साहित्यिकांच्या शब्दवैभवाने सजलेला, हिंदी वा कोणत्याही भारतीय भाषेतील गाण्यांमध्ये हमखास आढळणारा सौम्य-शीतल चंद्र आजवर आपल्यासाठी पृथ्वीपासून कैक योजने दूर असलेला उपग्रह होता. मात्र, आता लवकरच आपण म्हणजे आपल्या अवकाश संस्थेने पाठवलेले मानवरहीत यान- चंद्रावर पाऊल ठेवणार आहोत. हा चंद्र ना स्वयंभू, रवितेज वाहतो हा, असे वर्णिलेल्या चंद्रावर सूर्यप्रकाश परावर्तित होऊन त्यामुळे आपल्याला चंद्र प्रकाशमान भासतो, असे वर्णन ऋग्वेदात आहे. आपल्या आसपास वावरणा-यांपैकी काहींच्या नावांमध्ये चंद्र असतोच. अमरकोश या संस्कृत शब्दकोषात चंद्राला एकंदर २० नावांनी संबोधित करण्यात आले आहे. आपल्या संस्कृतीत चंद्राला महत्त्व दिले आहे. एवढे सारे असूनही सोमवार, २२ जुलै २०१९ रोजीपर्यंत आपण हजारो किमी अंतर दूर होतो. आपल्या संस्कृतीत ग्रह-ता-यांविषयी एवढी सखोल माहिती असूनही आपण केवळ तंत्रज्ञानाच्या अभावामुळे एवढे मागे होतो. मात्र, आता ही दरी भरून निघाली आहे, असे म्हणायला हरकत नाही.
आपला शेजारी देश- चीन- अमेरिकेला मागे टाकून अवकाशात स्वतःचे स्थान बळकट करण्याच्या प्रयत्नात असतानाच भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान २ चे प्रक्षेपण करून अवकाशात चीनला आव्हान देण्याचे इरादे स्पष्ट केले आहेत. चांद्रयानातील यंत्रवाहन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर येत्या ४८ दिवसांत उतरणार आहे. दरम्यान, अमेरिकेनेही येत्या पाच वर्षांत तिस-यांदा समानव चांद्रयान पाठविण्याचे सूतोवाच केले आहे.
५० वर्षांपूर्वी जेव्हा अमेरिकेच्या अपोलो यानाने अवकाशात चंद्राच्या दिशेने झेप घेतली होती त्यावेळी जगातील सर्व जण चंद्राच्या पृष्ठभागावर मानवाच्या त्या पहिल्यावहिल्या स्वारीचे वर्णन ऐकण्यासाठी कान रेडिओला लावून बसले होते. नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवताच ‘माणसाचे एक छोटे पाऊल परंतु मानवजातीची मोठी उडी’, असे म्हटले. त्यांचे हे वाक्य अजरामर झाले. शतकानुशतके अखिल ब्रह्मांडातील अनेक ग्रह-ता-यांविषयी असलेली उत्सुकता आणि त्या उत्सुकतेचा एक भाग म्हणून आर्मस्ट्राँग यांनी अखिल मानवजातीचीच भावना बोलून दाखवली होती. आता भारतही चंद्रापासून फार दूर नाही. सर्व काही ठरल्याप्रमाणे होत गेले तर ७ सप्टेंबरला पहाटे २ वाजून ५८ मिनिटांनी चांद्रयान २ चंद्रावर उतरेल आणि अवकाशातील निवडक महाशक्तींच्या पंक्तीत भारत जाऊन बसेल. २०१४ मध्ये यशस्वी ठरलेले मंगलयानाचे प्रक्षेपण आणि यंदाच्या वर्षी मार्च महिन्यात यशस्वी ठरलेली उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र चाचणी, हे सर्व पाहता भारताची अवकाशातील भरारी कोणीही नाकारू शकणार नाही.
अर्थात येत्या ४८ दिवसांत चांद्रयान मोहीम अयशस्वी ठरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. इस्रायलची चांद्रमोहीम अशीच फसली होती. अवकाशयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यास काही क्षण राहिले असतानाच इस्रायलच्या चांद्रयानात बिघाड निर्माण झाला. चीन आणि रशियाप्रमाणे अमेरिकेच्याही काही चांद्रमोहिमा फसल्या होत्या. असे असले तरी अपयश ही यशाची पहिली पायरी ठरते. इस्रोच्या मदतीने भारताने अंतरिक्षात एकाचवेळी अनेक उपग्रह सोडण्याचे तसेच उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र डागण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. त्या अर्थाने उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या तंत्रज्ञानात भारताला जगन्मान्यता मिळाली आहे.
आगामी काळ अवकाशातील स्पर्धेचा आहे. त्या अनुषंगाने इस्रोने आपली कामगिरी निश्चितच उंचावलेली आहे. भारतीय वैज्ञानिकांनी गाठलेला हा टप्पा निश्चितच कौतुकास्पद आहे. आता चांद्रयान २च्या विज्ञानात तंत्रज्ञांनी कौशल्य पणाला लावावे आणि अवकाश तज्ज्ञांनी चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर सुखरूप कसे उतरेल, यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी. चांद्रयान २ चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले की मग अवकाशातील स्पर्धेचे एक नवे दालन भारतासाठी खुले होईल.
चंद्राच्या पृष्ठभागाचा आणि चंद्रावरील वातावरणाचा अभ्यास करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. या क्षेत्रात कोणा एका देशाची मक्तेदारी नकोच आहे. निदान चंद्राला तरी ‘वन बेल्ट, वन रोड’पासून दूर ठेवले जावे. एक तर भारताने आधीच अंटार्क्टिका मोहिमेची सुवर्णसंधी गमावली आहे. त्यामुळे चंद्रावर कोणी मालकीहक्क सांगून तिथे वसाहती निर्माण करण्याच्या आगोदर भारताने या क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, हे उल्लेखनीयच.
अवकाशात वाढत चाललेली लष्करी स्पर्धा हाही प्रत्येकाचा चिंतेचा विषय झाला आहे. राष्ट्रीय सुरक्षेला अंतराळातूनही धोका असल्याच्या वास्तवाकडे भारत कदापिही काणाडोळा करू शकत नाही. पृथ्वीच्या कक्षेत भूस्थिर असलेले शेकडो उपग्रह दिशादर्शन, टेलिकम्युनिकेशन्स, बँकिंग व्यवहार, हवामानाचा अंदाज यांबरोबरच राष्ट्रीय आणि व्यावसायिक हित जपण्यासंदर्भातील अनेक गोष्टी हे उपग्रह करत असतात. या पार्श्वभूमीवर या अमूल्य उपग्रहांचे रक्षण करणे आणि उपग्रहविरोधी क्षेपणास्तर तंत्रज्ञानापासून त्यांचा बचाव करणे हे कोणत्याही सार्वभौम देशाचे आद्य कर्तव्य ठरते.
तंत्रज्ञान दररोज विकसित होत असते, त्यात दररोज काही ना काही बदल घडत असतात, त्यामुळे अवकाशातील आपल्या मालमत्तांना असलेला धोका राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा ठरतो, हे धोकेही दररोज आपले रूप बदलत असतात. या पार्श्वभूमीवर या उपग्रहांचे रक्षण करून पर्यायाने देशाचे आणि उपखंडाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपसूकच येऊन पडते. या सर्व पार्श्वभूमीवर १९६७ साली पारित करण्यात आलेला आऊटर स्पेस करार कालबाह्य ठरतो. कारण आता अवकाशात प्रचंड संहारक शक्ती असलेले अनेक उपग्रह मुक्तपणे विहरत असतात.
अवकाशातील प्रगती आता ही काही रोमांचकारी किंवा साहसी मोहीम राहिलेली नाही. धोरणात्मकरित्या ही प्रगती आता प्रत्येक देशाची गरज बनू लागली आहे. शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेने ही अवकाशातील शर्यत जिंकली. त्यामुळे अमेरिकेच्या प्रोपगंडाला एक वलय प्राप्त झाले. परंतु अलिकडच्या दशकांत या अवकाश स्पर्धा किती तकलादू आणि खर्चिक होत्या, हे स्पष्ट होऊन त्यातील फोलपणा उघडकीस आला आहे. अमेरिका आणि रशिया या महाशक्ती परस्परांवर नजर ठेवण्यासाठी अवकाशाचा वापर करत होत्या. त्यामुळे आपणही ऋग्वेदातील ऋचेप्रमाणे भाबडेपणाने असे म्हणू शकत नाही की, भारताच्या अंतराळ मोहिमा केवळ शांततेसाठीच आहेत किंवा कसे.
१९ एप्रिल १९७५ रोजी इस्रोने रशियाच्या कापुस्तिन यार या प्रक्षेपकाच्या साह्याने आर्यभट्ट हा उपग्रह पहिल्यांना अवकाशात सोडला होता. तेव्हापासून इस्रोने प्रगतीचा बराच मोठा पल्ला गाठला आहे. आता या क्षेत्रातील उगवती महासत्ता म्हणून भारताकडे पाहिले जात आहे, जिचे लक्ष्य आहे चंद्र!
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.