Author : Seema Sirohi

Published on Feb 04, 2019 Commentaries 0 Hours ago

अमेरिकेचे अध्यक्षपद यावेळी कदाचित एखाद्या महिलेला किंवा एखाद्या समलिंगी असणाऱ्याला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमेरिकीतील या बदलत्या हवेविषयी...

अमेरिकेचे नवा अध्यक्ष ‘वेगळा’ असेल?

अमेरिकेत येत्या २०२० मध्ये होऊ घातलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाकडून प्राथमिक फेरीसाठी पुढे आलेले उमेदवार पाहिले तर नव्या ऐतिहासिक बदलाची चाहूल लागते. अमेरिकेच्या लोकसंख्येमध्ये घडून आलेले बदल लक्षात घेता त्यानुसार सत्ता समीकरणांची जुळवाजुळव करण्याकरता डेमोक्रॅटिक पक्षात सध्या मोठी स्थित्यंतरे होताना दिसत आहेत. कदाचित यावेळी एखाद्या महिलेला किंवा एखाद्या समलिंगी असणाऱ्याला अमेरिकेचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आजघडीला ज्या नऊजणांनी अध्यक्षपदाच्या नामांकनासाठी पक्षांतर्गत पातळीवर उमेदवारी जाहीर केली आहे त्यात चार महिलांचा समावेश आहे. ज्यांच्यापैकी एकीचे पालक भारत आणि जमैकाशी नाते सांगणारे आहेत. तर आणखी एक उमेदवार, की ज्याने आपण गे अर्थात समलिंगी आहोत असे जाहीर केले आहे आणि सध्या अमेरिकेतल्या एका लहानशा शहराचा तो मेयर आहे. त्याचप्रमाणे आणखी एक उमेदवार तैवानी अमेरिकन असून दुसरा एक हिस्पॅनिक वंशाचा आहे. अर्थात् येत्या काही महिन्यांमध्ये उमेदवार म्हणून आणखीही अनेकजण पुढे येण्याची शक्यता असून अशा उमेदवारांची संख्या बहुधा वीसच्या पलिकडेही पोहोचेल असा अंदाज आहे.

आतापर्यंत जाहीर झालेल्या नऊ उमेदवारांपैकी सातजण श्वेतवर्णीय नाहीत. परत त्यात LGBT अर्थात समलिंगींना समाजमान्यता मिळवण्याचा पुरस्कार करणाराही एक उमेदवार असल्याने, ही सगळी मांदियाळी प्रामुख्याने श्वेतवर्णीयांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या प्रभावळीच्या अगदी निराळी आहे. डेमोक्रॅटिक पक्षाकडून अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरू इच्छिणाऱ्या या उमेदवारांमधल्या कमला हॅरिस, एलिझाबेथ वॉरेन, किर्स्टेन जिलिब्रॉण्ड या महिला सध्या अमेरिकन संसदेच्या सिनेटरपदावर कार्यरत आहेत. तर तुलसी गॅबर्ड अमेरिकन काँग्रेस मध्ये लोकनियुक्त सदस्य असून हिंदू धर्माचरणाचा स्वीकार त्यांनी केलेला आहे. यातले पिट बटिगीग, २०२० सालच्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकांमध्ये उतरू इच्छिणारे पहिलेच गे राजकारणी असतील, जी एक क्रांतिकारक घटना ठरेल.

अर्थात डेमोक्रॅटिक पक्षाकरता उमेदवारांमधली ही विविधता अध्यक्षीय निवडणुकीमध्ये विजयाचा हुकमी एक्का ठरेल असे काही नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर विजय मिळवण्यासाठी लायक उमेदवार कोण ठरू शकेल याची चाचपणी घेण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षांतर्गत होणाऱ्या प्रायमरीज म्हणजे प्राथमिक निवडणुका जेव्हा पार पडतील तेव्हा हे सगळे उमेदवार खरोखरचे कसाला लावले जातील आणि त्यानंतरच पुढील वर्षी डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिवेशनात अध्यक्षपदासाठीच्या उमेदवाराच्या नावाची घोषण केली जाईल. 

जर यात एखाद्या श्वेतवर्णीय पुरुष उमेदवाराचे नाव पुढे आले तरी आश्चर्य वाटू नये. कारण की अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष जो बिडेन यांनीही अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा गंभीरपणे विचार चालवला आहे; तर टेक्सासमधून निवडून गेलेले माजी काँग्रेस सदस्य बेटो ओ’रॉके यांचेही नाव चर्चेत आहे. कारण की अमेरिकन सिनेटसाठी झालेल्या मध्यावधी निवडणुकीमध्ये जरी त्यांना हार पत्करावी लागली असली तरी त्यांनी त्या निमित्ताने डेमोक्रॅटिक पक्षात चांगलीच हवा निर्माण केली होती.

उमेदवार कमला हॅरिस यांची CNN चॅनेल वरची मुलाखत जवळपास दोन दशलक्ष लोकांनी पाहिली असली तरी बिडेन आणि ओ’रॉके यांना या निवडणुकीत चांगचाच वाव मिळू शकेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

अर्थात पक्षाकडून उमेदवारी मिळवण्याच्या या खडतर स्पर्धेतून कोण पार पोहोचू शकतो याचे भाकीत करणे सध्या तरी फार घाईचे ठरेल. मात्र हे तर निश्चित आहे की तो उमेदवार पक्षातील बहुसंख्य घटकांच्या पसंतीस उतरेल त्याला सर्वांना सोबत घेऊन जाताना अशा कोणत्या तरी जादुई मंत्राची गरज भासणार आहे की ज्यायोगे प्रत्येकाचा उत्साह पण टिकेल आणि फाजील आत्मविश्वासाला वेसणही घातले जाईल.

सध्या डेमोक्रॅटिक पक्षामध्ये दोन विरुद्ध मतप्रवाह अस्तित्वात आहेत. एक प्रवाह आर्थिक पाठबळ देणाऱ्या अमेरिकन जनतेच्या मतांचा आदर राखून पुढे जाऊ इच्छितो आहे तर त्याच्या विरुद्ध असलेला मतप्रवाह वामपंथीय अथवा समाजवादी विचारसरणीचा पुरस्कार करणारा आहे, ज्याला सुपरस्टार अलेक्झांड्रिया ओकासिओ – कोर्टेझ यांचे नेतृत्व लाभले आहे. डेमोक्रॅटिक पार्टीने “विरोधी पक्ष’ या नात्याने अमेरिकन नागरिकांच्या उत्पन्नातली तफावत, आरोग्य सेवा, करप्रणाली आणि शिक्षण सुविधा यासारखे प्रश्न सातत्याने लावून धरले पाहिजेत असे त्यांचे मत आहे.

ओकासिओ – कोर्टेझ सोशल मिडियावर सातत्याने झळकत असतात आणि त्या स्वत:ला डेमोक्रॅटिक सोशियलिस्ट म्हणवून घेतात. मागच्या वर्षी जोसेफ क्रॉली यांना मध्यावधी निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रायमरीजमध्ये हरवून अमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहात प्रवेश मिळवणाऱ्या कोर्टेझ यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचा कल आता वामपंथी विचारधारेकडे कसा झुकतो आहे त्याची चुणूक दाखवली आहे.

जोसेफ क्रॉली हे कनिष्ठ सभागृहात भारतविषयक ध्येयधोरणे ठरवणाऱ्या समितीचे सह-अध्यक्ष होते आणि आगामी काळात पक्षामध्ये आणखी वरचे पद त्यांना मिळण्याची खात्री असताना २९ वर्षीय ओकासिओ – कोर्टेझ कडून हार पत्करावी लागल्याने त्यांच्या पुढच्या ध्येयांना सध्या तरी खीळ बसली आहे.

AOC या नावाने सध्या ओकासिओ – कोर्टेझ आपल्या चाहत्यांमध्ये चांगल्याच प्रसिद्धीस पावल्या आहेत आणि त्यांनी कनिष्ठ सभागृहात नव्याने आलेल्या इतर अनेक सदस्यांसह, डेमोक्रॅटिक पार्टीच्या ध्येयधोरणामध्ये नवा बदल घडवून आणण्यासाठी प्रतिदिन आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.

क्लिंटन यांची अध्यक्षीय कारकीर्द हॉलिवूड आणि वॉल स्ट्रिटच्या आर्थिक पाठबळावर आधारलेली होती, पण नंतरच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष म्हणून निवडून आल्याच्या दोन वर्षांतच डेमोक्रॅटिक पक्षाच्या मार्फत भावी अध्यक्ष म्हणून निवडणुकीला उभे रहाण्यास इच्छुक असे सगळे उमेदवार श्रीमंतांसाठी वाढीव करप्रणाली असावी आणि सर्वांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यावर आग्रहाने बोलू लागले आहेत. अर्थातच हिलरी क्लिंटन यांनी मांडलेल्या जाहिरनाम्याशी यापैकी कोणताच उमेदवार सहमत असेल हे शक्य दिसत नाही.

समाजवादी विचारसरणी आता अमेरिकेतल्या तरुण मतदारांना अस्पृश्य वाटत नाही. व्हाइट हाऊस मधल्या अमेरिकन  अध्यक्षांच्या आर्थिक सल्लागारांच्या समितीनेच याचे सूतोवाच मागील ऑक्टोबर महिन्यात केले होते. त्यांनी असे मत व्यक्त केले आहे की, समाजवाद आता अमेरिकेच्या राजकीय पटलावर पुन्हा एकवार नव्या दमाने उभा रहातो आहे. योगायोग असा की, कार्ल मार्क्सची २०० वी जयंती गेल्या वर्षी जगाने साजरी केली आहे.

डेमोक्रॅटिक पक्षाच्या जुन्या जाणत्या लोकांना आता भीती ही आहे की, रिपब्लिकन्स मध्ये जसा सध्या उजव्या विचारांचा वाढता प्रभाव आहे तसाच आजच्या तरुण डेमोक्रॅट्स वरती समाजवादी विचारधारेचा पगडा बसतो आहे. अर्थात त्यामुळे अमेरिकेची राजकीय प्रणालीच बदलून जाईल की काय असे त्यांचे निरीक्षण आहे.

मात्र हे नाकारता येत नाही की, या समाजवादी आणि डाव्या विचारधारेच्या डेमोक्रॅट्स सदस्यांमध्ये चांगलाच उत्साह आणि बांधिलकी दिसून येते. आणि त्याचा पहिल्यांदा स्पष्ट प्रत्यय दिसून आला तो २०१६ सालात बर्नी सॅन्डर्स यांना अध्यक्षीय निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून नामांकन द्यायचे की नाही यावर विचार होत असताना. मागच्या शतकात डेमोक्रॅटिक पक्ष अमेरिकन लोकांसाठी चळवळी आणि आंदोलने उभा करण्यासाठी जास्त प्रसिद्ध होता. त्या आपल्या मूळच्या रूपाकडे सध्या या पक्षाचा कल वाढला आहे आणि हे त्यांचे रिपब्लिकन पक्षापेक्षा निराळे असल्याचे प्रमाण त्यांना पुन्हा लोकांसमोर आणायचे आहे.

फक्त डेमोक्रॅटिक पक्षातल्या जाणकारांना अशी भीती आहे की, आपल्या पक्षात सध्या जहाल मतवाद रुजत चालला आहे. रिपब्लिकन पक्षात सुद्धा अशाच प्रकारे काही सदस्य पूर्णतया उजव्या विचारसरणीच्या आहारी गेले आणि त्यामुळे पूर्ण रिपब्लिकन पक्षालाच त्या दिशेला वळावे लागले आहे.

आज सगळ्याच डेमोक्रॅटस् सदस्यांची ही अपेक्षा आहे की, आता ट्रम्प यांना व्हाइट हाऊस रिकामे करायला लावूयाच, पण खरे पाहिले तर सध्याच्या अध्यक्ष महोदयांना जर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे असेल तर त्यांना खरा सामना करावा लागणार आहे तो डाव्या विचारसरणीशी. प्यू सर्वेक्षणाचे आकडे सांगतात की, जे डेमोक्रॅटस् स्वत:ला “लिबरल’ म्हणजे उदारमतवादी म्हणवून घेत असत त्यांचे प्रमाण गेल्या वर्षापावेतो ४६ टक्क्यावरून केवळ २८ टक्क्यापर्यंत खाली घसरले आहे.

डेमोक्रॅटिक पक्षाचे समर्थक असलेले अमेरिकन मतदार सध्या तर बहुतेक सगळ्याच मुद्द्यांवर समाजवादी आणि कम्युनिस्ट विचारसरणीचा आधार घेत आहेत. मग तो मुद्दा परदेशातून कायमच्या वास्तव्यास येणाऱ्या लोकांचा असो वा अर्थकारणाचा असो. १९९४ सालात अमेरिकेतल्या केवळ ३२ टक्के लोकांचेच असे मत होते की, बाहेरून आलेले लोक देशाच्या विकासाला बळकटी देतात, पण आता जवळपास ८४ टक्के अमेरिकनांचे हे मत बनले आहे. तशाच प्रकारे २००९ सालात ५७ टक्के लोकांची अशी भावना होती की, वर्णद्वेषातून घडणाऱ्या हिंसक घटनांना सरकारने वेळीच पायबंद घातला पाहिजे, तर आता ८१ टक्के लोक या भूमिकेशी सहमत आहेत.

डमोक्रॅटिक पक्षाच्या विचारसरणीत हा जो मोठा बदल झाला आहे त्याला अमेरिकेचे अर्थकारणही कारणीभूत आहे. मधल्या काही वर्षात अमेरिकन नागरिकांच्या उत्पन्नामध्ये मोठी तफावत निर्माण झालेली दिसून येते आहे. त्याचप्रमाणे २००८ सालचे आर्थिक संकट आणि त्यातून उद्भवलेल्या मंदीमुळे सुद्धा पक्षाच्या सदस्यांना निराळा विचार करण्यास भाग पाडले आहे.

मात्र सर्वात मोठे कारण ठरले ते डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीतला विजय. ज्यामुळे सगळे डेमोक्रॅटस् खडबडून जागे झाले आहेत आणि ज्या गोष्टी त्यांना आतापर्यंत मृगजळासारख्या वाटत होत्या, त्यांच्यावरही त्यांनी विचार सुरू केला आहे. मुख्यत: मोठ्या शहरातले तरुण डेमोक्रॅटस् की ज्यांच्यावर कम्युनिस्ट किंवा डाव्या विचारधारेचा प्रभाव आहे असे पक्ष सदस्य या सगळ्या घडामोडींकडे औत्सुक्याने पहात आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाकडून अध्यक्षीय निवडणुकीसाठी नामांकन मिळवण्यासाठी या अशा सदस्यांचा पाठिंबा फार निर्णायक ठरणार आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Seema Sirohi

Seema Sirohi

Seema Sirohi is a columnist based in Washington DC. She writes on US foreign policy in relation to South Asia. Seema has worked with several ...

Read More +