नॉव्हेल करोना विषाणूच्या (एनसीओव्ही) उद्रेकाने टोक गाठल्याचे तूर्तास तरी कोणतेच चिन्ह नाही. आतापर्यंत या विषाणूने चीनमध्ये ६०० जणांचा बळी घेतला आहे तर ३०,००० लोकांना त्याची बाधा झाली आहे. तसेच चीनबाहेर २६ देशांमध्ये या आजाराचे १५० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. २००२-२००४ या कालावधीत पसरलेल्या ‘सार्स’ विषाणूपेक्षा करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे प्रमाण कमी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु या विषाणूवर प्रभावी लस शोधायला किमान ६ ते १२ महिन्यांचा कालावधी लागेल, असेही तज्ज्ञ सांगतात. आताशा करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे प्रमाण घटत चालल्याचे दावे पुढे येऊ लागले आहेत.
करोना विषाणू वेगाने पसरत असून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी डिसेंबर महिन्यातच दिला होता. मात्र, या इशा-याकडे सरकारी यंत्रणांनी काणाडोळा करणेच पसंत केले. वुहानमधील रुग्णांवर उपचार करणा-या नेत्ररोगतज्ज्ञाने करोनाच्या संसर्गाबाबत वेळीच सावध होणे, गरजेचे असल्याचा इशारा डिसेंबरमध्येच दिला होता. परंतु वुहान पोलिसांनी उलट या वैद्यकीय तज्ज्ञाचीच मुस्कटदाबी केली. अफवा पसरवत असल्याचा आरोप करत पोलिसांनी संबंधित वैद्यकीय तज्ज्ञाला ताब्यात घेतले. संबंधित वैद्यकीय तज्ज्ञासह इतर सात जणांवरही पोलिसांनी कारवाई केली. चीनच्या सर्वोच्च न्यायालयानेही पोलिसांचीच री ओढत सर्व वैद्यकीय तज्ज्ञांच्या पोलिस कोठडीवर शिक्कामोर्तब केले.
करोना विषाणूच्या उद्रेकाचे केंद्रबिंदू असलेल्या वुहानमध्ये या आजाराने बाधित झालेल्यांचा मृत्यूदर सर्वाधिक आहे. करोना विषाणूच्या उद्रेकानंतर चीनच्या मृत्यूदरातही (निश्चित रुग्ण आणि एकूण मृत्यू यांच्यावर आधारित) २.३ वरून २.१ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने ४ फेब्रुवारीपर्यंतच्या दिलेल्या आकडेवारीतून हे स्पष्ट झाले आहे. हुबेई प्रांतात मात्र मृत्यूदराचे प्रमाण ३.१ टक्के आहे. आरोग्य यंत्रणांनी सर्व लक्ष वुहानवरच केंद्रित केले असल्याने हुबेई प्रांतातील छोट्या शहरांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. उदाहरणच द्यायचे झाल्यास हुबेई प्रांतातील एझु शहराचे देता येईल. वुहानपेक्षाही येथे बळींची संख्या जास्त असून मृत्यू दरही अधिक आहे. तसेच या शहरात पुरेशा वैद्यकीय सुविधाही नाहीत आणि औषघांचा पुरवठाही कमी आहे, असे निदर्शनास आले आहे.
हुबेई प्रांतात अतिदक्षता विभाग तज्ज्ञ आणि रुग्णालयातील खाटा यांची प्रचंड वानवा आहे. चीनच्या वैद्यकशास्त्र अकादमीचे प्रमुख वँग चेन यांच्या मते करोना विषाणूच्या उद्रेकाने टोक गाठले असल्याची सध्या तरी कोणतीच चिन्हे नाहीत. तसेच या विषाणूच्या संसर्गाचे उत्तम वाहक म्हणजे आजाराची अगदी किरकोळ लक्षणे असलेले रुग्ण, ज्यांच्याकडे केवळ रुग्णालयात पुरेशा खाटा नाहीत म्हणून दुर्लक्ष झाले. करोनाच्या उद्रेकाची व्याप्ती लक्षात आल्यानंतर हुबेई प्रांतात पुरेशा खाटांची संख्या असलेले रुग्णालय उभारण्यापासून औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देणे, रुग्णांना तसेच नगरजनांनाही त्यांचा लाभ उठवता येईल, असे वातावरण तयार करणे इत्यादींची गरज अधोरेखित झाली आहे.
राजकीय प्रतिसाद
करोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वदूर पसरू लागल्यानंतर चीन सरकार खडबडून जागे झाले. २५ जानेवारी रोजी अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या स्थायी समिती (पीएसबीसी) बैठकीत करोना विषाणूच्या फैलावाला आळा कसा घालायचा यावर जोरदार चर्चा झाली. बैठकीचे सीसीटीव्ही चित्रण उपलब्ध झाले असून त्यात अध्यक्ष आणि समितीचे सहाही सदस्य तावातावाने चर्चा करताना दिसतात. यावरून सर्वोच्च सत्तामंडळ या साथीच्या आजाराबाबत कसे गंभीर आहे, हे दाखवून देण्यात आले.
३ फेब्रुवारी रोजी पीएसबीसीची पुन्हा एकदा बैठक झाली. झिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार पीएसबीसीच्या या बैठकीत सद्यःस्थिती ही चीनच्या प्रशासन आणि क्षमता यांची सत्त्वपरीक्षा घेणारे असून पूर्ण क्षमतेने चीन या परिस्थितीला सामोरे जाईल आणि उद्रेकाला तोंड देण्यात आलेले अडथळे दूर करून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक बळकट करेल, या मुद्द्यांवर भर देण्यात आला.
४ फेब्रुवारी रोजी चीन सरकारचे मुखपत्र असलेल्या ’पीपल्स डेली’ या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर विशेष संपादकीय झळकले. त्यात लिहिले होते की, ‘करोना विषाणूविरोधात ‘जनयुद्ध’ छेडले गेले असून अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाणा-या या युद्धात जनतेने सहभागी होऊन कम्युनिस्ट पक्षाला साथ दिल्यास आपला विजय नक्की होईल.’ खरे तर अध्यक्षांपेक्षा पंतप्रधान ली केकियांग आणि उपपंतप्रधान सन चुनलान हेच प्रत्यक्ष परिस्थिती हाताळताना दिसत आहेत.
केकियांग यांनी वुहानला भेट देत परिस्थितीची पाहणी केली तर चुनलान यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी झटत असलेल्या यंत्रणेचे नेतृत्व केले. असे असले तरी प्रसारमाध्यमांनी मात्र क्षी जिनपिंग यांनाच झुकते माप दिले आहे. स्वतः क्षी कसे परिस्थिती हाताळत आहेत, त्यांनी परिस्थितीवर कसे नियंत्रण मिळवले आहे, कसे ते स्वतः जातीने सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असून यंत्रणांना आदेश देत आहेत यांच्या वर्णनांनीच वृत्तपत्रांचे रकाने भरले आहेत.
करोना उद्रेकाचे राजकीय परिणाम काय असतील, या चिंतेने चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला ग्रासले आहे. ३ फेब्रुवारीला झालेली पक्षाची बैठक ही चिंता अधोरेखित करते. या बैठकीत पक्षाने सर्व अधिका-यांना ऑनलाइन प्रसारमाध्यमांवर घट्ट नियंत्रण ठेवत ‘चीन सरकारने करोनाविरोधात छेडलेले हे जनयुद्ध जिंकायचेच’, या दिशेने जनमत घडविण्याचे आदेश दिले. बैठकीच्या दुस-याच दिवशी सार्वजनिक सुरक्षा मंत्री(पोलिस) झाओ केझी यांनी देशभरातील पोलिसांना टेलिकॉन्फरन्सद्वारे संबोधित करत विषाणूविरोधातील लढाईसाठी सुरक्षित आणि स्थिर वातावरण कायम ठेवण्याचे आदेश दिले. करोनाविरोधातील जनयुद्धात कोणी ‘दुष्ट शक्ती’ बाधा आणत असतील तर त्यांचा कठोर बंदोबस्त करण्याचे आदेशही मंत्रिमहोदयांनी दिले.
प्रशासकीय प्रतिसाद
करोनाविरोधातील लढाईचे नेतृत्व पंतप्रधान ली केकियांग करत आहेत. सोमवार, २७ जानेवारी रोजी केकियांग यांनी वुहानला भेट दिली. करोना विषाणूच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत, याचा त्यांनी आढावा घेतला. तसेच ज्या रुग्णालयात करोनाचे सर्वाधिक रुग्ण दाखल आहेत त्या रुग्णालयालाही केकियांग यांनी भेट दिली. चिनी नववर्षाच्या निमित्ताने चीनमध्ये ३० जानेवारीपर्यंत सार्वत्रिक सुट्टी असते. मात्र, करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता सुट्टीची मुदत २ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली.
चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या मध्यवर्ती समितीच्या आघाडीच्या गटाने हा निर्णय घेतला. पंतप्रधान ली केकियांग आणि त्यांचे सहकारी वँग हुनिंग यांच्या नेतृत्वाखालील हा आघाडीचा गट करोनाच्या उद्रेकावर नियंत्रण आणण्यासाठी काम करत आहे. करोनाला समर्थपणे तोंड देण्यासाठी औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याबरोबरच दैनंदिन जीवनात लागणा-या आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यातही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन या आघाडीच्या गटाने दिले.
परंतु प्रत्यक्ष जमिनीवरची स्थिती वेगळीच होती. उपपंतप्रधान सन चुनलान हे प्रत्यक्ष जमिनीवरची परिस्थिती हाताळत असून ते ‘मध्यवर्ती मार्गदर्शक गटा’चे नेते आहेत. करोना विषाणूविरोधातील जनयुद्धाचे नेतृत्व या गटाने स्वतःच्या हाती घेतले असून ‘प्रत्येक संशयित रुग्णाची कसून तपासणी’ करण्याचे आदेश या गटाने दिले आहेत. आजाराची साथ सर्वदूर पसरू नये हाच या आदेशामागील हेतू आहे. वुहानमधील हौशेंशान आणि लिशेंशान या दोन ठिकाणी रुग्णालये उभारण्यात आली असून चीनच्या लष्कराकडे – पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) – त्याचे नियंत्रण सोपविण्यात आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेने वुहानमधील व्यायमशाळा, प्रदर्शन केंद्रे आणि क्रीडा संकुले यांचे रुपांतर रुग्णालयांमध्ये करण्याचा चंग बांधला आहे;जेणेकरून अधिकाधिक रुग्णांना या ठिकाणी दाखल करून त्यांच्यावर वेळीच उपचार केले जाऊ शकतील. आतापर्यंत वुहानच्या स्थानिक स्वराज्य संस्थेने अशा ११ ठिकाणांचे तात्पुरत्या रुग्णालयांमध्ये रुपांतर करून १०,००० खाटांची व्यवस्था केली आहे. गंभीर स्वरूपात आजारी असलेल्यांसह सर्व रुग्णांना या ठिकाणी दाखल करून घेण्यात येत आहे. परंतु गंभीर स्वरूपात बाधित असलेल्या रुग्णांना जितक्या प्रमाणात एकटे ठेवता येईल तेवढा करोनाच्या प्रादुर्भावाला आळा बसेल, यावर यंत्रणांचा ठाम विश्वास आहे. काइजांग मासिकाने दिलेल्या वृत्तानुसार करोना आजाराची लागण झालेल्या सर्व रुग्णांना ५ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत रुग्णालयांत दाखल करा, असे आदेश अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी वुहान सरकारला दिले आहेत. जे या आदेशाचे पालन करणार नाहीत त्यांना तातडीने कामावरून निलंबित करण्याचे आदेशही जिनपिंग यांनी दिले आहेत.
आर्थिक परिणाम
करोना विषाणूमुळे चीनमध्ये होणारी जीवितहानी आणि त्याचा सर्वदूर होत असलेला प्रादुर्भाव याव्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे या साथीच्या आजारामुळे चीन आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर होत असलेला परिणाम. करोनाच्या संसर्गामुळे चिनी गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे परिणामी नववर्षानिमित्ताने सुट्टी असलेला भांडवली बाजार सोमवार, ३ फेब्रुवारी रोजी सुरू झाला त्यावेळी साफ कोसळला. बीओसी इंटरनॅशनल (चीन) या संस्थेचे मुख्य अर्थतज्ज्ञ क्षु गाओ यांच्या मते करोनाच्या उद्रेकामुळे सुरू असलेली ही आर्थिक पडझड क्षणिक ठरेल कारण ज्या पद्धतीने चीन सरकार या साथीच्या आजाराशी दोन हात करत आहे ते पाहता या महिन्याच्या अखेरीस ही साथ आटोक्यात येऊन बाजार स्थिरावेल, यात शंका नाही.
राष्ट्रीय विकास आणि सुधारणा आयोगाचे (एनडीआरसी) उपप्रमुख लिआन वेइलियांग यांच्या मते ‘२००२-२००३ मध्ये झालेल्या सार्स साथीच्या वेळी असलेल्या चिनी आर्थिक ताकदीच्या तुलनेत सध्याची स्थिती खूपच भक्कम आहे. चीनची आर्थिक ताकद, वस्तू आणि साहित्य यांचा साठा अत्याधिक प्रमाणात आहे. तसेच अशा प्रकारच्या आपत्तींना तोंड देण्याच्या चीनच्या क्षमतेतही कैकपटींनी वाढ झालेली आहे.’
तज्ज्ञांच्या मते सार्स काळाच्या तुलनेत २०२० मध्ये असलेली चिनी अर्थव्यवस्था अधिक गुंतागुंतीची आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, कॉर्पोरेट, ग्राहक आणि गहाण कर्जाचे प्रमाण प्रचंड आहे. तसेच हुबेई व त्या पलिकडील प्रांतांची पूर्ण नाकाबंदी केल्याने पुरवठा साखळी आणि सामान ने-आण करण्याच्या कामात ‘न भूतो, न भविष्यति’ असे अडथळे येत आहेत. त्यामुळे अनागोंदी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
सार्स आणि करोना यांच्या काळातील तुलना करण्याच्या या टप्प्यात आणखी एक मुद्दा महत्त्वाचा ठरतो, तो म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पादनातील (जीडीपी) ग्राहक खपाचे प्रमाण. जीडीपीतील हे ग्राहक खपाचे प्रमाण २००३च्या तुलनेत खूपच जास्त आहे. रोजगार पुरवण्यात सर्वाधिक वाटा असलेले मध्यम, लघु आणि अतिसूक्ष्म उद्योग संवेदनशील असून करोना उद्रेकाचे सर्वात जास्त आर्थिक परिणाम त्यांच्यावरच होण्याची शक्यता अधिक आहे. परंतु त्याचवेळी चिनी अर्थव्यवस्थेवर करोना उद्रेकामुळे होणा-या परिणामांचा जागतिक अर्थव्यवस्थेवरही विपरित परिणाम होणार आहेत, हे नक्की. २००३ मध्ये चीनचा जागतिक अर्थव्यवस्थेतील वाटा फक्त ४ टक्के होता. मात्र, २०१९ मध्ये त्याचे प्रमाण १६ टक्क्यांवर पोहोचले आहे.
करोनाचा सर्वात प्रथम परिणाम झाला तो पर्यटन आणि हवाई सेवा क्षेत्रांवर. चीनमध्ये देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय हवाई सेवा पूर्णतः बंद करण्यात आल्या. तर अनेक चिनी पर्यटकांनी त्यांचे परदेशात जाण्याचे बेत रहित केले.जागतिक पर्यटन क्षेत्रात चिनी पर्यटकांचा वाटा सर्वाधिक आहे. चीनच्या बँकिंग आणि विमा नियामक आयोगानेही प्राप्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कंपन्यांना दिलासा देणारी घोषणा केली. आपल्या निवेदनात आयोगाने म्हटले आहे की, ‘व्याजदर कमी करून, कर्ज नवीनीकरण धोरणासाठी व्यवस्थेत सुधारणा करणे आणि मध्य मुदतीचे आणि पत कर्जांच्या वृद्धीसाठी कंपन्यांना सहकार्य केले जाईल.’
दरम्यान, अनेक शहरांनी लघु आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगांवरील कर्ज, भाडे आणि सामाजिक सुरक्षा यांच्या देयकांचे ओझे कमी करण्यासाठी त्यांना दिलासादायी ठरेल, अशा धोरणांची आखणी केली आहे. चीनची मध्यवर्ती बँक असलेल्या पीपल्स बँक ऑफ चायनाने (पीबीओसी) उत्पादन क्षेत्रासाठी पत पाठिंब्याची घोषणा केली असून त्यामुळे मध्यम, लघु आणि अतिसूक्ष्म (एमएसएमई) उद्योगांना बळ मिळणार आहे. करोनाच्या उद्रेकामुळे होणा-या परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी आणि वैद्यकीय मदत व जीवनावश्यक वस्तू यांच्या सुरळीत पुरवठ्यासाठी चिनी मंत्रिमंडळाने करसवलती आणि कर्ज धोरणांची घोषणा केली आहे.
असे असले तरी कैक्झिनच्या मते ‘एमएसएमई’च करोना विषाणूचे सर्वाधिक ‘अ-मानवीय’ बळी ठरणार आहेत. नववर्षानिमित्ताने जाहीर करण्यात आलेल्या सुट्टीची मर्यादा आता ९ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आल्याने या निर्णयाचा सर्वाधिक फटका लघु व तत्सम उद्योगांनाच बसणार आहे. स्थानिक प्रशासनांनी त्यांचे कर आणि भाडे कमी करूनही हीच परिस्थिती कायम राहणार आहे. अशा प्रकारच्या तात्पुरत्या उपायांनी अल्पकालीन रोखता व्यवहारासारख्या मुद्द्यांवर उतारा मिळू शकेल परंतु या क्षेत्राशी निगडीत मोठ्या अडचणींचे निराकरण त्यामुळे होऊ शकणार नाही. करोनाचा उद्रेक होण्यापूर्वी लघु व तत्सम उद्योग क्षेत्र मलूल होते, आता तर ते बुडीत खात्यातच जाण्याची शक्यता आहे.
येत्या काही आठवड्यांत चीनच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण पडणार आहे. लष्कराच्या तुकड्या इकडून तिकडे हलविण्याबरोबरच कम्युनिस्ट पक्ष आणि पोलिस अर्थव्यवस्था स्थिर करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. पीपल्स बँक ऑफ चायना (पीबीओसी) या मध्यवर्ती बँकेनेही प्रयत्नांची शिकस्त करताना बाजारपेठेत पैशांची चणचण भासणार नाही, याची ग्वाही दिली आहे. बँकिंग क्षेत्रातील रोखता सुस्थितीत राहावी आणि व्याजदर स्थिर राहावेत यासाठी पैसा ओतण्याची तयारी मध्यवर्ती बँकेने दाखवली आहे.
२८ जानेवारी रोजी बँकेने रीतसर तशी घोषणाही केली. ४ फेब्रुवारी रोजी पीबीओसीने बँकिंग क्षेत्रात तब्बल ५७ अब्ज डॉलर एवढा निधी ओतला. जानेवारी, २०१९ पासून तो आतापर्यंतचा एकाच दिवशी केलेला सर्वात मोठा व्यवहार होता. त्यामुळे ३ फेब्रुवारीपर्यंत मलूल होत गेलेल्या युआन या चिनी चलनातही मोठी धुगधुगी निर्माण झाली. त्याचा परिणाम असा झाला की, दुस-याच दिवशी चिनी चलन धट्टेकट्टे झाले आणि शांघाय भांडवली बाजाराने तेजी अनुभवली.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.