Author : Prithvi Iyer

Published on May 28, 2020 Commentaries 0 Hours ago

मोबाईलसारख्या यंत्रांवर नको तितके अवलंबून राहिल्याने, निर्माण झालेले मानसिक ताण कमी करण्यासाठी पुन्हा तंत्रज्ञानाचाच आधार घ्यावा का? हा यक्षप्रश्न आहे.

माणसाच्या मनाचेही ‘डिजिटलायझेशन’?

‘कोव्हिड-१९’ या आजाराशी लढण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सखोल परिणाम जसा आपल्या जगण्यावर झाला, तसाच तो आपल्या एकमेकांशी असलेल्या संवादावर झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात एकमेकांमधील संवादासाठी, माहिती मिळवण्यासाठी आणि कार्यालयीन कामकाजासाठी आपण इंटरनेटवर अवलंबून राहू लागलो. त्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम झाला. या काळात लोक अधिकाधिक वेळ इंटरनेटवर जसे घालवू लागले, तसे इंटरनेट आणि कम्प्युटरच्या पडद्यामुळे होणारे परिणाम लक्षात येऊ लागले. या सगळ्याचा मानसिक आरोग्यावर  प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्या बाबत प्राधान्याने विचार होण्याची गरज निर्माण झाली आहे.

कम्प्युटरचा वापर केल्यामुळे मनःस्थिती (मूड) सतत बदलत असेल, तर त्यातून मानसिक आरोग्याचे मापन करता येऊ शकते किंवा मागोवा घेता येऊ शकतो. मूड म्हणजे मनामध्ये येणाऱ्या सकारात्मक किंवा नकारात्मक भावना. या मूडच्या किंवा मनःस्थितीच्या स्वयं-व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा पर्याय किती कार्यक्षम ठरू शकतो, याची तपासणी करणे आज महत्त्वपूर्ण बनले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मानसिक आरोग्य यांचा मेळ घातला, तर मनःस्थितीचा मागोवा घेणे शक्य होईल. अमेझॉन आणि गुगलसारख्या तंत्रज्ञानासंबंधीच्या मोठ्या कंपन्यांना या विषयावर काम करण्याची इच्छा आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून विचारपद्धतीवर लक्ष ठेवून असलेली या क्षेत्रातील प्रमुख प्रणाली म्हणजे ‘माइंडस्ट्राँग.’ या प्रणालीला सी मालिकेत (सी सीरिज) स्थान मिळाले असून, त्यासाठी दहा कोटी डॉलरचा निधीही उपलब्ध झाला आहे. जेफ बेझोस यांची व्हेंचर कॅपिटल कंपनी ही या प्रणालीतील प्रमुख गुंतवणूकदार आहे. अशा पद्धतीने वेगाने वाढणाऱ्या या क्षेत्रात अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीतील उद्योजकांनी रस दाखवला आहे. ‘कोव्हिड-१९’च्या संदर्भाने पाहिले, तर अशा पद्धतीच्या प्रणालीचे महत्त्व अधिक वाढलेले दिसते. त्यामुळे याच काळात या प्रणालीचा संभाव्य लाभ आणि त्यातील धोके तपासून पाहाणे, औचित्यपूर्ण ठरेल.

‘मूड ट्रॅकिंग’ म्हणजे काय?

मानसिक आरोग्याच्या स्वयं-व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाच्या साह्याने पर्याय उपलब्ध करून देता येऊ शकतो, या विचारातून मनःस्थितीचा मागोवा घेणाऱ्या प्रणालीची निर्मिती झाली. मनःस्थितीचा मागोवा घेणाऱ्या प्रणालींचा मानसिक स्वास्थ्य मिळवण्यासाठी स्वतःच नियमन करण्यासाठी चांगला उपयोग झाला असल्याचे प्राथमिक संशोधनातून स्पष्ट झाले आहे. मानसिक आरोग्यासाठीच्या उपाययोजनांसाठीचे हे एक महत्त्वपूर्ण सुधारित पाऊल मानले जात आहे.

बहुतांश प्रणाली या वापर करणाऱ्यांनी स्वतः दिलेल्या माहितीवर अवलंबून असतात. उपचारादरम्यान मनःस्थितीची माहिती देणाऱ्या नोंदी उपयोगी पडतात. अशा पद्धतीच्या प्रणालीमध्ये साधारणतः वापर करणाऱ्यांनी त्याच्या मनःस्थितीची माहिती रोजच्या रोज नोंद करून ठेवणे आवश्यक असते. माहितीबद्दलचा विश्वास आणि अचूकता हे मनःस्थितीच्या नियमित नोंदींवर अवलंबून असते. मनःस्थितीसंबंधातील प्रणाली एकूण मानसिक आरोग्य आणि विशिष्ट आजार या दोहोंवरही लक्ष ठेवून असते.

मनःस्थितीवर नजर ठेवून असलेल्या काही अॅप्लिकेशन्सना वापर करणाऱ्यांच्या मनःस्थितीच्या नोंदींची आवश्यकता नसते. ही अॅप्लिकेशन्स त्यासाठी स्वतःचेच तंत्रज्ञान वापरतात.

चेहऱ्यावरच्या भावांमधील बदलांचे विश्लेषण, संबंधित व्यक्ती मोबाइल फोनचा वापर कसा करते, म्हणजे मोबाइल फोनवर एखादी गोष्ट शोधणे-क्लिक करणे याचा वेध घेऊन त्याचे विश्लेषण करते. अशा पद्धतीच्या काही जैविक मापकांच्या आधारे मानसिक आरोग्याचा वेध घेतला जातो आणि अंदाजही बांधला जातो. लॅपटॉपचा वापर कसा केला जातो, यावरून काही स्वयंचलित ‘मूड ट्रॅकर’ दिवसभरातील मनःस्थितीचा वेध घेतात आणि वापरकर्त्यांना निष्कर्षाप्रत जाण्यासाठी मनःस्थितीचे मूल्यांकन करून देतात आणि त्यांची मनःस्थिती कशामुळे बदलत आहे, याची माहितीही देतात.

अशा पद्धतीच्या स्वयंचलित ‘मूड ट्रॅकर’संबंधीचे संशोधन अद्याप पहिल्या टप्प्यात आहे. अर्थात तरीही, या क्षेत्रातील संशोधक अशा प्रणालींसंबंधात आशादायक आहेत. मानसिक आरोग्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराचे लाभ आणि त्यातील कमतरता तपासून घेण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले आहे.

‘मूड ट्रॅकिंग’चे उपयोग

‘मूड ट्रॅकिंग’ अॅप्लिकेशन्सचा सर्वांत मोठा उपयोग म्हणजे या माध्यमातून स्वतःच्या मानसिक आरोग्यावर स्वतःच सक्षमतेने लक्ष ठेवता येते. वापर करणारा इंटरनेटचा वापर ज्या प्रकाराने करतो, त्यावर त्यांच्या मानसिक आरोग्याची स्थिती ठरते. हे अॅप्लिकेशन अयोग्य वापरासंबंधात वापरकर्त्याला जाणीव करून देऊन मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक ते बदल करण्यासही उद्युक्त करते. मात्र, वापरकर्त्याने स्वतःच नोंदी ठेवून आणि मनःस्थितीतील बदलांसंबंधात सातत्याने माहिती ठेवून आपल्या मनःस्थितीवर लक्ष ठेवले, तर ते उपयुक्त ठरू शकते.  परंतु ज्यांच्याकडे आपल्या मानसिक आरोग्यावर देखरेख ठेवायला वेळ नाही किंवा तेवढी शक्तीही नाही, त्यांच्यासाठी स्वयंचलित अॅप्लिकेशन्स उपयुक्त ठरू शकतात.

‘मूड ट्रॅकिंग’ अॅप्लिकेशन्स वापरणाऱ्यांकडून त्याच्या वापरासंबंधीची माहिती घेतली असता, या प्रणालींचा त्यांना मानसिक आरोग्यासाठी कसा परिणामकारक उपयोग झाला आणि आनंदी राहण्यासाठी वर्तनामध्ये कशा सुधारणा करता आल्या, हे समजते. मानसिक आरोग्यासाठी स्व-व्यवस्थापन करण्याबरोबरच अशी अॅप्लिकेशन्स उपचारांमध्येही फायदेशीर ठरतात. आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तिंनी स्वतःच्या मनोवस्थेवर सातत्याने लक्ष ठेवावे, असे मानोविकारतज्ज्ञांना वाटत असते. त्यामुळे अशी अॅप्लिकेशन्स त्यांच्या उपचारांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे दिसून आले आहे.

भारतासारख्या देशात मानसिक आरोग्य हा विषय नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. अशा ठिकाणी मानसिक आरोग्यविषयक काळजीचे महत्त्व सर्वसामान्य स्तरावर पोहोचण्यासाठी काही अंशी ही अॅप्लिकेशन्स मदत करू शकतात. भारतात काही लोक सामाजिक कलंकाच्या भीतीने उपचार करून घेण्यास धजावत नाहीत, अशांसाठी ही अॅप्लिकेशन्स स्वतःच्या मनःस्थितीवर स्वतःच लक्ष ठेवण्यासाठी आणि स्वतःविषयीच्या जाणिवा वाढविण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. ज्या व्यक्ती मनोविकारतज्ज्ञाकडे जाण्यास उत्सुक नसतात, अशा अनेकांसाठी ते परिणामकारक ठरू शकते.

मानसिक स्वास्थ्यासाठी उपचार मिळवणे तुलनेने जेवढे अवघड असते, तेवढेच स्मार्टफोन उपलब्ध होणे सुलभ असते. भारतातील मानसिक आरोग्य व्यवस्थेवर आलेला भार कमी करण्यासाठीही या अॅप्लिकेशन्सचा उपयोग होऊ शकतो, म्हणूनच त्याचा अधिक विचार करायला हवा. अर्थात, ही अॅप्लिकेशन्स उपचाराची जागा घेऊ शकत नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे. आधी सांगितल्यानुसार ती उपचार करताना प्रभावशाली ठरू शकतात. सामाजिक कलंकाच्या किंवा सामाजिक नकाराच्या भीतीने जे उपचार घेण्यास कचरतात, त्यांना या अॅपमुळे किमान स्वतःच्या मनःस्थितीतील बदलांवर देखरेख ठेवता येते आणि एवढे केले, तरी मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.

भविष्यातील धोके आणि आशा

अलीकडील काळात माहिती फुटण्यासंबंधातील काही प्रकरणे बाहेर आली आहेत. यामुळे अनेक जण खासगी माहिती देण्यास तयार होत नाहीत. ‘मूड ट्रॅकिंग’ करणारी काही अॅप्स वापरकर्त्याचा खासगीपणा अबाधित राखण्यासाठी तंत्रज्ञानात सुधारणा करीत आहेत. मात्र, काही अॅपमुळे पारदर्शकता आणि परवानगीच्या मुद्द्यावर शंका घ्यायला जागा आहे. खासगीपणाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले गेले असले, तरी अशा अॅप्लिकेशन्ससंबंधात आणखीही काही धोके आहेत. त्या धोक्यांमुळे त्यांची उपयुक्तता कमी होते. त्यामुळे त्याविषयी विचार करणे जरुरीचे आहे.

ही अॅप्लिकेशन्स वापरताना विचारात घ्यावा, असा काळजीचा एक मुद्दा म्हणजे, ‘हॉथर्न इफेक्ट.’ याचा अर्थ, जेव्हा आपल्यावर कोणी लक्ष ठेवून आहे, असे वाटत असते, तेव्हा आपोआप आपल्या वर्तनामध्ये एकप्रकारचा अवघडलेपणा येत असतो. संबंधित अॅप्लिकेशन आपल्या चेहऱ्यावरील हावभाव किंवा भावनिक प्रतिक्रिया टिपते आहे, याची जाणीव जेव्हा असते, तेव्हा संबंधित वापरकर्त्याच्या नैसर्गिक भावनांच्या प्रकटीकरणावर प्रभाव पडू शकतो.

‘मूड ट्रॅकर’ अॅप्लिकेशन्समध्ये प्रातिनिधिक तत्त्वांचा अभाव असल्याने त्यांचा वापर व्यापक स्तरावर करणे अवघड बनले आहे.भावनांची अभिव्यक्ती करण्याच्या पद्धती सामाजिक व सांस्कृतिक स्तरावर अवलंबून असतात, असे संशोधनातून दिसून आले आहे. काही भावना या साधारणतः सारख्याच पद्धतीने व्यक्त होत असल्या, तरी सांस्कृतिक पार्श्वभूमीनुसार काही भावनांच्या छटा गडद अथवा पातळ असू शकतात. त्यामुळे या अॅप्लिकेशन्सचा वापर जागतिक पटलावरवेगवेगळ्या सामाजिक स्तरांमध्येकरता येण्यासाठी भावनिक स्थित्यंतरे टिपणाऱ्या प्रणालीस विविध समाजाची सांस्कृतिक माहिती पुरवली पाहिजे. मात्र, यासंबंधीचे संशोधन अद्याप प्राथमिक टप्प्यातच असल्याने भावनिक बदलांचा वेध सांस्कृतिक भिन्नतेच्या दृष्टिकोनातून घेतला जात असेल का, यासंबंधी अस्पष्टता आहे.

निष्कर्ष

‘कोव्हिड-१९’ साथरोगामुळे डिजिटल संवादावर भर दिला जातो. त्यामुळेइंटरनेटवर अधिक वेळ खर्च होत असल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ‘मूड ट्रॅकर’ अॅप्लिकेशन्ससंबंधात चर्चा वाढत आहे आणिकोरोनोत्तर जगामध्ये त्यांच्या संभाव्य फायद्यावरही चर्चा सुरू आहे.

या अॅप्लिकेशन्सच्या कार्यक्षमतेविषयीचे दुमत हा एक विरोधाभास आहे. यंत्रांवर नको तितके अवलंबून राहिल्याने समस्या निर्माण झाली असताना मानसिक ताण कमी करण्यासाठी पुन्हा तंत्रज्ञानाचाच आधार घ्यावा का?  तंत्रज्ञान हेच मानसिक समस्येचे मूळ आहे, मग त्यावर तंत्रज्ञान हाच तोडगा असणार का, अशा प्रश्नांची उत्तरे शोधणे अवघड आहे. मात्र, मानसिक आरोग्यावर ‘मूड ट्रॅकर’ अॅप्लिकेशन्सचा वापर हा मानसिक आरोग्यासाठी भविष्यातील आशेचा किरण ठरू शकेल.  तंत्रज्ञानामुळे किमान स्थिती अधिक बिकट होण्याऐवजी स्थिती सुधारायला मदत होऊ शकेल, हीच अपेक्षा!

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Prithvi Iyer

Prithvi Iyer

Prithvi Iyer was a Research Assistant at Observer Research Foundation Mumbai. His research interests include understanding the mental health implications of political conflict the role ...

Read More +