Author : Shobha Suri

Published on Oct 26, 2023 Updated 0 Hours ago

पाण्याचे आंतरिक मूल्य आणि आपल्या अस्तित्वातील पाण्याची मध्यवर्ती भूमिका ओळखूनच आपण वर्तमान आणि भावी पिढ्यांसाठी अधिक लवचिक आणि अन्न-सुरक्षित जग निर्माण करू शकतो.

पाणी सर्वस्व आहे: सर्वांना समान आणि सुरक्षित पाणी उपलब्ध व्हायला हवे

पाणी हे जीवन देणारे अमृत असून, पृथ्वीवरील सर्व प्रकारचे जीवन जोपासण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. पाणी ही केवळ मूलभूत गरजच नाही तर पाण्याची उपलब्धता हा मूलभूत मानवी हक्कही आहे. २०२३ ची ‘जागतिक अन्न दिना’ची मध्यवर्ती संकल्पना, ‘पाणी हे जीवन आहे, पाणी हे अन्न आहे: या असमानता आणि असुरक्षा कमी करण्याप्रति संयुक्त राष्ट्रांच्या निःसंदिग्ध वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व करते,’ उदरनिर्वाहाचा स्त्रोत म्हणून पाण्याचे महत्त्व आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यात पाण्याची भूमिका मांडते.

लोकसंख्येची झपाट्याने होणारी वाढ, शहरांचा विकास आणि हवामान बदलाचे परिणाम यांमुळे पृथ्वीच्या जलस्रोतांवर अधिक ताण पडत आहे.

पाणी हा पृथ्वीवरील जीवनाचा एक मूलभूत घटक आहे. मानवी शरीराच्या वजनातील निम्म्याहून अधिक वजन पाण्याचे असते आणि पाणी पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागाच्या ७१ टक्के भाग व्यापते. यांपैकी फक्त २.५ टक्के शुद्ध पाणी आहे, जे पिण्यासाठी, शेतीसाठी आणि औद्योगिक कारणांसाठी वापरले जाते. पाण्याचा जीवनाशी असलेला परस्परसंबंध आपल्या शारीरिक रचनेच्या पलीकडे आहे. पाणी परिसंस्थेला समर्थन देते, हवामानाच्या नमुन्यांवर प्रभाव टाकते आणि पृथ्वीच्या भूगर्भीय प्रक्रियांना चालना देते. ‘सर्वांसाठी शुद्ध पाणी आणि स्वच्छता’ या विषयावरील ‘शाश्वत विकास लक्ष्य ६’ साठीची माहिती सूचित करते की, पाण्याची वानवा असलेल्या देशांमध्ये २.४ अब्ज लोक राहतात; २.२ अब्ज लोकांना सुरक्षितपणे व्यवस्थापित केलेले पिण्याचे पाणी उपलब्ध नाही; ३.५ अब्ज लोकांना सुरक्षितपणे व्यवस्थापित स्वच्छता उपलब्ध नाही; आणि २.२ अब्ज लोकांमध्ये हात धुण्याच्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. लोकसंख्येची झपाट्याने होणारी वाढ, शहरांचा विकास आणि हवामान बदलाचे परिणाम यामुळे पृथ्वीवरील जलस्रोतांवर अधिक ताण पडत आहे. गैरवापर, उत्खनन, प्रदूषण आणि हवामान बदलामुळे गेल्या काही दशकांमध्ये पाण्याची उपलब्धता आणि गुणवत्ता- प्रति व्यक्ती २० टक्क्यांनी कमी झाली आहे. अंदाजे ६० कोटी लोक, किमान काही प्रमाणात, त्यांच्या उपजीविकेसाठी पाण्यावर अवलंबून आहेत.

जागतिक अन्न असुरक्षिततेचा मुद्दा चिंतेचा विषय आहे. जगाची लोकसंख्या सतत वाढत असल्याने आणि हवामान बदलाचे परिणाम कृषी उत्पादनात अडथळा आणत असल्याने, अन्न उत्पादनात पाण्याचे महत्त्व कमी लेखले जाऊ शकत नाही. कृषी क्षेत्र हे गोड्या पाण्याच्या स्त्रोतांचा सर्वात मोठा ग्राहक आहे, गोड्या पाण्याच्या एकूण वापरात कृषी क्षेत्राचा वाटा अंदाजे ७० टक्के आहे. अन्नप्रणालीच्या परिवर्तनासाठी पाण्याची पुरेशी मात्रा, गुणवत्ता आणि स्थिरता आवश्यक आहे. पुरेशा पाण्याच्या कमतरतेचा थेट परिणाम अन्न प्रणालीच्या सर्व घटकांवर होतो. अन्न सुरक्षा आणि जल सुरक्षेसाठी एकत्रित दृष्टिकोनाचा अभाव ‘शाश्वत विकास उद्दिष्टे- २’ (शून्य उपासमार) आणि ‘शाश्वत विकास उद्दिष्टे- ६’ (पाणी आणि स्वच्छता) यांच्या प्रगतीत अडथळा आणतो. पाणी, अन्न सुरक्षा आणि पोषण यांच्या तरतुदीसाठी पाणी आणि अन्न प्रणाली यांच्यातील संबंधांच्या प्रगतीचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. मात्र, शेतीमध्ये पाण्याचा कार्यक्षम आणि शाश्वत वापर हे एक आव्हान आहे. गैरव्यवस्थापन, अतिउत्पादन आणि अकार्यक्षम सिंचन पद्धती यांमुळे अनेक प्रदेशांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे, ज्यामुळे अन्न सुरक्षा धोक्यात आली आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी जलस्रोत जतन केले जातील हे सुनिश्चित करण्याकरता, विशेषतः कृषी क्षेत्रात जबाबदार जल व्यवस्थापनाची गरज यांतून अधोरेखित होते.

अन्नप्रणालीच्या परिवर्तनासाठी पाण्याची पुरेशी मात्रा, गुणवत्ता आणि स्थिरता आवश्यक आहे.

पाण्याची टंचाई हे जागतिक आव्हान आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मते, असा अंदाज आहे की, २०५० सालापर्यंत ५ अब्ज लोकांना किंवा जगातील दोन तृतीयांश लोकसंख्येला वर्षातून किमान एक महिना पाणी टंचाईचा सामना करावा लागेल. हवामान बदलामुळे ही समस्या अधिकच वाढते, ज्यामुळे काही प्रदेशांमध्ये वारंवार आणि गंभीर दुष्काळ पडतो तर काही भागांत अतिवृष्टी आणि पूर येतो. पाणीटंचाईचा परिणाम एकसमान नसतो आणि हा परिणाम बहुधा उपेक्षित समुदायांवर विषमतेने होतो. शुद्ध पाण्याचा अभाव केवळ लोकांच्या आरोग्यावरच परिणाम करतो असे नाही, तर आर्थिक विकासातही अडथळा आणतो आणि यामुळे गरिबीचे चक्र कायम राहते. सामाजिक-आर्थिक स्थिती किंवा भौगोलिक स्थानाची पर्वा न करता, २०१० मध्ये संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेला ‘पाण्याचा हक्क’ हा एक अत्यावश्यक मानवी हक्क आहे. ‘शाश्वत विकास उद्दिष्टां’मध्ये नमूद केल्याप्रमाणे, २०३० सालापर्यंत शुद्ध पाणी सार्वत्रिकरीत्या सर्वांना उपलब्ध होण्यासाठी एकत्रित प्रयत्न, गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपाय आवश्यक आहेत.

पाण्याच्या संकटावर मात करण्यासाठी, आपण सर्वात असुरक्षित आणि उपेक्षित लोकांच्या गरजांना प्राधान्य द्यायला हवे, जेणेकरून शुद्ध पाणी सर्वांना उपलब्ध होणे सुनिश्चित होईल. अल्पभूधारक शेतकरी, उपेक्षित समुदाय आणि असुरक्षित गटांना त्यांच्या कृषी गरजांसाठी पाणी सुरक्षितरीत्या उपलब्ध होण्याची आणि वापरण्याची समान संधी मिळणे आवश्यक आहे. अचूक शेती आणि ठिबक सिंचन यांसारख्या नाविन्यपूर्ण तंत्रांचा वापर करून, शेतकरी पाण्याचा अपव्यय कमी करून पिकांचे जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतात. यामुळे केवळ उत्पादकता वाढते असे नाही, तर मर्यादित जलस्रोतांचेही संरक्षणही होते. बदलत्या पर्जन्यमानाच्या पद्धती आणि तापमानाच्या कमालीच्या वाढीमुळे- प्रामुख्याने कृषी क्षेत्र हवामान बदलामुळे असुरक्षित बनले आहे. शाश्वत पाणी व्यवस्थापन धोरणांनी या बदलांशी जुळवून घ्यायला हवे, ज्यामुळे पर्यावरणीय आव्हानांना तोंड देत, शेतकऱ्यांना त्यांचे जीवनमान टिकवून ठेवण्यास मदत होईल. रिमोट सेन्सिंग (उपग्रह, विमाने, ड्रोन्स यांद्वारे निरीक्षण करणे) आणि माहिती विश्लेषणासह तांत्रिक नवकल्पना, जलस्रोतांचे प्रभावीपणे निरीक्षण आणि व्यवस्थापन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

अचूक शेती आणि ठिबक सिंचन यांसारख्या नाविन्यपूर्ण तंत्रांचा वापर करून, शेतकरी पाण्याचा अपव्यय कमी करून पिकांचे जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतात.

ही समानता साध्य करण्यासाठी सर्वसमावेशकतेला प्राधान्य देणारी आणि पाणी उपलब्ध होण्यातील ऐतिहासिक असमानता दूर करणारी धोरणे, पद्धती आणि प्रशासन संरचनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. आपल्या पृथ्वीकरता शाश्वत भविष्य सुनिश्चित करण्याकरता आणि त्यात कुणीही मागे राहू नये याकरता, आपण शुद्ध आणि सुरक्षित पाणी सर्वांना समानरीत्या उपलब्ध होईल, याला प्राधान्य द्यायला हवे. शाश्वत कृषी पद्धतींना प्रोत्साहन द्यायला हवे आणि पाणी व अन्न सुरक्षेच्या परस्परसंबंधित आव्हानांना सामोरे जायला हवे. पाण्याचे आंतरिक मूल्य आणि आपल्या अस्तित्वातील पाण्याची मध्यवर्ती भूमिका ओळखूनच आपण वर्तमान आणि भावी पिढ्यांकरता अधिक लवचिक आणि अन्न-सुरक्षित जग निर्माण करण्याची आशा करू शकतो.

शोबा सुरी या ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनमध्ये वरिष्ठ फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.