Author : Soumya Awasthi

Expert Speak Raisina Debates
Published on May 15, 2025 Updated 0 Hours ago

डिजिटल युगात पहलगाम हल्ला दर्शवितो की माहितीचे युद्ध (information warfare) ही रणभूमीवरील कारवाई इतकेच प्रभावी ठरते, जिथे सत्य आणि नरेटिव्ह जनमतासाठी संघर्ष करते.

नरेटिव्हचे शस्त्रीकरण: पहलगाम हल्ल्यानंतर सोशल मीडियावरील प्रपोगंडा

Image Source: Getty

    २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला, ज्यामध्ये २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला, ही एक अमानुष हिंसक घटना होती आणि याच घटनेनंतर सोशल मीडियावर माहितीच्या युद्धाला (इन्फॉर्मेशन वॉर) सुरुवात झाली. वातावरण शांत झाल्यानंतर, ऑनलाइन विश्वातही एक तितकाच तीव्र संघर्ष सुरू झाला, जिथे राष्ट्र पुरस्कृत दहशतवादी समर्थक आणि डिजिटल प्रचारकांनी सत्याचे विकृतीकरण करून भारताच्या सुरक्षेला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. हा लेख पहलगाम हल्ल्यानंतर सोशल मीडियावर पसरवलेल्या प्रचाराचा अभ्यास करतो, त्यामागील शत्रुत्वपूर्ण तत्त्वे कशी या नरेटिव्हचे म्हणजेच कथानकाचे शस्त्रीकरण करतात, कोणते डावपेच वापरले जातात, आणि भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेवर त्याचे गंभीर परिणाम काय होऊ शकतात हे उलगडून दाखवतो.

    डिजिटल रणांगण: दहशतवादी प्रचारासाठी सोशल मीडियाचे साधन

    पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तानी सोशल मीडिया हँडल्स विशेषतः X (पूर्वीचं ट्विटर) वर भारताची बदनामी करण्यासाठी आणि या शोकांतिकेची थट्टा उडवण्यासाठी समन्वयित प्रयत्नांची भर पडली. #IndianFalseFlag, #PahalgamDramaExposed आणि #ModiExposed यांसारखे हॅशटॅग झपाट्याने ट्रेंड झाले, आणि हजारो पोस्टद्वारे पसरवले गेले, ज्यांचा उद्देश हल्ला भारतानेच आखलेली बनावट घटना असल्याचे दाखवण्याचा होता.

    #IndianFalseFlag, #PahalgamDramaExposed आणि #ModiExposed यांसारखे हॅशटॅग झपाट्याने ट्रेंड झाले, आणि हजारो पोस्टद्वारे पसरवले गेले, ज्यांचा उद्देश हल्ला भारतानेच आखलेली बनावट घटना असल्याचे दाखवण्याचा होता.

    हे प्रयत्न क्षणिक किंवा सहज नव्हते; ओपन-सोर्स इंटेलिजन्सच्या (OSINT) विश्लेषणातून हे उघड झाले की या हॅशटॅग्सखालील ७५ टक्क्यांहून अधिक पोस्ट्स पाकिस्तानी अकाउंटवरुन आल्या होत्या, ज्यापैकी अनेक अकाउंट पाकिस्तान सरकारसमर्थक किंवा लष्करसमर्थक नरेटिव्हशी संबंधित होती. या पोस्ट्सची वेळ आणि त्याचे प्रमाण पाहता, हे अतिशय नियोजित आणि नियंत्रित अभियान होते, ज्याचा उद्देश कथानकावर म्हणजेच नरेटिव्हवर प्रभाव टाकणे आणि हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा (LeT) आणि तिच्या प्रतिनिधी संघटना द रेसिस्टन्स फ्रंट (TRF) यांच्यावरून हटवण्याचा होता. या संघटनांनी हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचा दावा केला होता, पण नंतर ती मागे घेतली.

    AI-निर्मित दिशाभूल करणारी माहिती आणि विडंबन

    या प्रकारातील सर्वात धोकादायक प्रवृत्तींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून दिशाभूल करणारी आणि आक्षेपार्ह कंटेन्ट निर्माण करणे हे होते. इंटरनेटवर अशा AI-संपादित व्हिडिओंचे प्रसारण झाले, ज्यामध्ये शोकाकुल अवस्थेतील एका महिलेचा फोटो बदलून तो एका विकृत नृत्यदृश्यात रूपांतरित केला गेला होता. याशिवाय, X वर आणखी एक व्हिडिओ पसरवण्यात आला, ज्यामध्ये त्या वेळी नॉर्थन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल सुचिंद्र कुमार आणि इतर वरिष्ठ अधिकारी कथितपणे 'फॉल्स फ्लॅग' (बनावट हल्ला) याबद्दल चर्चा करत असल्याचे दाखवले गेले.

    अशा प्रकारचे डिजिटल फेरफार अनेक विध्वंसक हेतूंनी केले जातात: ते पीडितांच्या दुःखाला कमी लेखतात, अधिक द्वेषभावना भडकवतात आणि भारत सरकार व संस्थांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करतात. या पोस्ट्सचा प्रचंड वेगाने प्रसार होणे, ज्या काही तासांतच हजारो वेळा पाहिल्या गेल्या यावरून हेच दिसते की जनमत तयार करण्यात आणि बेबनाव निर्माण करण्यात AI-संचलित प्रचार किती प्रभावी ठरतो.

    भारतीय सशस्त्र दल आणि नेतृत्वाला लक्ष्य करणारी चुकीची माहिती

    या प्रचार मोहिमेने भारताच्या सुरक्षाव्यवस्थेच्या प्रामाणिकतेवरच आघात केला. या मोहिमेचा मुख्य हेतू भारतीय लष्करामध्ये अंतर्गत मतभेद असल्याच्या बनावट गोष्टी पसरवण्याचा होता, विशेषतः शीख सैनिकांवर लक्ष केंद्रित करून. अनेक पोस्ट्स आणि व्हिडिओ जे AI च्या सहाय्याने बनवलेले किंवा मोठ्या प्रमाणावर संपादित केलेले होते ते असा दावा करतात की शीख सैनिक भारत सरकारच्या विरोधात बंड करत आहेत आणि काश्मीरमधील कारवाईत सहभागी होण्यास नकार देत आहेत. काही व्हायरल कंटेन्टमध्ये भारतीय सैनिक खलिस्तान सार्वमताची मागणी करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. हे नरेटिव्ह खलिस्तानी समर्थक अकाउंट्स आणि पाकिस्तानी ट्रोल नेटवर्कद्वारे अधिकच वाढवले गेले, ज्यांनी जुने व्हिडिओ आणि छायाचित्रे पुन्हा वापरून त्यातून वास्तवाचा आव आणण्याचा प्रयत्न केला. AI द्वारे तयार केलेले डीपफेक व्हिडिओ आणि बनावट लष्करी सल्लागार यामुळे या खोट्या गोष्टींना अधिक विश्वासार्हतेचा आभास मिळाला, ज्यामुळे सामान्य वापरकर्ते सहजपणे त्यावर विश्वास ठेवून ते शेअर करत होते.

    मोहिमेचा मुख्य हेतू भारतीय लष्करामध्ये अंतर्गत मतभेद असल्याच्या बनावट गोष्टी पसरवण्याचा होता, विशेषतः शीख सैनिकांवर लक्ष केंद्रित करून.

    पहलगाम हल्ल्यादरम्यान झालेल्या ऑपरेशनल अपयशांमुळे वरिष्ठ भारतीय लष्करी अधिकाऱ्यांना बडतर्फ किंवा देशाबाहेर पाठवले गेले असल्याच्या अफवा पाकिस्तानी अकाउंटकडून पसरवण्यात आल्या. प्रत्यक्षात, हे अधिकारी सन्मानपूर्वक सेवानिवृत्त झाले होते किंवा पदोन्नती मिळवून पुढे गेले होते. मात्र, अधिकृत स्पष्टीकरणे दिली जाण्यापूर्वीच ही खोटी माहिती मोठ्या प्रमाणावर पसरली होती. पाकिस्तानी मुख्य प्रवाहातील माध्यमे ज्यात समा टीव्ही आणि दुनिया न्यूज टीव्ही यांचा समावेश आहे यांनी या सोशल मिडिया अफवांना सत्य बातम्यांप्रमाणे दाखवले, ज्यामुळे या खोट्या कथा अधिकच बळावल्या आणि भारतीय लष्करात गोंधळ व बंडखोरीचे चित्र उभे केले गेले.

    या प्रचार मोहिमेत आणखी एक थर जोडत, पाकिस्तानी सायबर हल्लेखोरांनी भारतीय संरक्षण नेटवर्कमध्ये घुसखोरी केल्याचा दावा केला. त्यांनी संवेदनशील माहिती मिळवल्याचे सांगत पुढील सायबर हल्ल्यांची धमकी दिली. जरी भारतीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की कोणतीही गोपनीय माहिती लीक झालेली नाही, तरी अशा दाव्यांचा मानसिक परिणाम झाला आणि असुरक्षिततेची व गोंधळाची भावना निर्माण झाली.

    या चुकीच्या माहितीच्या मोहिमेत ठराविक हॅशटॅगचा रणनीतीने वापर, समन्वयाने केलेली पोस्टिंग आणि मुख्यप्रवाहातील तसेच परिघावरील प्रतिनिधींचा सहभाग दिसून आला. भारताची प्रतिक्रिया जलद आणि बहुआयामी होती. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) आणि स्वतंत्र फॅक्ट-चेकर्सनी या व्हायरल खोट्या बातम्यांचे खंडन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले, स्पष्टीकरणे दिली आणि बनावट कागदपत्रे उघडकीस आणली. सरकारने जनतेला आणि माध्यमांना सूचना जारी करून, संवेदनशील माहिती शेअर करण्याआधी काळजी घेण्यास आणि सत्यता तपासण्यास सांगितले. भारतात अनेक पाकिस्तानी आणि संबंधित सोशल मिडिया खात्यांवर बंदी घालण्यात आली, तरीही त्याच्या नरेटिव्ह आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना लक्ष्य करत राहिला.

    प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) आणि स्वतंत्र फॅक्ट-चेकर्सनी या व्हायरल खोट्या बातम्यांचे खंडन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले, स्पष्टीकरणे दिली आणि बनावट कागदपत्रे उघडकीस आणली.

    पहलगामची घटना ही डिजिटल युगातील माहिती युद्धाच्या (इन्फॉर्मेशन वॉर) शक्तीची तीव्र आठवण करून देते, जिथे सत्य आणि असत्य यांच्यातील स्पर्धा प्रत्यक्ष वेळेतच सुरू असते आणि जनमतासाठीचे युद्ध हे प्रत्यक्ष घटनांइतकेच महत्त्वाचे ठरते.

    प्रचाराच्या व्यापक यंत्रणेची झलक: राष्ट्र, परकीय हस्तक व माध्यमे

    ही घटना चुकीच्या माहितीची रणनीती अधिकाधिक गुंतागुंतीची होत चालल्याचे स्पष्टपणे दर्शवते. इंडियन सायबर कॉर्डिनेशन सेंटरच्या (I4C) तपासणीत असे उघड झाले की पहलगाम हल्ल्याचा सुरुवातीचा व्हिडिओ तयार करण्यासाठी AI-आधारित डीपफेक टूल्सचा वापर करण्यात आला होता. फॉरेन्सिक इमेज विश्लेषणात स्फोटाच्या दृश्यामध्ये पिक्सेल रचनेतील विसंगती आढळून आल्या, ज्या जनरेटिव्ह अ‍ॅडव्हर्सेरियल नेटवर्क्स (GANs) वापरून तयार केलेल्या कृत्रिम प्रतिमांच्या वैशिष्ट्यांशी जुळतात. शिवाय, त्या व्हिडिओच्या मेटाडेटामध्ये ३० एप्रिलची वेळ नोंदवलेली होती, जी प्रत्यक्षात घटना घडण्याच्या आधीची होती.

    भारताच्या सुरक्षा आणि सामाजिक एकतेवर परिणाम

    अलीकडील पहलगाम हल्ल्याचा भारताच्या सुरक्षा, अर्थव्यवस्था आणि समाजावर खोल आणि तीव्र परिणाम झाला आहे. या हल्ल्यामुळे जम्मू आणि काश्मीरच्या पर्यटन अर्थव्यवस्थेत भिती निर्माण झाली आहे. पहलगाम आणि अनंतनागमधील हॉटेल बुकिंग्स ६० टक्क्यांहून अधिक घटली आहेत, तर अमरनाथ यात्रेच्या बुकिंग्समध्ये सुमारे ३५ टक्क्यांनी घट झाली आहे, कारण सुरक्षेचा धोका वाढला आहे. स्थानिक व्यवसाय, विशेषतः वाहतूक, हस्तकला आणि आदरातिथ्य क्षेत्रात, ४० ते ५० टक्के महसुली नुकसान होत असल्याचे सांगत आहेत. असंघटित पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक हजारो लोकांना बेरोजगारी किंवा अपुऱ्या रोजगारास सामोरे जावे लागत आहे. ही अनपेक्षित आर्थिक उतरती घसरण जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादामुळे असलेल्या व्यापक असुरक्षिततेचे प्रतिबिंब आहे, जी जनतेचा आत्मविश्वास, गुंतवणूक आणि प्रादेशिक स्थैर्य धोक्यात आणते.

    पहलगाम हल्ल्याभोवती पसरवली गेलेली प्रचारमोहीम भारतातील धार्मिक विभाजन अधिक खोल करण्याचा प्रयत्न करून सांप्रदायिक ध्रुवीकरण तीव्र करू शकते. अशा कथानकांमुळे दहशतवादी गट आणि त्यांच्या समर्थकांचे हितसंबंध साधले जातात, ज्यामुळे सामाजिक एकतेवर आणखी आघात होतो. लष्कर, पोलीस आणि सरकार यांना लक्ष्य करणाऱ्या सततच्या चुकीच्या माहितीच्या मोहिमा या संस्थांवरील जनतेचा विश्वास कमी करतात, ज्यामुळे समाज भविष्यातील हल्ल्यांपुढे अधिक असुरक्षित आणि कमकुवत होतो.

    असंघटित पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक हजारो लोकांना बेरोजगारी किंवा अपुऱ्या रोजगारास सामोरे जावे लागत आहे.

    याव्यतिरिक्त, भारताच्या अंतर्गत सुरक्षेबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाची धारणा ऑनलाइन माध्यमांमध्ये प्रबळ ठरणाऱ्या नरेटिव्हद्वारे आकार घेत असते. जर हल्ल्याच्या वास्तवावर किंवा भारताच्या प्रतिसादावर संशय निर्माण करण्यात प्रचार यशस्वी झाला, तर गुन्हेगार आणि त्यांच्या समर्थकांना जबाबदार धरण्यासाठीच्या राजनैतिक प्रयत्नांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. या सर्व घटकांचा परस्पर प्रभाव भारताच्या आर्थिक आणि सामाजिक स्थैर्यावर मोठा आघात करतो.

    भारताच्या प्रतिकारात्मक उपाययोजना

    माहिती युद्धाच्या (इन्फॉर्मेशन वॉर) गंभीरतेला ओळखून, भारतीय अधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. सरकारच्या प्रतिकारात्मक उपाययोजनेमध्ये डिजिटल सावधगिरीचा समावेश होता, ज्याला शत्रुतापूर्ण नरेटिव्हविरुद्ध कारवाईने पूरक केले गेले: भारताने अनेक पाकिस्तानी यूट्यूब-आधारित न्यूज चॅनेल्स आणि सोशल मिडिया हँडल्सवर बंदी घालून प्रचाराच्या पोहोचीवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण ठेवले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारतीय माध्यमांना कठोर सूचना जारी केल्या असून, त्यांनी कव्हरेजमध्ये संयम राखण्याची आणि तपास न केलेली किंवा संवेदनशील माहिती पसरवण्यापासून सावध राहण्याचा आग्रह केला आहे.

    ही माहिती नियंत्रणाची उपाययोजना व्यापक राजनैतिक आणि सुरक्षा उपाययोजनांसोबत समांतरपणे राबवली गेली. भारताने सिंधु जल करार (IWT) निलंबित केला, अटारी-वाघा सीमा बंद केली आणि परराष्ट्र अधिकाऱ्यांना (डिप्लोमेट्स) परत पाठवले, तसेच परिस्थितीविषयी महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय भागीदारांना माहिती दिली.

    माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारतीय माध्यमांना कठोर सूचना जारी केल्या असून, त्यांनी कव्हरेजमध्ये संयम राखण्याची आणि तपास न केलेली किंवा संवेदनशील माहिती पसरवण्यापासून सावध राहण्याचा आग्रह केला आहे.

    डिजिटल दक्षता, मीडियासाठी नियमन, राजनैतिक प्रयत्न आणि लष्करी तयारी यांचा समावेश असलेला हा सर्वसमावेशक दृष्टीकोन भारताच्या सुरक्षा आणि सामाजिक संरचनेचे रक्षण करण्यासाठी त्याच्या ठाम निर्धाराचे प्रतीक होता. जो थेट दहशतवादी हिंसा, प्रचार किंवा चुकीच्या माहितीच्या हानिकारक परिणामांपासून वाचवण्यासाठी होता. भारत सरकारच्या कार्यवाहीचा उद्देश जनतेचा आत्मविश्वास पुन्हा स्थापित करणे, आर्थिक परिणाम मर्यादित करणे आणि सांप्रदायिक तणाव टाळणे आहे, तसेच या जटिल धोका असलेल्या परीपेक्क्षासमोर भारताच्या ठाम निर्धाराचा स्पष्ट संदेश प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना देणे हा आहे.

    निष्कर्ष: दहशतवादाविरोधाची नवीन युद्धभूमी

    पाकिस्तानकडे प्रॉक्सी वापरकर्ते, खोट्या नरेटिव्हचा वापर आणि संकरित युद्धाची परंपरा आहे, ज्याद्वारे ते भारतातील अंतर्गत बाबींवर, विशेषत: जम्मू आणि काश्मीरवर, आंतरराष्ट्रीय राजकीय दृष्टिकोन प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. हे याआधी ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर देखील पाहिले गेले होते, ज्यामध्ये जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा हटवला गेला आणि तो दोन केंद्रशासित प्रदेशात (UTs) विभागला गेला. तथापि, नरेटिव्ह बदलत आहे, कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने खोटी माहिती आणि भारताच्या राजनैतिक उपक्रमांबद्दल जागतिक जागरूकता वाढत आहे. पहलगाम ही एक केस स्टडी बनली आहे, जी दाखवते की स्वतंत्र राष्ट्रांनी कसे डिजिटल युगातील दहशतवादाशी लढण्यासाठी लष्करी तयारी, नरेटिव्हची सार्वभौमिकता, सायबर लवचिकता आणि भारतीय नागरिकांचा प्रचार नष्ट करण्यामध्ये सक्रिय सहभाग यांचा वापर करावा लागेल.

    खरा धोका डीपफेक नाही, तर त्याचा शस्त्र म्हणून वापरणारे भौगोलिक राज्यकर्ते आहेत. पहलगाममधील पाकिस्तानच्या कृतींनी भारतास लाजिरवाणे दाखवले नाही तर त्यांनी फक्त त्यांच्या हताशतेचा आणि राजनैतिक अपयशाचा पर्दाफाश केला आहे. हे युद्ध फक्त भूभाग किंवा सत्तेसाठी नाही, तर सत्यासाठी आहे. आणि या चुकीच्या माहिती आणि हानिकारक हेतूंच्या युद्धात भारत माहितीपूर्ण, एकसंध आणि धाडसाने उभा आहे.


    सौम्या अवस्थी या ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनच्या सेंटर फॉर सिक्युरिटी, स्ट्रॅटेजी आणि टेक्नॉलॉजीमध्ये फेलो आहेत.

    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.