Author : Sushant Sareen

Published on Oct 29, 2021 Commentaries 0 Hours ago

पाकिस्तानात पुढे काहीही घडले तरीही पुढचे २२ महीने सत्तेत आणि पदावर टिकून राहणे इम्रान खान यांना कठीण ठरणार आहे हे नक्की.

पाकमध्ये नागरी-लष्करी संबंध ढासळताहेत

इंटर सर्व्हिस पब्लिक रीलेशन्सने पाकिस्तानी लष्करामधील उच्चपदस्थ अधिकार्‍यांच्या बदल्या केल्याची घोषणा केल्यानंतर दोनच आठवड्यात इंटर सर्विस इंटेलिजंसचे सध्याचे महासंचालक लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांची नियुक्ती पेशावर येथील इलेव्हेन कॉर्प्सच्या कोर्प कमांडरपदी करण्यात आली आहे अशी बातमी आली. इंटर सर्विस इंटेलिजंसच्या महासंचालक पदावर लेफ्टनंट जनरल नदीम अंजुम यांची करण्यात आलेली नियुक्ती ही लष्कर आणि पंतप्रधान यांच्यातील नियुक्त्यांबद्दलच्या संघर्षाचे द्योतक आहे.

या प्रकरणात उद्भवलेल्या संघर्षाचे निराकरण झाल्याचा दावा काही मंत्री करत असले तरीही पंतप्रधान इम्रान खान यांना पुढील आयएसआय प्रमुख म्हणून लष्कर प्रमुख जनरल कमर बाजवा यांनी निवडलेल्या व्यक्तीची ‘निवड’ करावी लागणार हे निश्चित आहे. २५ ऑक्टोबरपूर्वी केल्या गेलेल्या नियुक्त्यांची अधिसूचना जारी केली जाईल. यामुळे नागरी सरकार आणि लष्कर यांच्यातील संघर्ष कमी न होता तो अधिक वाढण्याची दाट शक्यता आहे.

या सर्व प्रकरणात इम्रान खान, जनरल कमर बाजवा किंवा फैज हमीद यांची जनमानसातील प्रतिमा झाकोळली जाऊ शकते. इम्रान खान यांना पंतप्रधान म्हणून पुढची टर्म हवी आहे, बाजवा यांनी अजून दोन वर्षे वाढवून हवी आहेत आणि हमीद यांना बाजवा यांच्यानंतर त्यांच्या पदावर विराजमान व्हायचे आहे. अर्थात या तिघांच्याही महत्वाकांक्षांना कुठेतरी ब्रेक लागण्याची चिन्हे आहेत.

सध्या पाकिस्तानात नागरी सरकार आणि लष्करातील दरी भरून काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. इम्रान खान यांनी लष्कराच्या हातचा रबर स्टॅम्प होण्यास स्पष्ट नकार दिला आहे असा काही मंत्र्यांनी खुलासा केला आहे. खान यांच्या या भूमिकेमुळे सरकारमधील अनेक मंत्र्यांवर नामुष्कीची वेळ आली आहे. परिणामी हे मंत्री स्वतःचा बचाव करण्याची रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. या सर्व प्रकरणात लष्कराने शांत राहून निरीक्षण करण्याची भूमिका अवलंबली आहे.

अर्थात शांत राहणे हयातही व्यक्त होणे आहेच हे वाक्य लष्कराच्या या भूमिकेला चपखल लागू पडत आहे. सरकार आणि लष्कर यांच्या यांच्या मिश्र राजवटीचा अंत जवळ आला आहे अशी चिन्हे दिसत आहेत. २०२३ च्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये येणार्‍या निवडणुकीची इम्रान खान वाट पाहत असले तरी ते सध्याच्या पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पूर्ण करू शकतील का ? याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.

इम्रान खान यांनी लष्कराकडे पाठ फिरवण्याची अनेक कारणे आहेत. खान यांच्या प्रशासनाचा कारभार ही एक न संपणारी आपत्ती आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था ढासळत आहे. राजकीय ध्रुवीकरणामुळे संसदेवर प्रश्न निर्माण केले जात आहेत. अर्थात याचे थेट परिणाम राजकारण आणि समाजावर प्रतिबिंबीत होत आहेत. राजनैतिक दृष्ट्या, इम्रान यांनी अमेरिकेचा रोष पत्करला आहे, अरबांना दूर सारले आहे आणि चीनला नाराज केले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. उलट हे संबंध दिवसेंदिवस ढासळत चालले आहेत. पण लष्कराच्या अंतर्गत कामकाजात ढवळाढवळ करण्याचे आणि सरकारी अधिकार्‍यांसोबत राजकारण करण्याचे मोठे पाप इम्रान खान यांनी केले नसते तर कदाचित लष्कराने इतर सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले असते. इम्रान खान यांनी असा अपराध केला आहे ज्याला पाकिस्तानी लष्कर कधीच क्षमा करत नाही किंवा विसरण्याचा प्रयत्न करत नाही.

आपला कार्यकाळ पूर्ण केलेल्या आयएसआय प्रमुखाच्या नियमित बदलीवरून खान यांनी लष्कराला उघडउघडपणे छेडण्याची कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. ही बाब अपघाताने घडली आहे आणि त्याचे रूपांतर नागरी-लष्करी संघर्षात झाले आहे का? की ज्यांच्या पाठिंब्यावर खान यांचे सरकार उभे आहे त्यांनाच दुखवण्याचा वेडेपणा हा एका पद्धतशीर योजनेचा भाग आहे ? हे अजूनही न सुटलेले कोडे आहे. अर्थात याला काही कारणे आहे व ही कारणे पुढे संक्षिप्त स्वरुपात मांडण्यात आली आहेत.

संवादाचा अभाव : दोन्ही घटकांमधील संवादाचा अभाव हे संघर्षाचे महत्वाचे कारण असू शकते. वरवर पाहता असे लक्षात येते की फैझ हमीद यांच्या नियुक्ती संदर्भात गेल्या उन्हाळ्यापासून लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा यांनी इम्रान खान यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली होती. नवीन आयएसआय प्रमुखाची नियुक्ती करण्याची घोषणा आयएसपीआरने इम्रान खान यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतरच केली होती आणि त्यावेळेस त्यांनी हमीद यांच्या जागी येणार्‍या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला नव्हता.

ही घोषणा झाल्यानंतर इम्रान खान यांचा सूर बदलला आणि अर्थात यामुळे लष्करप्रमुखांची नाचक्की झाली. ह्या घडामोडीनंतर पंतप्रधान खान आणि लष्करप्रमुख यांच्यात तणाव वाढीला लागला. शेवटी आता तडजोडीचा पर्याय पुढे आला आहे आणि तो म्हणजे इम्रान खान यांनी जनरल अंजुम यांची आयएसआय प्रमुखपदी नियुक्ती केली आहे.

नागरी वर्चस्वाचे प्रदर्शन : इम्रान खान यांना नागरी वर्चस्वाचे लष्कराला दर्शन घडवायचे आहे असे दिसते. खान यांनी लष्कराच्या पाठिंब्यावर पंतप्रधान पद मिळवले आहे, खरेतर लष्कराच्या मदतीने ते त्यांच्या पदावर टिकून आहेत व २०२३ पर्यंत पदावर राहण्यासाठी त्यांना लष्कराचीच मदत होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर लष्कराच्या पाठीत खंजीर खुपसणे ही एक मोठी गंभीर बाब ठरली आहे. असे असले तरी, लष्कराशी सामना झाल्यानंतर दोन प्रसंगी इम्रान यांनी इस्लामिक इतिहासावर वक्तव्ये केले आहे ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

इम्रान खान नक्की कोणता मार्ग अवलंबू इच्छितात यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संपूर्ण वाद उफाळून आल्यानंतर काही दिवसांतच, खलिफा उमर यांनी आपला सरदार खालिद याला त्याचे अधिकार दुसऱ्या व्यक्तीकडे सोपवण्यास आदेश दिले होते असा संदर्भ खान यांनी एका ठिकाणी वापरला होता. राज्यातील शासनकर्त्याच्या आदेशावरून कोणताही सरदार किंवा उच्चपदस्थ व्यक्तीला त्याच्या पदावरून काढून टाकता येते असा स्पष्ट इशारा खान यांनी जनरल बाजवा यांना दिलेला दिसून येतो. दुसर्‍या एका प्रसंगी, खान यांनी मदिना राज्याचा उल्लेख केला आहे.

मदिना राज्यात एका जनरलला त्याच्या कामगिरीच्या आधारावरच उच्च पदावर पदोन्नत केले जायचे असा हा संदर्भ आहे. म्हणजेच अफगाणिस्तानातील विजयाच्या जोरावर आणि हमीद यांच्या कामगिरीवर त्यांना मोठ्या पदावर बढती मिळावी असा संदेश खान यांना लष्कराला द्यायचा आहे असे दिसून येते. पाकिस्तानाला रियासत ए मदिनाची उपमा देऊन कोणत्याही अधिकार्‍याला हुकूम सोडून लष्कराला सतत चिथावणी देण्याचा खेळ जोपर्यंत खान करत राहतील तोपर्यंत आणि त्यानंतरही परिस्थिती चिघळत राहणार, हे निश्चित आहे.

राजकीय बॉडीगार्ड : इम्रान खान यांना आयएसआयच्या महासंचालक पदावर फैज हमीद हवे आहेत हे आता काही लपून राहिलेले नाही. अफगाणिस्तानमध्ये गोष्टी रुळावर येईपर्यंत हमीद यांची खान यांना गरज आहे हे स्पष्ट आहे. इम्रान यांनी आयएसआयला कोर्प्सचा दर्जा दिला जावा यासाठी प्रस्ताव ठेवलेला आहे म्हणजे पुढील वर्षाच्या नोव्हेंबरमध्ये जेव्हा जनरल बाजवा यांचा कार्यकाळ संपेल तेव्हा हमीद हे बाजवा यांच्यानंतर त्यांच्या पदासाठी पात्र असतील. यातूनच हमीद यांची नियुक्ती होण्यासाठी खान किती धडपड करत आहेत हे दिसून येते.

खान यांना हमीद यांची हवी असलेली नियुक्ती राष्ट्रहितासाठी नसून खान यांच्या वैयक्तिक व राजकीय स्वार्थाशी निगडीत आहेत. गेल्या पाच वर्षामध्ये आयएसआय मधील दुसर्‍या क्रमांकाची व्यक्ती आणि नंतर प्रमुख झालेल्या हमीद यांनी खान यांना पंतप्रधान पदावर पोहोचण्यासाठी लक्षणीय कामगिरी केली आहे. खरेतर हमीद हे खान यांचे राजकीय बॉडी गार्ड आणि हिटमन ठरले आहेत.

हमीद यांच्या आधी लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांनी खान यांच्या राजकीय खेळीमध्ये सहभागी होण्यास स्पष्ट नकार दिल्याने त्यांना पद गमवावे लागले होते. हमीद यांची अशी काही भूमिका नाही. नवीन निवडणूक कायदे आणून पुढच्या निवडणुकीची सोय करण्यासाठी, खान यांच्या पसंतीच्या लोकांचा निवडणूक आयोगात भरणा करण्यासाठी आणि विरोधकांवर चिखलफेक करण्याच्या दृष्टीने सामग्री शोधण्यासाठी, खान यांना आधीपेक्षाही जास्त हमीद यांची गरज लागणार आहे.

पुढच्या वर्षी जेव्हा बाजवा यांचा कार्यकाळ संपेल तेव्हा हमीद हे ज्येष्ठ्यतेच्या निकषावर चौथ्या क्रमांकावर असतील, असे असले तरीही बाजवा नंतर हमीद लष्करप्रमुख व्हावेत अशी खान यांची इच्छा आहे. इम्रान खान यांचे हमीदवरचे अवलंबित्व लष्करामध्ये अनेकांना मान्य नाही आणि खान यांच्या या खटपटींमुळे लष्कराच्या पदाचे राजकारण केले जात आहे जे पाक लष्कराला मान्य नाही.

हमीद यांना आयएसआय मधून काढून त्यांना कॉर्प्स कमांडचा दर्जा देणे हा सध्या उद्भवलेल्या समस्येवरील सर्वात शहाणपणाचा उपाय आहे हे बाजवा यांना माहीत आहे. इम्रान खान यांच्या मनात असलेल्या असुरक्षिततेच्या भावनेमुळे अनेक गोष्टी बिघडल्या आहे. त्यातील एक म्हणजे हमीद हे आता पूर्वीपेक्षा अधिक विवादास्पद बनले आहेत आणि त्यामुळे पुढील लष्कर प्रमुख म्हणून त्यांना त्याच्या सहकाऱ्यांनी स्वीकारण्याची शक्यताही आता धूसर होत चालली आहे. हीच गोष्ट पुढे लष्करात दुफळी माजवू शकते.

या संपूर्ण प्रकरणातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी उच्च पदस्थ अधिकार्‍यांना मोठ्या प्रमाणावर तडजोडी कराव्या लागणार आहेत. ह्या गोष्टीला आताच आळा घातला नाही तर लष्करातील अंतर्गत सुसूत्रता बिघडू शकते आणि सैन्यची परिस्थिती पंजाब पोलिसांसारखी होऊ शकते. वादग्रस्त ठरलेले माजी आयएसपीआर प्रमुख आसिफ गफूर पुढील आयएसआय प्रमुख होण्यासाठी लॉबिंग करत असल्याच्या बातम्या ऐकू येत आहेत. गफूर आणि त्याची पत्नी दोघेही इम्रान खान यांच्या पत्नीचे अध्यात्मिक अनुयायी बनले आहेत आणि हमीद यांच्या नंतर त्यांचे पद मिळवण्यासाठी तिच्या प्रभावाचा वापर करत असल्याचे सांगितले जात आहे.

दैवी संकेतांवरील अवलंबित्व : इम्रान खान यांची पत्नी बुशरा अर्थात पिंकी पिरनी या ज्योतिषशास्त्र आणि गूढ विद्यांचा सराव करतात, त्यांच्याच सांगण्यावरून इम्रान कारभाराचे निर्णय घेतात असे म्हटले जाते. उदाहरणार्थ, पंजाबचे मुख्यमंत्री आणि पाक व्याप्त काश्मीरचे पंतप्रधान या दोघांची निवड पिरनी यांनी क्रिस्टल बॉल पाहून केलेल्या भविष्यवाणीवरून झाल्याचे समजते. काही विश्लेषकांच्या मते, हमीद यांनी ४ डिसेंबरचे सूर्यग्रहण होईपर्यंत आयएसआय मध्ये राहण्याची गरज आहे, असा इशारा पिरनी यांनी इम्रान यांना दिला आहे.

दुर्दैवाची बाब अशी की पाकिस्तानी लष्करातील बदली आणि पोस्टिंगचे वेळापत्रक ज्योतिषी आकडेमोडीवर चालत नाही. हमीद यांच्या उत्तराधिकार्‍याचे नावही विशिष्ट आद्याक्षराने सुरू होणारे असावे, असे इम्रान यांना सांगितल्याच्या अफवा पसरलेल्या आहेत.

लाडाची वागणूक : पाकिस्तानी लष्कराकडून इम्रान यांना नेहमीच सौम्य वागणूक देण्यात आली आहे. ओसामाला हुतात्मा संबोधून, अमेरिकेच्या सेक्रेटरी ऑफ स्टेटच्या वक्तव्यांचा ‘अज्ञान’ असा निषेध करून, पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयने दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिल्याचे उघड उघड मान्य करून, सौदी अरेबिया सोबतचे संबंध बिघडवून व इतर संतापजनक विधाने करून खान यांनी अक्षम्य चुका केल्या आहेत. असे असूनही लष्कराने त्यांना सौम्य वागणूक दिली आहे. लष्करप्रमुखांनी पंजाबचे मुख्यमंत्री बदलण्याचे संकेत देऊनही खान यांनी ते फेटाळले आहेत. त्याचमुळे, खान सतत लष्कराची अवहेलना करतील पण त्यांना कोणीही काहीही बोलणार नाही असा त्यांचा भ्रम झाला आहे.

द टीआयएनए फॅक्टर : खान यांच्याशिवाय सैन्याकडे कोणताही राजकीय पर्याय नाही असे खान यांनी त्यांच्या मित्रांना सांगितले आहे. खान यांना पदावरून दूर करणे लष्करासाठी कठीण नाही पण यांच्या जागी दुसर्‍या कोणाची नियुक्ती करणे लष्कराला अवघड जाणार आहे, असे त्यांचे मत आहे. असा काही बदल घडवून आणायचा असेल तर नवाज शरीफ यांचेही मत यात लष्कराला घ्यावे लागेल. सुरुवातीपासूनच नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम हे दोघेही राजकारणातील लष्कराच्या हस्तक्षेपाविरुद्ध आहेत.

इम्रान यांच्यावर सूड उगवण्यासाठी नवाज शरीफ आणि मरियम दोघेही लष्कराला मदत करण्यास तयार होतीलही पण या मदतीच्या बदल्यात त्यांना हवी असलेली गोष्ट लष्कराला देता येईल का ? हे मात्र सांगता येणार नाही. जेव्हा लष्कराला एखादा नेता नको असतो त्यावेळेस कोणतीही राजकीय किंवा संवैधानिक प्रक्रिया लष्कर वापरत नाही याचा मात्र खान यांना पुरता विसर पडला आहे असे वाटते.

कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती असो एकदा का ती व्यक्ती लष्कराला नकोशी झाली की त्याच्यावर कोणतीही दयामाया दाखवली जात नाही. इम्रान खान स्वतःला कितीही मोठा नेता समजत असले तरीही ते या नियमाला अपवाद नाहीत. कोणतेच उपाय चालले नाही तर सत्तापालट हा नेहमी शेवटचा उपाय असतोच.

पुढच्या आठवड्यापर्यंत पाकिस्तानातील चित्र अधिकच स्पष्ट होईल. घडणार्‍या घटनांचे पडसाद म्हणून पाकिस्तानात विरोधी पक्षाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान लोकशाहीवादी चळवळ पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. निवडणूक आयोगावरील भ्रष्टाचाराच्या व परकीय निधी प्रकरणातील केसेस पुन्हा चालू होण्याचे संकेत आहेत. लाहोरमध्ये पुन्हा एकदा तहरीक ई लब्बाईकने धरण आंदोलन सुरू केलं आहे. बलुचिस्तानात यापूर्वीच अविश्वास ठराव मांडलेला आहे. संसद आणि पंजाबमधील असंतुष्ट घटक सध्याच्या शासनव्यवस्थेला कधीही आव्हान देऊ शकतात, याचे स्पष्ट संकेतच मिळाले आहेत.

पुढे काय घडू शकतं याचे हे संकेत आहेत. पुढच्या उन्हाळ्यात येणार्‍या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लष्कर आतापासूनच विरोधी पक्षातील नेत्यांशी संधान बांधण्याचे प्रयत्न सुरू करेल म्हणजेच सत्तापालटाची प्रक्रिया लष्कराला हवी तशी घडवून आणता येईल. पुढे काहीही घडले तरीही पुढचे २२ महीने सत्तेत आणि पदावर टिकून राहणे इम्रान खान यांना कठीण ठरणार आहे हे नक्की.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Sushant Sareen

Sushant Sareen

Sushant Sareen is Senior Fellow at Observer Research Foundation. His published works include: Balochistan: Forgotten War, Forsaken People (Monograph, 2017) Corridor Calculus: China-Pakistan Economic Corridor & China’s comprador   ...

Read More +