Published on Aug 16, 2021 Commentaries 0 Hours ago
‘ब्रिक्स’कडून भारताच्या अपेक्षा काय?

डॉ. समीर सरन, डॉ. सचिन चतुर्वेदी, प्रिय मित्रांनो,

१. ब्रिक्स संघटनेने यंदा १५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. मानवी आयुष्याच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास हे तारुण्य असते. ज्या टप्प्यावर आपल्या विचारांना बऱ्यापैकी आकार आलेला असतो. जगाबद्दलचा एक ठोस दृष्टिकोन तयार झालेला असतो. जबाबदाऱ्यांचे भानही आलेले असते. अशा नाजूक टप्प्यावर ब्रिक्सचे नेतृत्व भारताकडे आलेले आहे.

२. सध्याच्या जागतिक व्यवस्थेच्या दृष्टीने विचार केल्यास हा संदर्भ जास्त महत्त्वाचा आहे. महामारीने समाजाला व अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त केले आहे, हे दिसतेच आहे. ही परिस्थिती आव्हानाबरोबरच संधी घेऊन आलेली आहे. ब्रिक्स संघटनेच्या सदस्य देशांची भूमिका, कल्पना, धोरणे व रणनीतीमधील योगदान आताच्या इतके स्पष्टपणे कधीच दिसले नव्हते.

३. ब्रिक्सचा जन्म ही मुळात काळाची गरज होती. युद्धानंतरच्या परिस्थितीत जगाची रचनाच बदलून गेली होती. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांनी विकासाच्या नव्या चौकटी तयार करण्यासाठी पुढे येणे आवश्यक होते. आपल्यापैकी प्रत्येक देशासाठी आपापले अनुभव शेअर करण्याची, सहकार्याची आणि अर्थातच, केवळ दक्षिणकडील जगात अडकून न पडता अधिक व्यापक होण्याची एक संधी होती. वर्चस्ववाद हा क्षणिक असेल हे शीतयुद्धाच्या शेवटी आपल्याला कळून चुकले होते. ब्रिक्स हा विविधतेच्या शोधाला मिळालेला प्रतिसाद होता; अनेकार्थांनी बहुध्रुवीयतेचा अचूक अंदाज होता.

४. साहजिकच, राजकीय आणि आर्थिक, शैक्षणिक आणि संस्थात्मक, सामाजिक आणि सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात विकेंद्रीकरण आणि वर्चस्ववादाला विरोध ही दोन तत्वे ब्रिक्सच्या डीएनएमध्ये आहेत, हे आपण विसरता कामा नये. स्वातंत्र्य आणि परस्पर सहकार्याच्या याच भावनेतून भारताने ब्रिक्सच्या स्थापनेत सहभाग घेतला. ब्रिक्सची भविष्यातील वाटचाल याच विचारांवर होईल, इतकेच नव्हे २१ व्या शतकातील पुढील दशकांमध्ये जागतिक पातळीवर ते एक उदाहरण ठरेल, असा आम्हाला विश्वासा आहे. ‘ब्रिक्स’ हे विविधिता आणि अनेकत्वाचे महत्त्व अधोरेखित करणारे जागतिक फेररचनेचे नवे मॉडेल आहे.

५. ब्रिक्सचे भारताचे अध्यक्षपद चार स्तंभावर आधारलेले आहे. बहुपक्षीय व्यवस्थेत सुधारणा, दहशतवादविरोधी सहकार्य, शाश्वत उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी तंत्रज्ञान आणि डिजिटल उपाययोजना आणि माणसा-माणसातील सहकार्याला चालना हे ते चार स्तंभ आहेत. हे स्तंभ अमूर्त आणि चिरंतन वाटू शकतात, मात्र हे स्तंभ जागतिक वास्तवाला भिडणारे असून त्या प्रत्येकाला स्वत:चा असा स्पष्ट अर्थ आहे.

६. दुसऱ्या जागतिक युद्धानंतरच्या बहुपक्षीय रचनेतील सुधारणा आणि पुनर्मूल्यांकन आता आणखी लांबणीवर टाकले जाऊ शकत नाही. १९४० च्या दशकातील समस्या सोडवण्यासाठी उभारण्यात आलेल्या संस्थांमध्ये आता अमूलाग्र सुधारणा घडवून आणणे गरजेचे आहे. या संस्था आजच्या शतकातील समस्यांना भिडण्याची क्षमता असणाऱ्या हव्यात, याची जाणीव करोना महामारी आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीने आपल्याला कठोरपणे करून दिली आहे.

७. जागतिक सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यांची संख्या वाढवणे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. मात्र, केवळ तेच पुरेसे नाही. संरचनात्मक शैथिल्य, स्पर्धात्मक कोंडी, विषम स्त्रोत आणि तिरकस मते हे बहुपक्षीय संस्थाचा दोष असतात. प्रादेशिक गटांच्या आणि बहुपक्षीय अशा नवनव्या आणि छोट्या संघटना पुढे येणे ही याच दोषांची परिणती आहे. ‘ब्रिक्स’ हा खरं तर याचा खूप आद्य अवतार म्हणावा लागेल. बऱ्याचदा आपण एखाद-दुसऱ्या गोष्टीचा ध्यास घेऊन काम करू लागतो, पण प्रत्यक्षात मतभेदांची दरी सांधण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न आणि कृतीची गरज असते.

८. दहशतवाद हा अशाच मोकळ्या जागा भरत असतो. मतभेदांमुळे आलेला दुरावा हेरून काही कुख्यात लोकांकडून किंवा देशांकडून कट्टरतावाद पोसला जातो. अफगाणिस्तानात सध्या होत असलेले स्थित्यंतर आणि तेथील जनतेवर पुन्हा लादल्या जात असलेल्या युद्धामुळे दहशतवादाचे आव्हान अधिक खडतर झाले आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास त्याची झळ केवळ अफगाणिस्तानच्या शेजारी देशांनाच नव्हे तर जगातील इतर देशांनाही बसणार आहे. त्यामुळेच आपण सगळे संबंधित देश दहशतावादाला स्पष्ट, अधिक समन्वयी पद्धतीने व एकजुटीने उत्तर देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. सामूहिक हिंसाचार, दडपशाही आणि छुपा अजेंडा राबवून आजच्या २१ व्या शतकात कोणीही कायदेशीर मान्यता मिळवू शकत नाही. प्रतिनिधित्व, सर्वसमावेशकता, शांतता आणि स्थैर्य यांचे नाते अतूट आहे.

९. नवनवे तंत्रज्ञान, विशेषत: डिजिटल तंत्रज्ञान आणि अफाट क्षमता असलेले इंटरनेट या बाबी मानवी प्रयत्नांची ताकद कित्येक पटीने वाढवतात. हे तंत्रज्ञान कट्टरतावाद्यांची आणि अपप्रचाराची साधनेही बनू शकतात हे आपण अनुभवातून शिकलो आहे. आमच्यासाठी डिजिटल साधने साथीच्या रोगाचा मुकाबला करण्याच्या दृष्टीने खूपच अनमोल ठरली आहेत. या तंत्रज्ञानामुळे कोविड महामारीच्या दीड वर्षांच्या काळात कॉण्टॅक्ट ट्रेसिंग, लस वितरण, ऑनलाइन आणि मोबाइल आधारित रोग निदान तसेच गरजू घटकांपर्यंत आरोग्य सुविधा पुरवण्याचा वेग कमालीचा वाढला आहे. ८० कोटी लोकांपर्यंत अन्नधान्य पुरवणे असो किंवा ४० कोटी लोकांच्या खात्यात रोख रक्कम जमा करणे असो, डिजिटल तंत्रज्ञानामुळे हे सगळे सुलभ झाले आहे. ऑनलाईन शिक्षणामध्ये झालेली वाढ देखील लक्षणीय आहे.

१०. महामारीची लाट ओसरल्यानंतरही यातील बरेच अनुभव आपल्याला उपयोगी पडणार आहेत. उदाहरणार्थ, शाश्वत विकासाची उद्दिष्टे समजून घेण्यात हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे. करोनाच्या महामारीने एकंदर आर्थिक वाढीला फटका बसला आहे आणि शाश्वत विकासाच्या उद्दिष्ट पूर्तीसमोर आव्हान निर्माण केले आहे. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी आता तंत्रज्ञानाचीच मदत होणार आहे. या बाबतीत भारत प्रचंड आशावादी असून गेल्या काही वर्षांमध्ये भारताने ज्या तंत्रज्ञानाचा वापर केला, नावीन्यपूर्ण प्रयोग केले आणि जे काही भारताला शिकायला मिळाले ते सहकाऱ्यांशी शेअर करायला भारत तयार आहे.

११. शेवटी, आपल्या लोकांकडे येतो. ‘ब्रिक्स’कडे किंबहुना आपल्या व्यापक विकासाच्या उपक्रमातील सहकारी असलेल्या देशांकडे येतो. गेल्या काही वर्षांनी आपल्यापैकी बर्‍याच जणांना आर्थिक मॉडेलच्या मर्यादांबाबत सजग केले आहे. कार्यक्षमता आणि दर निश्चिती प्रक्रिया ही लोकांच्या आणि समाजाच्या किंवा खरेतर लोकांची उपजीविका आणि शाश्वत विकासाच्या विरोधी आहेत असेच या मॉडेलमध्ये गृहित धरलेले असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले मानव केंद्रीत जागतिकीकरणाचे आवाहन हे केवळ महामारीमुळे विस्कटलेल्या सामाजिक घडीच्या अनुषंगाने नव्हते तर व्यापक पातळीवरील असमानतेला भिडणारे होते. कोविड महामारीच्या लांबत चाललेल्या संकटाच्या काळात लोक, कुटुंब आणि सामाजिक हित या गोष्टी जागतिक बदलापासून वेगळ्या काढल्या जाऊ शकत नाहीत.

१२. फार्मास्युटिकल उद्योगातील बौद्धिक संपदा कायदा आणि सार्वजनिक आरोग्य उद्दिष्टांची पूर्तता यांच्यातील असमतोल हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास आणि आधीच्या पद्धतीने हे सगळे सुरू राहिल्यास साथीच्या रोगांचे उच्चाटन होण्यास कितीतरी वर्षे उशीर होईल. हे कदापि परवडणारे नाही. परंतु आरोग्याच्या पलीकडे जाऊन या महामारीने जगाला एक मोठा आर्थिक धडा घालून दिला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अधिक आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी, किंबहुना भविष्यातील साथीच्या आजारांपासून अर्थव्यवस्थेला मुक्त ठेवण्यासाठी अधिक विश्वासार्ह आणि लवचिक पुरवठा साखळी तयार करणे हे महत्त्वाचे आहे. दक्षिणेकडचे जग त्या बाबतीत अधिक असुरक्षित आहे. कुटुंबाच्या व समाजाच्या उपजीविकेची आणि अर्थातच नैसर्गिक पर्यावरणाची काही प्रमाणात शाश्वती मिळावी यासाठी गुंतवणुकीत वैविध्य असणे आवश्यक आहे.

१३. गेल्या वर्षभरात ब्रिक्स अकॅडेमिक फोरममध्ये अनेक विद्यापीठातील आणि थिंक टँकमधील विद्वानांनी जागतिक आरोग्य, भविष्यातील कार्यसंस्कृती, हवामान बदल, जागतिक आर्थिक पुनरुज्जीवन, हरित ऊर्जा, व्यापार, डिजिटल सार्वजनिक वस्तू आणि महिलांच्या नेतृत्वाखालील आर्थिक वाढ अशा अनेक विषयांवर सांगोपांग चर्चा केली आहे. ही परिषद समृद्ध विचारमंथन आणि बौद्धिकतेचे प्रतीक आहे. ब्रिक्सला अधिक प्रभावी आणि जगाला अधिक सुरक्षित करू शकतील अशी धोरणे आगामी काळात पुढे येथील अशी मी अपेक्षा करतो. या दोन्ही आकांक्षा परस्परांना पूरक आहेत. सर्व क्षेत्रांमधील जागतिक शांतता ही ‘ब्रिक्स’च्या क्षमतांमध्ये भर टाकणारी ठरणार आहे. आणि ब्रिक्सची वाढलेली क्षमता निश्चितच जागतिक कल्याणामध्ये योगदान देत राहील.

म्हणून मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो आणि उर्वरित परिसवांदासाठी शुभेच्छा देतो.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.