(‘चीन आणि सभ्यताधिष्ठीत राष्ट्र’ या लेखमालेचा हा पाचवा भाग आहे. या आधीचे भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा.)
आज जगभर मान्यताप्राप्त असलेली ‘नेशन-स्टेट’ ही संकल्पना चीनला मान्य नाही. चीन स्वतःला या चौकटीत बसवत नाही. याबद्दल जगभरातील लोकशाहीवादी देशांमध्ये चीनबद्दल नाराजी आहे. कुणी याला हुकुमशाही म्हणतात, कुणी याला अमानवी सरंजामशाही म्हणतात, तर कुणी लोकशाहीची विटंबना म्हणतात. कुणीही काही म्हणू चीन आपली व्यवस्था बदलायला तयार नाही. यामागे चीनचा इतिहास आहे. ज्यात चीनी माणूस स्वतःला ‘टिआनशिआ’चा नागरिक म्हणवतो. ही धारणा गेले कित्येक शतके चीनवर गारूड करून आहे. ‘टिआनशिआ’ म्हणजे स्वर्गाच्या खालोखालचा प्रदेश. चीनी माणसाच्या मनातील ही धारणा समजून घेतल्याखेरीज आपल्याला आजचा चीन कळणार नाही.
पीत नदी आणि यांगत्से या दोन नद्यांच्या खोर्यांचा हान वंशीयांचा प्रदेश चिनी साम्राज्याचा पाया समजला जातो. हजारो वर्षांच्या इतिहासात हा प्रदेश विभाजित झाला पण पुन्हा एकसंघही झाला. काही राज्यकर्त्यांनी या प्रदेशाच्या सरहद्दीवरचे प्रदेश वा राज्ये- तिबेट, शिंगजिआन आपल्या अधिपत्याखाली आणली. तरीही चीन किंवा सरधोपटपणे आपण ज्याला मिडल किंगडम म्हणतो, ते चीन एका मोठ्या नामुष्कीच्या इतिहासातून जन्मले आहे.
आज चीनची राजधानी असेलेले बीजिंग हे कुबलाई खानाने वसवली. मंगोलियाच्या नजिक. कारण कुबलाई खान मंगोल होता. चेंगीज खानाचा नातू. चीनची ऐतिहासिक भिंत मंगोल आक्रमणाला थोपवू शकली नाही. चिनी साम्राज्याचं केंद्र बदलत राहिलं. कधी पीत नदीच्या खोर्यात कधी यांगत्से नदीच्या. चीनमधील सत्ताकेंद्र वा राजधानी जिथे असेल त्या प्रदेशाला मध्यवर्ती राज्य म्हणायचे. मात्र यथावकाश चीनलाच मध्यवर्ती राज्य (मिडल किंगडम) म्हणण्याचा प्रघात रूढ झाला. चिनी मानसामध्ये चीन हा देश जगाच्या केंद्रस्थानी असतो. जपान, कोरीया, व्हिएतनाम, लाओस म्हणजे पूर्व आशियाई देशांची भाषा, लिपी, खाद्य संस्कृती इत्यादीवर चिनी संस्कृतीची मुद्रा आहे. चीन मध्यवर्ती राज्य आहे कारण वांशिक, धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अन्य समूह आणि संस्कृती यांच्यापेक्षा चीन श्रेष्ठ आहे, अशी धारणा त्यामागे आहे.
लिन झेक्सू या चिनी सम्राटाच्या आयुक्ताला, चार्ल्स इलियट या ब्रिटीश व्यापार प्रमुखाने मार्च १८३९ मध्ये अफूच्या व्यापारासंबंधी पत्र लिहीले. सदर पत्रात त्याने ब्रिटन आणि चीन यांचा उल्लेख दोन राष्ट्रे असा केला. चिनी आयुक्ताचे त्यामुळे डोके सणकले. त्याने सदर पत्र चार्ल्स इलियटला परत केले आणि म्हणाला, जगातील कोणताही प्रदेश आमच्या स्वर्गीय साम्राज्याशी बरोबरी करू शकत नाही. लिन झेक्सू वा चीनचा सम्राट चीनबाहेरील जगाबाबत पूर्णपणे अज्ञानी होते. मात्र लिन झेक्सू असे का बोलला, हे चिनी संस्कृतीच्या संदर्भात समजावून घ्यायला हवे.
चिनी संस्कृतीत राष्ट्र-राज्य वा नेशन-स्टेट ही संकल्पना नव्हती. अशी संकल्पना जगात अस्तित्वात आहे आणि त्यानुसार युरोपियन देशांचा कारभार चालतो, याचीही कल्पना चिनी राज्यकर्त्या वर्गाला नव्हती. चिनी संस्कृतीत ‘टिआनशिआ’ ही एक संकल्पना आहे. तिचा अर्थ आहे स्वर्गाखालील प्रदेश. या प्रदेशावर राज्य करण्यासाठी स्वर्गानेच सम्राटाची वा राजघराण्याची नियुक्ती केलेली असते अशी मान्यता आहे. आपण ‘टिआनशिआ’चे निवासी आहोत अशी चिनी माणसाची धारणा असते.
‘टिआनशिआ’ हा केवळ एक प्रदेश नाही तर संस्कृती आहे. त्यातून चिनी संस्कृतीचा जगाविषयाचा दृष्टिकोन कळतो. सम्राटाची सत्ता आणि कन्फ्युशिअसच्या विचारानुसार असणारी सामाजिक घडी म्हणजे टिआनशिआ. चिनी संस्कृती अर्थात मध्यवर्ती केंद्र किंवा मिडल किंगडम सर्वोच्च आहे ही बाब त्यामध्ये अध्याहृत आहे. या संस्कृतीचा, तिच्या परंपरांचा स्वीकार करणारे समूह तिचा भाग बनतात, अशी चिनी धारणा आहे. ब्रिटन आणि चीन हे दोन बरोबरीचे देश आहेत ही भाषा त्यामुळे चिनी अधिकार्याला सहन झाली नाही.
ब्रिटीश आणि अन्य पाश्चात्य राष्ट्रांच्या बोटी व्यापारासाठी चीनच्या समुद्रकिनारी पोचल्या त्या काळात चीनची विभागणी १८ प्रशासकीय विभाग आणि १३०० जिल्ह्यांमध्ये करण्यात आली होती. प्रत्येक जिल्ह्याचा न्यायाधिकारीच त्या जिल्ह्याचा महापौर, पोलीसप्रमुख, न्यायाधीश, करसंकलक, कारागृह प्रमुख आणि प्रशासकीय परिक्षा मंडळाचा प्रमुख असे. एका माणसाला एवढी सर्व कामे करणे अशक्य होते. त्यामुळे परस्परांवर नजर ठेवणारी यंत्रणा गाव पातळीवर निर्माण करण्यात आली होती. गावांतील कुटुंबांचे गट पाडण्यात आले होते.
गावात कोण आला, कोण गावातून गेला यांची यादी गावप्रमुख न्यायाधिकार्याला देत असते. चोरी, दरोडे, जुगाराचे अड्डे, अपहरणाच्या घटना, नाणी पाडण्याचे उद्योग अशा गावातील सर्व वैध-अवैध घटनांची माहिती गावप्रमुखाने न्यायाधिकार्याला देणे बंधनकारक होते. त्यामध्ये गावप्रमुखाने कुचराई केली, तर तो गुन्हा होता. न्यायाधिकारी हा मायबाप सरकार होता. ही रचना कन्फ्युशिअसच्या स्थैर्य आणि सुसंवादाच्या तत्वावर आधारलेली होती.
सम्राट, सम्राटाचे कुटुंबीय हे सर्वोच्च स्थानी होते. त्यानंतर दरबारी आणि नोकरशहा होते. कन्फ्युशिअसचे ग्रंथ त्यांना तोंडपाठ असायचे. लेखी परिक्षांद्वारे त्यांची निवड झालेली असे. १८५० साली या नोकरशहांपैकी ६० टक्के लोक या मार्गाने आले होते. २० टक्क्यांनी त्यांच्या पदव्या विकत घेतल्या होत्या तर उरलेले २० टक्क्यांनी वशिल्याने वा शिफारसींनी आपले स्थान मिळवले होते.
नोकरशहांनंतर मोठे स्थान जमीनदार आणि सरदारांना असे. त्यानंतर शेतकरी व कुळे. त्यांच्यानंतर व्यापारी-दुकानदार. सर्वात खालच्या स्थानावर जे कर देत नाहीत असे लोक. व्यापारी आणि दुकानदार भले श्रीमंत असतील, परंतु त्यांना जमीनदार आणि शेतकरी यांच्या बरोबरीचे स्थान नव्हते. व्यापार्यांना रेशमी कपडे परिधान करण्यास बंदी होती. व्यापारी-उद्योजक-कारागीर यांना कनिष्ठ स्थान असल्याने चीनमधील अनेक शोधांचा व्यापारी उपयोग झाला नाही. उदाहरणार्थ गनपावडर वा बंदुकीच्या दारूचा शोध कारागीरांनी लावला. परंतु त्याचा उपयोग फटाक्यांसाठी सर्वाधिक केला गेला. लांबपल्ल्याच्या तोफा वा प्रगत अस्त्रांसाठी करण्यात आला नाही.
महिलांना तर या समाजात स्थानच नव्हते. चूल आणि मूल एवढ्यापुरते त्यांचे जग मर्यादीत होते. त्यांना मालमत्तेचा अधिकारही नव्हता. सैनिक किंवा लष्कर थेट सम्राटाच्या सेवेत असे. सैनिकांना कोणत्याही प्रकारचा कर द्यावा लागत नसे. सरदारांना अनेकदा सैन्य भरती करण्याचे हुकूम दिले जात. अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर यांच्यामधून ही सैन्य भरती केली जात असे.
काही अभ्यासकांनी चिनी सरंजामशाहीला नोकरशाहीवर आधारित सरंजामशाही अशी संज्ञा दिली आहे. केंद्र सरकारची उत्पन्नाची लक्ष्ये गाठणे अवघड असायचे. कारण ती ठरवताना प्रदेशनिहाय विचार केला जात नसे. स्थानिक म्हणजे जिल्हा व गावावरील होणारा प्रशासनाचा खर्च उपकर वा शुल्क आकारून मिळवावा लागायचा. न्यायाधिकार्याचा पगार अतिशय कमी असायचा. लोकांकडून त्याने आपल्या खर्चाची वा उत्पन्नाची तोंडमिळवणी करावी अशी अपेक्षा होती. दर तीन वर्षांनी त्यांची बदली होत असे.
१८४० पर्यंत गुआंगजौ (कँटोन) या एकमेव बंदरात पाश्चात्यांना प्रवेश होता. सरकारने नेमून दिलेल्या मोजक्या अधिकार्यांसोबतच व्यापाराचे सौदे त्यांनी करणे बंधनकारक होते. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यातच व्यापार करता यायचा. उरलेल्या काळात त्यांनी पाश्चात्यांना मकाव बेटावर मुक्काम करावा लागे. पाश्चात्य व्यापार्यांना चिनी भाषा शिकण्यास मनाई होती. त्यामुळे त्यांना सौद्यामध्ये घासाघीस करता येत नसे. चिनी संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे, या धारणेतून हे निर्बंध घालण्यात आले होते.
१८३९ ते १९४५ हा काळ स्थूलमानाने नामुष्कीचे शतक मानला जातो. १९२० च्या दशकात झालेल्या एका सर्वेक्षणानुसार चीनमध्ये जमिनीवर ६७३ प्रकारचे कर होते आणि त्यापैकी काहींची वसूली ३६ वर्षं आगाऊ केली जायची. काही कर पूर्वलक्षित प्रभावाने लागू केले जायचे. सिचुआन प्रांतात मिठावर २७ प्रकारचे कर वा उपकर होते. तीळ आणि कलिंगडाच्या बियांवरही कर होता. वेश्यांनाही कर द्यावा लागायचा. अफूची लागवड बेकायदेशीर होती. परंतु त्यातूनच सर्वाधिक उत्पन्न मिळे म्हणून शेतकरी अफूची लागवड करायचे. अफूच्या तस्करीतून एकट्या युनान प्रांतातचे वार्षिक उत्पन्न ५० दशलक्ष युवान होते. फुजियान आणि गांशू या प्रांतांचे उत्पन्न २० दशलक्ष युवान होते. अफूचा वापर चलनासारखा व्हायचा.
लाखो लोक लाकडाचा भुसा, गोरखमुंडी ही औषधी वनस्पती, कंदमुळे, झाडाच्या साली, पालापाचोळा खाऊन जगत होते. १९२०-२१ सालात पूर आणि दुष्काळामुळे सुमारे साठ लाख लोक मेले. शेतकरी प्रचंड कर्जबाजारी होते. व्याजाचा दर वर्षाला २०० टक्के होता. डाकूंच्या टोळ्या विविध प्रांतात होत्या. अपहरण हा मोठा उद्योग होता. ज्या व्यक्तीचे अपहरण करायचे तिला लॉटरीचं तिकीट म्हटले जायचे. खंडणी वेळेवर आली नाही तर अपहरण केलेल्या व्यक्तीचे कान कापून त्या व्यक्तीच्या घरी पाठवले जायचे. अपहरण केलल्या व्यक्तीला उदबत्त्यांनी चटके देणे, काट्यांवर नागडे झोपायला लावणे अशा शिक्षा दिल्या जायच्या. अपहृत व्यक्तीच्या पावलांवर खिळे ठोकून तिला पळून जाता येणार नाही, असा बंदोबस्त करून डाकू पसार व्हायचे.
१९२० च्या दशकात चीनमध्ये केवळ ५,२३७ किलोमीटर लांबीचे रेल्वेमार्ग होते. तेही केवळ उत्तरेला. १८५० मध्ये ब्रिटनमध्ये यापेक्षा दुप्पट किलोमीटर लांबीचे रेल्वेमार्ग होते. वाहतुकीसाठी संपूर्ण देशात केवळ २१,००० किलोमीटरचे महामार्ग होते. होड्या, मचवे, जहाजं म्हणजे जलमार्गांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जायचा. एक मजूर ७०-८० किलो वजन पाठीवर घेऊन दिवसाला १५ मैल चालत जात असे.
२० व्या शतकाच्या आरंभी शांघायमध्ये केवळ ४६ उद्योग होते. प्रत्येक उद्योगात सुमारे ५०० मजूर काम करायचे. जिआंगसू प्रांतात ३८६ कारखाने होते. त्यापैकी २६३ कारखान्यात प्रत्येक २५ मजूर होते. १९११ मध्ये संपूर्ण चीनमध्ये केवळ ६०० आधुनिक कारखाने होते. संपूर्ण चीनमधील औद्योगिक कामगारांची संख्या केवळ ७६,००० होती. कामगार कायदे नव्हते, कामाच्या ठिकाणी कोणत्याही सोयी-सुविधा कामगारांना नव्हत्या. अतिशय अमानुष शिस्तीने काम करून घेतले जाई. मजुरी अत्यल्प होती तरिही मजूर दिवसरात्र राबायचे कारण शेतीवर काम केल्यावर मिळणार्या उत्पन्नापेक्षा चार ते आठ पट अधिक उत्पन्न त्यांना मिळत होतं.
‘टिआनशिआ’ वा स्वर्गाखालील साम्राज्याची स्थिती अशी होती. सम्राटाच्या दरबारात या परिस्थितीची गंधवार्ताही कुणाला नव्हती. दरबारी आपल्या ऐय्याशीत मग्न होते. विविध प्रांतातले सरदार मनमानी कारभार करत होते. प्रजेला अक्षरशः पिळून काढत होते. त्यामुळे साम्राज्याचा हा पोकळ डोलारा कोसळणे स्वाभाविक होते.
पहिल्या अफूच्या युद्धातील चीनचा पराभव (१८३९-४२), त्याचा परिणाम म्हणून चिनी सम्राटाला करावे लागलेले मानहानीकारक तह, दुसर्या अफूच्या युद्धातील (१८५६-१८६०) पराभव, या युद्धात ब्रिटीश आणि फ्रेंच फौजांनी केलेली सम्राटाच्या वसंत प्रासादाची राखरांगोळी, १८८४-८५ च्या युद्धात जपानी फौजांनी केलेला चीनचा पराजय, आठ राष्ट्रांनी एकत्र येऊन दडपलेले बॉक्सर बंड (१८९९-१९०१), तिबेटमधील ब्रिटिशांचे आक्रमण (१९०३-०४), १९१५ साली जपानने केलेल्या २१ मागण्या (त्यापैकी १३ मागण्या चिनी सम्राटाला मान्य कराव्या लागल्या), १९३१ मध्ये जपानने मांचुरियावर केलेला कब्जा आणि दुसर्या महायुद्धाच्या काळात जपानने चीनवर केलेलं आक्रमण(१९३७-१९४५), हे चीनच्या नामुष्कीच्या वा अवहेलनेच्या शतकातले महत्वाचे टप्पे मानले जातात.
या अवहेलनेच्या विरोधात चीनमध्ये दोन राजकीय प्रक्रिया आकार घेऊ लागल्या. राष्ट्रवादी कोमिंग्टान पक्ष आणि कम्युनिस्ट पक्ष. कोमिंग्टानचा भर होता राष्ट्रीय चेतना जागृत करण्यावर. पाश्चात्य राष्ट्रांनी केलेल्या चीनच्या अवहेलनेला पूर्णविराम देऊन, पुन्हा एकदा आधुनिक टिआनशिआ, म्हणजे हान वंशीयांचे स्वर्गाखालील साम्राज्य स्थापन करण्याचे स्वप्न डॉ. सन यत सेन आणि कोमिंग्टानचे पुढारी पाहात होते. कोमिंग्टानच्या वळचणीला उभा असलेला, कम्युनिस्ट पक्ष मात्र वर्गसंघर्षाला प्राथमिकता देत होता. काल्पनिक भूतकाळातील चिनी साम्राज्याचे उदात्तीकरण करण्यात कम्युनिस्टांना काडीमात्र रस नव्हता. चिनी साम्राज्य, कन्फ्युशिअसची शिकवण व त्यावर आधारित समाजव्यवस्था उद्ध्वस्त करणे हा कम्युनिस्ट पक्षाचा कार्यक्रम होता.
नामुष्कीच्या शतकाच्या अखेरच्या दशकात कोमिंग्टान आणि कम्युनिस्ट यांच्यातील यादवी युद्धाला सुरुवात झाली. माओ झेडाँगच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्टांचा विजय झाला. पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाची स्थापना झाली. एकविसाव्या शतकात मात्र, कम्युनिस्ट चीनला कोमिंग्टानच्या स्वप्नाची आणि कन्फ्युशिअसच्या शिकवणुकीची भुरळ पडली आहे, हा दैवदुर्विलास आहे.
(‘चीन आणि सभ्यताधिष्ठीत राष्ट्र’ या लेखमालेचा हा पाचवा भाग आहे. या आधीचे भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा.)
संदर्भ
- Never Forget National Humilation
Historical Memory in Chinese Politics and Foreign Relations
By Zheng Wang
- Columbia University Press, 2012
The Penguin History of Modern China: The Fall and Rise of a Great Power..
By Jonathan Fenby, 2008
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.