Author : Tanya Aggarwal

Expert Speak Digital Frontiers
Published on Jun 01, 2024 Updated 0 Hours ago

डिजिटल ट्विन तंत्रज्ञान विकसित होत असताना त्याचा प्रभाव सर्व उद्योगांवर दिसून येतो. परंतु यासाठी स्पष्ट नियम केले नाहीत तर या वाढीला संतुलित मार्गाने प्रोत्साहन देणे शक्य होणार नाही. 

डिजिटल ट्विन तंत्रज्ञान म्हणजे काय? तंत्रज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न...

तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे डिजिटल क्षेत्र आणि वास्तविक जगाचे एकत्रिकरण झाले आहे. यामुळे डिजिटल ट्विन तंत्रज्ञान हे एक अपरिहार्य साधन म्हणून उदयाला आले आहे.  या तंत्रज्ञानामुळे उद्योगांना आकार मिळतो आहे व्यवहारांमध्येही क्रांती घडते आहे. सुरुवातीच्या काळात फक्त उत्पादनाच्या स्तरावर याची कल्पना केली होती. पण आता आभासी जगात आणि भौतिक वास्तवांसाठीही हे डिजिटल तंत्रज्ञान वापरात येणार आहे. आरोग्यसेवेपासून ते शहरी नियोजन, ड्रायव्हिंगची कार्यक्षमता,  संशोधन आणि शाश्वतता अशा विविध क्षेत्रांमध्ये याचा प्रवेश होईल. विविध देशांची सरकारे तसेच संयुक्त राष्ट्रासारख्या आंतरसरकारी संस्थाही डिजिटल ट्विन्सच्या वापराबद्दल आणि डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये त्याच्या वापराबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. जागतिक दूरसंचार आणि माहितीपूर्ण समाज दिन यासारख्या मंचांवरून ही जागरूकता निर्माण करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळू शकते. भारतात खाजगी उद्योग आणि सरकारी उपक्रम या दोन्हीमध्ये नाविन्यपूर्ण डिजिटल ट्विन तंत्रज्ञानाचे मिश्रण दिसून येते. विकासाचा पहिला टप्पा पाहता या तंत्रज्ञानातील वेगवान प्रगतीचा बारकाईने मागोवा घेणे नियामकांसाठी महत्त्वाचे आहे. यामधल्या प्रमुख भागधारकांच्या मदतीने नियामक रचना बनवणे आणि सहकार्याने पुढे जाणे या पद्धती डिजिटल ट्विन तंत्रज्ञानाच्या वाढीसाठी पोषक ठरतील. 

डिजिटल ट्विन तंत्रज्ञान  

डिजिटल ट्विन हे भौतिक वस्तू किंवा प्रणालीचे आभासी प्रतिनिधित्व आहे. हे केवळ एक स्थिर मॉडेल नाही तर एक बहुआयामी मॉडेल आहे. यामध्ये रिअल टाइम किंवा जवळजवळ रिअल टाइममध्ये वास्तविक जगातील समकक्षाच्या वर्तनाची नक्कल केली जाते. ही प्रतिकृती त्याच्या भौतिक भागाशी सेन्सर्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) उपकरणे आणि इतर डेटा स्रोतांद्वारे जोडलेली आहे. यामुळे दोघांमधील डेटाची देवाणघेवाण सक्षम होते. डिजिटल ट्विन हा शब्द सगळ्यात पहिल्यांदा मिशिगन विद्यापीठात डॉ. मायकेल ग्रीव्हस यांनी 2002 मध्ये सादर केला होता. सुरुवातीच्या काळात उत्पादन क्षेत्रात ही संकल्पना मांडण्यात आली होती. त्यानंतर ही कल्पना मोठ्या प्रमाणात अॅप्लिकेशन्सचा समावेश करण्यासाठी विकसित झाली आहे. डिजिटल ट्विन मध्ये विविध परिस्थितींचे अनुकरण करून आणि डेटाचे विश्लेषण करून भविष्यसूचक देखभाल, परिपूर्ण व्यवहार आणि उत्पादन विकासामध्ये नाविन्य आणले जाते. भौतिक मालमत्ता आणि प्रक्रियांच्या कामगिरीचे परीक्षण, विश्लेषण आणि त्याची क्षमता वाढवण्यासाठी उत्पादन, आरोग्यसेवा, वाहतूक आणि शहरी नियोजन यासारख्या विविध उद्योगांमध्ये डिजिटल ट्विन्सचा वापर केला जातो. हे तंत्रज्ञान वेगवेगळ्या परिस्थितींची पडताळणी करू शकते, त्याच्या परिणामांचा अंदाज लावू शकते आणि निर्णय घेण्यासाठीही मदत करू शकते.  

हे तंत्रज्ञान वेगवेगळ्या परिस्थितींची पडताळणी करू शकते, त्याच्या परिणामांचा अंदाज लावू शकते आणि निर्णय घेण्यासाठीही मदत करू शकते.  

डिजिटल ट्विन हे सिम्युलेशनपेक्षा वेगळे असते. सिम्युलेशन ही एक व्यापक संकल्पना आहे. यामध्ये भिन्न परिस्थिती किंवा परिस्थितींमध्ये एखाद्या यंत्रणेचा अभ्यास करण्यासाठी एक मॉडेल तयार केले जाते. डिजिटल ट्विन विशिष्ट भौतिक वस्तू किंवा प्रणाली आणि त्याच्या वास्तविक-वेळेच्या वर्तनाची प्रतिकृती बनवण्यावर लक्ष केंद्रित करतात. सिम्युलेशन अधिक सामान्य असू शकतात आणि ते नेहमीच भौतिक समकक्षांशी थेट जोडलेले असू शकत नाहीत. डिजिटल ट्विन आणि सिम्युलेशन या दोन्हींमध्ये वास्तविक जगातील घटनांचे आभासी प्रतिनिधित्व तयार करणे अपेक्षित आहे. डिजिटल ट्विन अधिक विशिष्ट, गतिमान आणि अनेकदा थेट भौतिक मालमत्तेशी जोडलेले असतात तर सिम्युलेशन अधिक सामान्य असू शकतात. तसेच त्यामध्ये भौतिक वस्तू किंवा प्रणाली यांच्यात प्रत्यक्ष संवाद घडवणे शक्य नसते. 

मेटाव्हर्समध्ये डिजिटल ट्विन्स 

मेटाव्हर्समध्ये एक आभासी जागा तयार केली जाते. यामध्ये वापरकर्ते डिजिटल वातावरणाशी आणि एकमेकांशी संवाद साधतात आणि डिजिटल ट्विनिंगला अनेक प्रकारे छेदतात. मेटाव्हर्स विकसित होत असताना  समग्र आणि एकमेकांशी जोडलेले आभासी जग तयार करण्यासाठी डिजिटल ट्विन कणा म्हणून काम करू शकतात. हे तंत्रज्ञान वापरकर्त्यांना मेटाव्हर्समध्ये स्वतःचे अत्यंत तपशीलवार आणि अचूक प्रतिनिधित्व तयार करण्यास सक्षम बनवू शकते.  यामुळे वैयक्तिक स्वरूपाचे आणि खरे असल्यासारखे अनुभव घेता येतात. उदाहरणार्थ, व्हर्च्युअल शॉपिंगमध्ये उत्पादनांचे डिजिटल ट्विन्स खरेदीचे निर्णय घेण्यासाठी वापरकर्त्यांना मदत करू शकतात. शिवाय डिजिटल ट्विन्स मेटाव्हर्समधील विविध मंच आणि यंत्रणांमधली देवाणघेवाण सुलभ करतात. तसेच विविध आभासी वातावरणांमध्ये अखंड संवाद आणि परस्परसंवादही घडवून आणतात. या देवाणघेवाणामुळे परस्परसंबंधित अनुभव घेता येतात आणि जागतिक स्तरावर सहयोग आणि नवकल्पना वाढीला लागते. डिजिटल ट्विन्स विविध डोमेनमध्ये त्याची खोली, समृद्धता आणि कार्यक्षमता वाढवून मेटाव्हर्सचा लक्षणीय विस्तार करू शकतात. याव्यतिरिक्त स्मार्ट शहरे, औद्योगिक संयंत्रे किंवा नैसर्गिक वातावरण यासारख्या संपूर्ण इकोसिस्टमचा समावेश करण्याच्या उद्देशाने डिजिटल ट्विन वैयक्तिक प्रतिनिधित्वाच्या पलीकडे विस्तारू शकतात. रिअल-टाइम डेटा आणि सिम्युलेशन एकत्रित करून हे तंत्रज्ञान बहुआयामी आणि प्रतिसादात्मक आभासी जग आणखी सक्षम करते. यामुळे त्यांच्या भौतिक समकक्षांना जवळून प्रतिबिंबित करता येते.

डिजिटल ट्विन्स हे तंत्रज्ञान वापरकर्त्यांना मेटाव्हर्समध्ये स्वतःचे अत्यंत तपशीलवार आणि अचूक प्रतिनिधित्व तयार करण्यास सक्षम बनवू शकते. यामुळे वैयक्तिक स्वरूपाचे आणि खरे असल्यासारखे अनुभव घेता येतात. 

उद्योग आणि अॅप्स 

विविध उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या असंख्य अॅप्सच्या माध्यमातून डिजिटल ट्विन हे एक परिवर्तनकारी तंत्रज्ञान म्हणून उदयाला आले आहे. यामुळे संस्थांच्या कार्यपद्धतीत क्रांती झाली आहे. हे तंत्रज्ञान जटिल प्रणाली आणि प्रक्रियांचे मॉडेलिंग, देखरेख आणि क्षमता वाढवण्यासाठी एक वैविध्यपूर्ण आणि प्रभावी व्यासपीठ देते. भौतिक आणि डिजिटल जगामधला दुवा सांधून ते संस्थांना डेटानुसार निर्णय घेण्यासाठी, नाविन्य आणण्यासाठी आणि व्यवहारांमध्ये अधिक कार्यक्षमता, लवचिकता आणि टिकाऊपणा आणण्यासाठी सक्षम करतात.

उत्पादन: डिजिटल ट्विन हे भौतिक उपकरणे, उत्पादनाची साखळी आणि संपूर्ण कारखान्यांच्या आभासी प्रतिकृती तयार करून यंत्रसामग्री आणि प्रक्रियांची कार्यक्षमता, व्यवस्था आणि कार्यक्षमतेबद्दल वास्तविक-वेळ अंतर्दृष्टी प्रदान करतात. उत्पादनामधली संभाव्य समस्या ओळखून उत्पादनाचे वेळापत्रक प्रभावी करण्यासाठी आणि डाउनटाइम कमी करण्यासाठीही हे तंत्रज्ञान उपयोगी पडू शकते. या सगळ्यामुळे उत्पादकता वाढते आणि खर्चही कमी होतो. 

उत्पादनाचे व्यवस्थापन: या तंत्रज्ञानामुळे अभियंते उत्पादनांचे आभासी रूप  तयार करू शकतात आणि विविध परिस्थितींमध्ये त्यांच्या कार्यक्षमतेची पडताळणी करू शकतात. त्यामुळे उत्पादन होण्यापूर्वीच त्याच्या रचनेमध्ये सुधारणा आणि प्रमाणीकरण होऊ शकते. असे उत्पादन विकास चक्राला गती देते आणि उत्पादकांना उच्च-गुणवत्तेची उत्पादने वितरीत करण्यास सक्षम करते. त्यामुळे ग्राहकांच्या गरजाही चांगल्या प्रकारे पूर्ण होतात. 

आरोग्य क्षेत्र: या तंत्रज्ञानाद्वारे रुग्णांच्या वैद्यकीय डेटावर आधारित आभासी प्रतिकृती तयार करून चिकित्सक उपचार योजना तयार करता येतात. यामध्ये विविध शक्यतांची पडताळणी करून अधिक अचूकतेने परिणामांचा अंदाज लावता येतो. हा दृष्टिकोन रुग्ण-विशिष्ट मॉडेलिंग म्हणून ओळखला जातो.  शस्त्रक्रिया किंवा जुनाट आजारांसाठीच्या उपचारांच्या नियोजनात हे मूल्यवान ठरते. या तंत्रज्ञानाद्वारे रुग्णांचे दूरस्थ निरीक्षणही करता येते. यामुळे आरोग्य सेवा पुरवणाऱ्या यंत्रणांना लक्षणे,   औषधोपचार आणि एकूण आरोग्य स्थितीचा रिअल टाइममध्ये अंदाज लावता येतो. यामुळे रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळू शकते.  

वाहतूक क्षेत्र: डिजिटल ट्विनमुळे वेगाने दळणवळण, साधन सामग्रीचे वहन   आणि फ्लीट मॅनेजमेंट यांसारख्या क्षेत्रात नाविन्य येते आहे. वाहने, वाहतूक संरचना  आणि पायाभूत सुविधांच्या डिजिटल प्रतिकृती तयार करून सुधारणाही करता येत आहेत. यामुळे इंधनाची कार्यक्षमता वाढते आणि संपूर्ण यंत्रणेची कार्यक्षमताही सुधारते. उदाहरणार्थ,  वाहन उद्योगात डिजिटल ट्विन्सचा वापर वाहनांच्या वर्तनाची शक्यता तपासण्यासाठी, प्रगत ड्रायव्हर सहाय्य प्रणालीची चाचणी घेण्यासाठी आणि स्वायत्त ड्रायव्हिंग तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी केला जातो. त्याचप्रमाणे विमान वाहतूक क्षेत्रात एअरलाइन्सची विमान सेवा वाढवण्यासाठी तसेच देखभालीच्या गरजांचा अंदाज लावण्यासाठी आणि वैयक्तिक सेवांद्वारे प्रवाशांना चांगला अनुभव देण्यासाठी या तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होतो आहे. 

शहरी नियोजन: शहरे आणि शहरी पायाभूत सुविधांच्या आभासी प्रतिकृती तयार केल्याने शहर नियोजकांना नवीन विकास, पायाभूत सुविधा प्रकल्प, वाहतूक प्रवाह, ऊर्जेचा वापर, हवेची गुणवत्ता आणि सार्वजनिक सेवांच्या धोरणातील बदलांच्या प्रभावाची पडताळणी करता येते. डिजिटल ट्विनमुळे रिअल-टाइम मध्ये जागरुकता निर्माण करून नैसर्गिक आपत्ती आणि इतर संकटांचे भविष्यसूचक मॉडेलिंग सक्षम करता येते. त्यानुसार आपत्कालीन प्रतिसादाचे नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापन करता येते. 

भारतात डिजिटल ट्विनचा उपयोग   

भारतात खाजगी क्षेत्रात अनेक स्टार्टअप डिजिटल ट्विन तंत्रज्ञानाचा समावेश करत आहेत.  उदाहरणार्थ, Paninian ही कंपनी एरोस्पेस उत्पादनांसाठी डिजिटल ट्विनची मदत घेते आहे.   TwinGrid Labs क्लाउड-कॉम्प्युटिंग आणि मशीन लर्निंग सुधारण्यासाठी विशिष्ट डिजिटल ट्विन तंत्रज्ञान विकसित करते आहे. तसेच SwitchOn  ही कंपनी उत्पादनांच्या कार्यक्षमतेचा अंदाज लावण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरते आहे. उत्पादन क्षेत्रासाठी स्वयंचलित तपासणी विकसित करण्यासाठी डिजिटल ट्विन तंत्रज्ञानाचा वापर होतो आहे. भारत सरकारने आर्थिक वाढीसाठी आणि नवकल्पना राबवण्यासाठी डिजिटल ट्विन तंत्रज्ञानाचे महत्त्व ओळखले आहे. संगम : डिजिटल ट्विन सारख्या उपक्रमांद्वारे 2035 पर्यंत मोठ्या शहरांसाठी डिजिटल ट्वनि तयार करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. हा अनेक क्षेत्रांना एकत्र आणणारा उपक्रम आहे. यामध्ये उद्योग, शिक्षण आणि आणि स्टार्टअपमधील तज्ज्ञांना एकत्र आणले जाते. दूरसंचार सचिवांनी संगम उपक्रमाच्या भारताच्या पायाभूत सुविधांमध्ये परिवर्तन करण्याच्या क्षमतेवर भर दिला आहे. भारत सरकारने धोरण तयार करणे, शहर नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापन सुधारण्यासाठी जेनेसिस इंटरनॅशनल या खाजगी मॅपिंग कंपनीसोबत भागीदारी केली आहे. हे योग्य दिशेने टाकलेले पाऊल असले तरी डिजिटल ट्विन्सच्या पूर्ण वापरासाठी संरचनेचा अभाव आहे. त्यामुळे देशाच्या विद्युतक्षेत्रात स्वच्छ ऊर्जेसारख्या क्षेत्रांमध्ये या तंत्रत्रानाची क्षमता वापरता येत नाही. 

भारत सरकारने धोरण तयार करणे, शहर नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापन सुधारण्यासाठी जेनेसिस इंटरनॅशनल या खाजगी मॅपिंग कंपनीसोबत भागीदारी केली आहे.

जसजसे डिजिटल ट्विन तंत्रज्ञान विकसित होत आहे तसतसा त्याचा प्रभाव संपूर्ण उद्योगांवर अधिक खोलवर होत जाईल. सरकारी धोरणे, नियोजन आणि संसाधनांचे व्यवस्थापन या क्षेत्रांत हे तंत्रज्ञान अधिक प्रभावी ठरेल. यामुळे सार्वजनिक सेवाही सुधारतील. डिजिटल ट्विन तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत डिजिटल अंतर भरून काढण्यास मदत करेल. य़ामुळे संयुक्त राष्ट्रे आपली शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकतील. योग्य नियामक यंत्रणा असेल आणि प्रमुख भागधारकांचे सहकार्य असेल तर डिजिटल ट्विन तंत्रज्ञान असंख्य क्षेत्रांसाठी अनुकूल ठरू शकते. त्यासाठी स्पष्ट नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांची गरज आहे. खाजगी क्षेत्राच्या नेतृत्वाखाली केलेली तांत्रिक प्रगती ही सततच्या जागतिक समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय देऊ शकते. या तंत्रज्ञानातून मिळणाऱ्या फायद्यांचे योग्य व न्याय्य  वितरण करणे ही मात्र सरकारची जबाबदारी आहे. 


तान्या अग्रवाल या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये संशोधन सहाय्यक आहेत. 

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.