचा बळी घेतला आहे. तर चीनबाहेर या आजाराने ६३१ जण मृत्युमुखी पडले आहेत. कसेही असले तरी जगभरात थैमान घालणा-या या प्राणघातक विषाणूला रोखण्यासाठी जागतिक पातळीवर सहकार्य हाच कळीचा मुद्दा आहे. या साथीच्या आजाराशी लढा देण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येणे गरजेचे आहे.

एकूणच जगाचे अर्थकारण घायकुतीला आणलेल्या करोना आजारावर काही प्रमाणात नियंत्रण मिळविल्याचा दावा चीनने केला आहे. मात्र, त्यामागची सत्यासत्यता तपासण्याला वेळ लागेल. तत्पूर्वीच या प्राणघातक आजाराने संपूर्ण जगाला आपला विळखा घातला आहे. त्यामुळेच उशिरा का होईना करोनाचे गांभीर्य लक्षात घेत जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूएचओ) करोनाला ‘जागतिक साथीचा आजार’ (महामारी) घोषित करावे लागले. करोनाच्या प्रादुर्भावामुळे जागतिक अर्थव्यवस्थेची वाटचाल मंदीच्या दिशेने सुरू झाली आहे.

एका अंदाजाप्रमाणे करोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला तब्बल २ ट्रिलियन डॉलरचा फटका बसू शकतो. जागतिक अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या पर्यटन व्यवसायाने तर बसकणच मारली असून पर्यटन क्षेत्राला करोनामुळे ३० ते ५० अब्ज डॉलर एवढे महाप्रचंड नुकसान सोसावे लागणार असल्याचा अंदाज आहे.

करोना विषाणूमुळे जग एकाचवेळी साथीच्या आजाराच्या आणि मंदीच्या विळख्यात सापडले आहे. जागतिक अर्थव्यवस्था २.५ टक्क्यांनी घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॅनडा, मेक्सिको आणि मध्य अमेरिका क्षेत्र या देशांतील परिस्थितीमुळे तर जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास ०.७ ते ०.९ टक्क्यांनी घसरू शकतो, असा प्राथमिक अंदाज आहे. मागणीअभावी तेलाच्या दरांनी नीचांक गाठला आहे. त्यामुळे तेल निर्यातदार देशांबरोबरच ज्या देशांची अर्थव्यवस्था निर्यातीवर निर्भर आहे, त्यांना नुकसान सोसावे लागणार आहे. करोनाच्या भीषण सावटापुढे देशोदेशीच्या भांडवली बाजारांनीही लोळण घेतल्याने अनेक गुंतवणूकदारांचे लाखो कोटी डॉलर बुडू लागले आहेत.

उर्वरित जगात ही भयाण परिस्थिती असताना दक्षिण आशियाचे भवितव्य मात्र भारताशी जोडले गेले आहे. करोनाच्या साथीवर भारत कसा नियंत्रण मिळवतो यावर दक्षिण आशियाई देशांची पुढील वाटचाल अवलंबून आहे. भारतात करोनाने चंचूप्रवेश केला आहे. आतापर्यंत काही भारतीयांना करोनाची लागण झाली आहे. त्याचा फैलाव रोखण्यासाठी भारत सरकारने देशाला जगापासून विलग करण्याचे धोरण अवलंबले आहे. विलगीकरणाचे धोरण म्हणून भारत सरकारने सर्व प्रकारचे व्हिसा देण्याचे काम १५ एप्रिलपर्यंत थांबवले आहे. मात्र, देशोदेशीचे राजदूत, संयुक्त राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय संस्था यांचे प्रतिनिधी यांना या धोरणातून वगळण्यात आले आहे.

भारताचा सख्खा शेजारी देश नेपाळकडे मात्र संशयाने पाहिले जात आहे. आम्ही ‘करोनामुक्त’ आहोत, असे सांगणा-या नेपाळात करोनाचे संशयित सापडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सावध झालेल्या भारताने नेपाळ-भारत सीमेवर अतिदक्षतेचा इशारा जारी केला आहे. नेपाळमार्गे करोना विषाणून भारतात शिरू नये यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स – एनडीआरएफ) तज्ज्ञांचे पथक सीमेवर तैनात करण्यात आले आहे. देशावर आलेल्या नैसर्गिक संकटाबरोबरच रासायनिक, जैविक, किरणोत्सारी आणि आण्विक अशा सर्व संकटांचा मुकाबला करण्यासाठी एनडीआरएफची निर्मिती करण्यात आली आहे.

चीननंतर करोनाचा सर्वाधिक फटका बसणारा देश म्हणजे इटली. इटलीत आतापर्यंत १२ हजार जणांना करोनाची बाधा झाली असून २००० हून अधिक जण बळी गेले आहेत. इटलीत तर एवढी भयाण अवस्था आहे की, कोट्यवधी लोकांना स्थानबद्ध राहण्याचे आदेशच तेथील सरकारने काढले आहेत. जीवनावश्यक वस्तू आणि औषधे यांचा पुरवठा करू शकणारी दुकानेच खुली ठेवण्यात आली असून संपूर्ण इटलीमध्ये आणीबाणीसदृश परिस्थिती आहे. एकमेव जागतिक महासत्ता असलेली अमेरिकाही करोनाच्या जाळ्यातून सुटू शकलेली नाही. अमेरिकेत १ हजार १३५ लोकांना करोनाची लागण झाली असून ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासनाने देशात आणीबाणी जाहीर केली असून युरोपातून कोणी अमेरिकेत येऊच नये यासाठी कठोर निर्बंध ट्रम्प प्रशासनाने लादले आहेत.

करोनामुक्त असल्याचे जाहीर करणा-या नेपाळमध्ये अलीकडेपर्यंत विमानतळांवर कोणत्याही प्रकारची चिकित्सा होत नव्हती. चीनमध्ये जेव्हा करोनाने डोके वर काढले होते तेव्हाही नेपाळ-चीन हवाई सेवा बिनदिक्कतपणे सुरू होती. तसेच नेपाळ-चीन सीमांवरही कोणत्याही प्रकारची तपासणी केंद्रे स्थापन करण्यता आलेली नव्हती. त्यामुळे करोनाचा नेपाळमध्ये प्रवेश झाला असण्याची शक्यता नाकारण्यात आलेली नाही. नोकरीच्या निमित्ताने आखातात तसेच इतर देशांत वास्तव्यास असलेल्या नेपाळी नागरिकांना करोनाने ग्रासले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) नेपाळला करोना प्रादुर्भाव होण्याची उच्च जोखीम असलेल्या देशांच्या यादीत सूचिबद्ध केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या इशा-यानंतर खडबडून जाग्या झालेल्या नेपाळ सरकारने आता कुठे करोनाविरोधातील लढाईसाठी कंबर कसली आहे. काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर तपासणी कक्ष उभारण्यात आले असून देशात येणा-या आणि देशातून बाहेर जाणा-या प्रवाशांची कसून वैद्यकीय तपासणी केली जात आहे. एवढेच नव्हे तर भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या सीमा नेपाळला ज्या ठिकाणी भिडतात त्या भूसीमांच्या १२९ पैकी ४१ ठिकाणांवरही नेपाळ सरकारने वैद्यकीय तपासणी कक्ष स्थापन केले आहे. नेपाळची अर्थव्यवस्था पर्यटनकेंद्री आहे. दरवर्षी लाखो पर्यटक नेपाळला येत असतात. त्यामुळे येथील व्हिसा नियमही फारसे जटिल नाहीत. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर नेपाळ सरकारने चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया, जपान, फ्रान्स, जर्मनी आणि स्पेन या देशांतून येणा-या पर्यटकांना व्हिसा देण्याची प्रक्रिया बंद केली आहे.

थोडक्यात या देशांतील कोणताही पर्यटक नेपाळला येऊ शकणार नाही. तरीही अपवादात्मक परिस्थितीत एखाद्यास नेपाळमध्ये येणे अगदीच गरजेचे असेल तर त्यास आधी त्या त्या देशातील नेपाळी दूतावासाकडून तशी परवानगी घेऊन तेथूनच व्हिसा घ्यावा लागेल. एरव्ही नेपाळमध्ये ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ पद्धती लागू असते. पर्यटनाबरोबरच नेपाळने खबरदारीचा उपाय म्हणून चीन, दक्षिण कोरिया, इटली, जपान आणि इराण या देशांतून खाद्यपदार्थ आयात करण्याचेही थांबवले आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर नेपाळ सरकारने आपल्या नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. साधा ताप किंवा तत्सम लक्षणे वा इन्फ्लुएंझासारखी लक्षणे आढळली तर नागरिकांनी स्वतःच विलग व्हावे, असे आवाहन नेपाळ सरकारने केले आहे. करोनाग्रस्तांनी स्वतःहून आपल्या आजाराची माहिती द्यावी, असेही सरकारने म्हटले आहे. नेपाळच्या सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभाग आहेत मात्र मोठ्या संख्येने रुग्ण सामावून घेण्याची त्यांची क्षमता नाही. परंतु आता अतिदक्षता विभागांमध्ये मोठ्या संख्येने करोना रुग्ण भरती होऊ लागले आहेत. नेपाळमधील ही परिस्थिती चिंताजनक असून नजीकच्या भविष्यात ती आणखीनच उग्र रूप धारण करू शकेल, अशी धास्ती आहे.

राजधानी काठमांडूमध्ये तर सॅनिटायझर्स, मास्क आणि इतर महत्त्वाची औषधे इत्यादींचा प्रचंड तुटवडा आहे. स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठाही तेथील सरकार नागरिकांना धडपणे करू शकत नाही. तिथेही चणचण आहे. जीवनावश्यक वस्तू बाजारातून गायब होतील या भीतीने ग्रासलेल्या नेपाळी लोकांनी तांदूळ, खाद्यतेले, डाळी, कडधान्ये, पिठे या वस्तूंचा साठा करून ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती २५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. करोनाची कोंडी करण्यासाठी कतारने नेपाळसह १४ देशांच्या नागरिकांना आपल्या देशात प्रवेशबंदी जाहीर केली आहे. त्यामुळेही नेपाळच्या अडचणींत भर पडली आहे. कतारमध्ये नोकरी करणा-या नेपाळींची संख्या जास्त आहे. कतार सरकारच्या निर्णयामुळे सुमारे ४० हजार नेपाळी कामगारांना नेपाळमध्ये अडकून पडावे लागणार आहे.

नेपाळने यंदाच्या वर्षी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘व्हिजिट नेपाळ इयर २०२०’ हा कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने लाखो पर्यटक नेपाळमध्ये येऊन त्याचा मोठा फायदा नेपाळच्या अर्थव्यवस्थेला होणार होता. मात्र, करोनाच्या साथीमुळे नेपाळ सरकारला हा कार्यक्रम रद्द करावा लागला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या फेब्रुवारीमध्ये नेपाळला येणा-या परदेशी पर्यटकांच्या संख्येत २१ टक्क्यांनी घट झाली आहे. पर्यटकांच्या गर्दीने कायम फुललेले असलेले थमेल हे काठमांडूतील पर्यटन केंद्र यंदा ओस पडल्याचे चित्र आहे.

हॉटेलांमधील गर्दीही आटली आहे. पर्यटकांच्या नोंदींनी जी हॉटेले खच्चून भरलेली असायची ती आता रिकामी दिसू लागली आहेत. निम्म्यापेक्षाही कमी गर्दी या ठिकाणी दिसून येत आहे. नेपाळला भेट देणा-या परदेशी पर्यटकांमध्ये चिनी नागरिकांचा सर्वात मोठा वाटा असतो. २०१९ मध्ये नेपाळला भेट देणा-या चिनी पर्यटकांची संख्या १,६९,५४३ एवढी होती. ती यंदा ३,५०,००० पर्यंत पोहोचणार होती. मात्र, ही संख्या घटल्याने नेपाळच्या पर्यटन उद्योगाने हाय खाल्ली आहे.

करोनाच्या भीतीमुळे नेपाळची देशांतर्गत विमानसेवाही कोलमडली आहे. करोनाचा एवढा वाईट परिणाम हवाई वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे की, नेपाळमधील अनेक विमानतळांवर विमाने धावपट्ट्यांवरच उभी असल्याचे चित्र आहे. मनिलास्थित आशियाई विकास बँकेच्या अंदाजानुसार करोना विषाणूमुळे नेपाळच्या देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) १३ टक्के घट होण्याची आणि १५,८८० लोकांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळण्याची शक्यता आहे.

जागतिक पटलावर करोना विषाणूचे भयंकर परिणाम नजीकच्या भविष्यात दिसून येणार आहेत. या आजारामुळे होत असलेली आणि होणारी जीवित आणि वित्त हानी कधीही भरून न निघणारी आहे. अद्याप तरी करोनावर रामबाण इलाज शोधण्यात संशोधकांना यश आलेले नाही. त्यामुळे या आपत्तीतून एकच शिकायला मिळत आहे आणि ते म्हणजे जग हे एक खेडे असून आपत्तीला कोणत्याही देशाच्या सीमारेषांचा विधिनिषेध नाही. म्हणूनच काही महिन्यांच्या आतच करोनाने अक्राळविक्राळ रुप धारण करत संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. या आजारावर मात करायचीच असेल तर सर्व देशांनी एकत्र येऊन त्यावर तातडीने उपाय शोधायला हवे. त्याशिवाय तरणोपाय नाही. या पार्श्वभूमीवर भारताच्या नेतृत्वाखाली नेपाळसारख्या दक्षिण आशियाई देशांनी एकत्र येऊन करोनाच्या संकटाला तोंड द्यायला हवे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.