Author : Ayjaz Wani

Expert Speak Raisina Debates
Published on Apr 30, 2025 Updated 0 Hours ago

पहलगाम हल्ला हे स्पष्टपणे दाखवतो की काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होत असल्याने पाकिस्तानी लष्कर निराश झालं आहे, त्यामुळे त्यांनी या प्रगतीला अडथळा आणण्यासाठी प्रॉक्सी दहशतवाद पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न केला आहे.

काश्मीरप्रश्नी पाकिस्तानी लष्कराची अस्वस्थता उघड

Image Source: Getty

२२ एप्रिल २०२५ रोजी दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पहलगाममध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला असून जनतेमध्ये संतापाचे वातावरण आहे. या भीषण हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. लष्कर-ए-तोयबा (LET) शी संबंधित असलेल्या ‘द रेजिस्टन्स फ्रंट’ (TRF) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हे आतापर्यंतचे पुलवामा (फेब्रुवारी २०१९) नंतरचे सर्वात भीषण दहशतवादी कृत्य ठरले आहे. पुलवामा हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. पहलगाम हल्ल्याचा आवाज संपूर्ण देशात घुमत आहे. सर्व धर्म आणि पंथांतील तसेच काश्मिरी नागरिकांनी सुद्धा या क्रूर कृत्याचा एकमुखाने निषेध केला. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाविरोधात काश्मीरमध्ये जनतेने मोर्चे काढले. गेल्या ३५ वर्षांपासून काश्मीर खोऱ्यात हिंसा आणि दहशतवादाचे सत्र सुरू आहे, परंतु प्रथमच संपूर्ण काश्मीरमध्ये एखाद्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बंदची घोषणा करण्यात आली. नागरिक रस्त्यावर उतरून शांततापूर्ण निदर्शने करत आहेत. न्याय मिळावा म्हणून काश्मीरमध्ये कँडल मार्च काढले जात आहेत. लोक म्हणत आहेत की हा हल्ला इस्लामिक शिक्षणाच्या विरोधात आहे.

पहलगाम हल्ला पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना व लष्करी सत्ताधाऱ्यांच्या वाढत्या असमाधानाची आणि नैराश्याची साक्ष देतो. काश्मीरमध्ये दहशतवादाला मिळणारा लोकांचा पाठिंबा कमी झालेला आहे, पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर काढता पाय घ्यावा लागतो आहे, देशांतर्गत असंतोष वाढलेला आहे आणि पाक-अधिकृत काश्मीरमध्ये उठाव व असंतोष वाढत आहे.

२०१९ मध्ये कलम ३७० हटवल्यानंतर गेल्या पाच-सहा वर्षांत काश्मीरमध्ये घडलेल्या सकारात्मक बदलांमुळे पाक लष्करप्रमुख असीम मुनीर यांना छुप्या युद्धाच्या रणनीतीकडे वळावे लागले आहे आणि पहलगाम हल्ल्यात थेट सहभाग घ्यावा लागला आहे. असीम मुनीर हे पूर्वी मदरशात शिक्षण घेतलेले असून त्यांनी १५ एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात भाषण करताना पाकिस्तानातील जनतेला दोन-राष्ट्र सिद्धांत कायम ठेवण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले, “काश्मीर ही आपल्या गळ्याची नस आहे, ती तशीच राहील आणि आम्ही तिला विसरणार नाही.” आम्ही काश्मिरी जनतेच्या पाठीशी उभे राहू. १८ एप्रिल रोजी लष्कर कमांडर सैफुल्लाह मूसा याने पाकिस्तान अधिकृत काश्मीरमधील रावळकोट शहरात एका सभेला संबोधित करताना म्हटले की, “भारत सरकार काश्मीरमधील जनसांख्यिकी बदलण्याचा कट रचत आहे. जिहाद सुरू राहील, बंदुका धडधडतील आणि काश्मीरमध्ये शिरच्छेद सुरूच राहतील.”

आजचा काश्मीर – खरी परिस्थिती

2019 मध्ये अनुच्छेद 370 आणि 35-A हटवल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात दहशतवादाच्या छायेतून बाहेर आले आहेत. आता काश्मिरी जनतेमध्ये मुख्य प्रवाहाशी जोडले जाण्याची आकांक्षा वाढलेली दिसून येते. भारताच्या व्यापक राष्ट्रीय संस्कृतीशी एकरूप होण्याची भावना वाढीस लागलेली आहे. स्थानिक दहशतवाद्यांच्या भरतीत व दहशतवादी घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. २०२१ मध्ये अशा १२० घटना घडल्या होत्या, तर २०२४ मध्ये त्यांची संख्या फक्त ७ वर आली. हा बदल काश्मीरच्या पूर्वीच्या कालखंडाशी तुलना करता एक मोठा बदल आहे. स्थानिक युवकांची दहशतवादी संघटनांमध्ये घटलेली भरती, मजबूत सुरक्षा व्यवस्था आणि ओव्हर ग्राउंड वर्कर्स (OGWs) चा अभाव यामुळे पाकिस्तानला मोठ्या संख्येने परकीय दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये पाठवावे लागले. २०२४ मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये ठार झालेल्या ६८ दहशतवाद्यांपैकी ४२ हे विदेशी होते. हे दहशतवादी M-4 कार्बाइन रायफल्स, नाईट व्हिजन गॉगल्स आणि पाक लष्कराच्या वापरात असणाऱ्या उच्च-एन्क्रिप्टेड दूरसंचार उपकरणांनी सज्ज होते. खोऱ्यात जनतेचा पाठिंबा न मिळाल्यामुळे आणि शहरी भागांमध्ये सुरक्षा दलांशी समोरासमोर लढणे अशक्य झाल्यामुळे हे दहशतवादी आता घनदाट जंगलांमध्ये लपून गुरिल्ला युद्धाच्या पद्धतीने कारवाया करत आहेत. २०२० नंतर अनेक दहशतवाद्यांना काश्मीर खोऱ्यांमधून पीर पंजाल पर्वतरांगांमध्ये आणि जम्मूच्या दक्षिण भागात स्थलांतरित व्हावे लागले. हे दहशतवादी आता डोंगराळ भागांतील जंगलांचा वापर करून सुरक्षा दलांवर हल्ले करून पुन्हा नव्याने हल्ल्याची तयारी करण्यासाठी जंगलात परत जातात.

२०१९ नंतर जम्मू-काश्मीरमध्ये मोठा आर्थिक बदल घडून आला आहे. मागील तीन वर्षांत पर्यटन व्यवसायात आलेल्या बूममुळे जम्मू-काश्मीरची आर्थिक विकास दर ७.८ टक्क्यांवर पोहचला आहे, जो राष्ट्रीय सरासरी ७.७७ टक्क्यांपेक्षा थोडी जास्त आहे. या वाढत्या आर्थिक विकासात पर्यटन क्षेत्राचा फार मोठा वाटा आहे. होमस्टे योजनेसारख्या सरकारी उपक्रमांमुळे हजारो स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या टिकाऊ विकास उद्दिष्टांतर्गत प्रत्येक युनिटला विशेष मदत दिली जाते.

पाकिस्तानची वाढती हताशा

काश्मीर हा पाकिस्तानसाठी कायमच एक राजकीय आणि सामरिक प्रचाराचा मुद्दा राहिलेला आहे. या मुद्द्याच्या आड पाकिस्तानने आपल्या देशातील राजकीय अस्थिरता आणि आर्थिक अडचणींवरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला आहे. मागील चार वर्षांत पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेतील घसरण प्रकर्षाने जाणवली आहे. सध्या पाकिस्तानमधील लष्कराला तहरीक-ए-तालिबान (TTP), बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) आणि बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट (BLF) या संघटनांकडून मोठे आव्हान मिळत आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेत आल्यानंतर TTP ने आपले हल्ले वाढवले आहेत. तालिबानच्या सत्तेच्या पहिल्या २१ महिन्यांत पाकिस्तानमध्ये दहशतवादी घटनांमध्ये ७३ टक्क्यांनी वाढ झाली. खैबर पख्तूनख्वा प्रांतात या घटनांमध्ये सर्वाधिक म्हणजे २७९.८ टक्क्यांनी वाढ झाली. २०२१ मध्ये ५७२ घटना झाल्या होत्या, त्या २०२४ मध्ये २,१७३ पर्यंत पोहोचल्या. त्याचप्रमाणे, BLA आणि BLF यांनीही वेगवेगळ्या आघाड्यांवर पाकिस्तानच्या लष्करावर आपले हल्ले तीव्र केले आहेत.

भारताविषयी काश्मिरी जनतेच्या दृष्टिकोनातील बदलामुळे निर्माण झालेल्या या नव्या परिस्थितीमुळे पाकिस्तानला आपली रणनीती बदलावी लागली आहे. आता पाकिस्तान पुन्हा प्रॉक्सी दहशतवादी गटांद्वारे अस्थिरता निर्माण करण्याचा व कट्टरतेला चालना देण्याचा प्रयत्न करत आहे.

काश्मीरमध्ये चांगली आर्थिक स्थिती, शांततेचं वातावरण आणि पर्यटनात आलेली तेजी यामुळे स्थानिक जनतेची मानसिकताही बदलू लागली आहे. भारताविषयीचा विरोध निवळत चाललेला आहे. या बदलामुळे पाकिस्ताननेही आपली रणनीती बदलली आहे. सोशल मीडियावर भारतविरोधी प्रचाराची तीव्रता वाढवली गेली आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी २,००० हून अधिक संशयास्पद भारतविरोधी पोस्ट्सचा आढावा घेतला, ज्या २०२३ मध्ये केवळ ८९ होत्या. मात्र या सगळ्या प्रयत्नांमध्ये पाकिस्तानला फारसा यश मिळाले नाही, कारण २०१९ नंतर काश्मीरमध्ये सामान्य जनतेच्या जीवनात आशेचा नवा किरण दिसायला लागला होता. काश्मीर पुन्हा एकदा भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांमध्ये समाविष्ट होऊ लागला होता. देशी व विदेशी पर्यटकांसाठी काश्मीर पुन्हा आकर्षण ठरले. एवढंच नव्हे तर पाकपुरस्कृत दहशतवादी गट व त्यांचे समर्थकसुद्धा काश्मीरसंबंधी होणाऱ्या सकारात्मक चर्चेला रोखू शकले नाहीत. वेळोवेळी आंतरराष्ट्रीय राजनयिक व मान्यवरांनी नव्या काश्मीरचे कौतुक केले आहे.

या सर्व सकारात्मक घडामोडींमध्ये पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी देशातील सुरक्षा आव्हानांवरील अपयश झाकण्यासाठी आणि आपले अपयश लपवण्यासाठी नवी खेळी खेळली. त्यांनी पुन्हा द्विराष्ट्र सिद्धांताची भाषा बोलून फूट पाडणाऱ्या विचारधारेचे पुनरुत्थान केले. असीम मुनीर यांनी दहशतवादी गटांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काश्मीरला पाकिस्तानच्या “गळ्याची नस” म्हटले. हे विधान काश्मीरमध्ये कथित जनसांख्यिकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर दिले गेले होते, कारण काही दिवस आधी रावळकोटमध्ये झालेल्या रॅलीमध्ये लष्कर कमांडर सैफुल्ला मूसा यांनी अशाच गोष्टी मांडल्या होत्या. या दोघांचे वक्तव्य ‘द रेजिस्टन्स फोर्स’साठी एक स्पष्ट संदेश होता. त्यानुसार TRF च्या दहशतवाद्यांनी लोकप्रिय पर्यटनस्थळावर हल्ला करून काश्मीरच्या आर्थिक विकासाला धक्का देण्याचा आणि भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्याचा उद्देश छुपा युद्ध सुरू ठेवणे, स्थैर्याच्या प्रयत्नांना अडथळा आणणे आणि जम्मू-काश्मीरच्या भारताशी एकात्मतेला बाधा पोहोचवणे हाच होता. असीम मुनीर यांना फेब्रुवारी २०१९ च्या पुलवामा हल्ल्यासाठीही जबाबदार मानले जाते. त्या काळात ते पाकिस्तानच्या कुख्यात गुप्तचर संस्था ISI चे प्रमुख होते. ऑक्टोबर २०१८ ते जून २०१९ दरम्यान त्यांच्या कार्यकाळात काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आणि तरुणांमध्ये कट्टरतेचा प्रभाव वाढला.

निष्कर्ष

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांची नावे आणि त्यांची धार्मिक ओळख विचारून हत्या करणे हा पाकिस्तानच्या व्यापक योजनांचा एक भाग आहे. भारतीय समाजात फूट पाडणे हे पाक लष्करी सत्ताधाऱ्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. या हल्ल्याच्या माध्यमातून पाकिस्तानचा हेतू भारतीय समाजामधील धार्मिक-जातीय दरी अजून खोल करण्याचा आहे. विशेष लक्ष देण्यासारखी बाब म्हणजे, या हल्ल्यात केवळ एकच काश्मिरी मुसलमान ठार झाला. तो काश्मिरी नागरिक देखील तेव्हाच मरण पावला, जेव्हा त्याने एका दहशतवाद्याकडून बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला.

अशा परिस्थितीत भारतासाठी धोरणात्मक स्पष्टता समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. भारताने हे समजून घेतले पाहिजे की काश्मिरी जनतेचा फारसा पाठिंबा नसतानाही पाकिस्तान प्रॉक्सी युद्ध कसे चालू ठेवतो.

गेल्या पाच वर्षांत सरकारने काश्मीरमध्ये अनेक महत्त्वपूर्ण यश मिळवली आहेत. यामध्ये काश्मिरी युवक ३५ वर्षांच्या संघर्षानंतर प्रथमच दहशतवादाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे. आता दिल्लीनं पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी पाकिस्तानच्या लष्करी नीतीच्या खोटेपणाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्दाफाश करण्यासाठी आपल्या कूटनीतिक प्रयत्नांना अधिक गती दिली पाहिजे. आशिया-पॅसिफिक समूहांतर्गत ‘फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’ (FATF) च्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंगवर कडक कारवाई केली जावी. त्याचबरोबर, भारतानं अमेरिका आणि युरोपीय देशांसोबत आपली सामरिक भागीदारी अधिक बळकट करत पाकिस्तानच्या लष्करी सत्ताधाऱ्यांवर निर्बंध आणण्याचा प्रयत्न करावा. या वेळी पाकिस्तानला काश्मिरी जनतेकडून मिळणारा पाठिंबा अत्यल्प आहे. त्यामुळे भारतासाठी धोरणात्मक स्पष्टता मिळवणे खूप महत्त्वाचे आहे. भारताने अभ्यास करायला हवा की काश्मीरमध्ये लोकांचा पाठिंबा नसतानाही पाकिस्तान प्रॉक्सी युद्ध कसे चालवतो.


अयाझ वानी (PhD) हे ‘ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन’च्या स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्रॅममध्ये फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.