Expert Speak Raisina Debates
Published on Jan 15, 2025 Updated 1 Hours ago

ट्रम्प यांच्या पूर्वीच्या NATO संबंधित दृष्टिकोनामुळे युरोपमध्ये आण्विक आणि सुरक्षेसंबंधी धोके वाढले आहेत, आणि अधिक अस्थिरता रोखण्यासाठी अमेरिकेला NATO शी आपली वचनबद्धता पुन्हा स्पष्ट करावी लागेल.

डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष आणि NATO चा आण्विक दृष्टिकोन

Image Source: Getty

फेब्रुवारी 2024 मध्ये, त्यावेळचे रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्षीय उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन (NATO) च्या युरोपीय सदस्यांनी ठरवलेल्या 2 टक्के GDP संरक्षण खर्चाच्या लक्ष्यावर असंतोष व्यक्त केला आणि त्यांना ते 3 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे आवाहन केले. त्यांनी या अटी पूर्ण न करणाऱ्या सदस्यांना संरक्षण देण्यास नकार देण्याची धमकी देखील दिली.

ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात अमेरिका-केंद्रित (US-centric) दृष्टिकोनाचा प्रभाव होता आणि त्याच पद्धतीने त्यांचा आगामी दुसरा कार्यकाळ देखील असाच असण्याची अपेक्षा आहे. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान, ट्रम्प यांनी बायडेन प्रशासनाच्या सहभागाच्या पातळीवर वारंवार टीका केली. फेब्रुवारी 2024 मधील भाषणात, ट्रम्प यांनी NATO संरक्षण खर्चाच्या मुद्द्याचा वापर करून अमेरिका युक्रेनचा प्रमुख समर्थक राहण्यापासून माघार घ्यावी, यासाठी आपली भूमिका अधिक बळकट केली.

ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात अमेरिका-केंद्रित (US-centric) दृष्टिकोनाचा प्रभाव होता आणि त्याच पद्धतीने त्यांचा आगामी दुसरा कार्यकाळ देखील असाच असण्याची अपेक्षा आहे.

जुनी युद्धे, जुने अध्यक्ष

नोव्हेंबर 2024 मध्ये, ट्रम्प यांचे भाषण फक्त शक्यता नसून त्यांच्या आधीच्या कार्यकाळातील कृतींचे स्मरण आहे. 2019 मध्ये, ट्रम्प प्रशासनाने INF करार (1987 मधील इंटरमीडिएट-रेंज न्यूक्लियर फोर्सेस करार) मधून माघार घेतली, ज्यामुळे अमेरिके-रशिया दरम्यान अण्वस्त्र तैनात करण्याबाबतची चर्चा फक्त न्यू START ( स्ट्रैटजिक आर्म्स रिडक्शन ट्रीटी) करारच बाकी आहे. न्यू START करारावर अनेक तज्ज्ञ आणि स्वतः ट्रम्प यांनीही टीका केली आहे, कारण ट्रम्प यांना हा करार अपुरा वाटतो आणि त्याऐवजी एक नवीन करार करण्याची इच्छा आहे. यावर्षीच्या सुरुवातीला, रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी असा दावा केला होता की लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या स्वरूपात युक्रेनला मिळणाऱ्या पश्चिमी देशांच्या समर्थनास उत्तर म्हणून रशियन अण्वस्त्र प्रतिसाद घडवू शकते. अनेक अमेरिकन धोरण तज्ज्ञांनी हे जवळपास अशक्य परिणाम मानले असले तरी, पुतिन यांच्या विधानामुळे माघार घ्यावी अशी अमेरिकी भावना तयार झाल्याचे दिसते.

न्यू START करारावर अनेक तज्ज्ञ आणि स्वतः ट्रम्प यांनीही टीका केली आहे, कारण ट्रम्प यांना हा करार अपुरा वाटतो आणि त्याऐवजी एक नवीन करार करण्याची इच्छा आहे.

अमेरिकेची युक्रेनमधून माघार युरोपियन शक्तींवर थेट परिणाम करेल, ज्यामुळे जर्मनीसारख्या देशांना अधिक प्रमुख भूमिका घेणे आणि त्यांच्या संरक्षण बजेटमध्ये वाढ करणे भाग पडेल, ज्याबाबत त्यांनी आजवर विलंब केला आहे. यामुळे युरोपमधील आघाड्यांवर आणि NATO च्या एकात्मतेवर ताण निर्माण होईल. रशियाच्या अण्वस्त्र रणनीतीमुळे NATO तसेच युरोपियन युनियन (EU) आणि अमेरिका यांच्यातील तणाव अधिकच वाढेल. मागील ट्रम्प प्रशासनाने NATO मधून बाहेर पडण्याची धमकी दिली होती. ही धमकी प्रत्यक्षात आली नाही, परंतु या भीतीमुळे चीन आणि रशियासारख्या स्पर्धक जागतिक शक्तींना NATO आणि अमेरिका स्वतंत्र काम करू शकत नसल्याचे संकेत मिळाले. EU आणि NATO यांच्यावर त्यांच्या लष्करी ताकदी वाढवण्याचा दबाव वाढू शकतो, ज्यामुळे युरोपमधील आणि अमेरिकेसोबतच्या भू-राजकीय मतभेद अधिकच वाढू शकतात. जुलै 2024 मध्ये झालेल्या 75व्या वर्धापनदिन शिखर परिषदेत, NATO ने रशियाच्या विरोधातील भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. तथापि, अमेरिकेवरील सततची अवलंबिता आणि युक्रेनला पूर्ण सदस्यत्व देण्याबाबतचा संकोच यामुळे या प्रयत्नांना मर्यादा आल्या आहेत.

अण्वस्त्र रणनीती आणि NATO

2024 मध्ये वॉशिंग्टन डी.सी. येथे झालेल्या शिखर परिषदेत, NATO ने अण्वस्त्र आणि त्याच्या विकासाबाबतची भूमिका पुन्हा स्पष्ट केली, अण्वस्त्रांना आंतरराष्ट्रीय सुरक्षिततेचे आणि प्रतिबंधाचे साधन म्हणून मानले, विशेषतः रशिया-युक्रेन युद्धाच्या प्रतिसादात. यापूर्वी नमूद केल्याप्रमाणे, रशियानेही अण्वस्त्र वापरण्याची तयारी असल्याचे पुन्हा स्पष्ट केले आहे. रशिया आणि NATO देशांनी अण्वस्त्र वापरासंदर्भात केलेल्या या सूचनांमुळे अण्वस्त्र अप्रसार करार (NPT) आणि अण्वस्त्र प्रसार रोखण्याच्या त्याच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही, हे अधोरेखित होते. याशिवाय, फिनलँड आणि स्वीडनने NATO मध्ये प्रवेश केल्याने NPT वर परिणाम होऊ शकतो. आत्तापर्यंत, या देशांनी अण्वस्त्र असलेल्या आघाड्यांपासून दूर राहणे पसंत केले होते. जरी या देशांकडे अण्वस्त्र नाहीत, तरी आता ते NATO चे सदस्य आहेत आणि त्याच्या अण्वस्त्र संरक्षणाखाली आहेत. या समावेशनामुळे या नवीन सदस्यांना GDP च्या 2 टक्के संरक्षण खर्चाचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक असेल.

ट्रम्प यांच्या NATO आणि युरोपच्या लष्करी खर्चावरील दीर्घकालीन टीकेमुळे अटलांटिकपार संबंधांवर कायमस्वरूपी परिणाम झाला आहे. फ्रान्स आणि जर्मनीसारखे देश स्वायत्तपणे कार्यान्वित लष्करी प्रणाली अधिक विकसित करू शकतात, ज्यामुळे सुरक्षेच्या धोक्यांना सामोरे जाण्यासाठी NATO वेगवेगळ्या दृष्टिकोनांचा अवलंब करू शकेल. याशिवाय, युरोपीय लष्करासाठी अधिक आक्रमक धोरणाच्या ट्रम्प यांच्या समर्थनामुळे युरोपच्या अमेरिकेवरील लष्करी प्रतिबंधासाठीच्या अवलंबित्वाचे पुनर्मूल्यांकन होऊ शकते.

NATO चे पुन्हा पुष्टीकरण आणि अण्वस्त्र सुरक्षिततेचे मजबुतीकरण

NATO मधून माघार घेण्याऐवजी किंवा त्यामधील सहभाग कमी करण्याऐवजी, अमेरिका या प्रदेशाकडे अधिक व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहू शकते, आघाडीच्या संरक्षण धोरणाला पुनरुज्जीवित करताना तिच्या अण्वस्त्र प्रतिबंध क्षमतांना आधुनिक सुरक्षा वातावरणासाठी मजबूत आणि सुसंगत ठेवू शकते. पुढील अध्यक्षीय कार्यकाळ NATO भागीदारांसोबतच्या संबंधांना पुनरुज्जीवित करण्याची आणि सामूहिक संरक्षण व अण्वस्त्र सुरक्षिततेच्या हमी पुनरुज्जीवित करण्याची संधी प्रदान करतो.

याशिवाय, अमेरिका अण्वस्त्रांचा धोका लक्षात घेऊन, विशेषतः युरोप आणि पश्चिम आशियासाठी, शस्त्र नियंत्रणाच्या समर्थनासाठी पुढाकार घेऊ शकते आणि घेणे आवश्यक आहे. ट्रम्प यांचे इराणविरोधी "कमाल दबाव" अभियान तुर्किये सोबतच्या तणावासह अनेक संघर्षांना कारणीभूत ठरले आहे, परंतु प्रतिबंध आणि धोरण यांचे संतुलन अधिक यशस्वी ठरू शकते. ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीसारख्या देशांसोबतचे संबंध टिकवून, जे आधीच या समस्येवर काम करत आहेत, अमेरिका तेहरानने दिलेल्या अण्वस्त्र धोक्याला सामोरे जाऊ शकते आणि या प्रदेशात स्थैर्य पुन्हा प्रस्थापित करण्यात मदत करू शकते. अमेरिकेने शस्त्र नियंत्रण करारांचे, विशेषतः अमेरिके-रशियामधील न्यू START कराराचे पालन सुरू ठेवले पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय यंत्रणांद्वारे अण्वस्त्र प्रसार थांबवण्याच्या प्रयत्नांचे नेतृत्व करत राहिले पाहिजे.

अमेरिकेने NATO आणि त्याच्या सहयोगी देशांसोबत मिळून-मिसळून राहिले पाहिजे, सामूहिक संरक्षण आणि अण्वस्त्र प्रतिबंध यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित करत, आणि त्याचवेळी अण्वस्त्र प्रसार रोखण्यासाठी व विनाशकारी संघर्षाचा धोका कमी करण्यासाठी प्रयत्न पुढे नेले पाहिजेत.

बदललेल्या भू-राजकीय परिस्थितीत, जिथे नवीन अण्वस्त्र शक्ती उदयास येत आहेत आणि स्टेट व नॉन स्टेट घटक आघाड्यांना आव्हान देत आहेत, तिथे NATO ने केवळ आपल्या अण्वस्त्र धोरणाची पुनर्बांधणीच केली पाहिजे असे नाही, तर सामायिक सुरक्षा, कूटनीती आणि शस्त्र नियंत्रणाच्या आधारावर सदस्यांना एकत्र आणले पाहिजे. अमेरिकेने NATO आणि त्याच्या सहयोगी देशांसोबत मिळूनमिसळून राहिले पाहिजे, सामूहिक संरक्षण आणि अण्वस्त्र प्रतिबंध यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित करत, आणि त्याचवेळी अण्वस्त्र प्रसार रोखण्यासाठी व विनाशकारी संघर्षाचा धोका कमी करण्यासाठी प्रयत्न पुढे नेले पाहिजेत. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील धोरणांमुळे NATO च्या संरक्षण आणि अण्वस्त्र सुरक्षेच्या रणनीतींमध्ये लक्षणीय बदल झाले, ज्यामुळे आघाडीचे दुर्बलीकरण झाले. स्थिर आणि सुरक्षित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या पायाभूत तत्वांना मजबूत ठेवण्यासाठी NATO ने ठाम, दृढ राहून पारंपरिक आणि अण्वस्त्र धोक्यांना प्रतिसाद देण्यास सक्षम असले पाहिजे. माघार घेण्याऐवजी, अमेरिकेने NATO शी आपली बांधिलकी पुन्हा दृढ करावी, अण्वस्त्र सुरक्षा उपायांना चालना द्यावी आणि उदयोन्मुख धोके हाताळण्यासाठी आपल्या सहयोगी देशांसोबत सहकार्य करावे.


श्रविष्ठा अजयकुमार या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमधील सेंटर फॉर सिक्युरिटी, स्ट्रॅटेजी अँड टेक्नॉलॉजीमध्ये असोसिएट फेलो आहेत.

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.

Author

Shravishtha Ajaykumar

Shravishtha Ajaykumar

Shravishtha Ajaykumar is Associate Fellow at the Centre for Security, Strategy and Technology. Her fields of research include geospatial technology, data privacy, cybersecurity, and strategic ...

Read More +