Author : Dr. Gunjan Singh

Published on Oct 30, 2023 Commentaries 0 Hours ago

चीनमधील विकासाचा खालावलेला दर, वाढती विषमता, वांशिक मुद्दे अशा प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी राष्ट्रवाद किती फायद्याचा ठरेल हे येणारी वेळच सांगेल.

चीनी ‘राष्ट्रवादा’चे दुधारी शस्त्र

चीनी राष्ट्रवादाची मुळे शतकानुशतकाच्या इतिहासात रुजलेली आहेत. या इतिहासानुसार चीनचे वर्णन परकीय राष्ट्रांकडून शोषले गेलेले राष्ट्र असेच केले जाते. चीन हा एक ‘पराभूत’ आणि ‘जखमी’ राष्ट्र असल्याची कल्पना देशभक्तीपर शिक्षण, मोहिमा आणि प्रपोगंडाच्या माध्यमातून अधिकाधिक सशक्त करण्यात आली आहे. जेव्हाजेव्हा चीन सरकारला आपण अंतर्गत आणि जागतिक पातळीवर देखील असुरक्षित असल्याची जाणीव होते; तेव्हातेव्हा त्यांनी राष्ट्रवादाचा आसरा घेतल्याचे दिसून येते. प्रमुख परराष्ट्र धोरणाची दिशा ठरवताना, देशांतर्गत पाठिंबा मिळवण्यासाठी देखील राष्ट्रवादाच्या भावनेचा आधार घेतला गेला, विशेषतः जपान, तैवान आणि अमेरिकेसंदर्भात.

चीनी सरकारने १९९० साली देशभक्तीपर शिक्षणाची मोहीम सुरु केली, देशभरात उचंबळून आलेल्या राष्ट्रवादाच्या भावनेचा याच्याशी थेट संबंध जोडता येईल. १९९९ साली बेलग्रेड येथील चीनच्या दूतावासाबाहेर झालेला बॉम्बस्फोट, गुप्तचर विमानाचा अपघात, २००५ साली जापनीज पाठ्यपुस्तकाचे लेखन आणि तिबेटमधील बंड, याचीनमधील राष्ट्रवादाचा उद्रेक घडवणाऱ्या काही प्रमुख घटना आहेत.

काही विद्वानांच्या मते राष्ट्रवादाचा वापर हा इतर देशांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी आणि काही परराष्ट्रीय धोरणांची पुष्टी करण्यासाठी केला जात आहे. लिबरथल म्हणतो, “राष्ट्रवादी आंदोलने ही लोकांमध्ये असणारा खरा आक्रोश आणि तो आक्रोश वाढण्यासाठी सरकारने केलेली हाताळणी यांचा एक संगम आहे, जी नेहमी चीनी सरकारच्या वाटाघाटीच्या स्थानाला फायदेशीर ठरत आली आहे, कारण; अशा घटनेत आक्षेपार्ह पक्षाशी चर्चा केली जाते.” परंतु, काहीजण असाही दावा करतील की, चीनसाठी राष्ट्रवाद नवीन नाही. अलीकडच्या काही वर्षातील चित्र पाहता असा दावा करणे, काही पूर्णतः चुकीचे आहे असेही नाही आणि शी जिंगपिंग यांच्या नेतृत्वाखाली तर, पक्ष फार मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादाचा आश्रय घेत आहे. काही विद्वान असाही दावा करतात की, या काळात राष्ट्रवादाची भावना तिच्या अत्युच्च स्थानावर पोहोचली आहे. काही जण असेही म्हणू शकतात की, या भावनेने आता धर्माची जागा घेतली आहे.

आदर्शवादाच्या राजकीय वातावरणात चायनीज कम्युनिस्ट पक्षाला (सीसीपी) आपल्या धोरणांना जनतेचा पाठिंबा मिळावा म्हणून राष्ट्रवादाचा आधार घ्यावा लागला. आर्थिक सुधारणा आणि नव्या आर्थिक विकासाला चालना यामुळे ‘सीसीपी’ला आपल्या सत्तेला वैधता मिळवण्यात यश आले. आज सशक्त अर्थव्यवस्था आणि देशातील शांतता आणि स्थैर्य यामुळे सीसीपीला तर सत्ता चालवण्याचा परवानाच मिळाला आहे.

शी यांनी अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर असे विधान केले की, आपला पक्ष देशभक्तीचा उपासक आहे आणि हीच देशभक्ती सध्याच्या शिक्षण व्यवस्थेचा एक महत्वाचा भाग बनणे आवश्यक आहे. चीनचे स्वप्न पूर्ण करण्यातही याचा मोठा वाटा असणार आहे, तसेच देशभक्ती आणि समाजवादाची कल्पना दोन्ही एकत्र आणणे आवश्यक आहे. या कथित देशभक्तीपर शिक्षणाचा एक महत्वाचा आधार हा “संयुक्त चीन, समान हेतू असलेला देश, हा परकीय आक्रमणापुढे अधिक ताकदीने उभा राहू शकतो,” हाच आहे. विभागलेला चीन मागे पडू शकतो, ज्यामुळे दशकानुदशकांचा विकास देश गमावू शकतो आणि देशाला पुन्हा एकदा अराजकाच्या खाईत लोटले जाऊ शकते.”  सध्या चीनमध्ये एक देशभक्तीपर शिक्षण प्रणाली राबवली जात आहे, ज्याला शी यांच्या कार्यकाळात अधिक महत्व प्राप्त झाले आहे.

एका वृत्तानुसार शालेय विद्यार्थ्यांना २०१६ मधील लॉंग मार्च संबंधित, जो शी यांच्या वैचारिक नियंत्रणाचा आणि देखरेखीचा एक संकेत होता. त्याचे शोज पाहायला आणि त्यासंबंधीची भाषणे द्यायला सांगितली जातात. काही ठिकाणी पालकांना आपल्या पाल्यांनी हे शोज पहिले असल्याचे पुरावे देखील शाळेत जमा करावे लागतात. यातच भर म्हणून सध्याच्या पाठ्यपुस्तकांमध्ये सीसीपी विषयी गौरवोद्गार काढण्यात आले असून,  कन्फ्यूशियनिझमवर जास्त भर देण्यात आला आहे, सोबत चीनी लोकसंस्कृती आणि पारंपारिक वनौषधी यांच्यावरही प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

म्हणूनच, शी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नानजिंग हत्याकांडाचा ८०वा वर्धापन दिन साजरा केला आणि चीनी राष्ट्रवादाच्या भावनेचा गैरवापर करत १३ डिसेंबर २०१७ रोजी राष्ट्रीय स्मृतिदिन देखील साजरा केला.

या पार्श्वभूमीवर चीन-अमेरिकेदरम्यानच्या व्यापार-युद्धामुळे चीनमध्ये अमेरिका-विरोधी भावनेला खतपाणी मिळत आहे. टॅरिफ्स लागू झाल्यानंतर चायनीज प्रसारमाध्यमांनी कोरिअन वॉर, हेरॉइक सन्स, डॉटर्स, सरप्राईज अटॅक, यासारखी जुनी आणि अमेरिका-विरोधी चित्रपट प्रसारित केले. गेले कित्येक दशके चीनच्या प्रसारमाध्यमांनी आपल्या चॅनेलवरून हे चित्रपट प्रसारित केले नव्हते.

परंतु, अशाप्रकारे सतत राष्ट्रवादाचा आश्रय घेण्यात आता एक मोठी अडचण निर्माण झाली आहे, ती म्हणजे चीन आजघडीला दुसरी मोठी जागतिक अर्थसत्ता आहे आणि त्यांचे स्वतःचे प्रगत आणि अत्याधुनिक असे लष्कर आहे. शी यांच्या नेतृत्वाखालील चीनने “आपल्या क्षमता लपवा आणि योग्य संधीची वाट पाहा,” हे तत्व देखील गुंडाळून ठेवले आहे. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हच्या घोषणेमुळे चीनल्या आपल्या सामर्थ्याविषयी असलेला आत्मविश्वास स्पष्ट दिसतो आहे. तरीही जेंव्हा सीसीपी राष्ट्रवादाचा आधार घेते तेव्हा, ती काही प्रमुख प्रश्न उपस्थित करते. तरीही चीन आपले “शोषिततेचे” नाटक खेळणे बंद करत नाही आणि त्यांना जेव्हाजेव्हा वाटेल की आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्यावर टीका होत आहे, तेंव्हा तेंव्हा ते राष्ट्रवादाचा आधार घेतात. या संदर्भातील हल्लीचे उदाहरण म्हणजे डारील मोरे यांच्या हॉंगकॉंग येथील निदर्शनांना पाठिंबा देणारे ट्विटनंतर एनबीए आणि चीनमधील संबंध दुरावले होते.

अशा प्रकारच्या कृतीमुळे गेली ७० वर्षे सत्तेत असून देखील चीन सरकार हे सतत टीकाकारांच्या भीतीने आणि वेडसरपणाने ग्रासलेले आहे, अशा प्रकरच्या विधानांना पाठबळ मिळते. चीन सातत्याने आपल्या सीमा ओलांडत असतो आणि जेंव्हा काही गोष्टी त्यांच्या मनासारख्या होत नाहीत तेंव्हा ते संतापतात. चीनचा अधिकाधिक विकास होत जाईल आणि जागतिक अर्थव्यवस्थेत त्यांचा समावेश केला जाईल तसतसे त्याने अधिकाधिक जबाबदार बनले पाहिजे आणि आपल्यावरील टीका हाताळताना सामंजस्य दाखवले पाहिजे.

थोड्या कालावधीत पाठिंबा मिळवण्यासाठी पक्षाला राष्ट्रवादाची मदत होईल परंतु, प्रमुख संरचनात्मक समस्याचे निराकरण होणे आवश्यक आहे. कारण दीर्घकाळासाठी हाच राष्ट्रवाद पुन्हा पक्षाच्या दिशेनेच वापरला जाऊ शकतो. यापूर्वीच्या बेलग्रेड बॉम्बिंग, गुप्तचर विमानाचे अपहरण यासारख्या घटनेत अतिप्रमाणातील राष्ट्रवादाची अभिव्यक्ती करण्यात आली याचे समर्थन होऊ शकते. यामुळे चीनला काही तोटे देखील झाले. परंतु, सध्याच्या काळातील वाढता राष्ट्रवाद आणि त्याचा वापर मात्र नकारात्मक वाटतो आहे.

अशा कृती जर चीनच्या आक्रमक व्यवहाराशी जोडल्या गेल्या तर पक्ष आणि सरकारच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतात. अजूनही पक्ष स्वतःला इतका असुरक्षित का समजतो आणि ते लोकांचे लक्ष्य आणि त्यांची ताकद मुख्य मुद्द्यापासून इतरत्र भरकटवू इच्छितात का?

विकासाचा खालावलेला दर, आर्थिक सुधारणांची गरज, चीनच्या अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक बदल, अर्थव्यवस्थेतील एसओइसारख्या सुधारणा, वाढती आर्थिक विषमता, वांशिक मुद्दे? यासारख्या मुद्द्यांवर पक्षाने लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. यासारख्या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी राष्ट्रवाद किती फायद्याचा ठरू शकतो हे येणारी वेळच सांगेल. जर पक्ष आर्थिक विकास आणि तैवानसारख्या मुद्द्यावर देशाची एकात्मता टिकवण्यात अपयशी ठरला तर, हा राष्ट्रवाद जो पक्षाने पोसला आहे, तो त्यांच्याच विरोधात वापरला जाईल.

हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.