१८ सप्टेंबर रोजी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडाचा नागरिक आणि खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येमागे भारतीय हात असल्याचा आरोप केला. दोन आठवड्यांनंतरही, हे आरोप अद्याप सिद्ध होत नसले तरी, चालू घडामोडींनी भारताच्या गुप्तचर सेवेविषयी- विशेषत: संशोधन आणि विश्लेषण विभागाबद्दल (रॉ) जगभरात उत्सुकता निर्माण केली आहे.
निज्जरच्या हत्येला टोळीतील शत्रुत्वातून तसेच फुटीरतावादाबाबत भारताला वाटणाऱ्या वाजवी चिंतेतून झाल्यासंदर्भातील तज्ज्ञांच्या मतांकडे दुर्लक्ष करून, सध्याच्या सरकारचे गुप्त हत्या यंत्र म्हणून ‘रॉ’चे परीक्षण करण्यावर जागतिक प्रयत्न मोठ्या प्रमाणावर केंद्रित आहेत. म्हणजेच विस्ताराने, त्यांचा रशियन आणि सौदी गुप्तचर मोहिमांशी असलेला निराधार सारखेपणा शोधून काढला जात आहे. अशी विश्लेषणे भारताच्या गुप्तचर संस्कृतीचे अचूक प्रतिबिंब होऊ शकत नाही, तसेच भारताच्या गुप्तचर संस्कृतीत लक्ष्यित हत्यांना स्थान नाही.
निज्जरच्या हत्येला टोळीतील शत्रुत्वातून तसेच फुटीरतावादाबाबत भारताला वाटणाऱ्या वाजवी चिंतेतून झाल्या संदर्भातील तज्ज्ञांच्या मतांकडे दुर्लक्ष करून, सध्याच्या सरकारचे गुप्त हत्या यंत्र म्हणून ‘रॉ’चे परीक्षण करण्यावर जागतिक प्रयत्न मोठ्या प्रमाणावर केंद्रित आहेत.
गुप्तचर संस्कृती, दहशतवाद आणि लक्ष्यित हत्या
सर्व राष्ट्रांची विलक्षण गुप्तवार्ता संस्कृती आहे, जी त्यांच्या संबंधित कल्पना व अस्मितेद्वारे निर्धारित केली जाते आणि संस्थात्मक निवडी, कार्यपद्धती व धोरणांवर प्रभाव टाकते. उदाहरणार्थ, या संदर्भातील अमेरिकी धोरण- निर्णय घेण्याची प्रक्रिया सर्वोच्च स्तरावर करणे आणि नंतर बाकीच्या संघाला कळवली जाणे, या दृष्टिकोनाचे अनुसरण करते, ज्याचे श्रेय मुख्यत्वे अमेरिकी ‘सिद्धांत-चालित राजकीय प्रघाताला’ दिले जाते. जरी त्याचे अनेकदा उल्लंघन झाले असले तरी, शीतयुद्धाच्या काळात, लोकशाही पर्यवेक्षण, तांत्रिक वर्चस्व आणि सभ्यपणे केली जाणारी हेरगिरी अशी अमेरिकी गुप्तवार्ता संस्कृतीची व्याख्या केली गेली होती. ९/११ च्या हल्ल्यानंतर बदललेल्या अमेरिकी धोरणात्मक वातावरणाने त्यात आमूलाग्र बदल घडवून आणला. जगाला ‘आपण’ आणि ‘ते’ (दहशतवादी) असे विभागून टाकणाऱ्या बुश यांच्या निर्देशाने त्याला बळकटी मिळाली. अमेरिकी गुप्तवार्ता संस्कृती अधिक लष्करी बनली, जिथे ‘माग काढणे आणि लक्ष्य करण्याची’ जागा ‘आंतरराष्ट्रीय समुदायासह भौगोलिक घटकांच्या प्रभावाखालील आंतरराष्ट्रीय संबंधांनी’ घेतली. या परिवर्तनासह, कायदेशीर साधन म्हणून लक्ष्यित हत्यांचा स्वीकार वाढत गेला. काही अभ्यासकांनी याचे वर्णन ‘नियमांचे परिवर्तन’ असे केले— अमेरिकी गुप्तवार्ता संस्कृतीविषयीच्या अमेरिकी धोरणात- निर्णय घेण्याची प्रक्रिया सर्वोच्च स्तरावर होते आणि तो निर्णय नंतर बाकीच्या संघाला कळवला जातो, या दृष्टिकोनाचे स्पष्ट प्रतिबिंब दिसून येते.
दुसरीकडे, इस्रायली गुप्तवार्ता ‘व्यावहारिकतेचे तत्त्वज्ञान’ अवलंबते. यात निर्णय घेण्याची प्रक्रिया संघाकडून होते आणि ती वरिष्ठ स्तराला कळवली जाते, अशी पद्धत अनुसरली जाते, ज्यात वास्तव जगातील समस्यांवर व्यावहारिक उपाय विकसित करण्यासाठी कनिष्ठ श्रेणींना पुढाकार घेण्यास आणि नाविन्यपूर्णता अवलंबिण्यास मोठा वाव आहे. या संस्कृतीत, लक्ष्यित हत्या हा नियमांचा विषय नसून कामाची गरज म्हणून त्याकडे पाहिले जाते. म्हणूनच, इस्त्रायलमधील चर्चा क्वचितच त्याच्या कायदेशीरपणाविषयी होते आणि अनेकदा मोहिमांविषयी व परिणामांविषयी असतात. मोजपट्टीच्या अत्यंत टोकाला हुकूमशाही राजवटी आहेत. त्यांच्यामध्ये पुष्कळ फरक असूनही, लक्ष्यित हत्यांमागचा हेतू, व्यापकपणे असंतुष्टांमध्ये (किंवा देशद्रोही, त्यांच्या नावानुसार) भीती निर्माण करणे हा आहे.
भारतीय गुप्तवार्ता संस्कृती अमेरिकी आणि इस्रायली गुप्तवार्ता संस्कृतीच्या मध्ये कुठेतरी येते आणि भारतीय गुप्तवार्ता नेतृत्वाच्या स्तरावर आधारलेली आहे. त्याची मुळे भारतीय स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या वर्षांत दडलेली आहेत, जेव्हा गुप्तवार्ता विभागाला लक्षात आले की, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांना हाताळण्यासाठीच्या राजकीय रणनीतीत आदर्शवादाच्या भावना आहेत, त्यामुळे गुप्तचर मोहिमांवर अडथळा आणणारा प्रभाव पडला. या पैलूवर चिंतन करताना, टी जी संजीवी, पहिले गुप्तवार्ता विभाग प्रमुख, यांनी नमूद केले की, ‘त्यांना वारंवार त्यांच्या सरकारला अनभिज्ञ ठेवून स्वतंत्र कारवाई करावी लागली’. त्यामुळे, एकापाठोपाठ एक आलेल्या गुप्तचर विभागप्रमुखांनी, राजकीय नेतृत्वाने मांडलेल्या व्यापक चौकटींना न जुमानता सिद्धांत व कार्यकारी पद्धती विकसित करण्यात आणि नाविन्यपूर्णता अवलंबिण्यात स्वायत्तता प्राप्त केली आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, काहीसे अमेरिकी व्यवस्थेप्रमाणे, भारतीय गुप्तचर सेवा राजकीय नेतृत्वाने दिलेल्या चौकटीत काम करतात, परंतु राष्ट्रीय सुरक्षाविषयक धोक्यांचा सामना करण्यासाठी साधने शोधण्यात गुप्तचर नेतृत्वाला उच्च दर्जाची स्वायत्तता असते.
भारतीय धोरणात्मक प्राधान्य: हृदय आणि मने जिंकणे
बंडखोर हे ‘आपले लोक’ आहेत, ज्यांना सुधारणे आवश्यक आहे आणि मुख्य प्रवाहातील लोकशाही प्रक्रियेत सहनियुक्त करणे आवश्यक आहे, अशा जवाहरलाल नेहरूंच्या आग्रही दृष्टिकोनाने भारताच्या बंडखोरीविरोधी गुप्तचर सिद्धांताचा पाया घातला. बंडखोरीविरोधी आणि दहशतवादविरोधी काम करणार्या अनेक गुप्तचर नोकरशाहीद्वारे चालवल्या जाणार्या भविष्यातील सर्व मोहिमांचा हा आधार बनला. यात अंतःकरण आणि मने जिंकणे (सावध, संयमशील आणि थेट कारवाई किंवा सक्ती टाळणारा दृष्टिकोन) आणि लक्ष्य दूर करणे (कठीण दृष्टिकोन) यांच्यातील स्पष्ट विभाजनाचा विचार करण्यात आला आहे. पहिल्याला अत्यंत महत्त्व दिले गेले आणि ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी गुप्तचर विभागाला धोरणाचा समन्वय साधण्याची आणि अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपवली गेली. ‘रॉ’ चे माजी प्रमुख आणि एक माजी गुप्तचर विभागाचे अधिकारी के सी वर्मा यांनी नमूद केले की, गुप्तवार्ता विभागाचे सर्वात मोठे योगदान म्हणजे बंडखोर नेत्यांसोबत विभागाच्या वैयक्तिक अधिकाऱ्यांची असलेली ‘उच्च दर्जाची विश्वासार्हता’ आहे, जी व्यावसायिकता आणि ‘प्रशंसनीय सहसंवेदने’चा परिणाम आहे. संघर्ष व्यवस्थापनाऐवजी संघर्ष निराकरणात धोरणात्मक दृष्टीकोन घेणे हे या प्रारूपाचे सार होते. यात कोणतेही आश्चर्य नाही की, अनेक बंडखोर चळवळी आता भारताच्या राजकीय प्रक्रियेचा भाग बनल्या आहेत आणि कोणतीही फुटीरतावादी चळवळ कधीही यशस्वी झालेली नाही.
कामकाजाच्या दृष्टिकोनातून, गुप्तवार्ता विभागाने हे- संघर्ष निराकरणाच्या कौटिल्य पद्धतीद्वारे- म्हणजेच- मन वळवणे, लाचखोरी आणि लबाडी (फोडा आणि राज्य करा) याद्वारे साध्य केले. ‘फूट पाडा आणि राज्य करा’ या रणनीतीवर सर्वाधिक भर दिला गेला आणि संघर्ष क्षेत्रात कार्यरत असलेल्या इतर सुरक्षाविषयक नोकरशाहीने त्याचे अनुकरण केले. १९६८ मध्ये जेव्हा ‘रॉ’ची निर्मिती करण्यात आली तेव्हा संस्थेने कामाकाजाचा तत्सम सिद्धांत स्वीकारला होता. असा विश्वास होता की, भारताच्या शेजारीही भारताच्या हेतूंबद्दल ‘दिशाभूल’ झालेले आणि भारताच्या सुरक्षाविषयक चिंतांबद्दल ‘चुकीची माहिती’ असलेले विभाग आहेत आणि म्हणूनच, त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. यामुळे धोरणात्मक गुप्तचर विकासाबरोबरच, शेजाऱ्यांचे राजनैतिक आणि नागरी समाजातील महत्त्वाचे विभाग लाभदायक ठरतील, हे पाहणे ही संस्थेची मुख्य जबाबदारी बनली, ज्याचा उद्देश भारत-समर्थक धोरणे सुलभ करणे आहे.
आश्चर्यकारकपणे, अनेक बंडखोर चळवळी आता भारताच्या राजकीय प्रक्रियेचा भाग आहेत आणि कोणतीही फुटीरतावादी चळवळ कधीही यशस्वी झाली नाही.
या ‘हृदय जिंकणे आणि मन जिंकणे’ उद्दिष्टाचा पाठपुरावा करत, ‘रॉ’चा मनोवैज्ञानिक युद्ध विभाग त्याच्या सर्वात सक्रिय विभागांपैकी एक राहिला आहे. सुरुवातीच्या मोहिमा १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान दिसून आल्या, जेव्हा त्यांनी युरोपीय आणि उत्तर अमेरिकी लोकांसमोर बंगाली दु:खद स्थिती उजेडात आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आशा होती की, आंतरराष्ट्रीय जनमत त्यांच्या देशांच्या परराष्ट्र धोरणाला सकारात्मक आकार देईल. नंतर, पंजाब आणि काश्मीरमध्ये समस्या सुरू झाल्याने, मनोवैज्ञानिक युद्ध विभाग जगभरातील उपखंडात विखुरलेल्या जगताकडून समर्थन मिळवण्याकरता, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानी अतिशयोक्ती भरलेल्या माहितीचा प्रतिकार करण्यासाठी सक्रिय राहिला. तेव्हापासून, पाश्चिमात्य देशांमध्ये ‘रॉ’ स्थानके अधिकृतरीत्या दुहेरी बाबतीत कार्यरत आहेत. पहिला म्हणजे, सकारात्मक द्विपक्षीय संबंध वाढवण्याच्या उद्देशाने तेथील भारतीय लोकांसोबत दीर्घकाळ टिकणारे संबंध प्रस्थापित करणे. दुसरा, भारतातील फुटीरतावादी चळवळींना पाठिंबा देणाऱ्या तेथील भारतीय वर्गाचे निरीक्षण करणे, त्यात प्रवेश करणे आणि त्या गोष्टी कुशलतेने हाताळणे. संस्थेने रिपुदमन सिंग मलिकचे भारताकरता उपयुक्त ठरेल असे यशस्वी रूपांतर करणे हे नंतरचे प्रकरण आहे.
लक्ष्यित हत्या: नियमांमुळे नव्हे तर आवश्यकतेमुळे मान्य न होण्यासारखे निर्माण झालेले वास्तव
तरीही, दहशतवादविरोधी, विशेषत: जेव्हा देश-प्रायोजित दहशतवाद, एक जटिल आव्हान बनते, जे ‘त्यात प्रवेश करणे आणि त्या गोष्टी कुशलतेने हाताळणे’ रणनीतीला प्रतिकार करते. त्याहूनही अधिक म्हणजे, जेव्हा गुप्तचर संस्थांनी, सक्रिय उपाय योजण्याकरता राजकीय संयमादरम्यान प्रत्येक संभाव्य दहशतवादी जोखिमांचा अंदाज लावणे आणि त्यांना रोखणे अपेक्षित होते, तेव्हा गुप्तचर संस्थांना नाविन्यपूर्ण प्रयत्न करावे लागले. या संदर्भात, भारतीय गुप्तचर संस्था कठोर लक्ष्ये नष्ट करण्यासाठी ‘फोडा आणि राज्य करा’ नियमांची रणनीती वाढवतात, हे लक्षात येऊ शकते. नव्वदीच्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात काश्मीरमध्ये कुक्का परे यांच्या नेतृत्वाखाली माजी अतिरेक्यांना रोजगार पुरवला गेला, हे याचे उदाहरण आहे. भारतीय गुप्तवार्ता विभाग आंतर-गटांतील शत्रुत्वामुळे होणाऱ्या हत्यांकडे डोळेझाक करत असल्याची अधिक सूक्ष्म उदाहरणे ईशान्येकडील बंडखोरीत पाहिली जाऊ शकतात. देशाच्या धोरणात्मक उद्दिष्टांबाबत समर्थन निर्माण करण्याच्या उद्देशाने माहिती देण्यासाठी आणि प्रभाव पाडण्यासाठी परदेशी लोकांशी थेट संवाद साधण्याकरता विविध सरकारी प्रयत्न हे रक्तपाताच्या घटनांहून अधिक शक्तिशाली ठरतात. ‘रॉ’चे माजी अधिकारी बी रमण यांनी सांगितले, ‘देशातील दुरावलेल्या वर्गांशी व्यवहार करताना दहशतवाद हा त्यांना दिलासा देणारा उपचार ठरत नाही आणि ठरणारही नाही, हे दर्शवण्यासाठी प्रत्यक्षात ठोस कृतीचे मिश्रण असणे’ हा भारताचा दहशतवादविरोधी दृष्टिकोन आहे.’
भारतीय गुप्तवार्ता विभाग आंतर-गटांतील शत्रुत्वामुळे होणाऱ्या हत्यांकडे डोळेझाक करत असल्याची अधिक सूक्ष्म उदाहरणे ईशान्येकडील बंडखोरीत पाहिली जाऊ शकतात.
या दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी दहशतवादामागील देशाचे प्रायोजकत्व उघड करण्याचा आणि भारताला उपयुक्त ठरेल, अशी प्रभावशाली लक्ष्ये निवडण्याचा प्रयत्न आहे, जे भारतीय हेरांचे मुख्य कार्य राहिले आहे. भारताच्या शेजारच्या जिहादी किंवा गुन्हेगारांचा खात्मा करण्याचे प्रसंग जेव्हा उद्भवले, तेव्हा समस्या ज्यांच्यामुळे निर्माण झाली, त्यांच्यावर निर्णायक कारवाई करण्यातील संबंधित सरकारच्या अक्षमतेबद्दल गुप्तचर संस्थांची निराशा दिसून येते. शेजारी राष्ट्रांच्या पलीकडच्या प्रदेशात अशा मोहिमा कधीच केल्या गेल्या नाहीत. ट्रुडो यांचे अन्यायकारक आरोप आणि कृती यामुळे निर्माण झालेल्या राजकीय वादळात अडकलेल्या, भारत सरकारने- केलेल्या गुन्ह्याच्या संबंधात पोलिसांकडून शोधले जात असलेले कॅनडात राहणारे गुन्हेगार आणि फुटीरतावादी यांच्याविषयी गुप्तवार्ता विभागाकडे असलेल्या माहितीच्या कागदपत्रांचा अवलंब केला आहे. ही कृती देश-प्रायोजित दहशतवादाला भारतातर्फे दिल्या जाणाऱ्या पारंपरिक प्रतिसादाच्या अनुषंगाने आहे, म्हणजेच, आंतरराष्ट्रीय समूहासमोर ही गोष्ट उघड करणे.
म्हणूनच, भारताची गुप्तवार्ता संस्कृती ऐतिहासिकदृष्ट्या त्याच्या संघर्ष निराकरण धोरणाकरता ओळखली जाते, जी देशाकरता उपयुक्त ठरण्यासाठी लक्ष्यांना प्रवृत्त करते, लाच देते आणि कुशलतेने हाताळते. हे भारतात आणि परदेशातही सातत्याने केले जाते. हिंसक उपाय हे कठोर लक्ष्यांना उद्देशून मान्य न होण्यासारखे वास्तव आहे आणि शेजारच्या पलीकडे ते आजपर्यंत वापरले गेलेले नाही. सत्तेतील राजवट आणि विचारसरणीची पर्वा न करता, भारतीय गुप्तचर सेवा नेहमीच राष्ट्रीय सुरक्षेच्या गरजांकडे लक्ष देत असतात. त्यांना निवडक सरकारांच्या अखत्यारीत कामाचे अधिक स्वातंत्र्य मिळाले आहे, ज्यामध्ये सद्य सरकारचा समावेश आहे. मात्र, हे स्वातंत्र्य आपोआप आपल्या संस्कृतीत बदल दर्शवत नाही. काही भाष्यकार सुचवत आहेत त्याउलट, निश्चितच गुप्तचर सेवांनी दहशतवादी आणि असंतुष्ट यांच्यातील भेद जाणला आहे. अशा निष्कर्षांना, पूर्वग्रहदूषित मते आणि परिस्थितीजन्य मूल्यांकने नव्हे, तर ठोस पुरावे आवश्यक असतात. थोडक्यात, भारतीय गुप्तवार्ता संस्कृती अधिक जटिल आणि टिकून राहण्याची क्षमता असलेली आहे आणि भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या गरजांना ती विचारसरणीपेक्षा अधिक प्राधान्य देते.
धीरज परमेश छाया हे इंग्लंडच्या हल युनिव्हर्सिटीच्या क्रिमिनोलॉजी विभागातील गुप्तवार्ता आणि सुरक्षा या विषयाचे व्याख्याते आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.