Published on Apr 18, 2019 Commentaries 0 Hours ago

भारत आणि रवांडा यांनी कृषी, माहिती तंत्रज्ञान, आरोग्यसेवा आणि पर्यटन अशा क्षेत्रात सहकार्य केल्यास दोघांनाही फायदा होईल.

रंवांडांमध्ये भारताला गुंतवणूकसंधी

गेल्या काही वर्षांपासून भारत आणि रवांडा या दोन देशांचे परस्पर संबंध सातत्याने वाढत चालले आहेत. १९९९ मध्ये रवांडाने दिल्लीमध्ये आपला राजनैतिक दूतावास सुरू केला आणि २००१ मध्ये आपला पहिला राजदूत भारतात पाठवला. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये सातत्याने उच्चस्तरीय भेटीगाठी घडत आल्या आहेत. या संबंधांना मोठी गती मिळाली, ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या वर्षीच्या रवांडा भेटीने. रवांडाला भेट देणारे ते भारताचे पहिले पंतप्रधान ठरले.

या भेटीत मोदींनी रवांडाला २०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची मदत जाहीर केली आणि त्याचप्रमाणे तिथल्या नरसंहाराची झळ बसलेल्या नागरिकांना २०० गाईसुद्धा भेट दिल्या. पंतप्रधानांच्या या भेटीच्या दरम्यानच भारत सरकारने किगालीमध्ये आपल्या पूर्णवेळ दूतावासाचे उद्घाटन केले. आजमितीस भारत आणि रवांडा यांच्यामधले व्यापारी संबंध आणि परस्पर गुंतवणूक फारशी मोठी नाही. किगालीमधला भारतीय दूतावास या क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावेल अशी अपेक्षा आहे.

सध्या तरी रवांडासोबतचे भारताचे परस्पर व्यापारी संबंध फारसे घनिष्ठ नसले तरी, भारतीय कंपन्यांनी पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान, कृषी, आरोग्यसेवा आणि शिक्षण क्षेत्रात बऱ्यापैकी शिरकाव केला आहे. आफ्रिकेमधल्या अन्य देशांच्या तुलनेत रवांडा मध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण असल्याने या व्यापारी संबंधांमध्ये वाढ होण्यास भरपूर वाव आहे. रवांडा सरकारची देशांतर्गत धोरणे सकारात्मक आहेत.

रवांडामधील सरकारने आपल्या कारभारावर चांगली पकड बसवली आहे. आपली धोरणे राबवण्याबाबत आणि कोणताही भ्रष्टाचार खपवून न घेण्याबाबत विद्यमान सरकारची राजकीय इच्छाशक्ती सुद्धा मजबूत आहे. कोणत्याही नव्या व्यावसायिक उपक्रमाला सरकारकडून इतके चांगले प्रोत्साहन मिळते आहे, कोणत्याही नव्या कंपनीला काही तासांच्या आत आपली नोंदणी करता येते. इतकेच नव्हे तर नोंदणीची आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्या व्यावसायिकाला रवांडामध्ये स्वत: येणेही बंधनकारक नाही. कारण की, हे काम आता ऑनलाइन सुद्धा करता येते आहे. आफ्रिकेतल्या अन्य देशांच्या तुलनेत रवांडामधली सुरक्षा आणि सुव्यवस्था अतिशय उत्तम आहे, त्यामुळे संपूर्ण आफ्रिका खंडामध्ये व्यावसायिक गुंतवणुकांच्या दृष्टीने रवांडाला प्राधान्याचे स्थान प्राप्त झाले आहे.

कृषी, माहिती तंत्रज्ञान, आरोग्यसेवा आणि पर्यटन या चार महत्त्वाच्या क्षेत्रात भारत आणि रवांडा यांच्यात व्यावसायिक देवाण – घेवाणीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. रवांडा हा देखील प्रामुख्याने कृषिक्षेत्रावर अवलंबून असलेला देश असल्याने त्यामध्ये भारतीय कंपन्यांना मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीला वाव आहे. जैन इरिगेशन ही भारतामधली जलसिंचन क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी रवांडामध्ये कित्येक प्रकल्पांमध्ये सहभागी झालेली आहे. आफ्रिका खंडामधल्या कंपनीच्या कार्यक्षेत्राचे संचालन सध्या रवांडामधूनच केले जाते आहे.

माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सुद्धा भारतीय कंपन्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत. कारण की, अन्य देशांच्या तुलनेत भारतीय कंपन्यांनी या क्षेत्रात चांगलीच प्रगती साधलेली आहे. त्याचप्रमाणे अनेक इंजिनीअर्स रवांडामधल्या सरकारी आणि खासगी कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत.

रवांडामधून शिक्षणासाठी भारतात येऊन इथल्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा मोठी आहे त्याचप्रमाणे अनेक भारतीय प्राध्यापक रवांडामधल्या विद्यापीठांमध्ये शिकवण्यासाठी जात असतात. कृषी आणि माहिती तंत्रज्ञानाच्या व्यतिरिक्त, आरोग्यसेवांच्या क्षेत्रात देखील दोन्ही देशांना सहयोगाच्या अनेक संधी आहेत. भारतात मिळणाऱ्या उत्तम आरोग्यसेवा अन्य विकसित देशांच्या तुलनेत अतिशय स्वस्त आहेत, त्यामुळे याचा फायदा भारतातल्या आरोग्यक्षेत्राला मोठ्या प्रमाणावर मिळू शकतो.

अपोलो आणि फोर्टिस सारख्या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल चेन्स रवांडाहून येणाऱ्या रुग्णांना आधीपासूनच आरोग्यसेवा पुरवत आहेत. तरीही यात भरपूर वाढ होण्यास पुष्कळ वाव आहे. त्याचप्रमाणे भारतातली काही तज्ज्ञ डॉक्टर मंडळी मेडिकल कॅम्पच्या निमित्ताने रवांडामध्ये जाऊन तिथल्या रुग्णांना परवडेल अशा मानधनात आरोग्य विषयक चिकित्सा आणि सल्ला पुरवत आहेत. तसेच रवांडामधले अनेक उमदेवार डॉक्टर भारतात ट्रेनिंगला येतात. मात्र या देवाण – घेवाणीत चांगली वाढ होऊ शकेल अशा पुष्कळ पोषक संधी उपलब्ध झाल्या आहेत.

कृषी, माहिती तंत्रज्ञान, आरोग्यसेवा आणि पर्यटन या चार महत्त्वाच्या क्षेत्रात भारत आणि रवांडा यांच्यात व्यावसायिक देवाण – घेवाणीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. रवांडा हा देखील प्रामुख्याने कृषिक्षेत्रावर अवलंबून असलेला देश असल्याने त्यामध्ये भारतीय कंपन्यांना मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीला वाव आहे.

जरी रवांडा हा देश “The land of a thousand hills’ या नावाने प्रसिद्ध असला आणि पर्यटनाद्वारे देशाला सर्वात जास्त परकीय चलन प्राप्त होत असले तरी तिथले पर्यटनक्षेत्र मात्र अजूनही तितकेसे विकसित नाही. रवांडाला पर्यटकांची गर्दी होण्याचे खास कारण ठरते आहे ते तिथले समृद्ध असे वन्यप्राणी जीवन. रवांडामध्ये आढळणारी माउंटेन गोरिला ही प्रजाती जगभरात प्रसिद्ध आहे, अर्थात सध्या तरी या प्रजातीवर लुप्तप्राय होण्याचे सावट आहे.

रवांडाला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या मोठी असल्याने आणि त्यात सातत्याने वाढ होत असल्याने, त्याचा फायदा रवांडाला होतोच आहे. रवांडा एअर कंपनीने किगाली ते मुंबई दरम्यान आठवड्याला चार थेट विमानसेवा पुरवण्यास सुरुवात केलेली असल्याने भारतीयांना आता रवांडाला भेट देणे आणखी सुविधेचे आहे. भारतीय नागरिकांना किगाली आंतरराष्ट्रीय विमानतळावर तत्काळ व्हिसा मिळण्याची सोय असल्यामुळे आणि पर्यटकांना चांगली हॉटेल्स उपलब्ध होत असल्यामुळे भारतीय पर्यटकांच्या संख्येत गेल्या काही काळात चांगलीच वाढ झाली आहे. परंतु अजूनही पुष्कळशा भारतीय पर्यटकांमध्ये रवांडा एक आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्धीस पावलेले नाही.

रवांडाला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत बऱ्यापैकी वाढ व्हायची असेल तर रवांडामधल्या टूर ऑपरेटर्सनी भारतीय कुटुंबांच्या खिशाला परवडतील अशी स्पेशल पॅकेज पुढे आणली पाहिजेत. रवांडामधले माउंटेन गोरिला हे पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे आकर्षण असले तरी त्यांना बघण्याच्या टूरची फी ७५० अमेरिकन डॉलर्सवरून १५०० अमेरिकन डॉलर्स, म्हणजे दुप्पट झाली आहे. अशा गोष्टींचा विचार झाला पाहिजे. मात्र रवांडामधल्या नागरिकांसांठी मेडिकल टूरिझमसाठी भारत एक चांगला पर्याय ठरतो आहे. एकूण, रवांडा आणि भारत यांच्यातले परस्पर सहकार्याचे संबंध आणखी घनिष्ठ बनण्यास भरपूर वाव आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.