Author : Utkarsh Amitabh

Published on Oct 27, 2021 Commentaries 28 Days ago

मानवी जीवनातील अर्थकारणामध्ये समाजाची भूमिका समजण्यासाठी व त्याला आकार देण्यासाठी वेब ३.० ही एक विलक्षण संधी आहे.

इंटरनेट ३.० आणि तुम्हीआम्ही

समाजाच्या जडणघडणीत सामुदायिक कृतीचे नेहमीच मोलाचे योगदान राहिले आहे. पण असे असले तरी, समुदायांच्या आर्थिक आणि व्यावसायिक क्षमतांचा सर्वसमावेशक अभ्यास अजूनही झालेला नाही. हे अधिक समजून घेण्यासाठी, आपण ह्या लेखात इंटरनेटचा इतिहास आणि वेब ३.० चा आढावा घेणार आहोत.

इंटरनेटचा इतिहास

वेबचे पहिले युग किंवा ज्याला वेब १.० असे म्हटले जायचे त्यात माहिती कशाप्रकारे वापरली जाते किंवा एखाद्या माहितीवर प्रक्रिया कशी होते यावर अधिक भर देण्यात आला होता. याहू, नेटस्केप, क्रेग्सलिस्ट, एओएल ह्या सर्वांचा वेब १.० कंपन्यांमध्ये समावेश होतो. यात गूगलने माहितीचे ‘लोकशाहीकरण’ घडवून आणले व भक्कम जाहिरातींवर आधारित मॉडेल तयार करून हे युग जिंकले असे म्हणायला हरकत नाही.

इंटरनेटच्या दुसर्‍या युगात म्हणजेच वेब २.० मध्ये फेसबूक, इंस्टाग्राम, रेडीट, लिंकडिन यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा जन्म झाला. या प्लॅटफॉर्म्सनी माहिती, वस्तू आणि सेवा यांना एका छत्राखाली आणण्याचे काम केले. याच काळात कॅब बूक करण्यासाठी, सहली किंवा डेटवर जाण्यासाठी आणि अनोळखी व्यक्तिसोबत व्यावसायिक भागीदारी करण्यास सुरुवात केली. उबर या अॅपवर तुम्ही कॅब बुक करू शकता किंवा गाडी चालवून त्यातून पैसे कमवू शकता. इंस्टाग्रामवर काहीनाकाही पोस्ट करणे, व्हिडिओ पाहणे हे नित्याचे झाले आहे. याचाच परिणाम म्हणून ‘इन्फ्लूएन्सर’ ही नवी जमात उदयाला आली आहे.

पिअर टू पिअर (पि२पि) माहितीची देवाणघेवाण हे वेब २.०चे वैशिष्ट्य ठरले आहे. यामुळे इंटरनेट वापराला नक्कीच चालना मिळाली आहे. असे असले तरीही डेटाचा प्रवाह नियंत्रित करून नियम घालून देणार्‍या बड्या प्लॅटफॉर्म्सना यातून बराच फायदा झाला आहे. यामुळे प्लॅटफॉर्म्स, सहभागी वापरकर्ते आणि धोरणकर्त्यांमध्ये गुंतागुंतीचे संबंध निर्माण झाले आहे.

धोरणकर्त्यांना इंटरनेटचे नियमन करायचे आहे पण ते कसे करावे हे मात्र त्यांना माहीत नाही. यात सहभागी वापरकर्ते आर्थिक फायद्यांमुळे आनंदी आहेत पण असमान वितरणामुळे असमाधानी आहेत. इंटरनेटच्या वापरातील चढया आलेखात योगदान देऊनही सगळीकडून आपल्यावर टीका केली जात आहे असे प्लॅटफॉर्म्सना वाटते आहे. सत्ता, प्रभाव, डेटा आणि भांडवलाच्या केंद्रीकरणामुळे वेब २.० युगामध्ये मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

वेब ३.० युग एक वेगळ्या प्रकारचे डिजिटल उत्पादन आहे. हे उत्पादन सह मालकी, सहनिर्मित आणि सहचलित असल्यामुळे जगभर त्याचा गाजवाजा झाला आहे. अर्थात हे इंटरनेटचे तिसरे युग आहे. यात विकेंद्रीकरण, संस्थांवरील ढळता विश्वास आणि मूल्य निर्मिती व कब्जा याच्याकडे बघण्याच्या नवीन दृष्टिकोन यांवर अधिक भर असलेला दिसून येत आहे. याचे पडसाद आपण जगभरातील प्रसारमाध्यमांमध्ये उमटलेले पाहतोच आहोत. उदाहरणार्थ, मिरर या प्लॅटफॉर्मचा वापर केल्यामुळे तुम्ही एका विशिष्ट समाजाचे सभासद होताच पण त्यासोबत या माध्यमाची तुमच्याकडे सहमालकीही येते. आम्ही मिररला मोठ्या पातळीवर नेऊ इच्छितो पण तत्पूर्वी याचा गुणवत्तापूर्ण पाया सुनिश्चित करण्यासाठी आम्ही आपल्याला प्रवेश देऊन वैयक्तिक सभासद बनवू इच्छितो. – असे मिरर नामक कोणत्यातरी वेबसाइटची जाहिरात करण्यात आली आहे. अर्थात अशा अनेक जाहिराती आपण विविध माध्यमांवर रोज झळकताना पाहतो.

मिरर या वेबसाइटवर संशोधन करण्यासाठी लेखक भांडवल उभारणी करू शकतो व त्यासोबत वाचकांना हवे असलेले पुस्तक अथवा लेख किंवा कादंबरी लिहिण्यासाठी वाचकांकडून आगाऊ रक्कम घेऊन आपला महिन्याचा पगारही सुनिश्चित करू शकतो. यात वाचक किंवा गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळतोच. यामुळे परस्पर संबंध सुधारण्यास व बांधले जाण्यास अनुकूल वातावरण निर्माण होते. यात अटी शर्ती यांचे योग्य आकलन झाल्याने आणि त्याचे फळ स्पष्ट व निश्चित असल्यामुळे अपयशाचा धोका कमी होतो. इंटरनेट तिसर्‍या युगात प्रवेश करत असतानाच विविध संस्था, डिजिटल उत्पादने व मिरर सारखी समाजमाध्यमे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत, हे निश्चित झाले आहे.

नेटवर्क कॅपिटल आणि वेब ३.०

या लेखाच्या लेखकाने नेटवर्क कॅपिटल या पिअर टू पिअर प्लॅटफॉर्मची निर्मिती केली आहे. हा प्लॅटफॉर्म सहनिर्मिती व सहचलित असून पुढील काळात समुदाय सदस्यांद्वारे चालवला जाईल. याची पुढील घडण अजूनही चालू असली तरी खाली त्याबाबतच्या काही न्याय्य व सर्वसमावेशक कल्पना दिलेल्या आहेत. ही काही मोठी यादी नाही, तर यात फक्त तीन मोठ्या कल्पनांचा समावेश आहे. या कल्पनांवर लेखकाने बराच डेटा गोळा केला आहे.

एकसमान सर्वसमावेशक व्यासपीठाची निर्मिती करण्यासाठीची सामुदायिक रचना

एकसमान सर्वसमावेशक व्यासपीठाची निर्मिती करणे म्हणजे सर्वांसाठी सुरक्षित जागा निर्माण करणे होय. १००००००हून अधिक सभासदांमध्ये ५० टक्के महिलांचा समावेश आहे. बदल आपोआप घडत नाही. महिलांना विविध क्षेत्रातील, देशातील, उद्योगांतील लोकांशी संवाद साधून, त्यांच्याकडून शिकून आपल्या आवडीचे करियर निवडण्याची संधी मिळावी यादृष्टीने या व्यासपीठाची रचना केली आहे.

साप्ताहिक वृत्तपत्रे, पॉडकास्ट, मास्टरक्लासेस आणि कोहॉर्ट-आधारित-अभ्यासक्रमांद्वारे, नेटवर्क कॅपिटलच्या भविष्यात लिंग समानतेचे महत्त्व व योगदान सातत्याने लोकांच्या मनावर बिंबवले जाते. हळूहळू या गोष्टीचा लोकांनीही स्वीकार केला आहे. कोणत्याही समुदायाची घडण हेतुःपूरस्सररित्या व्हायला हवी. आधी समुदाय निर्माण झाला मग त्याची रचना, मूल्ये ठरवली गेली असे होता कामा नये.

बिझनेस मॉडेलचा स्वीकार

नेटवर्क कॅपिटल हा सदस्यत्त्वावर आधारित समुदाय (सबस्क्रिप्शन बेस्ड कम्यूनिटी) आहे. आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेले विद्यार्थी तसेच तरुण व्यवसायिकांना परवडावे यासाठी याची किंमत चल ठेवण्यात आली आहे. फेसबूक आणि एंडोवमेंट फंडच्या मदतीने नेटवर्क कॅपिटलला बांधण्यात आले आहे. जर कोणामध्ये शिकण्याची जिद्द असेल पण आर्थिकदृष्ट्या ती व्यक्ती सक्षम नसेल तर त्याला नेटवर्क कॅपिटलकडून १००टक्के शिष्यवृत्ती देण्यात येते. शाळांमध्ये तसेच पाठ्यवृत्तीच्या माध्यमातून शेकडो मुले व तरुण व्यावसायिक अभ्यास करत आहेत. या उपक्रमाचा अजून विस्तार करण्याचा नेटवर्क कॅपिटलचा मानस आहे. संधी आणि कौशल्य यांच्यातील दरी कमी करण्यासाठी यातून प्रयत्न केला जाणार आहे.

सांस्कृतिक योगदानाचे महत्त्व

प्रत्येक समुदायामध्ये समान संस्कृतीच्या व्यक्तींना शोधले जाते किंवा संवाद वाढवण्यासाठी आपल्याच संस्कृतीच्या लोकांकडे अनेकदा अधिक ओढा दिसून येतो . ही एक मोठी चूक आहे. संस्कृती ही सतत वाढणारी, अनेक गोष्टी सामावून घेणारी आणि वेळ-काळ-लोकसंख्येचा कल यांचा विचार असणारी सर्वसमावेशक असावी.
नेटवर्क कॅपिटलने शाळांची निर्मिती केल्यानंतर हजारो तरुण त्याचा भाग झाले आहेत.

सध्याच्या सदस्यांपेक्षा त्यांच्या गरजा वेगळ्या होत्या, त्यांनी वापरलेले तंत्रज्ञान वेगळे होते व त्यांच्या अपेक्षाही वेगळ्या होत्या. २०२१ मध्ये नेटवर्क कॅपिटलने केलेल्या सर्वात महत्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे डिजिटल उत्पादने आणि त्यांच्या गरजेनुसार अनुभव तयार करणे ही होय. नेटवर्क कॅपिटल इकोसिस्टममध्ये किशोरवयीन मुलांचे एकीकरण केल्याने समुदायाची संस्कृती अधिक समावेशक बनून बळकट होण्यास मदत झाली आहे.

निष्कर्ष

मानवी जीवनातील अर्थकारणामध्ये समाजाची भूमिका समजण्यासाठी व त्याला आकार देण्यासाठी वेब ३.० ही एक विलक्षण संधी आहे. योग्य संरचनात्मक निर्णय, प्लॅटफॉर्म, सभासद आणि धोरणकर्त्यांसह, सह-मालकी असलेला, सहचलित व सह-निर्मित आदर्श समुदाय निर्माण करता येऊ शकतो. हा समुदाय तुलनेने अधिक न्याय्य आणि समतावादी ठरु शकेल. कार्ल मार्क्स आणि अॅडम स्मिथ या दोघांच्या अनुयायांना भविष्याबद्दल उत्साहित करण्याची क्षमता वेब ३.० समुदायामध्ये आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Utkarsh Amitabh

Utkarsh Amitabh

Utkarsh Amitabh is the chief executive officer of Network Capital and the chief marketing officer of 5ire.org, a blockchain unicorn valued at $1.5 billion. 5ire.org acquired a stake ...

Read More +