-
CENTRES
Progammes & Centres
Location
कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला सहआस्तित्वावर आधारित समाजाच्या दिशेने कसे जायचे, याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल.
कोरोना विषाणूने जगभर घातलेल्या थैमानामुळे जळी-स्थळी-घरी-दारी-टीव्ही-रेडियोवरच्या इतर सर्व विषयांना, बातम्यांना, प्रश्नांना विराम दिला असल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या या कोरोना तांडवामुळे जगातील अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था, बाजारपेठ, राजकारण, संस्कृती, नागरीकरण इत्यादी साऱ्या क्षेत्रांच्या संरचना बदलून टाकणार असल्याचे भाकीत अनेक जागतिक संघटनांनी केले आहे. भारताच्या संदर्भात आजच घडलेली मोठी गोष्ट म्हणजे सुधारित नागरिकता कायद्याच्याविरोधात (CAA) आंदोलनासाठी बसलेल्या शाहीनबाग व अन्य ठिकाणच्या आंदोलकांना सामाजिक आरोग्यसुरक्षेच्या आंदोलन गुंडाळायला लावून तेथील तंबू, मंडप पोलीसयंत्रणेने दूर केले. अशा संवेदनशील काळात सामाजिक आरोग्य जपण्याच्या दृष्टीने शासनाची ही कृती योग्यच मानायला हवी. मात्र कोरोनाच्या या संकटकाळात आपल्या समाजातील प्रमुख कळीचे मुद्दे पूर्णतः झाकोळले जाणेदेखील उचित नाही. शासनाच्या कार्यक्षम यंत्रणा आणि व्यवस्थांच्या कौशल्याच्या जोरावर हे संकट दूर गेल्यावर बेकारी, आर्थिक गोंधळ, बेरोजगारी या समस्या निश्चितच पुन्हा डोके वर काढणार आहेत.
कोरोनाचे संकट येण्यापूर्वी काश्मीरसंदर्भातील ३७० कलमाविषयीचा निर्णय आणि सुधारित नागरिकता कायदा (CAA) हे अधिनियम शासनाने चर्चेस घेतल्यापासून देशातील शतकभर सतत असलेला हिंदू-मुसलमान वाद पुन्हा सामाजिक-राजकीय पटलावर आला होता. देशातील तरुणांमध्ये बेरोजगारीची समस्या वाढल्यावर या प्रश्नाच्या माध्यमातून समाजाच्या खदखदीला पुन्हा वाट मिळायची दाट शक्यता दिसून येते.
धर्मश्रद्धा ही गोष्ट भारतीय उपखंडात अतिशय संवेदनशील मानली जाते. त्यामुळे आपल्या देशातील अनेक राजकीय घडामोडी धर्मश्रद्धा आणि त्या अनुषंगाने होणारे राजकारण यांच्या आधारे आकाराला येतात, आणि देशात वेगवेगळी वादळे निर्माण करून जातात. यामागील मुख्य कारण श्रद्धा आणि त्याविषयीच्या धारणा यांचे वसाहतकाळात झालेले एकसाचीकरण व त्यातून तयार झालेल्या एकसाची लोकधारणा.
भारतातील बहुसांस्कृतिक श्रद्धाविश्वात इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म पाण्यात मिसळलेल्या साखरेसारखा विरघळला आहे. वसाहतकाळात इंग्रजांनी राबवलेल्या ‘फोडा व राज्य करा’ या नीतीनुसार त्यांनी इथले राजकीयदृष्ट्या आणि जनसंख्येच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या हिंदू आणि इस्लाम या दोन धर्माच्या लोकांमध्ये वेगवेगळ्या मार्गांनी वितुष्ट आणले आणि या दुहीच्या जोरावर आपला राज्यकारभार व राजकारण निर्धोक ठेवले.
समाजातील आणि आपल्या मर्यादित भावविश्वात दिसणाऱ्या, समजून येणाऱ्या घटनांमुळे प्रभावित होणे आणि त्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रतिसाद देणे, हा सहज मानवी स्वभाव आहे. प्रत्येक काळातील वेगवेगळ्या छोटय़ा-मोठय़ा स्थानिक अगर व्यापक पातळीवरील वैयक्तिक किंवा सामूहिक पातळीवर घडलेल्या राजकीय अथवा सांस्कृतिक घटनांचा प्रभाव तत्कालीन आणि नंतरच्या समाजावर पडत असतो. अशा वैयक्तिक आणि सामूहिक आठवणी त्या काळामध्ये किंवा नंतरच्या काळात वेगवेगळ्या साहित्य प्रकारांतून आणि मौखिक किंवा लिखित माध्यमांतून लिहिल्या जातात. याच आठवणी नंतर पुढील पिढय़ांत हस्तांतरित होत जातात. तसेच विशिष्ट राजकीय हेतूंनी त्यांना वेगळ्या रूपात समाजासमोर आणून समाजात दुही पसरवायचे काम राजकीय व्यवस्थेचे स्वकीय किंवा परकीय हिस्सेकरी नेहमी करत आले आहेत.
साधारण जनरीती पाहिल्यास वास्तवात आपल्याहून वेगळ्या-अपरिचित अशा जीवनशैलीचे आणि आचारपद्धतीचे अनुसरण करणाऱ्या समूहांना आपसूकच आपण वेगळे-परके समजू लागतो. हे परकेपण बहुतांशी सांस्कृतिक-भाषिक-आहारशैलीअनुरूप भेदांच्या मापदंडांवर बेतलेले असते. या मापदंडांना वसाहतकाळातील शासकांनी रूढ केलेल्या धारणांची जोड मिळाल्याने समाजातील आपपरभाव, विशेषतः हिंदू व मुस्लिम या समाजांतील भेद, अधिकच वाढीला लागला. हे सारे राजकारण अधिकाधिक कर्कश होत असताना, काही मोजक्या उदाहरणांद्वारे या अर्थातराच्या प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपण दोन वेगवेगळ्या धार्मिक स्थळांवर घडून आलेल्या- घडणाऱ्या ऐतिहासिक घडामोडींचा संक्षेपात आढावा आपण घेणार आहोत.
हा आढावा घेताना सर्वप्रथम आपण एका ऐतिहासिक आख्यायिकेकडे पाहूया. तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली येथील श्रीरंगनाथस्वामी या विष्णुमंदिराचा इतिहास मांडणाऱ्या ‘कोयिल-ओळूगु’ नावाच्या एका ऐतिहासिक इतिवृत्तामध्ये ही आख्यायिका मिळते. आख्यायिकेचा सारांश असा: इस्लामधर्मी तुर्की-अरबी राजसमूहांनी उत्तर-भारतात बस्तान बसवल्यावर लोकजीवनात रूढ झालेल्या काही १३-१४व्या शतकात मलिक काफूर या अल्लाद्दीन खिलजीच्या सेनापतीने दख्खन जिंकायच्या मिषाने दक्षिणेची मोहीम सुरु केली. या स्वारीदरम्यान रंगनाथस्वामी मंदिरावर घाला घातल्यावर मंदिरातील पालखी/मिरवणूक उत्सवासाठीची (‘अळकिय मनवाळ’, अर्थात रूपवान राजपुत्र रूपातील) विष्णूंची उत्सवमूर्ती इतर लुटीसोबत दिल्लीला नेतो. पुढे सुलतानाची मुलगी ती मूर्ती खेळणं म्हणून खेळायला घेऊन जाते आणि तिचे निरागस बालपण त्या मूर्तीशी खेळण्यात रमून जाते. इकडे मंदिरातील पुरोहितवर्ग ती मूर्ती आणावयास दिल्लीदरबारी गेला असता, त्या समूहातील एक वृद्ध स्त्रीच्या नजरेस पडते की, सुलतानाच्या महालातील एका कक्षात राजकन्येशी साक्षात भगवान विष्णू स्वत: सगुण साकार रूपात अष्टैश्वर्यासह प्रकट होऊन खेळत आहेत. इकडे मंदिरातून आलेला पुरोहित-अर्चक समूह सुलतानासमोर कीर्तनादी सादरीकरण करून झाल्यावर बक्षीस म्हणून राजकन्येच्या कक्षातील विष्णुमूर्तीची याचना करतो. सुलतान त्यांना मूर्ती ओळखण्यासाठी राणीवशात प्रवेश करण्यास मनाई करतो आणि ‘‘तुमच्या भक्तीत सामर्थ्य असेल तर तुमच्या देवाला इथे यायला सांगा,’’ असे आव्हान त्यांना देतो. त्यानुसार देवाचे आवाहन केले असता मूर्तीमधील देव राजकन्येला झोपवून स्वत: दरबारात प्रकट होतो. हा चमत्कार पाहून सुलतान सन्मानपूर्वक मूर्ती त्या मंदिरातील कार्यकारी समूहाला परत करतो व ती मूर्ती घेऊन ते लोक तमिळनाडूतल्या मंदिरात परततात. इकडे आपली लाडकी मूर्ती नसल्याचे पाहून राजकन्या व्याकूळ होते आणि मूर्तीच्या ओढीने मंदिराजवळ येते. पण मूर्तीला बंदिस्त पाहून त्या दु:खावेगाने ती द्वाराशीच प्राण सोडते.
मेलकोटे येथील दुसऱ्या समांतर आख्यायिकेनुसार, वैष्णवाचार्य रामानुजस्वामी सुलतानाच्या दरबारात मूर्ती आणावयास जातात आणि सुलतान राजकन्येलाही मूर्तीसोबत जाण्याची अनुमती देतो. वाटेत आचार्यवर्गाकडे असलेली असलेली मूर्ती राजकन्येच्या पालखीत प्रकट होते आणि राजकन्या त्या मूर्तीत विलीन होते. मेलकोटे आणि तिरुचिरापल्ली येथील मंदिरातील प्रमुखांनी राजकन्येच्या अद्वितीय भक्तीचा सन्मान म्हणून तिचे, ‘तुलुक्क नचीयार’चे (तुर्की राजकन्या) मंदिर प्रांगणापासून जवळच स्थापन केले आहे. संबंधित विष्णुमूर्तीला दाखवला जाणारा नवेद्यदेखील यामुळे उत्तर भारतीय पदार्थाचा असतो आणि स्थानिक इस्लामी पद्धतीनुसार विडय़ाची पाने विशिष्ट पद्धतीने लावली जातात, असे निरीक्षण ज्येष्ठ अभ्यासक सोमसुंदर पिल्लई यांनी नोंदवले आहे.
हिंदू-मुस्लिम संघर्षाचे संदर्भ ऐतिहासिक धारणांच्या पृष्ठभूमीवर पाहाताना पद्मावती आणि अल्लाद्दीन खिलजी यांच्यासंदर्भातील सुप्रसिद्ध आख्यायिकेची आठवण होते. वास्तवात तुलुक्क नाचियार किंवा पद्मावती या दोन्ही आख्यायिका प्रत्यक्ष घडल्याचे कोणतेही भौतिक पुरावे आपल्याकडे उपलब्ध नाहीत. पद्मावती हे प्रतीक राजपूत पर्यायाने हिंदू अस्मितेचे प्रतीक म्हणून उभे राहिल्यावर तिच्या जौहाराविषयीचा अभिमान हा एका विशिष्ट पुरुषी मानसिकतेतून आलेल्या गंडातून विकसित झालेला दिसतो. अशा आख्यायिकांची शेकडो संस्करणे वेगवेगळ्या भाषांद्वारे, उपखंडात शतकानुशतके संचार करणाऱ्या आणि सूत-भाट-चारणांच्या पिढ्यांनी रुजवलेल्या वेगवेगळ्या काव्यप्रकारांतून आणि ग्रंथांच्या बाडामधून आपल्यापर्यंत येऊन पोहोचली.
अनेकदा या आख्यानांच्या कथनात्म परंपरांमध्ये परस्परविरोधी तपशील, विसंगत धारणा, व्यंगात्मक सूर अथवा विडंबनेही दिसतात. भारतीय उपखंडातल्या विविध मौखिक आणि कथात्म परंपरांची अशी बहुविध संस्करणे निर्माण होऊन त्यातून वेगवेगळ्या सामूहिक स्मृती विकसित होण्यामागचे प्रमुख कारण त्या कथा-संस्करणांच्या जनकांना मिळालेले अलिखित समाजदत्त स्वातंत्र्य हे होय. या ग्रंथकृतींचा, काव्य-कथांचा आस्वाद घेताना त्या काळात अस्मितांचे मुद्दे उपस्थित झाल्याचे संदर्भ आपल्याला मिळत नाहीत. आजसारख्या राजकीय संवेदना त्याकाळी एकांगी होत गेल्या असत्या, मूठभर मवाल्यांच्या झुंडशाहीला बळ मिळाले असते तर आज उपखंडातील मौखिक परंपरा आज आपल्याला दिसतात त्यासारख्या समृद्ध झाल्या नसत्या. आपल्या पूर्वजांकडे असलेलं शहाणपण आपण आज द्विगुणित करायची गरज येऊन ठेपली आहे.
१९८०च्या दशकात एकीकडे रामजन्मभूमीचे आंदोलन वाढीला लागले असताना दुसरीकडे तेव्हाच्या सरकारने रामायण आणि महाभारत या मालिकांची निर्मिती नामवंत चित्रपटनिर्माते-दिग्दर्शक मंडळींकडून करवून घेतली होती. हजारो वर्षे जनमानसात रुजलेल्या कथा पहिल्यांदाच दृश्यरूपात पडद्यावर पाहायला मिळाले. मात्र समाजात या मालिकांविषयी आणि संबंधित कथानकांविषयी असलेल्या भाबड्या धारणांचा उपयोग तत्कालीन राजकारणासाठी करण्यात आला, असल्याचे अनेक नामवंत अभ्यासकांनी दाखवून दिले आहे. आज २०२०-२१ साली अनेक समस्या समाजासमोर आ वासून उभ्याअसताना अशा खोट्या, कृत्रिम अस्मितांवरून अस्मितांवरून संघर्ष घडणे सशक्त समाजाचे रक्षण नाही. अशा घटनांवर आणि ऐतिहासिक धारणांवर केली जाणारी चिकित्सक भाष्ये समाजाकडून नाकारली जाणे, समाजाच्या उन्नतीच्या दृष्टीने योग्य नाही.
तुलुक्क नाचियार किंवा पद्मावतीसारख्या अनेको कथा, हिंदू-मुस्लिम किंवा अन्यधर्मीय सौहार्द, सामायिक श्रद्धाविश्व किंवा परस्पर सौहार्दसंबंध यांचे दर्शन घडवणारी शेकडो-हजारो उदाहरणे या देशात आजही अतिशय जागृत व जिवंत आहेत. आपल्या महाराष्ट्रातच श्रीगोंद्याचे थोर कृष्णभक्त, वेदांती शेख महंमद आहेत, रत्नागिरीजवळचा हजारो हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान असलेला हातीस दर्गा आहे. एकीकडे साईबाबांची शिर्डी आहे दुसरीकडे एकनाथ महाराजांचे आजेगुरू पीर चांद बोधले गुरु आहेत. शिवछत्रपतींचे वडील शहाजी महाराजांचे नाव ज्यांच्या आशीर्वादाचे स्मरण राहावे यासाठी ठेवले गेले ते पीर शहाशरीफ आहेत. या व अशा स्थानांचे माहात्म्य जाणून शेकडो भाबडे भाविक आणि सामान्य नागरिक भारतीय समाजाचा आणि संस्कृतीचा आत्मा असलेल्या सहिष्णुतेच्या, समावेशकतेच्या गाभ्याला जपत आहेत.
या साऱ्या स्थानांचा आढावा घेणाऱ्या, त्या स्थानांशी संबंधित माहात्म्यकथा चित्रित करणारे माहितीपट, दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट यांची निर्मिती हा यावर अतिशय उत्तम उपाय ठरू शकतो. दृक्श्राव्यमाध्यमाचा समाजावरील प्रभाव आणि पौराणिक-धार्मिक श्रद्धांचे दर्शन घडवणारे दृश्य प्रकल्प यांच्या प्रभावाची चुणूक १९८०सालापासून समाजाने अनुभवली आहे. ते लक्षात घेता शासनाने/सांस्कृतिक मंत्रालयाने पुढाकार घेऊन असे माहितीपट-चित्रपट निर्मित करण्यात पुढाकार घ्यायला हवा. हे माहितीपट-मालिकापट-चित्रपट बनवताना चिकित्सक अभ्यास-संशोधन करणाऱ्या संशोधक-प्राध्यापकांकडून योग्य मार्गदर्शन घ्यावे. अशा पुढाकारातून भारतीय समाजात रुजलेल्या सहअस्तित्वाच्या जाणीवा आणि सौहार्द यांना उत्तेजन तर मिळेलच, पण त्यासोबतच आपल्या देशातल्या विविधतेने नटलेल्या परंपरांना आणि त्यांच्या मोकळ्या, सहिष्णू वृत्तीला पुन्हा अनुकूलता प्राप्त होईल.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Hemant Rajopadhye was a Senior Fellow and Head of ORF Mumbais Centre for the Study of Indian Knowledge Traditions. His research focuses on what the ...
Read More +