Author : Anchal Vohra

Published on Aug 30, 2021 Commentaries 0 Hours ago

इस्रायल आणि लेबनॉन या दोन देशामधील सीमेवर संयुक्त राष्ट्राच्या फौजांमुळे २०१४ पासून आलेली शांतता, बैरूत स्फोटाच्या वर्षपूर्तीमुळे पुन्हा भंगली.

पुन्हा इस्रायल-लेबनॉन आमनेसामने

जगातील सर्वाधिक अस्थिर प्रदेशातील एक, अशी ओळख असलेल्या अशा इस्रायल-लेबनॉन सीमेवर, या महिन्यात झालेल्या गोळीबाराने आणखी तणाव वाढला. इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात दोन्ही बाजूंनी झालेल्या हल्ल्यामुळे परिस्थिती चिघळली. तसेच, उभय देशांची नौदले परस्परांविरूद्ध उभे ठाकल्याने परिस्थिती चिंताजनक राहिली आहे.

लेबनॉन आणि इस्रायल या देशांच्या सीमेवर, संयुक्त राष्ट्राच्या शांतता सेनेचा बंदोबस्त आहे आणि २०१४ सालापासून हा परिसर तुलनेने शांत आहे. मात्र, ४ ऑगस्ट रोजी बैरूट बंदरात झालेल्या स्फोटाच्या वर्षपूर्तीनिमित्त लेबनॉनच्या राजधानीत हजारो नागरिक रस्त्यावर जमले असताना, दक्षिण लेबनॉनमधून इस्रायलच्या दिशेने तीन रॉकेट्स डागण्यात आली.

या हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारली नाही आणि या हल्ल्यामागे पॅलेस्टिनी निर्वासित असू शकतात, असे स्थानिक प्रसारमाध्यमांनी नमूद केले आहे. इस्रायलने मात्र, या हल्ल्यासाठी हिजबुल्लाहला जबाबदार धरले आहे आणि हिजबुल्लाहला माहीत असल्याखेरीज दक्षिण लेबनॉनमध्ये काडीदेखील हलत नाही, असे इस्त्रायली प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे.

तोफांचा जोरदार मारा करून इस्रायलने प्रत्युत्तर दिले; इस्रायलने ९२ तोफगोळे डागल्याचा दावा लेबनॉनच्या सैन्याने केला. २०१४ सालानंतर पहिल्यांदाच ५ ऑगस्ट रोजी इस्रायलने लेबनॉनवर हवाई हल्ला केला, आणि लेबनॉनने डागलेल्या रॉकेट्सला उत्तर म्हणून हा प्रतिहल्ला चढवल्याचे इस्रायलने म्हटले आहे. पुन्हा एकदा, कुणीही जबाबदारी स्वीकारली नाही. एका दिवसानंतर, हिजबुल्लाहने इस्रायलवर २० रॉकेट्सचा मारा केला आणि या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. इस्रायलने हवाई हल्ले न थांबवल्यास कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

इस्रायल-लेबनॉन संघर्षामुळे आधीच कितीतरी संकटांचा सामना करणाऱ्या लेबनॉनच्या नागरिकांना देशाच्या सीमेवरील वाढत्या नाट्यमय घडामोडींमुळे भयभीत केले आहे. लेबनॉनमध्ये लोकांवर उपासमारीची वेळ आलेली असताना देश आणखी एका नव्या संघर्षाच्या काठावर उभा असल्याची भीती त्यांना वाटत होती.

काही काळ, दोन्ही बाजूंमध्ये एकमेकांविरोधात वाक्-युद्ध जरी झडत असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. गेल्या दशकभरात, इस्त्रायलने शेकडो वेळा सीरियातील संशयित इराणी मालमत्तांवर हल्ले केले आहेत, मात्र, लेबनॉनसाठी त्यांची एक वेगळी रणनीती असल्याचे दिसून येते, ती म्हणजे- हिजबुल्लाहला आतून कमकुवत करणे.

इस्रायलही लेबनॉनवर हल्ला करू इच्छित नाही, याचे कारण की, तसे केल्याने हिजबुल्लाह व उर्वरित कडव्या राजकीय वर्गाला आयते कोलीत मिळेल, ज्यांना लेबनॉनचे नागरिक दहशतवादी कारवायांसाठी जबाबदार धरतात. मात्र, सीमेवरील परिस्थिती जशी निवळली, तशी हिजबुल्लाहचे प्रमुख हसन नसरल्लाह यांनी घोषणा केली की, लेबनीज नागरिकांना इंधनअभावी होणारा त्रास कमी करण्यासाठी इंधनाचे इराणी टँकर लेबनॉनच्या दिशेने रवाना झाले आहेत. दिवाळखोर सरकारने जीवनावश्यक वस्तूंवरील सबसिडी काढल्यापासून देश इंधनाच्या भीषण टंचाईला तोंड देत आहे. मालवाहू जहाजे थांबविण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा लेबनॉनने इस्त्रायल आणि अमेरिकेला दिला आहे.

नसरल्लाह दूरचित्रवाणीवरील भाषणात म्हणाले, “येत्या काही तासांत इराणमधून निघालेले मालवाहू जहाज भूमध्यसागराच्या पाण्यात प्रवेश करेपर्यंतचा प्रदेश हा लेबनॉनचा प्रदेश मानला जाईल.” “अमेरिकी आणि इस्रायलींना, मी सांगतो: हा लेबनॉनचा प्रदेश आहे.”

जहाज अद्याप लेबनॉनच्या किनाऱ्याला लागले नाही, मात्र जर तसे झाले तर अमेरिका लेबनॉनवर निर्बंध टाकण्याची भीती आहे. लेबनॉनचे माजी पंतप्रधान साद हरिरी म्हणाले, “इराणी जहाजांमुळे लेबनॉनच्या नागरिकांसाठी अतिरिक्त धोके आणि निर्बंध निर्माण होतील.” त्याशिवाय, इराण आणि इस्रायल दरम्यान सुरू असलेल्या छुप्या नौदल युद्धात लेबनॉन भरडला जाऊ शकेल.

लेबनॉनचेचे ऊर्जा तज्ज्ञ लॉरी हेतायन म्हणाले की, इराणचे कच्चे तेल सीरियात जाऊ शकते आणि ट्रकमधून लेबनॉनला रवाना करण्यापूर्वी तेलाचे शुद्धीकरण तिथे केले जाण्याची शक्यता आहे. “मात्र, हे सर्व करण्यास अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांद्वारे मनाई आहे, असे करणे तितके सोपे नाही आणि हिजबुल्लाह हे खुलेआम करत असल्याने लेबनॉनला खूप धोका आहे, आमच्यावर निर्बंध लादले जाण्याचा अथवा हल्ला होण्याचा धोका आहे,” असे हेतायन यांनी सांगितले.

लेबनॉनमधील अमेरिकेचे राजदूत डोरोथी शिया यांनी नसरल्लाच्या घोषणेनंतर काही तासांनी एका अरब न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले की, अमेरिका लेबनॉनचे ऊर्जा संकट सोडवण्यासाठी इजिप्त, जॉर्डन तसेच जागतिक बँकेशी चर्चा करीत आहे. “आम्ही लेबनॉनच्या इंधन आणि ऊर्जेच्या गरजांसाठी वास्तव, शाश्वत उपाय शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत.” त्या म्हणाल्या. “मला वाटते की, इंधन आयातदारांनी लेबनॉनच्या लोकांमध्ये इंधन योग्यरित्या वितरीत करायला हवे. आणि मी तुम्हाला विचारते, हिजबुल्लाह असे करतील, यांवर तुमचा विश्वास आहे का? ” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

इराणी टँकर लेबनॉनला अथवा सीरियाला पोचल्यावर इस्रायल त्याला का आणि कशा पद्धतीने प्रतिसाद देईल, हे पाहणे बाकी आहे. जहाज सीरियाच्या बंदरात थांबवल्यास आणि आधीच निर्बंध घातलेल्या बनियास तेल शुद्धीकरण प्रकल्पामध्ये त्याचे शुद्धीकरण झाल्यास अमेरिका नेमक्या कुणावर निर्बंध लादेल, हेही अस्पष्ट आहे. मात्र, लेबनॉनमधील लोकांसाठी अत्यावश्यक असे इंधन वाहून नेणारे टँकर नष्ट करण्याचा निर्णय घेणे इस्रायल आणि अमेरिका या दोन्ही राष्ट्रांसाठी कठीण आहे. दरम्यान, इराणने म्हटले आहे की, लेबनॉनला अधिक कच्चे तेल पाठविण्याची इच्छा आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.