Author : Cathleen Berger

Published on May 21, 2021 Commentaries 0 Hours ago

आपण सगळेच दररोज इंटरनेटसारखी अनेक साधने वापरतो. या साधनांचा वापर सजगपणे करायला हवा आणि त्याच्या व्यापक परिणामांचाही विचार व्हायला हवा.

इंटरनेट आणि निरोगी भविष्य

आज संपूर्ण जग हवामान बदलाच्या संकटाचा सामना करते आहे आणि येत्या काळात हवामानातील बदल किती वेगाने होतील, याचा अंदाज बांधणेही कठीण होत आहे. जागतिक हवामान संघटनेच्या ताज्या पंचवार्षिक आकडेवारीनुसार, २०२४ पर्यंत एक किंवा एकापेक्षा अधिक महिन्यांतील तापमान हे औद्योगिकीकरणपूर्व औष्णिक पातळीपेक्षा १.५ अंश सेल्सिअसने अधिक उबदार असेल, अशी ७० टक्के शक्यता आहे. ही परिस्थिती वर्षभर राहण्याची शक्यता २० टक्के आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर २०१६ च्या पॅरिस करारामध्ये अपेक्षित आणि अंदाजित बदलापेक्षा अधिक वेगाने आपण अपरिवर्तनीय परिस्थितीकडे वाटचाल करत आहोत. संकटाची तीव्रता कमी करायची असेल तर किंवा विनाश टाळायचा असेल तर आपल्याला आमूलाग्र बदलाची गरज आहे आणि इथेच तंत्रज्ञानाला मोठी भूमिका बजावावी लागणार आहे.

हवामानाविषयीच्या बहुतांश अंदाजांनुसार, अत्यंत महत्वाकांक्षी धोरणे आणि औद्योगिक प्रयत्नांनंतरही जागतिक तापमानातील १.५ डिग्री सेल्सियसच्या वातावरणात राहणे, आपल्यासाठी फारच कठीण जाणार आहे. या संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी पावले उचलणे किती आव्हानात्मक आहे हे ग्लोबल कार्बन प्रोजेक्टच्या खालील आलेखावरून दिसते. २०२० मध्ये यासाठी प्रयत्न सुरू झाले असून पाच वर्षांत कर्ब उत्सर्जनाचे प्रमाण ४० गिगा टनावरून अर्ध्यावर, किंबहुना त्यापेक्षा कमी होणे अत्यावश्यक आहे. हे परिवर्तन कायमस्वरूपी ठरेल.

Figure 1: Mitigation curves for 1.5°C

Source: Global Carbon Project/Robbie Andrew (CC0 BY 4.0)

बहुतेक अंदाज, नवीन तंत्रज्ञान किंवा तांत्रिक प्रगतीकडे अंगुलीनिर्देश करतात. काही प्रकरणांमध्ये, कार्बन कॅप्चर आणि स्टोरेज (सीसीएस) वर जोर दिला जातो. मात्र, आपल्याकडे अद्याप लक्षणीय प्रमाणात सीसीएस विकसित होणे बाकी आहे. आपल्याला अद्याप सीसीएस टेकचे परिणाम माहीत नाहीत. काही अभ्यासांनुसार, फ्रॅकिंग तंत्राच्या नकारात्मक परिणामासारखेच याचेही पर्यावरणाच्या दृष्टीने विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यामुळेच आपल्याला तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे.

मात्र, गंभीर जखमांची मलमपट्टी टाळण्यासाठी आपल्याला संबंधित तंत्रज्ञानाचे परिणाम आणि दीर्घकालीन स्थिरतेबद्दल अधिक संशोधन करण्याची देखील आवश्यकता आहे.

इंटरनेटची भूमिका

विविध संशोधनाला व उपाययोजनांना बळ देणाऱ्या इंटरनेट या तंत्रज्ञानाच्या पर्यावरणीय परिणामांची सांगोपांग चर्चा अद्याप झालेली नाही. कोविड १९ या महामारीमुळे आजच्या जगातील मूलभूत तंत्रज्ञान असलेल्या इंटरनेटची ताकद आणि महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. सामाजिक संबंध, आर्थिक सुबत्ता आणि आरोग्यदायी पर्यावरण या तीन घटकांचा परस्परसंबंध म्हणजे शाश्वतता.

त्या अनुषंगाने विचार केल्यास, सामाजिक संबंधांसाठी इंटरनेट ही नेहमीच एक लाइफलाइन ठरली आहे. विशेषत: शारीरिक अंतर राखण्याची गरज असताना. अत्यावश्यक सेवेत नसलेल्या, पण उपजीविकेसाठी काम करणे गरजेचे असलेल्या लोकांसाठी इंटरनेट हे महत्त्वाचे साधन ठरत आहे. इंटरनेटमुळे अनेकांना गावखेड्यात राहून काम करण्याची संधी मिळाली आहे. ऑनलाइन सेवा मिळत आहेत आणि आर्थिक लाभही होत आहे. त्यामुळेच आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने इंटरनेट हे अत्यंत महत्त्वाचे साधन ठरले आहे. मात्र, दूरगामी वापराच्या दृष्टीने इंटरनेटचे मूल्यांकन करणे गरजेचे आहे. जो घटक नेहमी दुर्लक्षिला जातो, त्या आरोग्यदायी पर्यावरणाची जबाबदारी इंटरनेटने उचलणे आवश्यक आहे. मग इंटरनेटचा पर्यावरणावर होणारा परिणाम नेमका कसा आहे आणि त्याच्या शाश्वत वापरासाठी काय करावे लागेल?

इंटरनेटच्या पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास अनेक पाहण्यांतून करण्यात आला आहे. मात्र, या परिणामांची तीव्रता नेमकेपणाने तपासणे आणि वेगवेगळ्या निष्कर्षांचा तुलनात्मक अभ्यास करणे क्लिष्ट आहे. शिवाय, हे निष्कर्ष वेगवेगळ्या तांत्रिक गृहितकांवर आधारित आहेत. इंटरनेटमुळे होणाऱ्या कर्ब उत्सर्जनाची वस्तुस्थिती आणि आकडेवारी ही अशी आहे…

ऑनलाइन जाहिराती

२०१९ मध्ये सरासरी इंटरनेट युजर्सना दर महिन्याला १७०० बॅनर जाहिरात दिली गेली. महिन्याला ४.६ अब्ज लोक इंटरनेटवर होते असे गृहित धरल्यास अंदाजे ८ ट्रिलियन बॅनर जाहिराती दाखवल्या गेल्या. २०१६ या वर्षाशी तुलना करता २०१८ मध्ये इंटरनेटच्या एकूण कर्ब उत्सर्जनामध्ये ऑनलाइन जाहिरातींचा वाटा १० टक्के इतका होता, असे एका अभ्यासातून पुढे आले आहे. २०१६ मध्ये अंदाजे ६०.२८ दशलक्ष मेट्रिक टन (१०६.५९ टेरा वॅट अवर ऊर्जा) कर्ब उत्सर्जन झाले होते. तेव्हापासून हा आकडा वाढत गेल्याचे दिसते. याचा अर्थ, २०१६ ते २०२० या काळात केवळ ऑनलाइन जाहिरातींमुळे कर्ब उत्सर्जनात ३०१ मेट्रिक टनाची वाढ झाली. २०३० पर्यंत हाच आकडा १ गिगा टनावर ( तेव्हा जगातील अंदाजित उत्सर्जन ३०७ गिगा टन असेल) जाण्याची शक्यता आहे.

एका अभ्यासानुसार, ऑनलाइन जाहिरातींचा प्रत्यक्ष परिणाम फारच कमी आहे. प्रति दहा लाख ऑनलाइन जाहिरातींमागे एक ग्राहक मिळतो. ही गुंतवणूक फायद्याची आहे का?

संबंधित उपकरणे

जगभरात सध्या तब्बल ३० अब्ज उपकरणे इंटरनेटशी जोडलेली आहेत. जागतिक लोकसंख्येच्या प्रमाणात पाहिल्यास प्रत्येक व्यक्तीकडे तीन ते चार उपकरणे आहेत. भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास उत्तर अमेरिकेत प्रति व्यक्ती सुमारे १३ उपकरणे आहेत तर, आशिया व अफ्रिकेमध्ये प्रति व्यक्ती एक ते तीन उपकरणे आहेत. त्याचबरोबर, कार, स्मार्ट मीटर या ‘मशीन टू मशीन’ उपकरणांचाही यात समावेश व्हायला हवा. तो झाल्यास यात आणखी १४ अब्ज उपकरणांची भर पडते.

पर्यावरणावर होणाऱ्या इंटरनेटच्या परिणामामध्ये या उपकरणांचाही वाटा आहे. २०१७ च्या ग्रीनपीस क्लिकिंग ग्रीन रिपोर्ट नुसार, जगाच्या एकूण विजेच्या मागणीपैकी १२ टक्के वीज माहिती व संवाद तंत्रज्ञान क्षेत्राला लागणार आहे. इंटरनेटशी संबंधित उपकरणांना लागणाऱ्या ऊर्जेचा यात समावेश केल्यास हा वाटा ३० ते ४० टक्क्यांवर जाईल.

इतकेच नव्हे तर, मोजे हे सुद्धा इंटरनेटशी जोडले जाऊ शकतात. त्या माध्यमातून शरीराचे तापमान तपासले जाऊ शकते. तसेच, झोपेत असताना शरीरात घडणाऱ्या प्रक्रियांचा अनुभव घेता येऊ शकतो. व्हिडिओ स्ट्रिमिंगचे प्रमाण येत्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. २०२१ च्या अखेरपर्यंत प्रत्येक सेकंदाला अब्जावधी मिनिटांचे व्हिडिओ पडतील. भविष्यात व्हिडिओ स्ट्रिमिंग हा डेटाचा मुख्य स्त्रोत असेल. २०१५ मध्ये इंटरनेटवरील जगभरातील ट्रॅफिकमध्ये ६३ टक्के वाटा व्हिडिओ स्ट्रिमिंगचा होता. २०२० पर्यंत हाच वाटा ८० टक्क्यांपर्यंत जाईल, असा अदांज २०१७ च्या ‘ग्रीनपीस क्लिकिंग ग्रीन रिपोर्ट’मध्ये नोंदवण्यात आला होता. यू ट्यूब ही सुद्धा जगभरात सर्वाधिक वापरली जाणारी सेवा आहे. डेटा सेंटर आणि प्रोसेसिंगची कार्यक्षमता सुधारल्यामुळे ऑनलाइन स्ट्रिमिंगच्या पर्यावरणावरील परिणामाला चाप बसत असला तरी त्याच्या एकंदर परिणामांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

उर्जा वापर आणि डेटा निर्मितीमधील योगदानाशिवाय (डेटा संकलित करणे, प्रक्रिया करणे, विश्लेषण करणे आणि संग्रहित करणे) उत्पादन, वितरण आणि विल्हेवाट या साखळीच्या आधारे सर्व उपकरणांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. बहुतेक उपकरणांमध्ये पृथ्वीवरील दुर्मिळ घटकांचा समावेश असतो. अडचणीच्या परिस्थितीत या घटकांची मदत घेतली जाते, मात्र, त्यांची विल्हेवाट लावणे अवघड असते.

कृत्रिम बुद्धिमत्ता

यांत्रिकीकरण हा शब्द अनेकदा मोघमपणे वापरला जातो. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पर्यावरणावर लक्षणीय परिणाम होतो. हे समजून घेण्यासाठी आपल्याला काही उदाहरणे पाहायला हवीत.

एका संशोधनानुसार, लोकप्रिय नैसर्गिक भाषा प्रक्रियेसंबंधीच्या आर्टिफिशल इंटेलिजन्स मॉडेलचे प्रशिक्षण घेताना होणारे कर्ब उत्सर्जन हे म्युनिच, जर्मनी आणि अॅक्रा व घाना यांच्यातील विमान उड्डाणाच्या सुमारे ३०० पट असते. यातील एका मॉडेलला जीपीटी – २ म्हटले जाते.

जून २०२० मध्ये ‘जीपीटी ३’ हे आधीच्या मॉडेलपेक्षा कित्येक पटीने मोठे मॉडेल असल्याचे जाहीर करण्यात आले. ‘जीपीटी ३’ हे मॉडेल १७५ अब्ज पॅरामीटरवर क्षमतेचे आहे तर, २०१९ चे जीपीटी – २ हे मॉडेल केवळ १.५ अब्ज पॅरामीटर क्षमतेचे होते.

जीपीटी – २ सारख्या मॉडेल्समुळे ६,२६,१५५ पाऊण्ड (२८४ मेट्रिक टन) कर्ब उत्सर्जन होते. एखादी कार सरासरी ७,०४,७६२ मैल चालवल्यानंतर उत्सर्जित होणाऱ्या कार्बनइतके हे प्रमाण आहे. नवीन जीपीटी – ३ मॉडेलच्या कर्ब उत्सर्जनाची तुलना अद्याप केलेली नाही.

शिवाय, या प्रचंड डेटावरील प्रक्रिया क्षमतेचे मूल्यांकन करताना आपल्याला डेटा सेंटर, डिजिटल युगातील कारखान्यांचा विचार करावा लागेल. हे कारखाने जगभरातील एकूण वीज वापरापैकी दोन टक्के वीज वापरतात. डेटा सेंटर मोठ्या प्रमाणावर जागा व्यापतात आणि जागतिक जलस्त्रोतांवरही त्यामुळे मोठा ताण येतो. मोठ्या सेवा पुरवठादारांच्या अहवालांमध्ये या घटकाचा क्वचितच विचार केला जातो, किंबहुना त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

रॉब ट्यूजने यांनी अलीकडेच फोर्ब्समध्ये लिहिलेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे…

‘मोठे म्हणजे उत्तम’ हा विचार सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनाच्या अजेंड्यावर आहे. ही विचारधारा येत्या काळात पर्यावरणासाठी मोठा धोका ठरणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे क्षेत्र अधिक दूरगामी फायदा देणारे आणि उत्पादनक्षम होण्यासाठी विचारपूर्वक आणि धाडसी बदलांची आवश्यकता आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात छोटी-छोटी गुंतवणूक करणे, स्थानिक पातळीवर अंमलबजावणी करणे किंवा शाश्वत विकासाला केंद्रबिंदू मानून खर्चाचे फेरमूल्यांकन करणे, असा याचा अर्थ घेता येईल. या बाबतीत सुधारणेला प्रचंड वाव आहे.

ग्रीन हाउस गॅस उत्सर्जनाचे अतिरिक्त स्त्रोत

कर्ब उत्सर्जन हे केवळ ऑनलाइन जाहिराती, इंटरनेट संबंधित उपकरणे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेपुरतीच मर्यादित नाही. लेगसी कोड, स्पॅम, वेबसाइटचा दर्जा, डेटा विश्लेषण आणि प्रूफ-ऑफ-वर्क ब्लॉकचेन अंमलबजावणी किंवा निरुपयोगी व कालबाह्य डेटाच्या साठ्याशी देखील इंटरनेटला झगडावे लागत आहे.

फार खोलात न जाता २०१९ मधील आकडेवारीवर नजर टाकली तरी बरेच काही आपल्या लक्षात येईल. या आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये अंदाजे १५८ अब्ज स्पॅम ई मेल पाठविण्यात आले होते. या स्पॅम मेलची संख्या एकूण ई मेलच्या ५५ टक्के आहे आणि प्रत्येक मेसेजमागे सरासरी ०.३ ग्रॅम कार्बन उत्सर्जन होते. बनावट सोशल मीडिया अकाउंट्समुळे या समस्येची व्याप्ती वाढली आहे. उदाहरणार्थ, २०१९ मध्ये फेसबुकने वर्षाच्या पहिल्या तिमाहीत २.२ अब्ज बनावट खाती डिलिट केली. फेसबुकवरील प्रत्येक सक्रिय प्रोफाइलमुळे अंदाजे २८१ ग्रॅम कार्बन उत्सर्जित होतो. ब्लॉकचेनच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अंमलबजावणींमध्ये मोठा वाव असू शकतो, हे तंत्रज्ञान बिटकॉइन आणि इतर डिजिटल क्रिप्टोकरन्सीच्या रूपात असते. ‘प्रूफ ऑफ वर्क’च्या अंमलबजावणीसाठी मोठ्या प्रमाणात विजेची आवश्यकता लागते. बिटकॉइनमुळे दर वर्षी २२ ते २२.९ मेट्रिक टन कर्ब उत्सर्जन होईल, असा अंदाज म्युनिच तंत्रज्ञान विद्यापीठ आणि मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी २०१९ साली वर्तवला होता.

आपल्याला फेररचनेची गरज आहे हे अगदी स्पष्ट आहे. आपल्याला उत्सर्जन कमी करण्याची गरज आहे आणि जागतिक तापमान जगण्यासाठी सुसह्य व्हावे यासाठी आवश्यक असलेल्या बदलांना सहकार्य करण्याची गरज आहे.

भविष्यातील शक्यता

तुम्ही खूपच अस्वस्थ असाल, तर तुम्ही एकटे नाहीत. अनेकांची हीच भावना आहे. भविष्य कसे असेल याचा अंदाज आपण बांधू शकत नाही. जास्तीत जास्त सुरक्षित व शाश्वत पर्यायासाठी प्रयत्न करणे हे खरोखरच कठीण आहे. त्यासाठी आपल्यापुढे कल्पनाचित्र हवे. दूरदृष्टी हवी. सर्जनशीलता आणि नवा ट्रेंड हवा.

अशी कल्पना करा: आपण २०५० मध्ये आहोत. इंटरनेटचे अवशेष असलेल्या संग्रहालयात तुमचे स्वागत आहे. २०५० मध्ये उघडलेले हे संग्रहालय तुम्हाला विस्मृतीत गेलेल्या २०२० च्या इंटरनेट युगाकडे नेते.

भांडवलशाहीच्या पाळतीच्या भयावह आठवणीने धापा टाकायला लावते. स्पॅमच्या महामारीची आठवण देते. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणाची व्याप्ती दाखवणारा प्रचंड डेटा किंवा बेफिकीर डेटा विश्लेषण व व्हिडिओ स्ट्रिमिंगच्या भयंकर संस्कृतीची झलक दाखवून चकित करून सोडते.

हे सगळे आता कालबाह्य झाले आहे.

इंटरनेट व इंटरनेटशी संबंधित मुख्य कर्ब उत्सर्जकांची गांभीर्याने दखल घेतल्यास आपल्याला भविष्यातील चांगल्या जगाची कल्पना करता येऊ शकते. बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने स्मार्ट निर्णय घेण्यासाठी एखाद्या युटोपियाचे कल्पनाचित्र रंगवणे हे पहिले पाऊल आहे.

हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी आपण या प्रत्येक गोष्टीची दखल घेतली पाहिजे. परंतु यातील सर्वच गोष्टींचा सामना आपण एकट्याने किंवा स्वतःच करू नये. हा एक सामूहिक प्रयत्न आहे, ज्यातील प्रत्येकाचा सकारात्मक परिणाम होऊन आवश्यक बदल घडू शकतो.

पुढे जाताना…

या टप्प्यावर कार्बन कॅप्चर आणि स्टोरेज किंवा तत्सम पर्यायांचा वापर करून हवामान बदलाची तीव्रता कमी करण्यासाठी वेगाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. तथापि, ते काही रामबाण औषध नाही. आपल्याला अजूनही स्वत:चा गृहपाठ व्यवस्थित करावा लागेल आणि काही सवयी बदलाव्या लागतील.

ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जनाचे मूल्यांकन हा निकडीची आणि नित्याची बाब व्हायला हवी. या प्रक्रियेतील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविण्यासाठी जागतिक कार्बन ट्रॅकरसारख्या पद्धतींना बळ द्यायला हवे.

जागतिक बाजारव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तनाची कल्पना धूसर वाटत असल्यास छोट्या-छोट्या टप्प्यांमध्ये त्याचा विचार करायला हवा आणि समूहात असतानाच आपल्या कृतीही समजून घ्यायला हव्या. ऊर्जा पुरवठादार बदला, स्ट्रिमिंग करण्यापेक्षा डाऊनलोड करा, नवी उपकरणे खरेदी करण्यापेक्षा दुरुस्ती करा, कमीत कमी ई मेल पाठवा. हे सगळे प्रत्येकाने एकत्रितपणे करायला हवे. ही निरंतर चालणारी आणि चिकाटीने करावी लागणारी गोष्ट आहे, एकदा करून थांबण्याची ही गोष्ट नाही. जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न सातत्याने करायलाच हवा.

कार्बनालायजरसारख्या साधनांचा त्यासाठी वापर करायला हवा. केंद्र सरकार याकामी कमी पडत असेल तर तुमच्या शहरासाठी तुम्ही स्वत: पुढाकार घ्यायला हवा किंवा आपल्या कंपनीला योग्य दिशेने नेण्यासाठी सहकाऱ्यांच्या साथीने प्रयत्न करायला हवा.

सारांशाने सांगायचे झाले तर, आपल्यापैकी बरेच जण दैनंदिन आयुष्यात इंटरनेट सारखी अनेक साधने वापरतात. या साधनांचा वापर करत असताना थोडे थांबून, मागे वळून पाहणे गरजेचे आहे. या सगळ्या साधनांच्या वापरामुळे होणाऱ्या व्यापक परिणामांचा विचार करायला हवा. हा सगळा मामला स्वत:ची मानसिकता बदलण्याशी संबंधित आहे. एकदा ते झाले की इतर लोकांशी संपर्क साधून, त्यांना भेटून, त्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याची गरज आहे.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.