Author : Prateek Tripathi

Expert Speak Space Tracker
Published on Nov 14, 2025 Updated 0 Hours ago

अमेरिकन स्पेस फोर्सच्या X-37B उपक्रमातून भारताला संरक्षण क्षेत्रातील R&D क्षमता वाढवण्यासाठी आणि ‘मेक इन इंडिया’च्या महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण शिकवण मिळू शकते.

टेक्नोलॉजीच्या शर्यतीत कोण आघाडीवर? अमेरिका, चीन कि आता भारत!

तंत्रज्ञानातील नवकल्पना म्हणजेच इनोव्हेशन एखाद्या देशाच्या लष्करी क्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी नेहमीच एक महत्त्वाचा मापदंड राहिल्या आहेत. यामुळेच नवीन तंत्रज्ञानाचा विकास अनेकदा लष्करी संशोधनातून होत असतो आणि नंतर त्याचा विस्तार सामाजिक वापरात होतो. अमेरिकन स्पेस फोर्सच्या X-37B कार्यक्रमाने या प्रक्रियेचे उत्तम उदाहरण दिले आहे. भूतकाळातील नवीन प्रकारचे स्पेस मॅनोयुवर्स (manoeuvres) तपासण्यापासून ते आता क्वांटम इनर्शियल नेव्हिगेशन प्रणालींचे प्रयोग करण्यापर्यंत, X-37B हे दर्शवते की भविष्यातील तंत्रज्ञानात अमेरिका अग्रणी का राहिली आहे.

तसेच, वाढत्या गुंतागुंतीच्या प्रादेशिक वातावरणात भविष्यातील लष्करी क्षमता कशा विकसित कराव्यात यासाठी हा कार्यक्रम भारतासाठी एक मार्गदर्शक केस स्टडी म्हणूनही काम करू शकतो.

X-37B प्रोग्रामची पार्श्वभूमी

नासा यांच्या X-37 प्रोग्रामवर (1999–2004) आधारित X-37B हे विमान बोईंग कंपनीने तयार केले आहे. बोईंगच्या भाषेत, हे “मानवरहित, स्वयंचलित अंतराळ विमान असून प्रगत प्रयोग आणि तंत्रज्ञान चाचणीसाठी डिझाइन केलेले आहे.” 2010 पासून हा कार्यक्रम केवळ डिपार्टमेंट ऑफ द एअर फोर्स रॅपिड कॅपॅबिलिटीस ऑफिस (DAF RCO) द्वारे चालवला जात होता, परंतु आता तो DAF RCO आणि युएस स्पेस फोर्सच्या Delta 9 युनिट यांच्या संयुक्त व्यवस्थापनाखाली आहे. Delta 9 हे कक्षीय युद्धासाठी जबाबदार असलेले प्रमुख युनिट आहे. 2010 पासून मार्च 2025 पर्यंत, X-37B कार्यक्रमांतर्गत सात ऑर्बिटल टेस्ट व्हेईकल्स (OTVs) प्रक्षेपित करण्यात आले आहेत.

चित्र 1: X-37B OTVs

Why The Us Leads In Military Innovation The Case Of X 37b

स्रोत: सिक्युर वर्ल्ड फाऊंडेशन 

X-37B च्या इतिहासात, या उपक्रमाने अनेक नव्या आणि अभिनव तंत्रज्ञानांच्या चाचणीसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून काम केले आहे. OTV-4 मध्ये प्रयोगांसाठी हॉल-इफेक्ट थ्रस्टर ठेवण्यात आला होता, जो नंतर अँडव्हान्स्ड एक्स्ट्रीमली हाय फ्रीक्वेन्सी (AEHF) या लष्करी उपग्रह संप्रेषण कार्यक्रमात वापरला गेला. त्याचबरोबर, नासाच्या मटेरियल्स एक्स्पोजर अँड टेक्नॉलॉजी इनोव्हेशन इन स्पेस (METIS) कार्यक्रमाचा भाग म्हणून, अंतराळातील परिस्थितीत चाचणीसाठी 100 हून अधिक विविध प्रकारची सामग्री त्यावर नेण्यात आली.
OTV-5 मध्ये 780 दिवस चाललेल्या दीर्घकालीन अंतराळ मोहिमेदरम्यान प्रायोगिक इलेक्ट्रॉनिक्स आणि हीट पाईप तंत्रज्ञानांची चाचणी घेण्यासाठी विशेष पेलोड ठेवण्यात आला होता. याशिवाय, OTV-6 मध्ये सौरऊर्जेचे संकलन करून मायक्रोवेव्ह बीममध्ये रूपांतरित करणाऱ्या ऑन-ऑर्बिट पॉवर बिमिंग या नव्या तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यात आली. OTV-7 ने X-37B कार्यक्रमात नवे पर्व उघडले कारण ते लो अर्थ ऑर्बिट (LEO) ऐवजी हायली इक्‍सेंट्रिक ऑर्बिट (HEO) मध्ये कार्य करणारे पहिले मिशन ठरले. या मोहिमेत पृथ्वीच्या वातावरणातील घर्षणाचा वापर करून नवीन प्रकारची एअरोब्रेकिंग मॅनोयुवर्स तपासण्यात आली, ज्यामुळे इंधन न जाळता वेगवेगळ्या कक्षांमध्ये संक्रमण करणे शक्य होते. परिणामी, OTV-7 भविष्यातील स्पेस डोमेन अवेअरनेस वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकते.

X-37B OTV-8 वर चाचणी घेतली जाणारी नवी तंत्रज्ञाने

X-37B OTV-8 चे प्रक्षेपण 21 ऑगस्ट 2025 रोजी केनेडी स्पेस सेंटरमधून SpaceX च्या Falcon 9 रॉकेटच्या सहाय्याने करण्यात आले. या मोहिमेतील एक प्रमुख तंत्रज्ञान म्हणजे क्वांटम इनर्शिअल सेन्सर, जो Pentagon च्या Defence Innovation Unit (DIU) च्या कराराखाली Vector Atomic या स्टार्टअपने विकसित केला आहे. क्वांटम सेन्सिंगमुळे विद्यमान पोझिशनिंग, टायमिंग आणि नेवीगेशन (PNT) प्रणालींना पुरक किंवा भविष्यात कदाचित त्यांची जागा घेण्याइतकी क्षमता आहे. सद्य परिस्थितीत GPS वर अवलंबून असलेल्या बहुतेक PNT प्रणालींना संघर्षांदरम्यान वाढत्या GPS जॅमिंग आणि स्पूफिंगचा धोका वाढला आहे. त्यामुळे क्वांटम सेन्सिंग-आधारित PNT प्रणाली GPS अनुपलब्ध असलेल्या वातावरणात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकतात.

या मोहिमेत आणखी एक महत्त्वाची चाचणी म्हणजे स्पेस बेस्ड लेजर कम्युनिकेशन, ज्याद्वारे उपग्रह-ते-उपग्रह आणि उपग्रह-ते-ग्राउंड संवाद साधला जाईल. सध्या वापरली जाणारी रेडिओ-फ्रीक्वेंसी लिंकांच्या तुलनेत लेझर लिंक जास्त सुरक्षित, उच्च डेटा-क्षमता आणि अधिक बँडविड्थ प्रदान करू शकतात. हे तंत्रज्ञान स्पेस डेव्हलपमेंट एजन्सी आणि DIU यांच्या भविष्यातील “हॅक-प्रूफ” ऑप्टिकल कम्युनिकेशन उपग्रह ताऱ्यांच्या योजनांशी संबंधित असण्याची शक्यता आहे.

Delta 9 युनिटच्या देखरेखीमुळे OTV-8 वर कक्षीय युद्धाशी संबंधित चाचण्या होत असल्याचा काही अंशतः अंदाज व्यक्त केला जातो, परंतु याबाबत अधिकृत पुष्टी नाही.

भारतीय संरक्षण संशोधनासाठी शिकवण

X-37B सारख्या अत्याधुनिक कार्यक्रमाचा परिमाणात्मक अभ्यास जितका विस्तृत करता येईल, तितकाच त्यातील काही गुणात्मक धडे भारताच्या दीर्घकालीन लष्करी संशोधन धोरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात.

अनन्वेषित (अनएक्सप्लोर्ड) क्षेत्रांची ओळख आणि आगामी कृती

X-37B कार्यक्रम आपल्या काळाच्या पुढे होता. त्या काळात अवघड आणि अप्रासंगिक वाटणाऱ्या अंतराळ क्षमतांची आणि स्पेस डोमेन अवेअरनेसची आवश्यकता त्याने ओळखली. आजही बहुतेक चर्चा LEO उपग्रहांभोवती फिरते, परंतु X-37B हे सुधारित कक्षीय मॅनोयुवर्याबिलिटी (manoeuvrability) असलेल्या HEO मधील अंतराळ यानांवर लक्ष केंद्रित करते, ज्यांचे अपोजी 35,000 किमीपर्यंत जाऊ शकते, तर LEO चे अपोजी 2,000 किमीपर्यंत असते. या कार्यक्रमाच्या दूरदृष्टीपूर्ण स्वरूपामुळे चीनने शेंलाँग (Shenlong) नावाचा समान कार्यक्रम सुरु केला, ज्याने सप्टेंबर 2024 मध्ये आपली तिसरी चाचणी उड्डाण पूर्ण केली आणि X-37B OTV प्रमाणे प्रॉक्सिमिटी मॅनोयुवर्स केल्या.

मात्र, नवकल्पनात्मक कल्पनांसाठी मोठ्या जोखमी स्वीकाराव्या लागतात. त्यामुळे नव्या आणि अनन्वेषित (अनएक्सप्लोर्ड) क्षेत्रांमध्ये संशोधन करण्यासाठी सरकारी-पाठींब्याची वित्तपुरवठा यंत्रणा आवश्यक ठरते, तसेच त्या संधींना पुढे नेण्याची तयारीही असावी लागते. यासाठी नवोन्मेषाला प्रोत्साहन देणारी संस्कृती विकसित करणे अत्यावश्यक आहे.

नागरी-लष्करी एकात्मता 

नागरी-लष्करी एकात्मतेच्या तत्त्वज्ञानावर अनेक चर्चा होत असल्या तरी X-37B कार्यक्रमाने याची प्रत्यक्षात यशस्वी अंमलबजावणी दाखवून दिली आहे. सरकार, लष्कर, खासगी क्षेत्र आणि अकॅडमिक संस्था यांनी एकमेकांच्या सामर्थ्यांचा उपयोग करून नवी लष्करी तंत्रज्ञाने विकसित करण्यासाठी कसे एकत्रितपणे काम करू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे. मूलभूत लष्करी संशोधन आणि विकास (R&D) मजबूत करण्यासाठी अशी सहकार प्रणाली अत्यावश्यक आहे. NASA, DAF RCO, Space Force, DIU, Boeing, SpaceX, Vector Atomic आणि इतर अनेक घटकांची सक्रिय भूमिका याचे स्पष्ट उदाहरण आहे. शैक्षणिक क्षेत्रात, OTV-6 ने USAF अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेला FalconSAT-8 हा प्रायोगिक उपग्रह तैनात केला होता. इतक्या विविध संस्थांमध्ये सामंजस्य आणि समन्वय साधणे आव्हानात्मक असले तरी नागरी–लष्करी एकात्मता साध्य करण्यासाठी ते अत्यावश्यक आहे.

तंत्रज्ञान-संयोग सक्षम करणे 

X-37B उपक्रमाने अंतराळातील प्रयोगांच्या माध्यमातून जमिनीवरील आणि नौदल क्षमतांमध्ये वाढ करण्याच्या संधी ओळखल्या. क्वांटम सेन्सिंग, लेझर-आधारित ऑप्टिकल कम्युनिकेशन यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानांसाठी अंतराळाला चाचणी-व्याप्ती (testbed) म्हणून वापरण्याचे महत्त्व या कार्यक्रमाने सिद्ध केले. नव्या तंत्रज्ञानांच्या संगमाचा मागोवा घेणे आणि त्यामध्ये गुंतवणूक करणे कोणत्याही राष्ट्राला लष्करी स्पर्धात्मक बढत (कॉम्पेटेटीव एज) मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते.

धोरणात्मक संवाद आणि गोपनीयता

X-37B कार्यक्रमाच्या संपूर्ण इतिहासात, अमेरिकन लष्करी प्रतिष्ठानाने या मोहिमेबाबत माहिती उघड करण्याबाबत सावध भूमिका घेतली आहे. बहुतेक प्रसार हा विद्यमान सामरिक परिस्थितीनुसार शक्तिप्रदर्शनापुरता मर्यादित ठेवण्यात आला, तर अंतराळयानाच्या विघातक (disruptive) आणि आक्रमक क्षमतांबाबतची माहिती जाणीवपूर्वक गोपनीय ठेवली गेली.
भारतानेही आपल्या लष्करी क्षमता आणि संशोधनाबाबत याच प्रकारची संयमी भूमिका स्वीकारणे आवश्यक आहे. विद्यमान संतुलन राखण्यासाठी, फक्त आवश्यक तेवढीच माहिती सार्वजनिक केली जावी.

एकात्मिक स्पेस कमांडची गरज

भारताने स्वतंत्र स्पेस कमांड विकसित करण्यासाठी अनेक पावले उचलली असली, तरीही भारतीय स्पेस कमिशनमध्ये लष्कराच्या मर्यादित सहभागामुळे अनेक कमतरता कायम आहेत. आतापर्यंत अंतराळ संशोधनात ISRO अग्रणी राहिले आहे, परंतु हे लक्षात घेणे आवश्यक आहे की ISRO ही आपल्या क्रांतिकारी संशोधन आणि उपक्रमांनंतरही मूलतः नागरी संस्था आहे, लष्करी नाही.
अंतराळ क्षेत्रातील लष्करी महत्त्वाकांक्षा पुढे नेण्यासाठी भारताचे ISRO वरचे अतिनिर्भर राहणे अनेकदा प्रतिकूल ठरले आहे. उदाहरणार्थ, ISRO ने रिउजेबल लाँच वेहिकल ऑटोनोमस लँडिंग मिशन (Reusable Launch Vehicle Autonomous Landing Mission-RLV LEX) सारखी स्वयंचलित अंतराळयान चाचणी केली असली तरी, लष्करी सहभाग आणि पर्यवेक्षणाच्या अभावामुळे त्याची क्षमतावृद्धी इतर राष्ट्रांच्या तुलनेत मर्यादित ठरते. भावी युद्धव्यवस्था हळूहळू अंतराळ क्षेत्राकडे झुकत असल्यामुळे ही स्थिती त्वरित सुधारण्याची गरज आहे. सध्याच्या परिस्थितीत, यूएस स्पेस फोर्स प्रमाणेच एक एकात्मिक भारतीय लष्करी स्पेस कमांड स्थापन करणे अत्यावश्यक आहे. अशा कमांडमुळे अंतराळ क्षेत्रातील लक्ष केंद्रीत लष्करी R&D सुलभ होईल, ISRO सारख्या वैज्ञानिक संस्थांशी अधिक प्रभावी समन्वय होईल आणि देशातील वाढत्या स्पेस स्टार्टअप इकोसिस्टम बरोबर मजबूत सहकार्य साधता येईल. एकूणच, भविष्यातील संरक्षण संरचना बळकट करण्यासाठी एकात्मिक स्पेस कमांडची स्थापना आता अपरिहार्य झाली आहे.

निष्कर्ष: ‘मेक इन इंडिया’चे यश इनोव्हेशनवर अवलंबून

राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेनंतरही, दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळापासून अमेरिका जागतिक पातळीवरील प्रमुख लष्करी शक्ती राहिली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची तिची संस्कृती, ज्याचे उत्तम उदाहरण म्हणजे X-37B उपक्रम. संरक्षण क्षेत्रातील ‘मेक इन इंडिया’ हे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारताने लष्करी संशोधन आणि विकास (R&D) याला केंद्रस्थानी ठेवणे आवश्यक आहे. अमेरिकेने या क्षेत्रात घातलेल्या पायाभूत उदाहरणांचा अभ्यास करून, त्यातील संबंधित केस स्टडी ओळखून आणि योग्य घटक आपल्या लष्करी धोरणात वेळेवर समाविष्ट करून भारत या दिशेने महत्त्वाची प्रगती करू शकतो. चीनच्या शेंलाँग सारख्या उपक्रमांमधून वाढणाऱ्या लष्करी आणि अंतराळ क्षमतांबरोबरच, ऑपरेशन सिंदूर दरम्यान दिसून आलेली पाकिस्तानला या तंत्रज्ञानाची पुरवठा करण्याची त्याची तयारी, भारतासाठी या प्रक्रियेला आणखी तातडीचे स्वरूप देते.


प्रतीक त्रिपाठी हे ऑब्सरवर रिसर्च फाउंडेशनमध्ये सेंटर फॉर सिक्युरिटी, स्ट्रॅटीजी अँड टेक्नॉलॉजी (CSST) येथे ज्युनियर फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.