Published on Jun 23, 2021 Commentaries 0 Hours ago

अमेरिकेच्या माघारीनंतर, अफगाणिस्तानच्या हवाई दलाला टिकून राहण्यासाठी मदत करणे, प्रशिक्षण देणे हे अनेक अर्थाने भारतासाठी फायद्याचे आहे.

अफगाणिस्तानात भारताला ‘हवाई’ संधी!

अमेरिकेने जूनच्या मध्यापर्यंत अफगाणिस्तानातील आपले ५० टक्क्यांहून अधिक सैन्य माघारी बोलावले आहे. या सगळ्या घडामोडींबाबत अमेरिकेच्या संरक्षण व्यवस्थेचे कार्यालय पेंटॅगॉनने जाहीर केलेल्या निवेदनानुसार, अफगाणिस्तानात तैनात असलेले अमेरिकेचे संपूर्ण लष्कर माघारी बोलावण्यासाठी निश्चित केलेल्या किंवा प्रतिकात्मक म्हणता येईल अशा, ११ सप्टेंबर २०२१ या तारखेपूर्वी तिथून लष्कर माघारी आणता यावे, यादृष्टीने राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे प्रशासन वेगाने कार्यवाही करत आहे.

लष्कर माघारी बोलावण्यासाठीच्या अमेरिकेच्या या वेगामुळे अफगाणिस्तान आणि अमेरिका या दोन्ही देशांची धोरणांबाबत मात्र गोंधळ निर्माण झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. अफगाणिस्तानातल्या दहशतवादी आणि बंडखोरांच्या कारवायांविरोधात भविष्यात अमेरिकेची काय भूमिका असेल याबद्दल फारशी स्पष्टताही नाही. त्यामुळे पुन्हा एकदा काबूलच्या पतनाची पुनरावृत्ती होईल अशी स्थिती आहे. महत्वाची बाब म्हणजे या सगळ्या परिस्थितीत पुन्हा एकदा बळ मिळालेल्या तालिबान्यांविरोधात लढताना अफगाणचे सैन्य किती कार्यक्षम आणि सुरक्षित असेल याबाबतची अनिश्चितताही वाढली आहे.

अफगाणिस्तानच्या भूमीवर होत असलेल्या असंख्य बंडखोरांच्या कारवायांविरोधात लढा देण्याच्यादृष्टीने एएएफ अर्थात अफगाणचे हवाई दल नेहमीच महत्वाचे साधन किंवा हत्यार ठरले आहे. मात्र आता तिथून अमेरिकाच माघार घेत असल्याने अफगाणी हवाई दलाची कार्यक्षमताही कमी होऊ शकते किंवा ते निकामी ठरू शकते. कारण अमेरिकेच्या माघारीसोबतच अफगाणच्या हवाई दलाला कार्यरत ठेवण्यासाठी तिथे प्रयत्नपूर्वक काम करत असलेले १८,००० हून अधिक कंत्राटदारही आपोआपच माघारी जाणार आहेत. यामुळे एएएफची क्षमता लक्षणीयरित्या कमी होऊ शकते.

याचे महत्वाचे कारण म्हणजे एएएफ मध्ये कार्यरत असलेली यूएच-६० ब्लॅक हॉक सारखी विमाने आणि एमडी ५०० डिफेंडर हेलिकॉप्टर्स, तसेच बंडखोरांविरोधातल्या कारवाईसाठीची ए२९ सुपर टुकानो सारखी विशेष विमाने, ही अमेरिकी बनावटीची आहेत. या सगळ्यांच्या देखभालीसाठी अफगाणी हवाई दल पाश्चिमात्य कंत्राटदारांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. काही अहवालानुसार भविष्यात निर्माण होणारी समस्या दूर करण्यासाठी अजूनही कोणत्याही पर्यायाची व्यवस्था करण्यात आलेली नाही. ज्यामुळे कदाचित अफगाणी हवाई दल पांगळे होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

आपल्या सध्याच्या कृतीमध्ये अमेरिकेच्याबाबतीत दिसत असलेला दूरदृष्टीचा स्पष्ट अभाव तसा नवा म्हणता येणार नाही. ९/११च्या हल्ल्यानंतर, ‘दहशतवादाविरुद्धचा लढा म्हणून अमेरिकेने ज्या इराकमध्ये युद्धनाट्य रंगवले. त्या इराकलाही अमेरिकेच्या अशाच दूरदृष्टीचा स्पष्ट अभाव असलेल्या धोरणांचा फटका बसला आहे. त्यावेळी कॉईन म्हणजेच अनियमितपणे होणाऱ्या बंडखोरांच्या कारवायांविरोधातल्या लढ्याकरता, इराकने त्यांच्या हवाई दलाचे आधुनिकीकरण करण्यासाठी अमेरिकेकडून अत्यंत  महागडी अशी एफ१६ ही लढाऊ विमाने घेतली होती. महत्वाचे म्हणजे तेव्हा, जोपर्यंत कॉईन ही मोहीम सुरु होती, त्यापुरता तरी  त्यांच्याकडे या विमानांपेक्षा चांगला, छोटा आणि तुलनेने स्वस्त पर्यात उपलब्ध होता. आता इराकने विकत घेतलेली अनेक एफ१६ ही लढाऊ विमान प्रत्यक्ष वापराविना पडून आहेत. कारण तिथे दहशतवाद्यांकडून अमेरिकी सैन्याच्या तळांवर होणारे रॉकेट हल्ले वाढल्याने, कंत्राटदारांनी इराकमधून काढता पाय घेतला आहे.

अर्थात अफगाणी हवाई दलात अमेरिकी बनावटीची विमाने असणे निश्चितच त्यांच्यासाठी महत्वाची बाब आहे. मात्र त्याचवेळी अफगाणीस्तानने त्यांच्या ताफ्यातल्या जुन्या रशियन बनावटीच्या बहुतांश हेलिकॉप्टरचा वापरही चालू ठेवला, यातून त्यांची दूरदृष्टीही तितकीच ठळकपणे दिसून येते. यामुळे अफगाणी लष्कराला, दहशतवादाविरोधात प्रत्यक्षात लढा देणाऱ्या सैन्यांना मदत पोचवणे, जखमी सैन्याला हलवणे यांसारखी कामे चालू ठेवता आली आहेत. यापैकी बहुतांश हेलिकॉप्टर हे मध्यम उंचीवर उडणारी एम.आय.एल एम आय – १७ (Mil Mi-17) हेलिकॉप्टर आहेत. मात्र हीच हेलिकॉप्टर कदाचित पुढे जाऊन अफगाणी हवाई दलाच्या ताफ्यातली प्रमुख हेलिकॉप्टर ठरू शकतात. त्यांच्या या ताफ्यात चार एमआय-२४व्ही (Mi-24V) ही लढाऊ हेलिकॉप्टर्सदेखील आहेत.

अफगाणिस्तानच्या दहशतवादविरोधी मोहिमेला बळ देण्यासाठी भारताने त्यांना ही हेलिकॉप्टर्स मदत म्हणून दिली होती. क्षमतेच्या अनुषंगाने पाहिले तर ही चार हेलिकॉप्टर्स त्यांना २०१५-१६ मध्ये भारताच्या हवाई दलाच्या ताफ्यातून मदत म्हणून दिलेल्या चार जुन्या एमआय-३५ या हेलिकॉप्टर्सच्या जागी रुजु झाली आहेत. अर्थात, हेलिकॉप्टर देणे आणि त्यासाठी त्यांच्या हवाई दलाला प्रशिक्षण देणे केवळ इतकेच भारताचे योगदान मर्यादित होते. त्यानंतर मात्र या हेलिकॉप्टर्सची देखभाल करण्याची जाबाबदारी अफगाणी हवाई दल किंवा विमानाचे पुढील टिकाऊपण एएएफ किंवा त्यांच्या दहशतवादविरोधी मोहीमेत सहकार्य करणाऱ्या भागिदाराची (ऑपरेशन रेसोल्यूट सपोर्ट कोअॅलिशन / Operation Resolute Support coalition) होती. अर्थात एका आदर्श व्यवस्थेच्या तुलनेत ही बाब नक्कीच फारशी मोठी म्हणता येणार नाही. यानंतर या लढाऊ हेलिकॉपर्सचे पुढे काय झाले याबद्दल अद्याप निश्चित माहिती नाही. यासंदर्भात अलिकडे होत असलेल्या चर्चांमधून अशी माहिती पुढे आली होती की देखभाली संदर्भातल्या समस्यांमुळे ही हेलिकॉप्टर्स विनावापर पडून आहेत.

भारताला असलेली संधी

अफगाणी हवाई दलात रशियन हेलिकॉप्टरचे वाढलेले आणि एमआय-१७ वर केंद्रित झालल्या महत्वामुळे, केवळ रंजक प्रश्नच नाही तर कदाचित रंजक समीकरणही निर्माण झाल्यासारखी स्थिती आहे. भारत विशेषतः  भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात शेकडो एमआय-१७ कार्यरत आहेत. त्यामुळे भारत अफगाणी हवाई दलाला त्यांच्या ताफ्यातल्या रशियन बनावटीच्या हेलिकॉप्टर्सचा वापर कायम ठेवून, त्यांचे हवाईदल कार्यरत ठेवण्यात मदत करू शकेल का? की जेणेकरून अमेरिकी सैन्याने माघार घेतली तरीदेखील अफगाणिस्तानाला त्यांच्या दहशतवादविरोधी आणि कॉईन मोहिमेतले बहुतांश विभाग कार्यरत ठेवणे, तसेच प्रत्यक्षात लढा देत असलेल्या अफगाणी सैन्याला सहकार्य करणे शक्य होऊ शकेल.

एमआय-१७ची निर्मिती करण्याऱ्या रशियानंतर, भारतीय हवाई दलाकडेच एमआय-१७ आणि याच वर्गातल्या त्याच्या नवे स्वरुपातली हेलिकॉप्टर्स उडवण्याचा सर्वाधिक अनुभव असण्याची शक्यता आहे. भारताच्या हवाई दलातले वैमानिक अफगाणीस्तानातल्या परिस्थिप्रमाणेच दुर्गम असलेल्या इथल्या डोंगर आणि पर्वतरांगांमध्ये या हेलिकॉप्टर्सचा वापर करत आले आहेत. त्यामुळे या हेलिकॉप्टर्सच्या वैशिष्ट्यांबात विशेषतः अफगाणिस्तानातल्या कठीण परिस्थितीत ती कशी हाताळली गेली पाहिजेत याबाबत भारतीय हवाई दलातल्या वैमानिकांना चांगलीच माहिती आहे.

भारतीय हवाई दलातल्या अभियंत्यांना हेलिकॉप्टरच्या सर्व तांत्रिक वैशिष्ट्यांबाबत, त्यात अचानक निर्माण होणाऱ्या दोषांबाबत पूर्ण माहिती आहे, शिवाय या हेलिकॉप्टर्सची संपूर्ण देखभाल आणि उड्डाण करण्याच्यादृष्टीने ते सक्षम आहेत. महत्वाची बाब म्हणजे भारताच्या ताफ्यात असलेले एमआय-१७चे नवे अद्ययावत स्वरुप, म्हणजेच एमआय-१७व्ही-५ (Mi-17V-5) हे हेलिकॉप्टर अफगाणिस्ताननेही वापरले आहे. आणि त्यांच्याकडच्या या हेलिकॉप्टरची जोडणी भारतीय हवाईदलाच्या चंदिगड इथल्या हवाई तळ क्रमांक ३ वरच्या दुरुस्ती आगाराताच झाली होती, आणि तिथूनच या हेलिकॉप्टरने उड्डाणही केले होते.

सध्याच्या स्थितीत अफगाणी हवाई दलाच्या दृष्टीने त्यांच्या ताफ्यातल्या विमानं आणि हेलिकॉप्टर्सपैकी एमआय-१७ हे हेलिकॉप्टर सर्वात उपयुक्त आणि विविधांगी वापराच्यादृष्टीने महत्वाचे आहे. आणि त्यामुळेच या हेलिकॉप्टर्सच्या रुपातली त्यांच्या हवाई दलाची जी काही क्षमता सध्या दिसते, किमान ती तरी कमी झाली नाही पाहीजे अशीच अफगाणीस्तानची इच्छा असणार आहे. अर्थात  नजीकच्या काळात, विशेषतः म्यानमारलगतच्या पाकिस्तानी सीमाक्षेत्रात भारतासमोर असलेल्या आव्हानांचा विचार करता, अफगाणिस्ताला महत्त्वाची हेलिकॉप्टर्स देण्याच्या बाबतीत भारतीय हवाई दलाची नकारात्मक भूमिका असू शकते. मात्र त्याचवेळी दीर्घकालीन विचार केल्यास, भारत स्वतःच्या गरजेपेक्षा जास्त एमआय-१७व्ही-५ची आयात करू शकतो, आणि त्यानंनंतर त्या हेलिकॉप्टर्समधे तांत्रिक गणितीय बदल करून ती अफगाणिस्तानला देऊ शकतो. अर्थात परिस्थिती काहीही असली तरी भारतीय हवाई दलाकडे नजिकच्या काळात अफगाणी हवाई दलाशी जुळवून घेण्याच्यादृष्टीने तातडीने अमलात आणण्यासारखा एक पर्याय नक्कीच आहे आणि तो म्हणजे अफगाणी हवाई दलाला टिकून राहण्याच्यादृष्टीने आवश्यक ते प्रशिक्षण देणे आणि त्यातून सुरक्षितता निश्चित करणे.

भारतीय सरकारची अफगाणिस्तानात किती दूरवर जाण्याची आणि किती काळ तिथे तळ ठोकण्याची इच्छा आहे किंवा नाही, यावरच भारतीय हवाई दल आणि अफगाणी हवाई दलातल्या परस्पर सहकार्याचा आराखडा अवलंबून असणार आहे. जर सर्व काही व्यवस्थित घडणार असेल तर त्यामुळे भारताला, सध्याच्या आंतरराष्ट्रीय पटलावरचे वातावरण वारंवार बदलत असण्याच्या काळात, अगदी कमीत कमी वचनबद्धेत, भोगोलिकदृष्ट्या एका महत्वाच्या देशात, पाय रोवण्याची संधी मिळू शकेल. 

यासाठी आजवर पूर्ण क्षमतेने वापरली न गेलेली भारताची लष्करी राजनैतिकता कामी येऊ शकेल.  महत्वाची बाब म्हणजे, दीर्घकाळाचा विचार करता, एचएएल ध्रुव सारखी अधिक उंचावर उड्डाण करण्याच्यादृष्टीनं निर्माण केलेली भारतीय बनावटीची हेलिकॉप्टर्स, अफगाणी हवाई दलाला मिळावित अशी मागणीही भारताकडे नोंदवली जाण्याची शक्यताही निर्माण होऊ शकते.

निष्कर्ष

अफगाणिस्तानातून आपले सैन्य पूर्णपणे माघारी घेतल्यानंतर, आपले धोरण काय असेल याबाबत, अमेरिका अजूनही संमीश्र आणि तितकेच संदिग्ध संकेत देत आली आहे. मात्र त्यामुळे अफगाणिस्तानच्या आकाशात अफगाणी हवाई दलाचे वर्चस्व कितपत राहील याची सातत्याने परीक्षा घेतली जाईल अशी शक्यता मात्र वाढली आहे. कारण तालिबानने क्षेपणास्त्रांचा जमिनीवरून हवेत मारा करू शकतील अशा यंत्रणेत गुंतवणूक केली असल्याचे काही अहवालांमधून समोर आले आहे. अर्थात याआधी अशा यंत्रणेच्याबाबतीत सक्षम नसतानाही, यावर्षीच्या एप्रिल महिन्यात, अफगाणी हवाई दलाचे एमआय-१७ हेलीकॉप्टर आपण पाडले असल्याचा दावा तालीबानने केला होता.

दरम्यान वेगवान हेलिकॉप्टर्ससंदर्भात भारताकडे उपलब्ध असलेले पर्याय  मर्यादित आहेत. मात्र असे असले तरीही भारत, अफगाणी हवाई दलाला एमआय-१७ हेलीकॉप्टर्सचा वापर चालू ठेवता येण्यासाठीचे तांत्रिक सहकार्य देऊ शकतो. महत्वाचे म्हणजे या माध्यमातून, अफगाणिस्तानात लोकशाही वृद्धींगत व्हावी यासाठी आजवर केलेल्या आपल्या गुंतवणूक आणि प्रयत्नांना भारत पाठबळ देऊ शकतो. अभ्यासक राजेश राजागोपालन यांनी भारताच्या परकीय धोरणाविषयी बोलताना असे म्हटले आहे की. “कोणतीही कल्पना ही तशी नेमहीच महत्वाची असते, मात्र जोपर्यंत अशा कल्पनांना इतर आवश्यक सर्व माध्यमांतून बळ दिले जात नाही, तोपर्यंत निव्वळ अशा कल्पनांमधून निष्पन्न मात्र काहीही होणार नाही.”

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Authors

Kabir Taneja

Kabir Taneja

Kabir Taneja is a Fellow with Strategic Studies programme. His research focuses on Indias relations with West Asia specifically looking at the domestic political dynamics ...

Read More +
Angad Singh

Angad Singh

Angad Singh was a Project Coordinator with ORFs Strategic Studies Programme.

Read More +