Author : Samir Saran

Originally Published Council of Councils — The Council on Foreign Relations Published on Mar 16, 2020 Commentaries 0 Hours ago

कोरोनाचा धुरळा खाली बसला तरी हे जागतिक क्षितीजावर असलेले अनिश्चिततेचे सावट कायम राहणार आहे.येणारा काळ कठीण आहे आणि त्यात बदलही होत जाणार आहेत.

कोरोनामुळे जग अनिश्चिततेच्या गर्तेत

जगभरात पाच हजारांहून अधिक जणांचा बळी गेल्यानंतर आणि लाखोंहून अधिक जणांना लागण झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोव्हिड-१९ अर्थात कोरोनाला जागतिक साथीचा आजार म्हणून घोषित केले. जागतिक आरोग्य संघटनेने ही घोषणा करण्यासाठी बराच काळ लावल्याने आता या संघटनेला बोल लावले जात आहेत. पण या साऱ्याहून महत्त्वाचे आहे, ते कोरोनाची आताचे आव्हान कसे समजून घ्यायचे.

कोरोनामुळे मानवतेपुढे वाढून ठेवलेल्या संकटाला जागतिक पातळीवर देशोदेशींच्या आरोग्य संस्थांनी, सरकारांनी कसे तोंड दिले, आपल्या नागरिकांवर कोसळलेल्या आपत्तीला त्यांनी कसे परतावून लावले वगैरे चर्चा नंतर करता येईल. मात्र, कोव्हिड-१९च्या संदर्भाने पुढील तीन महत्त्वाच्या पैलूंचा विचार आणि अभ्यास करणे या घडीला अंत्यंत गरजेचे आहे.

चुकीच्या माहितीची साथ रोखणे

सर्वात प्रथम, आपल्याकडे कोरोनाच्या फैलावाबरोबरच सध्या अति-माहितीचाही फैलाव (याला दुस-या शब्दात ‘वृत्त अतिसार’ असे म्हटले तर ते जास्त योग्य ठरू शकेल) झाला आहे. माहितीच्या या अतिफैलावाला अर्थातच आपली समाजमाध्यमे जबाबदार आहेत. समाजमाध्यमांबरोबर मुख्य प्रवाहातील माध्यमेही वाहावत चालली असल्याने कोव्हिड-१९ बद्दल चुकीच्या माहितीचा महापूर सध्या अनुभवास येत आहे. तंत्रज्ञानाचा हा परिणाम आपल्याला माहित असला तरीही याची यावेळी जाणवणारी दाहकता वेगळी आहे.

एखादी गोष्ट फुगवून सांगणे हे सध्याच्या समाजमाध्यमी जगात नित्याचेच झाले असल्याने या माहितीच्या महापुरात सत्य काय आणि असत्य काय, हे समजणे दुरापास्त झाले आहे. कोरोना संकटाची तुलना एचआयव्हीशी करायची झाल्यास एचआयव्हीने जेव्हा प्रथमच डोके वर काढले होते त्यावेळी त्याच्या फैलावाबाबत एवढी सार्वजनिक चर्चा कधीच झाली नाही. त्यामुळे ही ‘चुकीच्या माहितीची साथ’ कशी रोखायची हे मानवतेला पडलेले मोठे आव्हान आहे.

इतिहासाच्या पुनरावृत्तीचा विसर

दुसरी गोष्ट, इतिहासाची पुनरावृत्ती होते हे कोरोनाच्या फैलावाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. एखाद्या देशात विषाणूची साथ पसरून ती अन्य देशांत फैलावल्याच्या अनेक घटना याआधीही इतिहासात घडून गेल्या आहेत. प्रवाशांमार्फत, भाविकांच्या मार्फत, कामगारांच्या मार्फत आजाराची साथ अन्य देशात जाऊन तेथून सर्वत्र पसरल्याची उदाहरणे इतिहासात सापडतात.

ब्रिटिशांचे जेव्हा निम्म्या जगावर राज्य होते त्यावेळी त्यांच्या वसाहतींमध्ये काम करणा-या कामगारांच्या माध्यमातून सूज येण्याचा आजार, देवीचा रोग तसेच इतर तत्सम साथीचे आजार कैक प्रमाणात फैलावले. प्लेगचे विषाणू अंगी बाळगणा-या उंदरांनी जहाजांच्या माध्यमातून परकीय भूमी गाठली आणि प्लेग जगभर पोहोचला होता.

जागतिक अर्थव्यवस्थेत चीनचे मध्यवर्ती स्थान आणि चिनी प्रवाशांचा जगभर होणारा संचार तसेच वन बेल्ट, वन रोड या चीनच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या पूर्ततेसाठी गुंतलेले लाखो कामगार यांमुळे इतरवेळी स्थानिक साथीचा आजार म्हणून दुर्लक्षिण्याजोगा कोरोना जगभर फैलावला, २००३ मध्ये चीनमध्ये अशाच सार्स नामक साथीचा आजार फैलावला होता. मात्र, कोरोनाचा जगभर फैलाव झाल्याने तो आता जागतिक समस्या बनला आहे. जागतिकीकरणाचा हा परिणाम आपण नव्याने समजून घ्यायला हवा आहे.

जागतिक राजकारणातसभ्रमावस्था

कोव्हिड-१९चा तिसरा आणि महत्त्वाचा पैलू म्हणजे या विषाणूच्या फैलावामुळे जागतिक पटलावर राजकीय परिस्थितींमध्ये निर्माण झालेली सभ्रमावस्था. कोरोनामुळे तहहयात अध्यक्षपदाचा चीन पुनर्विचार करेल का की, चीनचे विद्यमान अध्यक्ष शी जिनपिंग यांनी या संधीचा फायदा घेत स्वतःचे नेतृत्व अधिक उजळून घेतील? कोरोनामुळे अमेरिकेत यंदाच्या वर्षी होऊ घातलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांचे पारडे फिरेल का? अमेरिकेत विद्यमान प्रशासनाने अमेरिकेत झपाट्याने फैलावत असलेल्या कोरोनाशी केलेला सामना आणि कोरोनाचे अमेरिकी अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम यांमुळे तेथील निवडणुकांचे रंग बदलतील का? युरोपीय समुदाय त्यंच्या स्थलांतरणाबाबतच्या धोरणाचा पुनर्विचार करणार का?इत्यादी प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

दुसरीकडे, चीननंतर कोरोनाने इटलीला आपला घट्ट विळखा घातला आहे. पण तरीही चीनने इटली आणि इतर कोरोनासंकटग्रस्त देशांनाही मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे चीन जगभरच आपला प्रभाव पोहोचवणार का, त्याच्या प्रभावळीच्या छटा लाल रंगाच्या असतील का? असे अनेक प्रश्न भविष्यातील उत्तरांची वाट पाहत उभे आहेत.ही सर्व अनिश्चितता बराच काळ चालणार आहेत. तसेच या अनिश्चिततेत बदलही  होत जाणार आहेत. सारांशात काय तर, कोरोनाचा धुरळा खाली बसला तरी हे अनिश्चिततेचे सावट कायमच राहणार आहे.

(Council of Councils — The Council on Foreign Relations येथे हा लेख इंग्रजीतून पूर्वप्रकाशित झाला आहे.)

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.