Author : Dr. Gunjan Singh

Published on Apr 14, 2020 Commentaries 0 Hours ago

कोरोनाच्या धोक्याबद्दल बोलण्यास चीनने प्रसारमाध्यमांवर नियंत्रण ठेवणे, चीनसह सर्वांना घातक ठरले. अन्यथा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय संसर्ग रोखता आला असता.

…तर कोरोना पसरलाच नसता!

Source Image: internetofbusiness

चीनमधील प्रसारमाध्यमे पूर्णतः चायनीज कम्युनिस्ट पक्षाकडून (CCP) नियंत्रित केली जातात. पक्षाच्या विचारसरणीचा आणि अजेंड्याचा प्रसार करणे, हेच या प्रसारमाध्यमांचे एकमेव प्रमुख काम आहे, असा या पक्षाचा समज आहे. पक्षाच्या ध्येयधोरणांचा प्रसार करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी हातभार लावला पाहिजे, अशीही या पक्षाची अपेक्षा असते. प्रसारमाध्यमांनी स्वतंत्र आणि चिकित्सक असणे तिथे अजिबात अपेक्षित नाही. सामान्यतः तिथे प्रसारमाध्यमांना पक्षाच्या विचारांचे अनुसरण करण्याची सक्ती केली जाते. गेल्या काही दशकांत चीनी प्रसारमाध्यमे पक्षाच्या या प्रभावातून मुक्त होण्यासाठी धडपडत आहेत. पण, यामध्ये त्यांना फारसे यश मिळत नाही.

अगदी जेव्हा २००३ मध्येही सार्स (Severe Acute Respiratory Syndrome) ची साथ आली होती तेव्हा चीन सरकारची पहिली प्रतिकिया ही प्रसारमाध्यमांच्या वृत्तांकनावर आणि चर्चांवर बंदी घालणे, हीच होती. त्याचप्रमाणे जेव्हा चीनमध्ये कोव्हीड-१९ च्या संसर्गजन्य प्रसाराला सुरुवात झाली तेव्हा चीनी प्रसारमाध्यमांची प्रतिक्रिया काय असणार, याचा अंदाज लावणे कठीण नव्हते. अशा आपत्कालीन परिस्थितीतही त्यांचे वर्तन, हे अपेक्षेप्रमाणेच होते. अर्थातच, चीनी प्रसारमाध्यमे पक्षाच्या बाजूने उभी राहिली. मुख्य प्रसारमाध्यमांत कोणत्याही प्रकारच्या गंभीर वृत्तांकनावर बंदी घालण्यात आली होती. याच काळात समाज माध्यमांवरही कडक निगराणी ठेवण्यात आली असून त्यावरील मजकूराचीही छानणी केली जात होती.

डिसेंबर २०१९ मध्ये चीनमध्ये मोठ्या प्रमाणात कोव्हीड-१९ची लागण झाली, असे मानले जाते. परंतु, जानेवारी २०२० पर्यंत चीनच्या कोणत्याही प्रसारमाध्यमातून याविषयीची एकही बातमी किंवा माहिती प्रसिद्ध झाली नाही. या रोगाचा संसर्ग किती वेगाने पसरतो, हे माहिती असूनही अशाप्रकारे माहितीवर नियंत्रण ठेवणे, पुढे चीनमधील समाजाला आणि अर्थव्यवस्थेलाही धोकादायकच ठरले. कारण कोव्हीड-१९ बाबतच्या कोणत्याही माहितीचा चीन सरकारने स्वीकार केला नाही. मृतांचा आकडा वेगाने वाढत असतानाही सर्वकाही सुरळीत असण्याचे भासवणे त्यांनी सुरूच ठेवले. अगदी सुरुवातीच्या पातळीवरच सरकारने परिस्थितीचे गांभीर्य ओळखले असते, तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय संसर्गावरही वेळीच नियंत्रण मिळवता आले असते, असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.

काही काळाने चीनी प्रसारमाध्यमांनी कोव्हीड-१९ अमेरिकेहून चीनमध्ये आल्याच्या बातम्यांचा मारा  करण्यास सुरुवात केली. अमेरिकेने या विषाणूच्या प्रजातीचा विकास केला, आणि सध्या चीन आणि अमेरिकेदरम्यान सुरु असलेल्या व्यापार युद्धात सौदेबाजीमध्ये चीनला कमकुवत करण्यासाठी त्याचा वापर करत असल्याचे वृतांत प्रसिद्ध झाले. अशा प्रकारच्या वृत्ताचे समर्थन करण्यात ‘ग्लोबल टाईम्स’ हे चीनमधील प्रसारमाध्यम आघाडीवर होते. तर चायना डेलीने कोव्हीड-१९संबधित एक घटनाक्रमच प्रसिद्ध केला होता. ज्यामध्ये डिसेंबर २०१९च्या शेवटच्या आठवड्यात कोव्हीड-१९ चा पहिला रुग्ण सापडल्याचे नमूद करण्यात आले होते. शिवाय, शी जिंगपिंग हे संसर्ग रोखण्यासाठी सतत्याने कसे धडपडत आहेत, याविषयीच्या बातम्या देखील चीनी प्रसारमाध्यामातून वारंवार प्रसारित केल्या जात होत्या.

सध्या या क्षणी चीनसाठी अशा प्रकारच्या बातम्या आणि वृत्तांकने दाखवणे गरजेचे बनले आहे. कारण या बातम्यांमधून पक्ष कशा प्रकारे सातत्याने नागरिकांच्या सोबत आहे आणि परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी कसे प्रयत्न करत आहे, हेच दाखवले जात आहे. चीनी सरकार आणि पक्षाकडून पुन्हा एकदा प्रसार माध्यमांचा स्वतःसाठी वापर केला जात आहे. सरकारची काही चूक नसून पक्ष चीनी नागरिकांशी कसा एकनिष्ठ आहे, ते वारंवार लोकमानसावर ठसवले जात आहे.

अशा प्रकारच्या जागतिक महामारीच्या काळातही चीनी प्रसारमाध्यमे स्वतंत्ररित्या वृत्तांकन का करू शकत नाही, हा प्रश्न उपस्थित करणे आवश्यक आहे. अजूनही ही प्रसारमाध्यमे पक्षाचे आदेश पाळत आहेत आणि त्यांच्याचसुरस कथांचा प्रसार का करत आहेत? याचे उत्तर CCP च्या माहितीबद्दलच्या संकल्पना आणि त्याच्या यंत्रणेतच आहे. अगदी राष्ट्रीय आपत्तीच्या वेळीही चीनी प्रसारमाध्यमे ही पक्षाचीच पाठराखण करतात. पक्षाच्या वृतांतामध्ये राष्ट्रीय ऐक्य आणि स्थैर्य या गोष्टींना सर्वोच्च स्थान आहे. पक्षाच्या सत्तेला अधिकृतता मिळण्यासाठी देखील याची आवश्यकता आहेच. अशाप्रकारे शांती आणि स्थैर्य राखण्यात अपयश आल्यास यातून पक्षाला आणि त्याच्या सत्तास्थानाला मोठा धोका उद्भवू शकतो. आपल्या विचारांच्या व्यापक प्रचार करण्यासाठी प्रसारमाध्यम हे एक प्रमुख साधन आहे. तसेच शांतता आणि स्थैर्याची कल्पना अबाधित राखण्यासाठीही प्रसारमाध्यमांची मदत होते.

कोव्हीड-१९ च्या आपत्तीमुळे CCP साठी काही आव्हाने निर्माण होऊ शकतात. देशांतर्गत सुधारणा आणि १९७८ सालापासून सातत्य पूर्ण आर्थिक विकास यामुळे CCP च्या सत्तेला अधिकृत पाठिंबा मिळतो. समाजवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था आणि दोन अंकी आर्थिकविकास दर राखण्यातील सातत्य हे घटक पक्षासाठी सत्तेत राहण्यास सहाय्यभूत ठरले आहे. या काळात तर समाजवादी संकल्पनाही मागे पडली आहे. आर्थिक विकास आणि नागरिकांच्या राहणीमानाचा उच्च दर्जा यामुळे पक्षाची सत्तेवरील पकड अधिक मजबूत झाली आहे. परंतु, कोव्हीड-१९ च्या महामारीमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे.

कोव्हीड-१९ साथीचा उद्रेक होण्याआधीच चीनच्या अर्थव्यवस्थेला घरघर लागली होती आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काही मार्ग मिळतो का, यासाठी पक्षाची धडपड सुरूच होती. पण, या जागतिक महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याने, जागतिक व्यापार आणि गुंतवणूक कमी झाली आहे. ज्या देशांना जागतिकीकरणाचा फायदा झाला त्यामध्ये चीन हा एक प्रमुख देश आहे. म्हणूनच त्याच्या अर्थव्यवस्थेला याचा मोठा फटका बसणार आहे. जागतिक अर्थव्यवस्थेसह चीनच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांपासून बचाव करणे देखील जास्तच कठीण बनणार आहे.

अशा परिस्थितीत चीनी प्रसारमाध्यमे आपले नेतृत्व खंबीर असल्याचे चित्र निर्माण करतील. पण, अशा पद्धतीच्या घटनांमुळे सामाजिक आणि देशांतर्गत पातळीवर देशातील नेतृत्वाबद्दलचा अविश्वास वाढू शकतो. यामुळे सामाजिक स्थैर्य धोक्यात येऊ शकते. CCP ला या एकाच गोष्टीची जास्त दहशत आहे, ती म्हणजे देशांतर्गत निर्माण होणारे प्रतिकूल वातावरण. कारण, CCPला सत्तेत राहायचे असेल तर त्यांच्या सत्तेला जनतेकडून पाठिंबा मिळणे, जास्त गरजेचे आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.